मला स्पेस हवी पर्व २ भाग २८ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व २ भाग २८

मला स्पेस हवी पर्व २ भाग २८

मागील भागात आपण बघीतलं की छकू नेहाला भेटायला आली होती. तिच्या भेटीने नेहाला बरं वाटलं.छकूच्या जाण्यानंतर नेहाला फोन आला. कोणाचा फोन असेल बघू. या भागात.




“हॅलो. हा प्रणाली बोल. इतक्या महिन्यांनी तुला माझी आठवण झाली का?”

यावर प्रणाली म्हणाली,

“ नेहा मागच्या वेळी मी तुला फोन केला होता तेव्हा तू खूप चिडलेली दिसली म्हणून तुला फोन करण्याची मी हिम्मत केली नाही. आत्ताही फोन करण्यापूर्वी मी सुधीरला विचारलं की नेहाला फोन करू की नको.”

“काहीतरी काय प्रणाली. मी तेव्हा चिडले असेन पण म्हणून तू सुधीरला विचारून मग मला फोन करतेय? अगं आपण नणंद भावजय नाही मैत्रिणी आहोत ना !हे तू विसरली का ?”


“नाही ग. बर ते जाऊ दे मला सुधीरने सांगितलं की काहीतरी तुला प्रॉब्लेम आला होता ज्यामुळे तू खूप त्रस्त होतीस.”

“कुठला प्रॉब्लेम ?”

नेहाने विचारलं. यावर प्रणाली म्हणाली,

“अग कोणीतरी माणूस तुला त्रास देतो आहे असं सुधीर म्हणाला. तो अजूनही त्रास देतोय का?”

यावर नेहा म्हणाली,

“ नाही आता तो त्रास देत नाही. त्याची बायको मला भेटायला आली होती. त्यानंतर रमण शहा या माणसाने माझी माफी मागितली.”

“ अगं त्या माणसाच्या बायकोला ही माहिती होतं आश्चर्यच आहे !”

“हो. तिलाही ते चुकून कळलं. तो अर्धवट शुद्धीत असताना माझं नाव घेऊन बोलला म्हणून तिला कळलं. जसं तिला कळलं तसं ती मला भेटायला आली.”


“ तुला भेटायला आली?”

प्रणालीच्या आवाजा आश्चर्य होतं.

“ हो ती मला भेटायला आली होती. तिने तिच्या नवऱ्या च्या वतीने माझी माफी मागितली. मला आश्चर्य वाटलं. पण ती खूप छान आणि कणखर मनाची वाटली. त्यानंतर तो रमण शहा स्वतः माझी माफी मागायला आला होता.”

“ अगं हे असे वर वर माफी मागणारे लोक असतात. पुन्हा तुला काही त्रास दिला म्हणजे ! त्यापेक्षा तू पुण्याला यायचं बघ. विचार ऑफिसमध्ये. तुला परत येता येतय का?”

प्रणालीच्या आवाज काळजीने भरला होता.


“अगं त्याची बायको आजच येऊन गेली आणि तिने सांगितलं मला की आता त्याच्यात सुधारणा होते आहे. त्यानी तुमची माफी मागितली हे मला सगळं नंतर कळलं. प्रणाली आता आम्ही त्याच्या ऑफिसमध्ये जात नाही.”


“त्याच्या ऑफिसमध्ये म्हणजे? तू का जातेस?”

“ अगं त्याची सत्यम एडवर्टाइजिंग एजन्सी आहे तिथेच स्वस्तिक ट्रॅव्हल टूर्सच्या सगळ्या जाहिराती बनतात. आधी तेच जाहिरातीच स्क्रिप्ट लिहून त्याचा शूट करायचे पण इथे माझ्या नवीन कल्पना राबवायचं ठरवल्यामुळे माझ्यासमोर ते लेखक असतात त्यांना मी वेगळ्या पद्धतीने जाहिराती लिहायला सांगते नंतर त्या जाहिराती या सत्यम मधील डायरेक्टर शूट करतो. तर म्हणून तो मला म्हणाला की मी माझा असिस्टंट आणि लेखक तुमच्याच ऑफिसमध्ये पाठवीन तुम्ही त्याच्याशी जाहीरातीसंबंधी चर्चा करा.माझ्या ऑफिसमध्ये येऊ नका आणि जिथे जाहिरात शूट होणार आहे तिथे तुम्हाला यायचं असेल तर मला आधी कळेल मी तिथे येणार नाही एवढं त्यांनी कबूल केलंय म्हणजे त्याला आपली चूक कळलेली आहे म्हणून मला आता भीती वाटत नाही. “


“ नेहा तू म्हणतेय पण खरंच तो बदलला आहे का?”

“मला तुझी भीती कळते आहे. तो आता बराच बदलला आहे. मुळात तो वाह्यात माणूस नाही पण आत्तापर्यंत त्याच्या भोवती फ्लर्ट करणाऱ्या बायकाच फिरत होत्या. त्याच्या देखण्या रूपावर भाळवून त्याच्या मागे फिरत होत्या त्यामुळे त्याला असं वाटलं असावं की मी पण त्याला प्रतिसाद देईन .पण असं झालं नाही.”


यावर प्रणाली म्हणाली,

“ नेहा ते सगळं असू दे पण तू तुझी काळजी घे. अशी माणसं माफी मागतात. आपण पुन्हा असं करणार नाही असं कबूल करतात पण त्यांचा नेम नसतो ते पुन्हा तसंच वागू शकतात म्हणून तुला सांगते आहे.”

यावर नेहा थोडा वेळ बोलती नाही. तशी प्रणाली म्हणाली,

“ नेहा तुला माझं म्हणणं कदाचित पटणार नाही पण हे खरं आहे.”

“ प्रणाली अगं थोड्या वेळापूर्वी त्याची बायको येऊन गेली.”

“ काय त्याची बायको येऊन गेली ?कशासाठी ?”

“अगं मला धन्यवाद द्यायला आली होती.”

“धन्यवाद द्यायला आणि तेही तुला का?’

“ तिचं म्हणणं त्यानी माफी मागितली आणि मी त्याला माफ केलं त्यामुळे त्याच्या मनात जे गिफ्ट होतं ते गेलं आणि त्यामुळे आता त्याची तब्येत सुधारते आहे आणि तो आता खूप वेगळा झाला आहे यासाठी ती मला भेटायला आली होती.”

“आश्चर्यच आहे. ती बाई तुला धन्यवाद द्यायला आली याचं”

“ प्रणाली ती खरंच चांगली आहे. सुसंस्कृत विचारांची आहे त्यामुळेच तिने रमणला समजावून सांगितलं. माझ्या मागे लागून माझ्या संसारात आणि आयुष्यात वादळ निर्माण करणं योग्य नाही. तुझ्या भोवती ज्या बायका फिरायच्या त्यांच्या सारखी ही नाही त्यामुळे तू असं वागू नको. प्रणाली ती हे म्हणाली की इतर बायकांसारखी तू नसल्यामुळे तुझ्याबद्दल त्याला प्रेम वाटलं आणि तो तुझ्यात गुंतला. बाकीच्या बायकांना त्यांनी कधीच इतकं सिरीयसली घेतलं नाही कारण त्याला माहिती होतं त्या बायका त्याच्या देखण्या रूपावर भाळून त्याला सर्वस्व अर्पण करतात म्हणून तोही त्यांच्याबद्दल तेवढाच बेफिकीर होता पण तुझ्याबद्दल मात्र त्याला खूपच आपुलकी आणि प्रेम वाटलं कारण तुझा स्वभाव आणि तुझी हुशारी हे कारण आहे.”

‘ बापरे त्याची बायको एवढी शांत आणि एवढा विचार करणारी आहे ?”

“हो. म्हणूनच आज तिने भेटून मला जेव्हा हे सगळं सांगितलं तेव्हा माझ्या मनावर जे ओझं होतं ते दूर झालं.”

“तुझ्या मनावर कसलं ओझं होतं ?”

प्रणालीने विचारलं,

‘अगं रमणने तर माझी माफी मागितली पण मला वाटत होतं की याच्या बायकोला माझ्याबद्दल काय वाटत असेल ? माझा राग येत असेल का? माझ्यामुळे तो असं वागतो आहे पण आज ती जेव्हा माझ्याशी बोलली तेव्हा मला खूप बरं वाटलं. माझ्या मनावरचं ओझं दूर झालं हे मी तिला सांगितलं त्यावर ती म्हणाली तुम्ही ताण घेऊ नका. मला तुमची बाजू कळते मी पण एक स्त्री आहे म्हणूनच रमणला मी समजावलं.”

“ नेहा त्याची बायको खूप समजूतदार आहे म्हणून तुझ्या मागचा त्या माणसाचा ससेमिरा सुटला तरी सांभाळून रहा.”

“ होग.तू काळजी करू नकोस. अक्षयला हे समजलं असेलच.”

“ हो. सुधीरने सांगितलं. अक्षयने मला सांगीतलं. हे कळल्यापासून तो खूप अस्वस्थ आहे.तुझ्याशी मी बोलून सगळं माहीत करून घ्यावं म्हणून रोज मला तुझ्याशी बोलायची आठवण करतो. काहीन काही कारणाने राहून गेलं.”

“ आई बाबांना सांगितलं?”

नेहाने विचारलं.

“ नाही. आईबाबांना सांगायचं नाही अशी सक्त ताकीद सुधीरने दिली आहे. तो त्याच्या आईबाबांना पण सांगणार नाही.”

“ नकोच सांगायला. ऊगीच त्यांच्या मनावर ताण यायचा. तुला आणि अक्षयला घरात जपून रहावं लागत असेल. कारण माझी आई त वरून ताकभात ओळखणारी आहे.”

“ हो सध्या आमची धांदल असते. तुझ्याबद्दल बोलायचं असेल तर आम्ही घरात असून चॅट करतो.”

हे बोलून प्रणाली हसायला लागली. नेहालापण हसू आलं.

“ प्रणाली अक्षयला सांग काळजी करू नकोस. प्रणाली तुला मी मुद्दामच सगळं सविस्तर सांगीतलं आहे. तू ते अक्षयला सांग .मला इतक्यात पुण्याला परत येता येणार नाही. मी लक्ष ठेवणार आहे. मी माझी मैत्रीण रंजनाला सांगून ठेवणार आहे. तिकडे ऑफिसमध्ये काही हालचाल झाली तर ती लगेच मला कळवेल. एक वर्ष कमीत कमी मला इथून निघता येणार नाही.”

“ हो नेहा ते कळतंय मला.ऋषीचं कारण सांगून बघ.”
प्रणाली म्हणाली.यावर नेहा म्हणाली,

“ साहेब म्हणतील तुम्ही इथे आलात तेव्हाही तुमचा मुलगा लहानच होता.तेव्हाच विचार करायचा होता.”

“ खरय तू म्हणतेस ते. ठीक आहे. जेव्हा तुला पुण्यात येता येईल ते बघ. पण सांभाळून रहा.”

प्रणालीच्या आवाजाला काळजीचा स्पर्श होता.

“ हो. आईबाबांना सांग मी त्यांची आठवण काढली. बाकी आपण काय बोललो ते सांगू नकोस.”

“ नाही ग बाई. खुप गुप्तता पाळीन. ही गुप्तता पाळणे आवश्यक आहे. काळजी करू नकोस.चल ठेवते फोन”

“ हो ठेव”

प्रणालीशी बोलून नेहाला खूप बरं वाटलं कारण प्रणाली तिची वहिनी सांगण्यापुरती होती आणि मैत्रीण जास्त होती. दोघी एकमेकींना अगदी सगळ्या गोष्टी शेयर करीत. आत्ता पर्यंतचे दिवस इतके विचित्र गेले की नेहाला प्रणालीला फोन करण्याचं सुचलं नाही.आज तिचाच फोन आल्यामुळे नेहाचा मन आनंदीत झालं.

त्याचं आनंदात ती काम करू लागली. तिच्याकडे जाहीरातीचं नवीन स्क्रिप्ट आलेलं होतं ते तिला नजरेखालून घालायचं होतं.

__________________________________
क्रमशः