कामीनी ट्रॅव्हल - भाग ४२ Meenakshi Vaidya द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कामीनी ट्रॅव्हल - भाग ४२

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४२

हर्षवर्धन आता चांगल्या प्रकारे व्यवसाय सांभाळू लागला होता. तन्मय सुद्धा वयाच्या मानाने खूपच लवकर या व्यवसायात शिरला होता आणि चांगलं काम करत होता.

यावर्षी तन्मयचं शिक्षण पूर्ण झालं होतं. कामीनी ट्रॅव्हल्सच्या इतर शाखांमध्ये तन्मय मधून मधून भेट देत असे.

या वर्षभरात प्राचीनी ऑफिस मध्ये प्रवेश केला नव्हता. तिने ग्रफिक डिझाईनिंगमध्ये स्वतःला बिझी करून घेतलं होतं.

हर्षवर्धन आणि तन्मय या दोघांनी कामनी ट्रॅव्हल साठी खूप धडपड केली. यावर्षी खूप वर्षानंतर उत्तम ट्रॅव्हल कंपनी म्हणून कामीनी ट्रॅव्हल्सला पुरस्कार मिळाला होता. याचे श्रेय अर्थातच हर्षवर्धन आणि तन्मयला मिळालं होतं त्या दिवशी संध्याकाळी हर्षवर्धनने कामिनी बाईंना या पुरस्काराची बातमी दिली तेव्हा त्या म्हणाल्या

"अरे प्राचीला सांग की ही आनंदाची बातमी."

हर्षवर्धन काही फारसा खुश नव्हता ही बातमी प्राचीला द्यायला. त्याचा अजूनही प्राचीवरचा राग गेला नव्हता.

कामीनी बाईंना आता प्रश्न पडला की प्राची आणि हर्षवर्धन मध्ये दरी निर्माण झाली आहे ती कशी दूर करावी? त्यासाठी काय करावे त्या विचार करू लागल्या.

पण तेवढ्यात हर्षवर्धन खोलीत जातांना कामीनी बाईंना दिसला. प्राची इझीचेयरवर बसून पुस्तक वाचत असते.

"प्राची…. प्राची ..एक छान बातमी आहे."

"बोल."

पुस्तकांतून नजर न काढताच प्राचीने विचारलं.

"तुझे लक्ष असेल तर सांगतो."

हर्षवर्धन जरा रागानीच म्हणाला.

" आहे लक्ष सांग" तोंडासमोर असलेलं पुस्तक मिटत प्राची निर्विकार आवाजात म्हणाली.

" कामीनी ट्रॅव्हल्सला ब-याच वर्षानंतर उत्तम ट्रॅव्हल एजन्सी म्हणून पुरस्कार मिळाला आहे."

हर्षवर्धनचं हे बोलणं ऐकताच प्राची स्वतःच्याही नकळत आनंदानी उठून हर्षवर्धनचा हात धरून त्यांचं अभिनंदन केलं.

"हर्षवर्धन खूप छान बातमी सांगितलीस.तुझं आणि तन्मयचं खूप अभिनंदन."

प्राचीची ही कृती हर्षवर्धनला अजीबात अपेक्षित नव्हती. तो बावरून जातो. प्राचीला मात्र मनापासून आनंद झाला.

" हर्षवर्धन आईंना सांगीतलं? चल पटकन ही बातमी त्यांना देऊ."

प्राची त्याचा हात धरूनच बाहेर आली.तिनी कामीनी बाईंना हाक मारली.

"आई ऐकलंत का? आपल्या कामीनी ट्रॅव्हल्सला उत्तम ट्रॅव्हल एजन्सी म्हणून पुरस्कार मिळाला आहे."

प्राचीच्या चेह-यावरचा आनंद बघून आणि तिनी हर्षवर्धनचा धरलेला हात बघून त्या चकीत झाल्या. मनातून त्यांना खूप आनंद झाला.

"प्राची खूप छान बातमी आहे.आणि आज दोघं छान दिसताय."

कामीनी बाईंच्या या बोलण्यावर प्राचीला आश्चर्य वाटलं.

"आज आम्ही दोघं छान दिसतोय! कसं काय?" प्राचीनी विचारलं.

कामीनी बाई डोळ्यानी प्राचीनी धरलेल्या हर्षवर्धनच्या हाताकडे खूण करून दाखवलं. तेव्हा प्राचीच्या लक्षात आलं आणि एकदम तिने हर्षवर्धनचा हात सोडला.प्राची एकदम बावरून गेली. हर्षवर्धनच्या चेहेऱ्यावर मात्र बारीकसं हसू आलं.

कामीनी बाईं प्राचीला जवळ घेऊन म्हणाल्या,

" प्राची आज छान दिवस आहे. मागचं सगळं दोघंही विसरा. हर्षवर्धन आज खूप दिवसांनी आनंद आपल्या घरी चालत आला आहे. मागची भांडणं,गैरसमज दोघांनी विसरून पुढे पाऊल टाकावं असं मला वाटतं. प्राची तुझं काय म्हणणं आहे? हर्षवर्धन तूही सांग" कामीनी बाईंनी दोघांनाही विचारलं.

"आई मला प्राचीबरोबर आयुष्य जगायचं. मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं होतं प्राचीला. म्हणून मी इतके दिवस खूप कष्ट केले.आता मला प्राचीला बरोबर घेऊन आपला व्यवसाय अजून पुढे न्यायचा आहे.तन्मयला सुद्धा यात बरोबर घ्यायचं आहे."

हर्षवर्धनचं प्रत्येक वाक्य ऐकून प्राचीला खूप आश्चर्य वाटलं. तिचं मनही हर्षवर्धनचं बोलणं ऐकून आनंदलं होतं.या आनंदापायी तिला काही बोलणंच शक्य नव्हतं.

"प्राची तुझं काय म्हणणं आहे?"

कामीनीबाईंचे कान आता प्राची काय म्हणते हे ऐकायला आतूर झाले होते.

बराच वेळानी प्राची म्हणाली,

"आई मलाही हर्षवर्धन बरोबर आयुष्य जगायला आवडेल. हे आनंदी क्षण मी कधीच अनुभवलेले नाहीत. हर्षवर्धन आता खूप खंबीर झालाय यांचा मला आनंद आहे. माझ्यावर रागाऊन का होईना त्याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप कष्ट घेतले. या कष्टाचं फळ म्हणजे हा पुरस्कार आहे. याचा मला अभिमान आहे.

हर्षवर्धन मी ऑफीसमध्ये येत नसले तरी मला ऑफीसमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट कळत असते. तू केलेलं प्रत्येक नियोजन आणि तू घेतलेले प्रत्येक निर्णय मला कळत होते. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तुझी चाललेली धडपड बघून मला आणि आईंना खूप आनंद होत होता."

प्राची हर्षवर्धनकडे बघत हसून म्हणाली.

" काय? तू काय बोलतेय प्राची? तुझा राग.. तुझं वाटेल तसं बोलणं, राधाच्या ऑफीसमधे काम करणं हे सगळं काय होतं?"

हर्षवर्धन आई आणि प्राचीकडे आश्चर्यकारक नजरेनी बघायला लागला.

"हर्षवर्धन तू ज्या कम्फर्ट झोन मध्ये जगत होतास त्यातून तुला बाहेर काढायचं होतं. तुझ्यातली हुशारी, बाहेर काढायची होती म्हणून हे सगळं मला करावं लागलं. आईंनी मला साथ दिली."

"मग त्यादिवशी तू इतक्या उशीरा घरी आलीस इतकी अस्वस्थ होतीस हे सगळं नाटक होतं?"

हर्षवर्धनने विचारलं.

"नाही ते नाटक नव्हतं.त्या दिवशी मी खरोखरच हतबल झाले होते. तुला आपल्या कम्फर्ट झोन मध्येच राह्यला आवडतय हे माझ्या लक्षात आलं. यातून तुला बाहेर काढणं गरजेचं होतं. पण कसं? ते कळत नव्हतं. आठवडाभर मी सैरभैर झाले होते. शेवटी आईंनी मला समजावलं. त्या दिवशी तू भांडला नसतास तर मीच तुझ्याशी भांडले असते. तुझ्यातल्या 'मी' ला मला हलवून जागं करायचं होतं. हाच एकमेव शेवटचा उपाय माझ्याकडे आणि आईंकडे होता. तो उपाय आम्ही केला आणि त्यात आम्हाला यश मिळालं."

प्राची बोलायची थांबली तसं हर्षवर्धनने विचारलं

" तुला ऑफीसमधल्या बातम्या कोण द्यायचं?"

"संदीप मला सगळं सांगायचा. मीच त्याला सांगीतलं होतं. तन्मय घरी आल्यावर आईंना सगळं सांगायचा. यांवरून आम्हाला सगळी बित्तंबातमी मिळायची."

" आत्ता मी तुला कामीनी ट्रॅव्हल्सला पुरस्कार मिळाला ही बातमी सांगीतली तेव्हा तर तुझा चेहरा खूप निर्विकार होता. हे नाटक होतं.?"
हर्षवर्धनने विचारलं.

" हर्षवर्धन आम्ही दोघींनी जे केलं त्यावर फार विचार करू नको. आता या छान बातमीमुळे तुम्हा दोघांमध्ये असलेला दुरावा दूर करा. संसार नव्याने सुरू करा. नवीन लग्नं झाल्यावर ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या नाहीत त्यांचा अनुभव घ्या."

कामीनी बाईं आनंदाने प्राची आणि हर्षवर्धनला म्हणाल्या.

या तिघांचं बोलणं तन्मयनी घरात शिरताना ऐकल्यामुळे तो बाहेरच थांबला होता. तोही आज खूप आनंदात होता. तो दारात उभा आहे हे कामीनी बाईंच्या लक्षात आलं. त्यांनी त्याला हाक मारली.

"तन्मय जा पटकन पेढे घेऊन ये.देवासमोर ठेऊ."

" हो आजी लगेच आणतो."

तन्मय पेढे आणायला गेला.

"प्राची या दोन तीन दिवसांनी आपण सत्यनारायणाची पूजा करुया. तुम्ही दोघं पूजेला बसा. खूप वर्षांनी आपल्या घरात आनंद आलाय."

कामीनी बाईं म्हणाल्या.

प्राची नी आनंदानी कामीनी बाईंना मिठी मारली त्याही हसून तिला थोपटू लागल्या. हर्षवर्धन त्या दोघींचा आनंद बघत होता. आपल्यासाठी या दोघींनी किती कष्ट काढले. अशी आई आणि अशी बायको प्रत्येक जन्मात मला मिळो हीच देवा तुझ्या जवळ प्रार्थना आहे असं मनातच म्हणत हर्षवर्धन डोळे पुसत त्या दोघींकडे पाठ करून उभा राहिला.

पटवर्धनांच्या घरात आज आनंद ओसंडून वाहत होता. कैक वर्षांनी हा आनंद मेळा त्यांच्या घरी भरला होता. त्या आनंद रसात सगळे चिंब भिजले होते.

कामीनी बाईं, हर्षवर्धन, प्राची आणि तन्मय चौघेही भय्यासाहेबांच्या खोलीत गेले. चौघांना एकदम बघून भय्यासाहेब चकीत झाले.

" आज काय आहे चौघं एकदम आलात? काही विशेष?"

भय्यासाहेबांनी विचारलं.

" हो.विशेषच आहे.बाबा जरा उठून बसता. तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे." हर्षवर्धन म्हणाला.

"बरं उठतो." भय्यासाहेबांनी म्हटलं.

भय्यासाहेब उठायला लागतात. त्यांची काळजी घेणारा नारायण त्यांना आधार देऊन उठवून बसवितो.

"बाबा या वर्षी खूप ‌वर्षांनंतर कामीनी ट्रॅव्हल्सला उत्तम ट्रॅव्हल एजन्सी म्हणून पुरस्कार मिळाला आहे."

" अरे वा! अभिनंदन" भय्यासाहेब म्हणाले.

प्राची हर्षवर्धन भय्यासाहेबांना खाली वाकून नमस्कार करतात.

" असंच यश मिळो हिच माझा आशीर्वाद आहे."

"अहो येत्या दोन तीन दिवसांनी सत्यनारायणाची पूजा करूया म्हणतेय. हर्षवर्धन आणि प्राची दोघं करतील पूजा. इतकी छान बातमी आली आहे. त्या बातमीनी आपल्या घरातून गेलेला आनंद पुन्हा परत आला आहे. ही सगळी त्या ईश्वराची कृपा आहे."

कामीनी बाईंचा आवाज गदगदलेला होता.

"नक्की करू पूजा. हा आनंद साजरा व्हायलाच हवा. कामीनी उद्याच फडके गुरूजींना फोन करून पूजेचं ठरवून घे."

भय्यासाहेब म्हणाले.

" हो उद्याच करते फोन"

कामीनी बाई तर आनंदाच्या लाटेवर होत्या. प्राची हर्षवर्धन वेगळ्याच विश्वात दंग झाले होते. भय्यासाहेबही हर्षवर्धन सुधारला म्हणून आनंदात होते. आणि तन्मय तो तर आई-बाबांना खूप दिवसांनी इतकं आनंदी बघत होता. त्यामुळे हा आनंद कोणाला सांगू आणि कोणाला नाही असं त्याला झालं होतं.

आजपर्यंत इतका आनंद पटवर्धनांच्या घरांनी बघीतला नव्हता.

प्राची जे काही हर्षवर्धनशी वागली ते वागताना प्रत्येक पावलावर तिला सावध रहावं लागलं होतं. प्राची आणि कामीनी बाईंची काहीतरी योजना आहे म्हणून त्या दोघी असं वागतात आहे हे हर्षवर्धनला कळायला नको होतं. त्याला जर हे कळलं असतं तर सगळंच फिस्कटलं असतं.

पुरस्कार मिळाला हे प्राचीला संदीपकडून कळलं होतं. हर्षवर्धन घरी येऊन ही बातमी कशी देतो हे बघण्याची या दोघींना उत्सुकता होती.

हर्षवर्धनला कामीनी बाई मुद्दामच ही बातमी तू प्राचीला सांग असं म्हणाल्या. हर्षवर्धन अनिच्छेनेच ही बातमी प्राचीला सांगतो. पण प्राची तिच्याही नकळत आनंदून हर्षवर्धनचा हात पकडून अभिनंदन करते. हाच क्षण तिला आपल्या आयुष्यात यावा असं वाटत असतं म्हणून तर तिनी हा खटाटोप केलेला असतो.

आता ती आनंदी तर होतेच पण तिचा जीवनसाथी खंबीरपणे तिच्या बरोबर उभा राहणार असतो. हे तिला अभीमानास्पद वाटतं.

आता दु:खा ची काजळी प्राची आणि हर्षवर्धनच्या संसारावरून दूर गेली. पण यानंतर काय होईल या दाम्पत्याच्या आयुष्यात?....बघू पुढच्या भागात.
--------------------------------------------------------------
क्रमशः
लेखिका… मीनाक्षी वैद्य