मला स्पेस हवी पर्व २ भाग २५ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग २५

___________________________


मला स्पेस हवी पर्व २ भाग २५

मागील भागात आपण बघीतलं की रमण नेहाजवळ माफी मागायला आला होता. आता बघू.


आता या भागात बघू

रमण घरी आला आणि सोफ्यावर बसला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण इतका वेळ घेतलेलं ऊसनं अवसान आता पूर्णपणे संपलय. त्यामुळे त्याला खूप थकल्यासारखं वाटायला लागलं.

रमण डोळे मिटून बसला होता आणि त्याचे डोळे मात्र अश्रुंमधे मनातलं दुःख वाहून जावं म्हणून प्रयत्न करत होते. त्याचवेळी छकू समोरच्या खोलीत आली आणि रमणला अशा स्थितीत बघून जागीच थबकली.

रमणला आता काय त्रास होतो आहे हे छकूच्या लक्षात येत नव्हतं.

‘ याच्या मनातील अस्वस्थता आपल्याला कधीच कळणार नाही का? इतकी वर्षे आपण याच्याबरोबर
आहोत हा मला होतं असलेला भास आहे का? हा इतका नेहामध्ये गुंतलाय की याला स्वतःच्या कुटुंबाचं भान नाही. का? याला कसं समजावून सांगू?’

मनातील खळबळ बाजूला ठेवून छकू रमणच्या बाजूला येऊन बसली.

“ रमण काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का आलं?”

छकूच्या या प्रश्नाने रमण भानावर आला. त्याने छकूकडे बघीतलं तेव्हा छकूला रमणच्या डोळ्यात एक प्रबळ नैराश्य दाटून आलेलं दिसलं. त्याचे डोळे निस्तेज दिसत होते. छकूला रूबाबदार आणि देखण्या रमणची झालेली अवस्था बघून भडभडून आलं.

रमण थकल्या स्वरात म्हणाला,

“ मी नेहाची माफी मागायला गेलो होतो.”

छकूला आश्चर्य वाटलं. तिला काय बोलावं कळलं नाही. रमण शांतपणे छकूकडे बघत होता.

“ यानंतर मी नेहाला भेटणार नाही. तिच्या संसारात वादळ ऊठेल असं काही वागणार नाही. तू मला वेळेवर जागं केलंस यासाठी मी तुझे खूप आभार मानतो.”

रमणने हात जोडले. त्याबरोबर छकू त्यांचे हात आपल्या हातात घेऊन म्हणाली,

“ रमण हात नको जोडू. मी तुझी बायको आहे.आपणच एकमेकांना सावरायचं. तू चूक केलीस मी तुला तुझी बायको या नात्याने तू चुकल्याचं सांगीतलं ते तू ऐकलं. माझ्यावर विश्वास ठेवलास म्हणून मीचं तुला धन्यवाद देते. तू नसतं ऐकलं तर मी काय करू शकणार होते.”

“ छकू तू मला माफ करशील नं? मी किशोरवयीन मुलासारखं वागलो . माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. मी पुन्हा असं वागणार नाही ज्यामुळे तुला त्रास होईल.”

“ रमण तुझ्याकडून चूक झाली ती मी सांगीतली. तुला कळलं. तू तुझी चूक मान्य केली आणि ती सुधरवली यात सगळं आलं. चूका माणसांकडूनच होतात. तू अजीबात अपराधी वाटून घेऊ नकोस. तू नेहाची माफी मागितली हे ऐकून मला बरं वाटलं. आता झालेलं सगळं विसरून आपल्या तब्येतीकडे लक्ष दे.कळलं?”

रमण न राहवून छकूच्या खांद्यावर डोकं ठेऊन तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून बसला.

“ तू मला आधी का सांगीतलं नाही की मी चुकतोय. त्या बायका माझ्या भोवती घोटाळ्याच्या तर मला खूप गर्व झाला स्वतःच्या रूपाबद्दल आणि मी वहावत गेलो.”

छकू काहीन बोलता त्याचा हात हातात घेऊन थोपटत होती.

बराच वेळाने रमणला येणारे दुःखाचे कढ थांबले.रमण उठून बसला आणि छकूला काही कळायच्या आत त्याने तिला घट्ट मिठी मारली. पुन्हा त्याला रडायला आलं.

छकूला हे सगळं अनपेक्षित होतं. तिलाच आता त्याची गलितगात्र अवस्था बघून रडू यायला लागलं. रमणला या परिस्थितीतून सावरणं जड जाणार आहे हे छकूच्या लक्षात आलं. त्याचवेळी रमण बोलला,

“ मला नेहाला विसरणं खूप कठीण जाणार आहे.छकू तू मला मदत करशील नं?”

रमणच्या या प्रश्नावर काय ऊत्तर द्यावं छकूला कळेना. एक पती आपल्या प्रेयसीला विसरण्यासाठी पत्नीची मदत मागतोय! या बद्दल कोणाचे सजेशन आपल्या वाचनात आले नाही. कशी मदत करणार? त्याला मदत करायची म्हणजे त्याच्या मनातून नेहाची प्रतिमा काढून टाकून स्वतःची प्रतिमा ऊजळवायची?

हे कसलं दिव्य करायचं? सप्तपदी रमणबरोबर चालून त्याची पत्नी झाले तरी स्वतःची प्रतिमा नव-याच्या मनात उजळण्यासाठी हे दिव्य करायचं? मग ‘नातीचरामी’ हे लक्षात ठेऊन मी हे दिव्य करायचं का? रमणला मदत करायची?

छकूची मती कुंठित झाली.

“ छकू करशील नं मदत मला.”

रमणने पुन्हा छकूला विचारलं.

एक दीर्घ श्वास घेऊन छकू हो म्हणाली.

आपल्या संसाराचं किती विदारक चित्र आज माझ्या डोळ्यासमोर आलंय. लग्नात उखाणा घेताना म्हटलं होतं

‘ आयुष्याच्या सारीपटावर मांडली सोंगटी संसाराची,
नशीबाची दान सुरेख पडलं साथ लाभली रमणची.’

सगळ्यांनी मी घेतलेल्या ऊखाण्याचं किती कौतुक केलं. रमणबद्दलच्या प्रेमाने माझं हृदय ऊचंबळून आलं होतं.
सहासात वर्षांपूर्वी पर्यंत रमणबद्दल ऊचंबळून येणारं प्रेम माझ्या डोळ्यातून, माझ्या वागण्यातून, रमणशी बोलण्यातून क्षणोक्षणी मला जाणवायचं. इतरांनाही ते जाणवायचं.

एकदम हा प्रेमाचा बहर ओसरला कसा? रमण माझ्या प्रेमात आकंठ बुडालेला असताना कधी त्याला बाहेरची ओढ लागली? कळलंच नाही. हे कोडं अद्याप सुटलेलं नाही.

छकूच्या डोळ्यात आपण पराभूत झाल्याची विदारक जाणीव अश्रुंच्या रूपाने वाहू लागली. त्या वाहणाऱ्या गरम अश्रूंचा चटका सहन करत छकू अबोल झाली.

जरा वेळाने भानावर आल्यावर तिच्या लक्षात आलं की आपण रमणला मदत करायला हवी. त्याच पाऊल घसरलं होतं त्याची आठवण काढून आयुष्य भर त्याला टोचण्यापेक्षा त्याने माफी मागितली आहे हे लक्षात घेऊन त्याला मदत करायला हवी शेवटी ती रमणची अर्धांगिनी होऊन त्याच्या आयुष्यात तिने प्रवेश केला होता हे विसरून चालणार नाही.

छकूने आपल्या खांद्यावर असलेलं रमणचं डोकं बाजूला करून म्हटलं,

“ रमण तू तुझी चूक सुधारवण्यासाठी माझी मदत मागतोय तर मी नक्कीच देईन. तुझी अर्धांगिनी या नात्याने ही मदत करत असताना मला माझ्या मनाची समजूत काढावी लागणार आहे. आधी मला त्रास झाला आताही होईल तरीही मी तुला मदत करेन. पुढच्या आयुष्यात पुन्हा हीच चूक तू जर केलीस तर माफीला पात्र राहणार नाहीस हे लक्षात ठेव. आपलं चांगलं वैवाहिक जीवन असताना तुला बाहेरची ओढ लागली हा माझा अपमान समजते. यावेळी तुला माफ करेन पुन्हा ही चूक झाली तर तुला बाहेरची ओढ आहे हे सिद्ध होईल मग मी माझा निर्णय घेईन. हे मान्य असेल तरच मी आत्ता तुला मदत करेन.”


छकूचं बोलणं ऐकून रमण शाॅक झाला. त्याला छकू असं बोलेल हे अपेक्षित नव्हतं. तो आश्चर्यचकित नजरेने छकूकडे बघायला लागला. छकूच्या डोळ्यात एक ठाम पणा होता. तो बघून रमण अंतर्बाह्य हादरला. त्याच्या लक्षात आलं पुन्हा ही चूक न होण्याची काळजी घ्यावी लागेल. कारण रमणला स्वतःवरच विश्वास नव्हता की तो आता कोणत्याही स्त्री कडे बघणार नाही.


अत्यंत थकल्या आवाजात रमणने हो म्हटलं.

एवढं कठोर बोलणं छकूलाही जड गेलं पण ती आत्ता तशी वागली नाही तर रमण वारंवार ही चूक करेल याची शंभर टक्के खात्री छकूला होती. अनेक स्त्रीयांना स्वतःच्या तालावर नाचवल्यावर नेहा आपल्या पकडीत येत नाही बघून तिचा पिच्छा पुरवणारा रमण ऊद्या नेहाऐवजी दुसऱ्या स्त्रीमागे पिंगा घालेल.


पुन्हा हीच कृती रमणने करू नये आणि आपल्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनातील स्वास्थ्य बिघडवू नये हाच छकूचा उद्देश होता.

दिशा आणि हर्षद नकळत्या वयात आहेत. नेहा प्रकरणाला तितकी हवा लागली नाही त्यामुळे गावभर बातमी अजून झाली नाही तेव्हाच रमणचं वागणं सुधारायला हवं हे छकूला प्रकर्षाने जाणवलं.

“ मी खरंच पुन्हा अशी चूक करणार नाही. विश्वास ठेव.”


रमण कळकळीने म्हणाला. ‍‍छकू ठीक आहे म्हणत अत्यंत निर्विकार पुणे आपल्या कामाकडे वळली. रमण म्हटल्याप्रमाणे वागेल यावर छकूचा पुर्ण विश्वास नव्हता.


रमण अतिशय गळून गेला होता. नेहाचा विचार सोडून देईन असं नेहाला म्हणाला असला तरी तिला विसरणं खूप कठीण जाणार आहे हे रमणला कळत होतं. आत्तापर्यंत त्यांचे इतके सूर कोणत्याच स्त्रीशी जुळले नव्हते. खरंतर त्या स्त्रिया रमणशी बोलत असत, हास्यविनोद करीत असत पण नेहा तर कामाशिवाय आपल्याशी कामाशिवाय कधीच बोलत नसे तरी का तिच्या विषयी इतकी ओढ वाटली या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळत नव्हतं.


छकूचा आजचा आविर्भाव बघता आपल्या कडून पुन्हा अशी चूक झाली तर छकू म्हटल्याप्रमाणे नक्की वागेल या बद्दल रमणला तिळमात्र शंका उरली नव्हती. नेहला विसरून आपल्या आयुष्यात परत आलच पाहिजे,तसंच इतर बायकांबरोबर आपलं बोलणं कमी केलंच पाहिजे हेही रमणच्या लक्षात आलं.

रमण शांतपणे आपल्या खोलीत गेला.
________________________________
क्रमशः रमण सुधरेल का?