आत्मनस्तु कामाय श्रीराम विनायक काळे द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आत्मनस्तु कामाय

आत्मनस्तु कामायः

लाक्षागृहातून सुरक्षित बाहेर पडल्यावर पांडवांनी ब्राह्मणवेष धारण केला. भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत मत्स्य, पांचाल, त्रिगर्त आदि अनेक देश हिंडत ते एकचक्रा नगरीत एका एका ब्राह्मण कुटुंबात राहिले. वेशांतर केल्यामुळे कुणीही त्यांना ओळखू शकले नाही. तेथे एका ब्राह्मणाकडून पांचाल देशात द्रुपदाची कन्या ‘कृष्णा’ हिचे स्वयंवर आयोजित केल्याचे वृत्त त्यांना समजले. यज्ञकुंडातून प्राप्त झालेली, दैदीप्यमान अंगकांती असलेली कृष्णा ‘पण’ जिंकून मिळवण्यासाठी पांडव एकचक्रा नगरीबाहेर पडले. कुंतीसह अहोरात्र मार्गक्रमण करीत करीत करीत पांचाल देशात पोहोचले. तेथे एका कुंभाराकडे कुलाल शाळेत त्यांनी मुक्काम केला. स्वयंवराचा दिवस येईपर्यंत भिक्षा मागण्याच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण कुसुमावती नगरीचे निरीक्षण केले.
स्वयंवराचा दिवस उजाडला. राजधानीच्या ईशान्येला भव्य मंडप उभारला होता. सारामंडप देशोदेशीचे राजे, क्षत्रियवीर यांनी फुलून गेला. दुर्योधन, दुःशासनादि बंधु, कर्ण, अश्वत्थामा, शकुनी, सौबल, विराट, भोज, सुकेतु, सहदेव, भगदत्त, चेकित, पौंड्रक, चित्रायुध, शल्य, भूरिश्रवा, दृढधन्वा, जरासंध, सुषेण, शिशुपाल, सोमदत्त हे वीर मंडपात जमले. पांडव ब्रह्मवृंदामध्ये आसनस्थ झाले. द्वारकेहून श्रीकृष्णे, बलरामही स्वयंवर पाहण्यासाठी आलेले होते. मंगल वाद्यांच्या घोषात स्वयंवराची घटिका भरत आली. श्वेतवर्णी कटिवस्त्र, कंचुकी आणि उत्तरीय परिधान केलेली सुकेशिनी कृष्णा सखीसह मंडपात आली.
महाराज द्रुपद सिंहासनारूढ झाले. उपस्थितांचे स्वागत करून धृष्टद्युम्न स्वयंवरातील ‘पण’ कथन करू लागला. मंडपाच्या एका बाजूस ‘वैहायस’ नामक यंत्र उभारले असून त्याजवळ एक अवजड धनुष्य ठेविले होते. गरागरा फिरणाऱ्या वैहायसाच्या छिदातून बाण मारून यंत्रस्थित मत्स्याचा भेद करावयाचा होता. मात्र हा लक्ष्यभेद जलपात्रातील प्रतिबिंब पाहून करण्याची अट होती. हा अवघड ‘पण’ ऐकताच कित्येक वीर गलितगात्र झाले. नंतर धृष्टद्युम्नाने कृष्णेसह वीरमंडलात फिरून आपल्या भगिनीला उपस्थित राजांचा परिचय करून दिला. जवळून दिसलेले तिचे लावण्य आणि नीलकमलाप्रमाणे दरवळणारा तिचा अंग गंध यामुळे उपस्थितांमध्ये चैतन्य आले. कृष्णेच्या हातातील कमलपुष्प वेष्टीत सुवर्णाची वरमाला आपल्या गळ्यात पडावी अशी तीव्र इच्छा उपस्थित वीरांच्या मनात जागृत झाली.
धृष्टद्युम्नाने संकेत करताच वैहायस गरागरा फिरू लागले. मंडपातील एकएक वीर पुढे येऊन शरसंधान करू लागले. काही वीरांना त्या अवजड धनुष्याला प्रत्यंचाच चढविणे जमेना तर काही जणांनी सोडलेले बाण वेडेवाकडे जात निष्फळ ठरले. त्यांच्या फजितीमुळे उपस्थितांचे मनोरंजन झाले. मग धनुर्धर कर्ण सरसावला. त्याला पहाताच, 'मी सूतपुत्राला वरणार नाही.' असे उद्‌गार कृष्णेने काढले. अपमानित कर्ण माघारी वळला. आता मात्र कोणीही वीर पुढे येईना. 'या भूतलावर एकही धनुर्धर शिल्लक नाही का? कृष्णेचे स्वयंवर व्यर्थच ठरणार..!' अशी गर्जना धृष्टद्युम्न करु लागला. हे ऐकताच युधिष्ठिराने अर्जुनाला संकेत केला. ब्राह्मणवेषधारी अर्जुन वैहायसाच्या दिशेने जाऊ लागला. तो वैहायसाकडे जात असता कृष्णेने सखीकडे साभिप्राय कटाक्ष टाकला.
वैहायसाखाली असलेल्या धनुष्याला अर्जुनाने प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. भगवान रुद्र आणि श्रीकृष्णाचे मनात स्तवन केले. मग धनुष्यावर प्रत्यंचा चढवून भूमीवरील जलपात्रात पाहत त्याने यंत्रस्थित मत्स्याचा वेध घेतला. त्रिभुवन सुंदरी कृष्णा सलज्ज पुढे झाली. तिने हातातील वरमाला त्या ब्राह्मण वीराच्या गळ्यात घातली. त्याच वेळी भीमाला मंडपात ठेवून नकुल, सहदेवांसह युधिष्ठीर भिक्षा मागण्यासाठी मंडपाबाहेर पडला. कृष्णेची प्राप्ती एका ब्राह्मणाला झाली या गोष्टीचे क्षत्रिय वीरांना वैषम्य वाटले. ‘प्रिय बंधो युधिष्ठीरा, स्वयंवर मंडपस्थित क्षत्रिय कुलोत्पन्न वीर धनुर्धरांना न जमणारा अत्यंत अवघड लक्ष्यभेद करुन मी माझे धनुर्विद्येतील श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. माझ्या या कृत्यामुळे पराक्रमी भीष्मांशी असलेले नाते सार्थ ठरले आहे. एवढेच नव्हे तर माझ्या या वीरोचित कृत्यामुळे कुरुंच्या इतिहासाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. प्रभू रामचंदांनंतर श्रेष्ठ धनुर्धर म्हणून द्वापरयुगामध्ये माझे नाव घेतले जाईल असा मला साभिमान विश्वास आहे. तथापि या माझ्या पराक्रमाला त्यागाचे परिमाण लावणे अस्थायी होत आहे...”
किंचित विराम घेऊन कृष्णेकडे कटाक्ष टाकून युधिष्ठीर पुढे म्हणाला, “पण उद्या जेव्हा स्वयंवरात प्राप्त कलेल्या या कृष्णेचे दान तू ज्येष्ठ भ्रात्याला देशील तेव्हा अलौकिक त्यागाचे एक उदाहरण म्हणून अखिल विश्वात तुझ्या कृत्याचा कीर्ती सौरभ निश्चितच पसरेल. भीष्मांनी काशिराजाच्या तीन कन्यांचे हरण करुन त्याचे दान विचित्रवीर्याला केले. त्याहीपेक्षा उच्च श्रेणीतले परिमाण तुझ्या अकृत्रिम त्यागाला लावावे लागेल. कारण भीष्म प्रतिज्ञाबद्ध असल्याने त्यांच्या लेखी स्त्री ही भोगशून्य, त्याज्य वस्तु आहे. उलट तू आज ना उद्या मी निवडलेल्या सुंदरीचे पाणीग्रहण करुन गृहस्थधर्मात पदार्पण करणार आहेस. म्हणून तुझ्या त्यागाचा दर्जा श्रेष्ठ ठरणार आहे. तुझे हे कृत्य भरताच्या बंधुस्नेहाशी मिळते जुळते आहे.’
युधिष्ठीराच्या कथनाचा मतितार्थ ध्यानी येताच अर्जुन गडबडला. नखशिखांत हादरून तो कंपित स्वरात म्हणाला, “बंधु युधिष्ठीरा...! कृष्णेच्या सौंदर्याने स्थलकालाचे भान राहू नये हे समर्थनीय आहे. कृष्णेने माझ्या गळ्यात वरमाला घालताच हताश नजरेने माझ्याकडे पाहत तू मंडप त्याग केलास त्या तुझी मनःस्थिती मी समजू शकतो. तात्पर्य, तुझी लालसा जागृत व्हावी हे निसर्गसुलभच आहे. त्याबद्दल मी तुला दोषही देणार नाही. युधिष्ठीरा भानावर ये...! सौंदर्याच्या क्षणिक मोहाने तुझ्यासारख्या ज्येष्ठ भ्रात्यानेच जर असे ताळतंत्र सोडले तर मग कनिष्ठांनी कोणाचा आदर्श ठेवायचा बरे?”
अर्जुनाच्या उत्तराने यत्किंचितही विचलित न होता निग्रही स्वरात युधिष्ठीर म्हणाला, “अर्जुना, तुझे कथन खरेतर तुला स्वतःलाच अधिक लागू पडणारे आहे. आम्हा पाचही बंधूमध्ये ज्येष्ठता क्रम डावलून शरसंधान करण्याची प्रथम संधी मी तुला दिली म्हणूनही कदाचित तू असा हुरळून गेला असशील. कदाचित कामिनीच्या सौंदर्यासक्तीने तुझी सारासार विवेकबुद्धी लोप पावली असेल. कदाचित मंडपस्थित वीरांमध्ये एकट्या तुलाच यशप्राप्ती झाली म्हणूनही तुला उन्माद झाला असेल. पण तुझा हा धर्मनिष्ठ संयमी बंधू जिवंत असताना, त्याची सद्सद्विवेक बुद्धी, नीरक्षीर न्यायाने योग्य निर्णय घेण्याची त्याची समदृष्टी पूर्ण शाबूत असताना तुझे पतन तो कसे बरे होऊ देईल? पवित्र आर्य संस्कृतीत कुटुंब व्यवस्थेमध्ये कोणते आचरण संकेत आणि वर्तनदंड पाळणे अनिवार्य असते याचे ज्ञान तुला नसेल तर ते समजावून सांगणे माझे आद्य कर्तव्यच नव्हे काय?
फाल्गुना, ज्येष्ठ भ्राता अविवाहित असता कनिष्ठाला विवाह करण्याचा अधिकार नाही. मग माता कुंती तुला विवाह करायची अनुमती कशी बरे देईल? आणि विवाह न करता या सोज्वळ कृष्णेला तू भोगदासीचा दर्जा दिलास तर तिचा पिता द्रुपद तरी त्या गोष्टीला कशी काय संमत्ती देईल?" युधिष्ठीराचा हा युक्तिवाद बिनतोड असला तरी त्याचे खंडन कसे करावे याचे चिंतन अर्जुनाने केले होते.
"प्रिय बंधो! तुझे मत मी कदाचित मान्यही केले असते. पण त्याला छेद जाणारे उदाहरण अलिकडेच घडलेले आहे. भीमसेन तुझ्या पेक्षा कनिष्ठ असूनही प्रत्यक्ष कुंती मातेनेच त्याला हिडिंबेचे पाणीग्रहण करण्याची अनुमती दिली. तुला याचे विस्मरण झाले असावे. 'कामातुराणां न भयं न लज्जा' या वचनाची सत्यता मला आता पटू लागली आहे. वासनेच्या आहारी जाऊन पवित्र क्षात्रधर्माची पायमल्ली तुझ्यासारखा धर्मनिष्ठ करु धजावेल हे मला स्वप्नातही खरे वाटले नसते. मी मत्स्यभेद करुन जिंकलेल्या कृष्णेवर माझा पूर्ण अधिकार असताना अन्य कोणी तिची अभिलाषा करावी हा अक्षम्य आणि दंडनीय अपराध आहे. ज्येष्ठता क्रम डावलून तू मला शरसंधानाची संधी दिलीस, या मध्ये तुझे योजना चातुर्य जरुर आहे. कारण तू स्वतः आणि भीमसेन....तुम्ही स्वतःला धनुर्धर समजत असलात तरी वैहायस स्थित मत्स्यभेद करणे तुमच्या कुवती बाहेरचे आहे. पण जिंकून मी कृष्णेची प्राप्ती केली आहे. त्यामुळे तू दिलेले भिष्मांचे उदाहरण माझ्या संदर्भात गैरलागू ठरते. त्यानी काशी राजाच्या कन्यांची प्राप्ती अपहरण करुन केली होती. 'पण' जिंकून नव्हे, हे ही तू ध्यानात ठेव. त्यातही त्या तिघींपैकी अंबेने आपण शाल्व राजाला मनाने वरले आहे, असे सांगताच भीष्मानी तिला शल्वाकडे रवाना केले ही बाब लक्षणीय आहे. तेव्हा कितीही मधुर भाषण करुन माझ्या मनात कालत्रयीही येणार नाही असा विचार तू माझ्यावर लादू पाहशील तर ती गोष्ट मी मान्य करणार नाही."
अर्जुनाच्या कथनामुळे व्यथित होत्साता युधिष्ठीर उद्‌गारला, "फाल्गुना, माझ्या कथनातील मर्म दुर्लक्षित करुन केवळ स्वतःच्या कामशमनार्थ तू जो वितंडवाद घालीत आहेस तो तुला खचितच भूषणावह नाही. ज्येष्ठांनी केलेल्या सूचनांचे अंतर्मुख होऊन चिंतन करणे हे कनिष्ठांचे परम कर्तव्य आहे. गुरुनी केलेल्या या उपदेशाचे तुला विस्मरण झाले का? ज्या क्षुद संकुचित हेतूने तू हे घातकी औधत्य करीत आहेस ते तर धर्माज्ञेनुसार दंडनीय आहे. शास्त्राप्रमाणे ज्येष्ठ भ्राता हा गुरु आहे, पिता आहे! त्याच्या कथनाविषयी शंका घेणे हे महापातक असून त्याच्या परिमार्जनार्थ परखड प्रायश्चिते धर्मशास्त्राने वर्णिली आहेत. अर्जुना, तरीही तुझे अपराध पोटात घालून तुझ्या मनात उत्पन्न झालेली किल्मिषे आधी दूर करुन मगच मी तुला सौम्य प्रायश्चित सुचवीन. हा नरदेह म्हणजे अस्थि, मांस, चर्माचे नश्वर गाठोडे आहे. विषय सेवनाची उर्मी प्रसंगी सद्‌गुणांचाही व्यय करते हे ध्यानात घेऊन तू कामिनीचा नाद सोडावास! कारण ती पुरुषश्रेष्ठाच्या पतनाचे कारण असते ही दिव्य वाणी आहे!!
या धर्मज्ञ युधिष्ठीराला भीम हिडिंबा संबंधांचे उदाहरण तू द्यावेस हे अज्ञान आहे. अर्जुना, हिडिंबा राक्षसी असल्याने मानवी वर्तन संकेत तिला लागू नाहीत याचे ज्ञान तुला नाही प्राप्त केलेल्या वस्तूचा भोग घेणे हाच क्षात्रधर्म असल्याचे संदर्भ तुला कोणत्या ग्रंथात सापडले? क्षणिक काम पूर्तीच्या आहारी जाऊन दंभ मदादि रिपूनी ग्रासलेल्या अर्जुना... तुझे औधत्य सहजासहजी दुर्लक्षिण्याजोगे नाही! तरीही हा दयाघन युधिष्ठीर तुझ्या अंगी असलेल्या शरसंधान कौशल्यामुळे पुनःपुन्हा द्रवत आहे. ज्या कृष्णेच्या मोहापायी माझ्याशी आदराने आचरण करण्याच्या व्रताचा तू भंग कलास, त्या तुझ्या पतनाला कारण असलेली कृष्णा प्रायश्चित स्वरुप म्हणून तू मला अर्पण करावीस असा माझा सल्ला राहील."
हे कथन ऐकून अर्जुन तात्काळ कृष्णेचे दान युधिष्ठीराला देईल की काय.....? या भीतीने भीमाला ग्रासले. अर्जुनाने कथनाच्या ओघात शरसंधान कौशल्यात त्याला तुच्छ लेखले त्यावेळीच त्याचे बाहू स्फुरण पावू लागले. तथापि उपस्थित झालेल्या कलहामध्ये त्याचेही हेतू गुंतले होते. अशा वेळी बाहुबला पेक्षा बुद्धिचातुर्याची गरज आहे हे ही त्याच्या ध्यानात आले. अर्जुन आणि युधिष्ठीर दोघांनाही निरुत्तर करुन आपले हक्क सिद्ध करण्यासाठी तो प्रभावी शब्द योजना जुळवू लागला. परंतु युधिष्ठीराने अंतिम निर्णय उद्घोषित करताच तो भानावर आला. आता विचार करण्यात जास्त अवधि घालविणे धोक्याचे आहे असे वाटून भीम बोलू लागला.
“प्रिय युधिष्ठीरा... तुझी आनुज्ञा असेल तर प्रस्तुत विषयात काही मतप्रदर्शन करावे असा माझा मनोदय आहे.” भीमाचा विनय पाहता तो आपलेच समर्थन करील या अपेक्षेने युधिष्ठीराने अनुमती दर्शविली. “प्रिय बंधुनो, वक्तृत्व हा खरे तर माझा प्रांत नव्हेच! वादविवाद म्हणजे महाजटिल कार्य. प्रतिस्पर्ध्याला भिडून त्याला चांगले रगडून काढावे किंवा गदेच्या प्रहारांनी त्याचे चूर्ण चूर्ण करावे, हे माझे आवडते कार्य. बंधुनो माझे कथन सुरु असता कुणीही मध्येच व्यत्यय आणून माझा ओघ खंडित करु नये. त्याचप्रमाणे एखादा शब्द किंवा वाक्यप्रयोग चुकला तर अर्थ समजून घ्यावा.” यावर चारही बंधूनी स्मित करीत माना डोलावल्या.
“हं... तर अर्जुनाने प्रायश्चित म्हणून ही कृष्णा युधिष्ठीराला देण्याची घाई करु नये. तिचा त्याग करावयाचा या कल्पनेनेच त्याचे हृदय किती व्यथित झालेले आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. हा निर्णय त्याने सावध चित्ताने घ्यावा. आता मी थेट मुद्यालाच हात घालतो! स्वयंवरात भाग घेण्याची प्रथम संधी युधिष्ठीराने अर्जुनाला दिली. माझे जेष्ठत्व त्याने डावलले, हे समर्थनीय नाही! आता युधिष्ठीर म्हणेल की, मी स्वतः तरी ती संधी प्राथम्याने कुठे घेतली? तर त्यावरही माझे उत्तर आहेच. तो स्वतः ज्येष्ठ असल्यामुळे त्याला ती संधी घेता आली असती पण तसे न करता त्याने परभारे अर्जुनाला संकेत केला. याचा एकच अर्थ निष्पन्न होतो. स्पर्धा, बलप्रदर्शन हा युधिष्ठीराचा प्रांतच नाही!
स्वतःधर्माचरण करायचे अन इतरांना तसा उपदेश करायचा. हेऽहे... म्हणजे निर्बलाला शोभणारे कौशल्य त्याला युद्धापेक्षाही छान जमते म्हणजे स्वयंवरात भाग घेतला नाही तर कृष्णेची अभिलाषाही नाही! याबद्दल आता त्याने कोणतेही भाष्य करु नये. उलट अर्जुनाला कौशल्य दाखवायची संधी आयतीच मिळाली. त्यात त्याने समाधान मानावे. संधी मिळून वर आणि कृष्णेचीही इच्छा अर्जुनाने करावी म्हणजे अतीच झाले. हेऽहे म्हणजे एका कार्याची दोन-दोन श्रेये घेण्यासारखे झाले. ते काही नाही. त्याला संधी मिळाली आहे. आता कृष्णा मिळणार नाही. फारतर तिच्या प्राप्तीसाठी आपण पुन्हा एकदा ‘पण’ लावूया. हा ‘पण ‘गदायुद्धाचा असावा. माझी तयारी आहे.”
आपले बोलणे अद्याप संपलेले नाही. असा संकेत करीत त्याने नेत्र बंद केले. “आता दुसरा मुद्दा! म्हणजे अर्जुनाने म्हटले की, मी हिडिंबेचे पाणिग्रहण ज्येष्ठत्व डावलून केले. पण माझा बलशाली देह पाहून स्वतःहिडिंबा असूरवृत्तीनुसार माझ्यावर अनुरक्त झाली. तिच्या प्राप्तीसाठी काही 'पण' नव्हता. माझे सगळे बंधू स्त्री सुखापासून वंचित असता त्याची प्राप्ती मला एकट्याला व्हावी इतका मी स्वार्थी नाही. पण केवळ कुंती मातेनेच मला हिडिंबेची इच्छा तृप्त कर अशी अनुज्ञा दिली म्हणून...त्यावेळी ज्येष्ठ मानाचा मुद्दा युधिष्ठीराने उपस्थित केला नाही. तुम्ही इतरांनीही त्यावेळी मौन धरलेत. मग तसेच आताही करा अन् कृष्णेची प्राप्ती मलाच होऊ द्या कशी !
बंधुनो! कृष्णेच्या स्वयंवरात दुर्योधन, शिशुपाल, जरासंध, कर्ण, शल्य असे नाठाळ दुर्जन दिसले तेव्हा पणाची वाट न पाहताच कृष्णेचे बळाने अपहरण करण्याची अनुज्ञा मी युधिष्ठीराकडे मागितली होती. वास्तविक भीष्मांचे उदाहरण पाहता तशी संधी मला मिळणे आवश्यक होते. माझ्या कृत्याने कुरुंच्या लौकिकात मोलाची भर पडली असती पण युधिष्ठीराने परवानगी नाकारली. हे कृत्य मी स्व-बलावर करणार होतो. काही आपत्ती आली असती तर निवारण करायला मी समर्थ होतो. माझ्या बलाची पूर्ण कल्पना युधिष्ठीराला आहे. पण त्याने संधी दिली नाही. मग कर्ण मत्स्यभेद करायला उठला. त्यावेळी माझ्या इच्छेचा मी पुनःश्च उच्चार केला. पुन्हा त्याने नकोच म्हटले. स्थल काल परिणामांचे भान हरपलेल्या, जाण नसलेल्या या... या... युधिष्ठीराने मला नको म्हटले, त्याचे आदेश न जुमानता मी माझी इच्छा पूर्ण करु शकलो असतो आणि मागाहून माझ्या कृतीचा पश्चाताप मला व्यक्त करता आला असता पण....त्यावेळी काही ही गोष्ट मला सुचली नाही. पण समजा सुचतीच तर...? त्याबद्दल युधिष्ठीराने माझ्याकडे कृष्णेची मागणी केली असती तर...? मी काही अर्जुनाप्रमाणे वितंडवाद घातला नसता. दिली असती कृष्णा त्याला. तर मग बंधुनो! त्याने मला शरसंधानाची संधी तरी का बरे दिली नाही? कोणी सांगावे कृष्णेच्या प्राप्तीसाठी, तीव्र इच्छेमुळे कदाचित मी अचूक शरसंधान केलेही असते. वेळी मत्स्यभेद न होता तरीही क्रोधायमान होऊन या कृष्णेचे तिच्या गौरांगी सखीसह हरण तरी मी नक्कीच केले असते! प्रतिष्ठेच्या अशा निर्णायक क्षणी मला भलतेच अवसान येते. माझे धैर्य गळत नाही अन् मागाहून काहीतरी धर्मसूत्र घोळवून मी त्याचे निरसन सुद्धा करायला जात नाही. असले कर्म या युधिष्ठीरालाच शोभते !
बंधुनो, जरा विचार करा. कृष्णेने कर्णाचा अपमान करुन त्याला शरसंधान करु दिले नाही. ते ठीकच झाले. पण क्षणभर गृहित धरा, जर का त्या दुष्ट कर्णाने शरसंधान केले असते तर? तर आज आम्हा पांडवांमध्ये कृष्णेवरुन वाद होण्याचा प्रसंगच उद्भवला नसता...! आता मी काही त्या दुष्टाला ही कृष्णा सुखासुखी पचू दिली नसती. कर्णाच्या गळ्यात वरमाला घालण्यापूर्वीच ही कृष्णा या बलदंड भीमसेनाच्या स्कंधी आरुढ होऊन, गौरांगी सखीसह मंडपावाहेर अदृश्य झाली असती. कृष्णेची प्राप्ती करण्याचे माझे सगळे मार्ग याऽया युधिष्ठीरामुळे बंद झाले. आता तुम्हीच सांगा, या कृष्णेवर खरा अधिकार कोणाचा?. तर माझाच! अर्जुनाने वैहायस यंत्रामधील मीनाचा भेद केला. कृष्णेने त्याच्या गळ्यात वरमाला टाकली म्हणून काही फारसे बिघडले नाही. पण मंडपातील मत्सरी राजांनी गदारोळ घातला. तरी तो पाहूनही अर्जुनाच्या सहाय्यार्थ न थांबता हाऽऽहा युधिष्ठीर.... नकुल, सहदेवासह मंडपाबाहेर गेला.
हा भिक्षा मागायला गेला अन् इकडे मत्सरी राजसमुहाने अर्जुनावर हल्ला केला. एका ब्राह्मणाने कृष्णा मिळवावी याचे वैषम्य वाटले ना त्यांना...! यावेळी जर का मी त्याच्या सहाय्याला गेलो नसतो तर...? तर सगळ्यांचा समाचार अर्जुनाने कसा काय घेतला असता? विशेषतः शल्यासारख्या योद्ध्याचे आव्हान स्विकारुन हाऽऽहा धनुर्धर त्याच्याशी द्वंद्व कसले कर्माचे खेळणार? भले त्याला आपल्या धनुर्विद्येचा कितीही अहंकार असू द्या...! मी नसतो तर कदाचित अर्जुन युद्धात गुंतलेला पाहून शिशुपाल, जरासंध यासारख्या अधमांनी तिला पळवूनही नेले असते. आज केवळ माझ्यामुळे अर्जुन आणि कृष्णा दिसत आहेत. बंधुनो... माझे पाचही मुद्दे किती बिनतोड आहेत पहा बरे! आता या कृष्णंवर युधिष्ठीर आणि अर्जुन या दोघांपेक्षाही माझाच अधिकार प्राबल्याने सिद्ध झाला आहे. आता जर कोणाची काही शंका असेल, संदेह असेल तर स्पष्ट सांगावे. मी त्याचे निर्मूलन करीन. अर्जुनाने त्याचा निर्णय जाहीर करण्यासाठी मी त्याला योग्य अवधीही देण्यास तयार आहे.”
भीमसेनाचे प्रदीर्घ कथन पूर्ण होत असता सचिन्त मुद्रेने कृष्णा बोलू लागली, “विप्र श्रेष्ठहो... तुमचे कथन ऐकून मी संभ्रमित झाले आहे. काही गोष्टी स्पष्ट होण्यासाठी मी हे औधत्य करु धजावले, तरी मला क्षमा असावी. तुमची संख्या, तुमची नावे आणि भीमसेनांच्या वक्तव्यातील संदर्भ... हे ध्यानात घेता तुम्ही ब्राह्मण आहात की ब्राह्मण वेष केलेले पांडव आहात हे कृपा करुन..." तिचे कथन खंडित करीत उताविळीने भीम म्हणाला, “कृष्णे आम्ही पांडवच आहोत. लाक्षागृह जळत असता मातेसह आम्ही भुयारी मार्गाने निसटलो अन् ब्राह्मण वेशामध्ये देशाटन करीत आहोत. मला या सोंगाचा फारच कंटाळा येऊ लागला आहे. तुझा भावी पती...बलदंड भीम म्हणजे मीच अन् तुला पण जिंकून प्राप्त करणारा अर्जुन, जडजंबाल दुर्बोध शास्त्रार्थ सांगणारा हा ज्येष्ठ पंडुपुत्र युधिष्ठीर अन् हे कनिष्ठ बंधू, माद्री मातेचे पुत्र नकुल, सहदेव." हे ऐकत असता मधूर स्मित करीत कृष्णा उद्‌गारली, “कृपया मला थोडे मनोगत स्पष्ट करण्याची अनुमती असावी." त्यावर मान डोलावीत युधिष्ठीराने संमती दिली.
"तुम्ही जिवंत आहात हे ऐकून, विशेषतः लक्ष्यभेद करुन मला प्राप्त करुन घेणारा वीर, ज्याला मी पूर्वीच मनाने वरले होते, श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आहे हे कळताच मला जीवनाचे जणू श्रेय गवसले आहे. स्वयंवरामध्ये मत्स्यभेदाचा पण ठेवण्याची चतुर योजना अर्जुनाला आव्हान देऊन प्रगट व्हायला लागावे याच एकमेव हेतूने मी केली होती. लाक्षागृह जळले तरी श्रीकृष्णांसारखा पाठीराखा तुमचे खचितच रक्षण करील याची खात्री असल्याने पांडव लाक्षागृहात भस्मसात झाले या वदन्तेवर माझा विश्वास नव्हताच! आपले शरसंधाचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी अर्जुन नक्कीच येईल असे मला वाटले होते.
सखी समवेत स्वयंवर स्थानी प्रवेश केल्यावर उपस्थितांचा परिचय धुष्टद्युम्नाने मला करुन दिला. मंडपातील राजमंडलामध्ये अर्जुन नाही हे लक्षात येताच मला आत्यंतिक नैराश्य आले. त्या उद्विग्न मनःस्थितीत लाक्षागृहामध्ये पांडवांचा अंत झाला ही लोक वदंता खरीच असावी असे माझ्या मनाने घेतले. त्याच अवस्थेमध्ये उपस्थित जरठ, तेजहीन वीरांच्या तुलनेत ब्रह्मवृंदातून उभा राहिलेला तरुण मला श्रेष्ठ वाटला.”
युधिष्ठीर यत्किंचितही विचलित न होता निश्चयी स्वरात म्हणाला, “कृष्णे... तुझ्या कथनामुळे तर तू अर्जुनावरचा हक्क स्वहस्तेच गमावला आहेस. तुझे विचारसुद्धा दुटप्पी आहेत. तू खरोखर अर्जुनावर अनुरक्त असतीस तर तो स्वयंवरात प्रकट झाला नाही हे पाहिल्यावर तू अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला असतास. पण तसे न करता प्राप्त परिस्थितीमध्ये ब्राह्मण कुमाराचा स्वीकार करण्याइतकी तुझी चंचल वृत्ती मात्र खचितच प्रत्ययाला यावी.”
"कृष्णेच्या कथनातून स्वतःला सोईस्कर असा अर्थ युधिष्ठीराने काढला असला तरी तिच्या कथनातला मतितार्थ त्याने बुद्ध्या दुर्लक्षिला आहे. पती म्हणून केवळ माझाच स्वीकार करण्याचा तिचा निर्धार होता. तोही एवढा दृढ की, कोणत्याही परिस्थितीत माझी प्राप्ती निर्वेधपणे व्हावी अशी पूर्ण खबरदारी तिने घेतली होती. प्राप्त परिस्थितीत तडजोड करण्याची तिची वृत्तीही स्त्रीसुलभच आहे. परंतु केवळ स्वतःच्या हेतूपूर्ती साठी कृष्णेची वृत्ती चंचल आहे असा तर्कदुष्ट, विपर्यस्त निष्कर्ष युधिष्ठीरा तू काढू पाहत आहेस. ही बाब तुझ्या लौकिकाला बाधा आणणारी आहे." असे प्रतिपादन अर्जुनाने केले. त्यावर कृष्णा म्हणाली, “मी केवळ अर्जुनावर अनुरक्त आहे आणि माझे स्वामित्व अर्जुनाकडे आहे. ही गोष्ट त्यानेही मान्य केली आहे. माझी उत्पत्ती यज्ञकुंडातून झालेली असून माझ्या निष्ठा अग्निजिव्हां सारख्या ज्वलंत आहेत. तेव्हा अर्जुनाखेरीज कोणत्याही पुरुषाने माझ्या प्राप्तीचा हव्यास धरणे अयोग्य अनैतिक ठरेल.”
युधिष्ठीर म्हणाला, “कृष्णे, माणसाचे विचार हे जलाशयावर उठणाऱ्या तरंगांप्रमाणे क्षणजीवी असतात. त्याच्या उक्ती आणि कृती यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर असते. केवळ अनुरक्तिच्या निकषावर जन्माची नाती जुळत नसतात. कामांध मनोवृत्तीच्या माणसांनी आपल्या वृत्ती दडविण्यासाठी करावयाचा तो एक भ्रामक अर्थहीन शब्दप्रयोग आहे, असे तुझ्या उदाहरणावरुन मला आता वाटू लागले आहे. अर्जुनाची आशा मावळल्यावर मंडपस्थित कोणा भिन्नवर्णियाशी जन्माचे नाते जोडू पाहणाऱ्या तुझ्या निष्ठा किती ज्वलंत आहेत हे मी पूर्णपणे ओळखले आहे. तुझ्यासारख्या धूर्त आणि चंचल स्त्रीला काबूत ठेवण्यासाठीच माझ्यासारख्या धर्मज्ञ, संयमी पुरुषोत्तमाची निर्मिती ब्रह्म्याने केली असावी. हे कार्य माझ्या निरागस बंधूच्या कुवतीबाहेरचे आहे. म्हणून बंधू प्रेमापोटी त्यांचा संभाव्य दुःखभार स्वतःच्या माथ्यावर घेण्यासाठी मला स्वतःलाच बद्धपरिकर होण्यावाचून गत्यंतर नाही!”
इतका वेळ सर्वांचे कथन शांतचित्ताने श्रवण करणारा नकुल पुढे सरला अन् मृदू स्वरात उद्‌गारला, “थांब जेष्ठ बंधो! भातृप्रेमापोटी निरंतर चिंतामग्न असणाऱ्या युधिष्ठीरा! तुझी अतिव करुणा मला येत आहे. तुझ्या कथनातून ओसंडणारा स्नेहभाव भीमार्जुनांच्या पुरता लक्षात आला असेल असे त्यांच्या मुद्रेवरुन प्रत्ययाय येत नाही. म्हणूनच केवळ मला तोंड उघडणे भाग पडले. युधिष्ठीरा, कुंतीपुत्रांमध्ये तू ज्येष्ठ तर माद्रीपुत्रांमध्ये मी ज्येष्ठ! तात्पर्य तुझ्या व्यथा इतर तिघांपेक्षाही मलाच तीव्रतेने जाणवू शकतात. आतापर्यंतच्या चर्चेतून भीमार्जुनांचा कृष्णेवरील हक्क जवळ जवळ संपुष्टातच आला आहे." त्याचे हे वाक्य ऐकून उल्हासित झालेला युधिष्ठीर त्याला प्रोत्साहन देत म्हणाला, “ज्येष्ठ माद्रीपुत्रा, बोल! माझा प्रत्यक्ष सहोदर नसलास तरी माझ्या स्वभावाची पूर्ण पारख तुला झाली असावी असे तुझ्या कथनावरुन ध्वनित होते.
वास्तविक ज्येष्ठ भ्राता या नात्याने मी एकदा निर्णायक आज्ञा दिली तर कोणीही बंधुला त्याचे उल्लंघन करता येणार नाही असा पवित्र धर्मसंकेत आणि शास्त्रार्थ आहे. परंतु स्त्री सुखाची वासना एवढी तीव्र आणि दाहक असते की, माणसाची सारासार विवेक बुद्धीच ती भस्मसात करु शकते. विश्वामित्र, पराशर असे देवतुल्य तापसही स्त्री सुखासाठी लंपट झाल्यामुळे निष्प्रभ झाले. कुरुंचे दिग्गज पूर्वज महाराज नहुष आणि ययाति यांचेही कामवासनेपायी अधःपतन झाले. इतके दूरवर तरी कशाला जा...! आमचे जनक महाराज पंडु, क्षणिक सुखाच्या आहारी गेल्यामुळे आम्ही पांडव पोरके झालो. सत्याचे हे विदारक स्वरुप ध्यानात येऊन तरी भीमार्जुनांची कृष्णेच्या प्राप्तीची लालसा नष्ट व्हावी! नकुला माझा हा हेतू तुझ्या शब्दसामर्थ्याने तरी त्यांच्या कर्णरंध्रात शिरावा अशी माझी अपेक्षा आहे. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी तरी, ज्येष्ठ माद्रीपुत्रा... तू अवश्य बोल!”
“युधिष्ठीरा, कामातुरतेचे दुष्परिणाम आणि यथातथ्य स्वरुप पूर्णांशाने ज्ञात व्हावे इतके तुझे शब्द सामर्थ्य खचितच प्रत्ययकारी आहे. तू दिलेली उदाहरणे तर इतकी समर्पक आहेत की अल्पमतीच्या माणसाचेही तात्काळ मतपरिवर्तन व्हावे. अर्जुनाची भोगतृष्णा आता खचितच शमन झाली असून तिचे त्यागामध्ये उन्नयन होत असावे असे त्याच्या क्लांत मुद्रेवरुन दिसत आहे.
आता राहिला भीमसेन! त्याने आपल्या कथनात कृष्णेची प्राप्ती त्याला स्वतःला होणे कसे योग्य आहे ही एकच गोष्ट कोणतेही प्रमाण न देता पुनःपुन्हा ऊधृत केली म्हणून काही ती सिद्ध झाली असे थोडेच आहे? युधिष्ठीराने ज्येष्ठ भ्रात्याची कशी कुचंबणा होते याचे यथातथ्य वर्णन केले आहे. त्यामुळे आता भीमसेन बहुधा तटस्थच राहतील, (हो नाही काहीही समजावे असे भीमाचं हास्य) हा माझा अंदाज खरा ठरला आहे.
आता या कलहाचे कारण असलेली प्रत्यक्ष कृष्णा! तिचाही विचार करणे न्यायोचित ठरते. तिची वृत्ती चंचल असली तरी प्राप्त परिस्थितीत योग्यायोग्यतेचा विचार करण्याएवढी स्थिर बुद्धी तिच्याकडे आहे. अर्जुन दुष्प्राप्य आहे हे कळताच आयुष्यभर नैराश्याच्या गर्तेत खितपत पडण्यापेक्षा मंडप स्थित तरुणांमधील भिन्न वर्णाचा का असेना सुयोग्यवर निवडून आपल्या पूर्वनिष्ठा त्याच्या चरणी समर्पित करण्याएवढे सामर्थ्य तिच्याकडे आहे. लौकिकार्थाने तिचे स्वामित्व अर्जुनाकडे असल्यामुळे तिच्या इच्छा अनिच्छांचा विचारसुद्धा स्वतंत्रपणे करण्याचे प्रयोजन उरत नाही. ज्या निर्धाराने आपण अर्जुनावर अनुरक्त आहोत असे तिने सांगितले त्याच निर्धाराने अर्जुन तिचे दान ज्या पांडवाच्या हाती देईल त्याच्याशी काया-वाचा-मने एकनिष्ठ राहून पातिव्रत्याचे नवे संकेत ती दृढ करील अशी माझी खात्री आहे. तेव्हा युधिष्ठीरा तिची फिकीरही तू करु नकोस !
आता सर्वांच्या हितासाठी अहर्निश झटणारा युधिष्ठीर हाच कृष्णेसाठी एकमेव पर्याय उरला असे सकृतदर्शनी सर्वांनाच वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि मनाच्या आत्यंतिक निराश अवस्थेत, कृष्णेचा स्विकार करण्यावाचून अगदी गत्यंतर नाही म्हणून, शून्य आसक्तिने, केवळ ज्येष्ठ भ्रात्याचे कर्तव्य पालन करण्यात कसूर झाली असा जनापवाद आणि कृष्णेला वाऱ्यावर सोडली असा स्वकियांचा दोषारोप टाळण्याच्या केवळ याच एकमेव हेतूने कृष्णेचे स्वामित्व आपल्या शिरावर घेण्याची पाळी युधिष्ठीरावर येऊ घातली आहे.
तर बंधु जनहो! ज्येष्ठ भ्रात्याला आयुष्यभर वेदना सहन करायला लावणे मला माद्रीपुत्राला योग्य वाटत नाही म्हणून ज्येष्ठत्वाच्या नात्यामुळे कृष्णेचा आपल्या मनाविरुद्ध स्विकार त्याने करु नये असे माझे मत असून मनाच्या आत्यंतिक अवस्थेत हा ज्येष्ठ माद्रीपुत्र त्यागाला सिद्ध झाला आहे. युधिष्ठीराच्या दुःखाचे कारण असणारी कृष्णा....! हिचे पाणीग्रहण करण्याचा संकल्प मी व्यक्त करीत आहे. युधिष्ठीरा आता तरी शांत हो. मुळात हा कलह तू स्वतःच निर्माण केल्यामुळे तुला कृष्णेचे दान स्विकारण्याचा अधिकार कोणत्याही शास्त्रसंकेताच्या आधारे सापडणार नाही. तेव्हा त्याच्या वाटेलाही तू न जावेस यातच तुझे ज्येष्ठत्व शाबूत राहिल.
कुंतीपुत्रांनो...! या माझ्या संकल्पामुळे तुम्हालाही मोठा लौकिक प्राप्त होईल. एक तर चारुगात्री रुपयौवना कृष्णेसाठी साक्षात मदन स्वरुप असलेला हा नकुलच अनुरुप पांडव आहे याची खात्री पटून समस्त प्रजानन तुमच्या योजना चातुर्याची तारीफ करतील. खेरीज पति परायण माद्रीच्या पुत्रावर कुंतीपुत्र सहोदरापेक्षाही प्रेम करतात हा भ्रातृभावाचा नवा संकेतही भरतवर्षामध्ये रुढ होईल."
"धन्य आहे नकुला! आपल्या हेतूचा पत्ताही लागू न देता आपला कार्यभाग साध्य करुन घेण्याचे तुझे कौशल्य अन् चातुर्य केवळ अद्वितीय!" सहदेवाच्या या उद्गारानी उर्वरित पांडवांसह कृष्णेनेसुद्धा केवळ या उद्‌गारामुळेच त्याची दखल घेतली. "अरे नकुला! तुझ्या समवेत नऊ मास माद्री मातेच्या उदरात पाठीला पाठ लावून राहिलेल्या आपल्या समवयीन बंधूलाही मोठ्या चाणाक्षपणे कनिष्ठ लेखून, त्यास युधिष्ठीरासारख्या जेष्ठ-धर्मज्ञ भ्रात्याची सहजी मान्यता मिळवून तू आपले नाव सर्वार्थाने सार्थ केले आहेस. मलाही हे मान्य करण्यावाचून गत्यंतर उरले नाही की, तुम्हा चारही वीर शिरोमणी महाप्रतापी पांडवांमध्ये मी कनिष्ठ तम माद्रीपुत्र अगदी नगण्य ठरलो आहे....!
कृष्णेच्या प्राप्तीची अभिलाषा करणे दूरच तिच्याबद्दल विचार करण्याएवढेही कर्तृत्व नसलेला, केवळ संख्यारुप अस्तित्व असलेला मी पंचम स्थान स्थित पंडुपुत्र आहे. चार वेद, चार वर्ण, चार आश्रम, चार पुरुषार्थ अशी किती उदाहरणे सांगावीत? कोणत्याही श्रेष्ठ अलौकिक तत्वांची संख्यासुद्धा चार या अंकापुढे जात नाही. तुम्ही माझे जेष्ठ, श्रेष्ठ बंधू जणू चार वेदच असून नुकतेच तुमच्या पांडित्याचे दर्शन घडल्यामुळे माझ्या आयुष्याचे जणू सार्थकच झाले आहे. तुमच्या अलौकिकत्वापुढे कधी मान वर करुन पहावयाचे धाडसही मी यापूर्वी करु शकलो नाही. पण कृष्णेच्या अभिलापेने भोगलोलुप होऊन तुम्ही यापूर्वी केलेले कथन चतुर्थ वर्णियांपेक्षाही चार श्रेणीनी खालच्या स्थानी दाखविले तरी पुरे होणार नाही.
तुमच्या अधःपतीत, विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडल्यामुळे तुम्हा चौघांना 'ज्येष्ठ’ म्हणणे निरर्थक असून तुम्ही माझ्यापेक्षाही कनिष्ठ ठरला आहात. अर्थात या मुद्द्याला अनुलक्षून मी कृष्णेवर माझे स्वामित्व सिद्ध करु इच्छित नाही. तुमचे बाष्कळ वक्तव्य ऐकण्यापेक्षा माझी श्रवण संवेदनाच नष्ट झाली असती तरी चालले असते, असे म्हणण्याची पाळी तुम्हीच माझ्यावर आणिली आहे. तुम्हा चौघांकडेही लोकोत्तर गुणांचा समुच्चय जरुर आहे. पण तुमच्या मनात वास्तव्य करणारी विषारी कामांधता लक्षात घेता भीष्मांचे नावही तुम्ही उच्चारु नये.
युधिष्ठीरा, जेष्ठत्व निसर्गक्रमावर ठरत नसून ते वर्तनाने, उन्नत विचारांनी सिद्ध व्हावे लागते! भीमसेना, बलप्रदर्शनासाठी द्वंद्व खेळण्याची आवश्यक नसते, विकारांवर काबू ठेवूनही ते प्रदर्शित करता येते! अर्जुना, शौर्य पण जिंकून नव्हे तर अहंकार जिंकून सिद्ध करावे लागते! नकुला, शाश्वत सौंदर्य शरीरास्थित नसते. सुंदर विचार अभिव्यक्त करुन ते प्राप्त होते! कृष्णे! या चारही श्रेष्ठ पांडवांच्या तुलनेत तू मात्र स्वच्छ विचारांची वाटतेस. स्वतःचा हेतू वा अयोग्य कृती झाकून न ठेवता केलेल्या कथनातून तुझ्या बुद्धीचे प्रांजलत्व, तुझ्या वस्त्र प्रावरणांमधून प्रत्ययालाही न येणाऱ्या तुझ्या शरीर सौंदर्याप्रमाणे अबोध आहे. कनिष्ठाने जेष्ठांच्या नेत्रात अंजन घातल्याचा हा प्रसंग पांडवांच्या इतिहासात न राहो!
ज्येष्ठ बंधुनो! मी काही अलौकिक भव्य दिव्य गुणांचा भीष्म, रामचंद्र यांसारखा पुरुषोत्तम नाही. निसर्गक्रमानुसार होणारी मनःशरीर स्थित्यंतरे माझ्यातही झालेली असल्यामुळे यौवनसुलभ विषय सेवनाची ओढ कृष्णेच्या दर्शनाने माझ्याही मनात जागृत झाली. माझ्यासाठी कृष्णेसारखी त्रैलोक्यसुंदरी केवळ दुष्प्राप्य याची पूर्ण जाणीव असूनही तिला स्वयंवर मंडपात पाहताक्षणीच तिच्या प्राप्तीची तीव्र लालसा माझ्या मनातही जागृत झाली. बंधुनो, तुमचा विश्वास बसो न बसो! म्हणजे तो बसणार नाही याची जाणीव मला आहे. परंतु क्षणिक विकारांवर विचारानी ताबा मिळता क्षणीच वरमाला घेऊन सज्ज झालेली कुरळकुंतला, सौजन्यमूर्ती श्यामा माझ्यापेक्षाही माझा धर्मज्ञ बंधु युधिष्ठीर यालाच अधिक अनुरुप आहे! सुडौल देहयष्टीची संयमी पांचाली माझ्या पेक्षाही माझा जेष्ठ बलशाली बंधू भीमसेन यालाच अधिक शोभून दिसेल! धनुराकार भ्रुकुटी असलेली मृगलोचना द्रौपदी माझा ज्येष्ठ धनुर्धर बंधू अर्जुन यालाच अधिक साजिरी आहे! कृशकटी चारुगात्री अंगगंधा याज्ञसेनी माझ्यापेक्षा माझा ज्येष्ठ मदनरुप बंधू नकुल याच्यासाठीच भूलोकी अवतरली असावी! या भावना माझ्या मनात उचंबळून आल्या. तथापि पूर्ण विचार करता तुमच्यापैकी एकही ज्येष्ठ पांडव कृष्णेचा स्वीकार आणि सांभाळ करण्यासाठी योग्य नाही असे माझे स्पष्ट मत झाले आहे.
अर्जुनाच्या प्राप्तीसाठी आतूर झालेली कृष्णा...तिचे भवितव्य कोणा पांडवाच्या हाती आहे हा निर्णय आता काळच करील.” पांडवांमध्ये झालेला कलह त्यांच्यातील ऐक्य अभंग राखणारा ठरो अशी इच्छा करणे एवढेच आता माझ्या हातात राहिले आहे! कदाचित माझी इच्छा सामान्य तर्काच्या निकषांमध्ये बसणारी नसेल, कारण विनाशाचा आरंभ कलहामधुन होतो असा आजवरचा तरी इतिहास आहे. पण कुणी सांगावे काही नियम अपवादानेही सिद्ध होतात!”
भीमार्जुनांसह कृष्णा स्वयंवर मंडपातून बाहेर पडली तेव्हा त्यांना पत्ताही लागू न देता बलरामासह प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्यांच्या मागोमाग चालत राहिले. पांडव अश्वत्थाखाली थांबले. मग कृष्णेच्या प्राप्तीसाठी त्यांच्यात वाद विवाद सुरु झाला. त्यांचे संपूर्ण संभाषण आडोशाला राहून कृष्णाने ऐकले. सहदेवाने कलहाचा उपोद्घात करताच श्रीकृष्ण कुलाल शालेत गेले. त्यांनी कुंतीची भेट घेतली. पांडवांमधील वितंडवादाचे सारांशाने कथन करुन त्याच्या निवारणासाठी योग्य उपाय सांगून ते बलरामांसह निघून गेले.
सहदेवाने केलेल्या निर्भर्त्सनेमुळे लज्जित झालेले पांडव माना खाली घालून मुक्कामाकडे, कुलालशालेच्या दिशेने निघाले. संपूर्ण मार्गात कुणीच काही बोलले नाही. कृष्णेसह पांडव कुलालशाळेत पोहोचले. अंतर्गृहात असलेल्या कुंतीला त्यांचा पदरव ऐकू आला. बाहेर येण्याचे कष्ट न घेताच तिने आतूनच खणखणीत आवाजात विचारले, “बाळानो, आज भिक्षा मागून आणलीत ना?”
युधिष्ठीराने तात्काळ ‘होय’ असे उत्तर दिले. मग प्रत्येक शब्दाचे स्पष्ट उच्चारण करीत कुंती माता अंतर्गृहातूनच म्हणाली, "बाळानो! आज तुम्ही जे काही आणले आहे ना, ते पाचही जणात समान वाटून घ्या!!"