कामीनी ट्रॅव्हल - भाग ४१ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४१

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४१

प्राची आणि हर्षवर्धन यांचा वाद होऊन जवळपास चार महिने उलटले होते. या चार महिन्यांत बरंच काही घडून गेलं होतं. प्राची अजूनही घरीच होती. तिनी हर्षवर्धनशी बोलणं जवळपास सोडून दिलं होतं. कामीनी बाईं पण हर्षवर्धनशी आवश्यक तेवढंच बोलत. त्यांचा बहुतेक वेळ भय्यासाहेबांकडे लक्ष देण्यात जात असे.

भय्यासाहेबांना बघायला जरी केयरटेकर असला तरी बराच वेळ कामात जात असे.

आजकाल तन्मय आणि हर्षवर्धन दोघंही ऑफीसमध्ये जायला लागले होते. तन्मयला घरातील वातावरणाची थोडीफार कल्पना आली होती. कामीनी बाईंनी त्याला या वातावरणामागचं कारण सांगीतलं होतं. त्यामुळे तो समजूतीनी कामीनी ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात लक्ष घालू लागला होता.

रोज कामीनी बाईंना तन्मय ऑफीसमधल्या गोष्टी सांगत असे. हर्षवर्धन आता ईरेला पेटला होता. त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं.ऑफीसमधले सगळेच त्यांच्यात झालेला बदल बघून आश्चर्य चकीत झाले होते.

सुरवातीला हर्षवर्धनचे घेतलेले निर्णय चुकत असत पण त्याला संदीप आणि यादव सांभाळून घेत असत. हळूहळू त्याच्यातील निर्णय घेण्याची क्षमता कमालीची वाढली होती.

प्राचीनी आता ऑफीसमध्ये जाणं सोडलं होतं. ती तिला आवडणारा आणि ज्याच्यात तिनं ग्रॅज्युएशन केलं होतं तो विषय म्हणजे ग्राफिक डिझायनिंग.यात ती घरी बसून काम करू लागली. हे काम ती राधाच्या आर.एस.ग्राफीक सेंटर साठी करत होती.

सुरवातीला जेव्हा तिनी राधाला आपली इच्छा बोलून दाखवली तेव्हा राधा चाट पडली. एकतर खूप गॅपनंतर प्राचीनीच राधाला फोन केला होता. यापूर्वी राधानी इतक्यांदा प्राचीला फोन केले होते पण तिने फोन उचलला नव्हता.

"प्राची तू तुमच्या व्यवसायातून बाहेर पडलीस? का? आणि आता हा एवढा मोठा पसारा हर्षवर्धन एकटा कसा सांभाळणार? तन्मय लहान आहे. आता तू म्हणतेस की तू ग्राफीक डिझायनर म्हणून काम करणार आहेस?"

" हो.राधा मला कळतंय तुला खूप प्रश्न पडलेत. पण अचानक माझं सगळ्यातून लक्षं ऊडालं. हर्षवर्धनच्या मनात इतकी वर्ष काय चाललं होतं हे कळल्यावर तर मला सगळंच नकोस झालं.मला आवडतं म्हणून मी ग्राफीक डिझायनर झाले आणि लग्नानंतर काही वेगळंच घडलं. हा ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय माझी आवड नाही आणि नव्हती.

आता मला माझ्या आवडीचा करायचं आहे. ट्रॅव्हल्सचा व्यवसाय हर्षवर्धन आणि तन्मय सांभाळतील. खूपच अडचण आली तर आई किंवा मी मदत करू.पण आता त्याला स्वतःला सिद्ध करू दे."

"प्राची तुझ्या आयुष्यात किती वळणं आलीत पण तू ठाम होतीस. इतकं हताश आणि स्वतःच उभारलेल्या आणि ज्याचा विस्तार केला अश्या व्यवसायतून एकदम निरिच्छ होऊन बाहेर पडलीस. का एवढी निरीच्छा तुझ्या मनात आली? समजत नाही ग!"

"राधा आपलं आयुष्य आपण जसं जगायचं ठरवतो तसच जगता येतं असं नाही ग !मी सुद्धा कुठे विचार केला होता की ज्याच्या बरोबर लग्न करीन त्याची अशी अवस्था असेल! आणि मी ज्या आवडीच्या विषयात शिक्षण घेतलं तो विषय बाजूला ठेवून दुसऱ्याच विषयाशी निगडीत व्यवसाय मला करावा लागेल. आता मला या सगळ्यातून बाहेर पडावं असं वाटतंय. मी तिथे राहीली तर हर्षवर्धन पुढे जाणार नाही हे मला त्याच्या कडे बघून कळलंय."

"हं तू म्हणतेस ते पटतय मला पण ज्या कंपनीला उभं करण्यासाठी तू इतके कष्ट घेतलेस त्या कंपनीपासून तू किती काळ दूर राहू शकतील? "

" मी एकदा जो निर्णय घेते तो अंतीम असतो. पश्चात्तापाची मी वेळ येऊ देत नाही. कारण मी सगळ्या बाजूने विचार करून मगच निर्णय घेते. माझ्या लग्नानंतर मला हर्षवर्धन आणि भय्यासाहेब यांचा खरा चेहरा दिसला तेव्हा एखाद्या मुलीने घटस्फोट घेतला असता. पण मी माझ्यापेक्षाही जास्त विचार माझ्या सासूचा केला. त्यांची घुसमट समजून घेतली. हर्षवर्धनला सुधरवण्यासाठी खूप कष्ट घेतले. पण काही महिन्यांपूर्वी मला लक्षात आलं की हर्षवर्धन आपला कम्फर्ट झोन सोडायला तयार नाही म्हणजेच तो बरा झाल्याचं हे लक्षण आहे. यामुळे माझा एकदम सगळ्यातला इंटरेस्ट गेला.

मी तिथून म्हणून बाहेर पडायचं ठरवलं. घेऊ दे त्याला कष्ट. बसू दे चटके. मी त्याच्यापेक्षा वरचढ आहे हे दाखवण्यासाठी माझे सगळे प्रयत्न असतात असं त्याला वाटत होतं हे त्यांनी बोलून दाखवलं परवा. म्हणजे त्याला सांभाळून मी व्यवसाय करत होते त्याची त्याला किंमत नव्हती आणि नाही. माझ्या कष्टांची पण किंमत नव्हती. मी त्याला नशेच्या विळख्यातून सोडवून सामान्य माणसासारखं करण्यासाठी जे कष्ट घेतले ते हर्षवर्धन विसरला. हा माझा अपमान आहे. याची मला जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी पार कोसळले."

राधा तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाली.

" तुझं बरोबर आहे पण एवढा मोठा पसारा हर्षवर्धन आणि तन्मयला सांभाळता आला नाही तर काय करणार?"

"नाही सांभाळता आला तर कंपनी बंद करेल."

प्राची थंडपणे म्हणाली.

" अगं कंपनी बंद करण़ इतक़ सोपं आहे का? तुमच्या तीन चार शाखा आहेत.तिथे कोण बघेल."

राधाने चकीत होऊन विचारलं.

"मला माहित नाही. तो कप्पा मी बंद केला आहे.मला तू काम देशील का?"

प्राचीने विचारलं.

" प्राची तुला मी काय देणार नाही असं कसं होईल? मी देईन तुला काम. तू घरून काम करत जा."

राधा नुकतच आलेलं एक काम प्राचीवर सोपवते. कायदेशीर रित्या कागदपत्रेही करते. प्राची शांतपणे राधाच्या ऑफीसमधून बाहेर पडली.

***

प्राची घरी आली तेव्हा कामीनी बाई तिची वाटच बघत होत्या. कारण प्राची न सांगता बाहेर पडली होती.

" प्राची कुठे गेली होतीस? जाताना सांगीतलं नाही त्यामुळे मला काळजी वाटली."

कामीनी बाईंनी काळजीच्या स्वरात विचारलं.

" मी राधाच्या ऑफीसमधे गेले होते."

प्राचीने कामीनी बाईंना सविस्तर सांगीतलं.

"तुझं मन ज्यात रमेल ते कर. हर्षवर्धन बराच कष्ट घेतोय. तन्मय मला घरी आल्यावर सगळं सांगतो.तू आता तुझं आयुष्य जग. खूप कोमेजून गेली आहेस. पुन्हा पुर्वी सारखी आनंदी हसरी हो. तुला असं बघवत नाही."

बोलता बोलता कामीनी बाईंचे डोळे भरुन आले.

प्राची हळूच त्यांच्या जवळ जाऊन बसली. त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली,

" आई तुमचा माझ्यावर खूप जीव आहे त्यामुळे तुम्हाला माझी काळजी वाटते. पण नका माझी काळजी करू.मी माझं आयुष्य जगणार आहे. हर्षवर्धन आता काही महिन्यांतच आपला व्यवस्थीत सांभाळायला लागेल. काळजी करू नका."

" तू आणि हर्षवर्धन माझे दोन डोळे आहात ग. तुम्ही निराश झालात की मला सुचत नाही. हर्षवर्धन आता करतोय प्रयत्न. तू म्हणून त्याच्याशी पूर्वीसारखं बोल असं मी नाही म्हणणार. कारण त्याने तुझ्या कष्टाची किंमत न करता त्याचा वेडावाकडा अर्थ घेतला. ते त्यांचं चुकलंच.पण त्याला कधी तुझ्या मदतीची गरज भासली तर त्याच्या पाठीशी उभी राहशील नं?"

कामीनी बाईंनी प्राचीला विचारलं.

"ते तर करावच लागेल.कारण शेवटी तो माझा नवरा आहे. त्याला मदत न करता मी माझं आयुष्य जगले तर पुन्हा सगळे मलाच नावं ठेवतील. तुम्हालाही वाईट वाटेल. तुम्ही माझ्या सासू कधीच नव्हत्या आणि नाही तर एक जीवाभावाची मैत्रीण आहात. तुम्हाला दु:ख होईल असं मी कसं वागेन. नका काळजी करू तुम्ही."

कामीनी बाईं काही न बोलता तिच्याकडे नुसतं बघत बसल्या. प्राचीचा चेहरा निर्विकार होता. ती हळूच उठली आणि आपल्या खोलीत गेली. कामीनी बाई बराच वेळ तश्याच बसून होत्या. तेवढ्यात भय्यासाहेबांचं सगळं काम करणारा नारायण त्यांना बोलवायला आला.

" बाई, साहेब तुम्हाला बोलवतात आहे."

" हो का! आलेच."

म्हणत डोळे पुसत आपल्या खोलीत गेल्या.

***

भय्यासाहेब आजकाल खुप कमी बोलायचे. तन्मयशी मात्र त्यांच्या गप्पा चालायच्या. तो रोज ऑफीसमधून आला की भय्यासाहेबांच्या खोलीत जाऊन गप्पा मारत असे. हर्षवर्धन कामीनी बाईंना दिवसभराच्या घडामोडी सांगत असे. एखादा सल्लाही विचारत असे.

आजकाल प्राची आपल्या ग्राफीक जगातच वावरत असे. तन्मयला आईचं वागणं कोड्यात टाकायच़ पण त्याची तिला विचारायची हिम्मत होत नसे.

असेच अजून दिवस लोटले. प्राची आपल्या आवडीच्या विषयात चांगलीच रमली होती. हर्षवर्धन आणि तन्मय कामीनी ट्रॅव्हल्सच्या जगात जगत होते. कामीनी बाईं आपल्या भवती असणा-या या माणसांच्या म्हणजेच प्राची, हर्षवर्धन, तन्मय आणि भय्यासाहेब यांच्या जगाचं निरीक्षण करत असत. आणि आपल्या सोयीनुसार अनुमान काढत. हर्षवर्धनच्या बोलण्या चालण्यात आता एकप्रकारची ऐट आली होती. आता पूर्वीसारखा तो गोंधळत नसे. फोनवरून तो इतरांना सहजपणे समजावत असे. आपला पक्का निर्णय घेत असे.

पटवर्धनांच्या घरात आता वेगवेगळे वारे वहात होते.यात प्राची वेगळ्या दिशेने तर हर्षवर्धन वेगळ्या दिशेने जात होता. कामीनी बाई स्थीर होत्या एका ठिकाणी बसून होत्या. हर्षवर्धन आणि तन्मयला जेव्हा सल्ला हवा असेल तेव्हा देत असत. भय्यासाहेबांशी खूप मोकळेपणाने बोलून एवढ्या वर्षांच्या राहीलेल्या गप्पा करत असत.

एकूण काय पटवर्धनांच्या घरात बदलाचे वारे वाहू लागले होते.ते कोणत्या दिशेने वाहत जाणारे ते बघूया.
----------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका.. मीनाक्षी वैद्य.