निषादपर्व श्रीराम विनायक काळे द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निषादपर्व

            निषादपर्व“प्रभासक्षेत्री यादव वीरांचा संहार झाला. बलराम, श्रीकृष्ण यांचीही अवतार समाप्ती झाली. सिंधुसागर कणाकणाने द्वारकापुरी आपल्या उदरात घेऊ लागला. यादवीतून वाचलेले वृध्द, नारीजन आणि बालके यांना पार्थाने द्वारकेतून हस्तिनापुरात आणावे. त्यांचा प्रतिपाळ करावयाची जबाबदारी योगेश्वर श्रीकृष्णानी पार्थावर सोपवलेली आहे...” दारूकाच्या मुखातून हे वृत्त ऐकून पांडव शोकाकुल झाले. श्रीकृष्णांनी सोपविलेले कार्य आपल्या हातून पार पडेल की नाही या शंकेने पार्थ ग्रासला त्याच्या सर्वांगाला कंप सुटला, हृदयाचे स्पंदन वाढले. आपण वृद्ध झाल्याची जाणीव त्याला प्रकर्षाने होऊ लागली. केवळ कर्तव्य भावनेनेच पार्थ प्रवासाला सिद्ध झाला. प्रवास दीर्घ पल्ल्याचा! अरण्य मार्गात हिंस्त्र श्वापदे, दस्यू आणि वनवासी लुटारू यांचाही धोका संभवत होता. म्हणून गांडीव धनुष्य, अक्षय भाता यासह सज्ज होऊन पार्थाने रथारूढ होऊन द्वारकेकडे प्रयाण केले.सुवर्ण रौप्यादि अमुल्य द्रव्य शकटांमध्ये भरून, गोधनासह सारा लवाजमा द्वारके बाहेर पडला. कुरूकुलाची ध्वजा फडकवीत पार्थाचा रथ जथ्याच्या मध्य भागातून दौडत चालला. निश्चिन्त मनाने मार्गक्रमणा करीत लवाजमा पंचनद प्रांतीच्या वन प्रदेशात शिरला. अन् अकस्मातपणे घनदाट वृक्ष राजींमधून तीक्ष्ण शरांचा वर्षाव सुरू झाला. जथ्याच्या अग्रभागी असलेले गोधन शराघातांनी विंधित झाले. भयाने हंबरडे फोडीत गोधन सैरभैर उधळले. घाबरलेला नारी समूह, बालके, हल्ल्याच्या भीतीमुळे आक्रंदन करू लागली. सर्वत्र एवढा कोलाहल सुरू झाला की, क्षणभर पार्थही दिड्गमूढ झाला. चहू बाजूंनी वेध घेत गांडीव धनुष्यावर प्रत्यंचा चढविण्याची सिद्धता करण्यात पार्थ मग्न झाला. या पूर्वी त्याच्या गांडीवाचा प्रलयकांरी टणत्कार ऐकूनच निधड्या छातीचे महावीरही गलितगात्र व्हायचे, पण आता...?त्या अवघड क्षणी टणत्कार दूरच... साधी प्रत्यंचा चढवितानाही पार्थाच्या सर्वांगावर अतिकष्टामुळे स्वेदबिंदू जमा झाले. थरथरत्या हातांनी धनुष्याचा दंड वाकवून प्रत्यंचा चढविण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असताना दस्यू नायकाने हृदयाचा थरकाप उडविणारी सांकेतिक आरोळी मारली. प्रतिपक्षाकडून कोणतेच प्रत्युत्तर प्रतिहल्ला न झाल्याने जथ्यात शिरून लूट करावयाचा इशारा दस्यूंना मिळाला. आडोशा बाहेर येत दस्यू वीरांनी यादव समूहाला चारी बाजूंनी कोंडीत धरले. खुद्द संघनायक पार्थाच्या रथाकडे निघाला. समूहात केवळ स्त्रिया, वृद्ध, बालके यांचाच भरणा... रथारुढ वृद्धाखेरीज कोणीही शस्त्रधारी रक्षक जथ्यात नाही हे लक्षात येताच चेकाळलेल्या दस्यूंनी निश्चिंत मनाने लुटालूट सुरू केली. वस्त्राच्छादित शकटांवरील आवरणे दूर झाली. अपरिमित रौप्य सुवर्णराशी पाहताच दस्यूंचे चेहरे हर्षोत्फुल्ल झाले. लुटारुंचे आक्रमण झाले तरीही पार्थ निष्क्रिय कसा? या शंकेने शोकाकूल यादव नारी, वृद्ध "पार्था वाचव... अर्जुना तुझ्या शरवर्षावाने लुटारूंचे निखंदन कर..." असा टाहो फोडू लागले.नारी जनांचा करुण विलाप कानी येताच अती शर्थीच्या प्रयत्नांनी पार्थाने कशीबशी प्रत्यंचा चढविली. अतीव परिश्रमांनी क्लांत होऊन धापा टाकीत पार्थ किंचित काल स्तब्ध राहिला. रथारुढवृद्धाची धनुष्यावर प्रत्यंचा चढविताना उडालेली त्रेधा पाहून संघनायक निश्चिंत झालेला. मात्र त्याने प्रत्यंचा चढविली, नारी समूहातून अर्जुनाचा उल्लेख झाला तेव्हा रथावर नजर ठेवणारा संघनायक घोड्याला टाच देऊन रथापासून दूर-सुरक्षित अंतरावर जाऊन थांबला. पार्थाने अक्षय भात्यातून बाण काढला. तो धनुष्यावर चढविला. शरसज्ज गांडीव मस्तकी टेकीत त्याने अस्त्राचे स्मरण केले. पण मंत्रातले एक अक्षर ही त्याला आठवेना! अस्त्र नाही तर निदान प्रत्युत्तरादाखल तरी शरसंधान करावे असा विचार करून अश्वारुढ दस्यू नायकाचा वेध घेत पार्थाने बाण सोडला. "बद्दऽ भुस्स्ऽऽऽऽ स्स्" असा घोंगळ ध्वनी घुमला. वेगहीन शर वेडावाकडा जात लक्ष्यापासून निम्म्या पल्ल्यावर थडथडत भूमीवर पडला. आता ताळतंत्र सुटलेला पार्थ एका मागून एक असे भसाभसा बाण सोडू लागला. पण हे बाण पहिल्या बाणाचा टप्पाही गाठू शकले नाहीत.अजाण शिशुला शोभेलसे रथारूढ वृद्धाचे शरसंधान पाहताच दस्यू संघनायक खदाखदा हसू लागला. निर्धास्त होऊन तो सहकाऱ्यांच्या दिशेला निघाला. प्राणभयाने थरथर कापणाऱ्या नारी शिशुवर्गादिंच्या अंगावरील आभुषणे दस्यू हिसकावू लागले. मिळालेल्या लुटींची गाठोडी बांधायचे काम सुरु झाले. एवढ्यात संघनायकाचे लक्ष एका कमनीय यादव नारीकडे गेले. तिला बळाने उचलून त्याने आपल्या पुढ्यात अश्वाच्या पाठीवर टाकले. नायकाचे हे कृत्य पाहून अन्य दस्यूनीसुद्धा समुहातील नारींचे अपहरण सुरू केले. आता दस्यू नायकाने सहकाऱ्यांना परतीचा इशारा केला. द्रव्यपूर्ण शकट आणि अपहृत नारींसह दस्यू लुटारुंचा समूह मार्गस्थ होऊ लागला. असहाय्य पार्थाचे हृदय शतशः विदीर्ण झाले.घटनास्थळापासून किंचित दूर असलेल्या कदंब वृक्षावर बसलेल्या एका वृद्ध निषादाने हे दृश्य पाहिले. निषादाहाती झालेला कृष्णाचा वध आणि सिंधुसागरात लुप्त होणारी द्वारका या वृत्तामुळे त्यालाही विमनस्कता आलेली. द्वारकेहून हस्तिनापूरला मार्गस्थ होत असलेल्या यदुवंशीयांवर हल्ला करण्यासाठी सज्ज झालेली दस्यू लूटांरुची टोळी त्याने पाहिली. खरे तर पंचनदप्रातांत नेहमी घडणाऱ्या अशा घटनांमध्ये त्या निषादाला काडीमात्र स्वारस्य नव्हते. परंतु काही अनाकलनीय अंतःप्रेरणेने त्याला घटनास्थळी जखडून ठेवलेले! शांतपणे मार्गक्रमणा करणारा यादव नारी, बालके, वृद्ध, रथ, शकट आणि गोधन असा लवाजमा वनप्रदेशा पासून दूर असतानाच त्याने हेरला. सारा लवाजमा दृष्टी पथात येताच मध्यभागी दौडणाऱ्या रथावरील कुरू कुलाची राजमुद्रा मिरविणारी ध्वजपताका त्याला दिसली. यादव समूहासोबत महाप्रतापी धनुर्धर अर्जुन समक्ष आहे याची खात्री पटून तो निश्चिंत झाला.पांथस्थाना अडवून, लुटमार करून उदरनिर्वाह करणाऱ्या दस्यूंबद्दल त्याला कमालीची घृणा वाटायची. आता दस्यू लुटारू यदुवंशीयांवर हल्ला करतील तेव्हा अर्जुनाच्या अमोघ शर वर्षावामुळे त्यांना चांगली अद्दल घडेल. अगदी अकल्पितपणे धनुर्विद्येचे एक अद्भुत गारूड आपल्याला पहावयास मिळेल. या विचारांनी त्याची उत्कंठा शिगेला पोचली. तथापि दस्यूंनी यादव समूहावर हल्ला केला, त्यानंतर अर्जुनाची झालेली केविलवाणी अवस्था पाहून त्याचा पुरता भ्रमनिरास झाला. हस्तिनापुराचा बलसंपन्न राजा, गुरूद्रोणाचा पट्ट शिष्य अर्जुन... महाभारत युद्धात अस्त्रविद्येच्या बळावर शत्रू पक्षाचा निष्पात करणारा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन...! त्याची दुःस्थिती पाहून हळहळणारा निषाद, द्रव्य आणि नारींचे अपहरण करून विजायोन्मादाने गर्जना करीत मार्गस्थ होणारा दस्यू समूह पाहून आपल्या व्रतापासून ढळला. निषादाने आपला तिरकामठा सज्ज केला. मार्गस्थ होणाऱ्या दस्यू लुटारुंच्या दिशेने त्याने शरसंधान केले.वृद्ध निषादाचे शरसंधान केवळ 'अतर्क्य' याच श्रेणीतले. सूंऽऽसूं असा घनगंभीर आवाज करीत भयात्कारी वेगाने प्रकाश शलाकेप्रमाणे लखलख करीत जाणारे निषादाचे तीर...! दस्यू समूहाजवळ जाताच त्यांना वेढा घालीत त्यांच्या समूहाभोवती चक्राकार गतीने फिरत राहिलेल्या निषादाच्या तीरांनी दस्यूंचा मार्ग रोधला. त्यांची अग्निजिव्हेप्रमाणे लखलखीत अग्रे, वेग अन् चक्राकार फिरताना निर्माण होणारा तीव्र ध्वनी यामुळे दस्यूंचा समूह जागच्या जागी थांबला. संघनायकाने अतिक्रोधीत होऊन आपल्या हातीचे खड्ग चक्राकार फिरणाऱ्या तीरांवर त्वेषाने फेकले. ज्या तीराच्या मार्गात ते खड्ग आले त्या तीराचा आघात होताच ते उंच फेकले जाऊन जमिनीवर पडले. आता मात्र चक्राकार फिरणाऱ्या तीरांचे कडे फोडून बाहेर पडावयाचे धैर्य समूहातील एकाही वीराला होईना. चक्राकार फिरणारे तीर वेग कमी झाल्यावर आपोआप भूमीवर पडतील, असा अंदाज दस्यूंनी केला.दस्यू लुटारुंच्या दिशेने सरसरत गेलेले बाण पाहताच अर्जुन थक्क झाला. त्यानंतर त्या बाणांनी केलेली किमया पाहताच ते कृत्य खचितच एखाद्या निष्णात धनुर्धराचे आहे. या गोष्टीबद्दल अर्जुनाच्या मनात तीळमात्र संदेह उरला नाही. तथापि.. सांप्रतकाळी संपूर्ण भरत खंडात अर्जुना खेरीज अन्य कोणीही श्रेष्ठ धनुर्धारी उरलेला नाही शिवाय त्या बाणांची अद्भूत किमया पहाता अशा प्रकारचे कोणतेही अस्त्र अस्तित्वात असल्याचे आपणास ज्ञात नाही. या गोष्टींची जाणीव त्याला झाली. तेव्हा मात्र ही किमया म्हणजे साक्षात गोपाळ कृष्णांचीच लीला असणार याची त्याला खात्री पटली. या विचारासरशी बाण आलेल्या दिशेने जरा पुढे जाऊन पहावे असे त्याला वाटले. रथातून पायउतार झाल्यावर मंद गतीने चहू बाजूला वेध घेत पार्थ कदंब वृक्षासमीप पोहोचला."कोणाला शोधीत आहेस रे अर्जुना?" या शब्दासरशी चमकून वर पाहताच अर्जुन थक्क झाला. जमिनीपासून दीडएक पुरूष उंचीवर फांदीच्या बेचक्यात बसलेला काळाकभिन्न, डोक्यावरचे शिप्तर केस आवरण्यासाठी मृगाजीनाची पट्टी आवळून त्यात गरूडाचे पीस खोचलेला, वयाने त्याच्यापेक्षा थोडा ज्येष्ठ वाटणारा, सडसडीत अंगलटीचा वल्कलधारी निषाद खांद्याला वेत्रकाष्टाचे धनुष्य लटकावून दाढी मिशांच्या जंजाळातून शुभ्र पांढरे दात चमकवीत तोंडभर हसत, लुकलुकत्या भेदक नजरेने पाहताना दिसला. काही घटिकांपूर्वी दस्यूंनी हल्ला केल्यावर आपली शरसंधानाची केविलवाणी धडपड पाहिल्यामुळे तर हा असा छ‌द्मी हसत नसेल ना? या विचाराने पार्थ क्रोधित झाला. राजसुलभ जरबेच्या स्वरात तो उद्‌गारला, "काय रे वनचरा? तुझे साथीदार शरचक्राच्या वेढ्यात स्थानबद्ध झालेले असताना त्यांना सोडवायचा प्रयत्न न करता तू असा मूढाप्रमाणे हसत काय राहिला आहेस?""हस्तिनापुराचे सम्राट, कुरूकुलभूषण धनुर्धर अर्जुनाचे अद्वितीय शरसंधान पाहून मी विस्मयचकित झालो आहे. मला हर्षोन्मादाने हसू आले. तुझ्या सामर्थ्याचे किंचितही भान न ठेवता तुझ्या डोळ्यादेखत अमाप द्रव्य आणि स्त्रिया बळाने हिरावून पळून जाणाऱ्या त्या उन्मत्त दस्यूंना चांगलीच अद्दल घडली. मी काही त्या लुटारूंप्रमाणे दस्यू नाही. आम्हा वनवासींच्या वैचित्र्यपूर्ण वेषभूषेवरून निषाद आणि दस्यू यातील भेद सामान्यातील सामान्यांनेही ओळखावा एवढा स्पष्ट आहे. मी हसलो तो दस्यूंच्या वेडगळपणाला. धनुर्धर अर्जुनाने सोडलेले दिव्य तीर दस्यू लुटारुंच्या वक्षाचा कधी वेध घेणार? हे पहावयाला मी आसुसलो आहे." निषादाचे बोलणे ऐकल्यावर हे दिव्य बाण कुठून आले याचे ज्ञान या निषादालाही नाही हे पार्थाने ओळखले. मग तर खात्रीपूर्वक ही कृष्णलीलाच आहे. लौकिकार्थाने प्रभुंचा अवतार समाप्त झाला असेलही तथापि अर्जुनावरील अकृत्रिम प्रेमापोटी, त्याच्यासारखा श्रेष्ठ धनुर्धर अचंबित व्हावा अशी शरसंधानाची अद्भुत किमया दाखवून "यत्र योगेश्वरो कृष्णः तत्र पार्थो धनुर्धरः" ही उक्ती प्रभूकृष्णांनी सार्थ केली. एवढेच नव्हे "यदा यदाहि धर्मस्यग्लानिर्भवति भारतः" या गीतावचनाचा प्रत्ययही आता जनांना येईल, या विचारांनी पार्थाचे हृदय उचंबळून आल् दस्यू लुटारुंच्या कोंढाळ्याभोवती चक्राकार फिरणाऱ्या तीरांपैकी एकाची गती मंद होत आली. तत्क्षणी निषादाने आपल्या पाठीवरच्या भाल्यातून एक तीर काढला. तो कामठ्यावर सज्ज करीत दस्यू समूहाच्या दिशेने वेध घेऊन निषादाने प्रत्यंचा खेचली. निषादाचे हे कार्य सुरू असता असा वेडेपणा करू नकोस असे अर्जुन सांगणार एवढ्यात निषादाचा तीर सूं ऽऽ सूं करीत सुटला. शरचक्रातील मंदगतीने फिरणारा तीर बाजूला ढकलून नवीन तीर त्याच्या जागी फिरू लागला. शर चक्राबाहेर पडलेला मंदगती तीर निषादाच्या दिशेने माघारी येत त्याच्यासमोर हातभर अंतरावर येऊन जमिनीत रुतला. निषादाने जमिनीत रुतलेला तीर काळजीपूर्वक उचलून भात्यात ठेवला. अर्जुनाकडे पाहून मंद स्मित करीत, उजव्या हाताचा पंजा उंचावून निषाद उद्‌गारला, "अर्जुना! आता तरी ओळख पटते का पहा बरे!" निषादाने उंचावलेल्या पंजाला फक्त चार बोटेच दिसली... अंगुष्ट नव्हताच. अंगुष्ट तुटल्या जागी त्वचा राठ होऊन हिंगरुड धरलेले दिसले.पार्थाच्या नजरेसमोर सहस्त्र सूर्यांची प्रभा चमकली. त्याची स्मृती जागृत झाली. एकलव्य ...... खात्रीने एकलव्यच! निषादराज हिरण्यधनुचा पुत्र एकलव्य!! बहुत संवत्सरांपूर्वी अमंगळ तिरकामठा खांद्याला लटकवून गुरू द्रोणांकडे धनुर्विद्या शिकण्यासाठी शिष्यत्वाची याचना करणारा एकलव्य!!! गुरू द्रोणांनी धुडकावून लावल्यावर निराश होऊन जड अंतःकरणाने माघारी जाणारा एकलव्य! कौरव पांडवादि राजपुत्र मृगयेसाठी वनात गेले असता भुंकणाऱ्या कुत्र्याला इजा न व्हाशी अशा बेताने त्याच्या तोंडात सात बाण मारून त्याचे भुंकणे बंद करण्याचे अजोड शरसामर्थ्य दाखविणारा एकलव्य! आश्चर्याने थक्क झालेल्या राजपुत्रानी विचारणा केली असता हे अतुलनीय शरसंधान आपण गुरू द्रोणांकडून प्राप्त केले अशी कबुली त्याने दिली. आपण प्राप्त केलेली दिव्य अस्त्रेही फिकी पडावी असे त्या वनचर निषादाचे शरसंधान पाहून आपला क्रोध मत्सर अनावर झाला.अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर कुणीही नाही अशी मुक्त कंठाने प्रशंसा करणाऱ्या गुरू द्रोणांना आपण या गोष्टीचा जाब विचारला. मुत्सद्दी द्रोणांनी एकलव्याची भेट घेतली. एकलव्याने आपल्या प्रेरणेने साध्य केलेल्या धनुर्विद्या साधनेच्या मोबदल्यात द्रोणांनी त्याच्याकडे गुरूदक्षिणा मागितली. धनुर्विद्येतला जणू प्राणच असा अंगुष्ठ! अन् मूर्ख निषादपुत्राने तत्क्षणी अंगुष्ठ छाटून द्रोणांच्या चरणी अर्पण केला. आपला प्रतिस्पर्धी संपला. या आनंदाने आपणाला अस्मान ठेंगणे वाटले. तो प्रसंग आपण विसरून गेलो अन् त्या नंतर एकलव्याच्या अस्तित्वाची धनुर्धर म्हणून गंधवार्ताही आपल्या कानी आली नाही. पण आज...? अगुंष्ठ नसतानाही आपल्या सारख्या श्रेष्ठ धनुर्धराला कल्पनातीत अतर्क्स वाटावे असे शरसंधानाचे रहस्य याने कुठे, कुणाकडे बरे प्राप्त केले असेल? पार्थाच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजले.भानावर आलेला पार्थ म्हणाला, "हो तर...! गुरूदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अगुंष्ठ छाटून गुरू द्रोणांना अर्पण करणारा माझा गुरू बंधू एकलव्यच ना रे तू? तुझ्या अमोघ अतर्क्य शरसंधानाने माझ्या नेत्रांचे जणू पारणेच फिटले. पण एक कोडे मात्र मला नाही सुटले. धनुर्विद्येत अगुंष्ठ म्हणजे जणीं प्राण, शरसंधानातले ते मर्मस्थानच जणू! असे असता अंगुष्ठ छेदूनही तुझी धनुर्विद्या साधना खंडित कशी बरे झाली नाही? माझा तर माझ्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. अगुंष्ठाविना शरसंधान निव्वळ अशक्य..." त्याचे कथन खंडित करीत कडवट सुरात एकलव्य बोलता झाला, "अशक्य फक्त तुम्हां क्षत्रियांना.....! मी तर निषाद कुलातला. मातेच्या उदरातून बाहेर पडतानाच आम्ही तिरकामठा हाती घेऊन येतो म्हणेनास! ते एक आमचे जणू सहावे ज्ञानेंद्रिय आहे असेच समज."दीर्घ उसासा सोडून एकलव्य पुढे बोलू लागला. "अरे अर्जुना! तुम्ही क्षत्रिय राजसत्ता कबजात ठेवण्यासाठी धनुष्य हाती घेता. प्रति स्पर्ध्याच्या काळजाचा वेध घेण्याची रक्तबंबाळ प्रतिज्ञा करून तुम्ही धनुर्विद्या प्राप्त करता. अन्याय नष्ट करण्याच्या नावाखाली नृशंस संहार करून स्वतःचा धाक आणि सत्ता पसरविण्यासाठी एक अमोघ साधन म्हणून राजनीती पुरतेच धनुष्य तुमच्या स्कंधावर असते. आम्हा निषादांच्या बाबतीत मात्र तिरकामठा हा आमचा पंचप्राण, आमचे जीवन सर्वस्वच असते. आमच्या योगक्षेमाला सहाय्यभूत असणारा, पोशिंदा म्हणून आणि प्रतिकूल परिस्थितीत आमचा संरक्षक मित्र म्हणून तिरकामठा आम्ही अष्टौप्रहर स्कंधी वागवतो. माझा अगुंष्ठ छेद करूनही माझी धनुर्विद्या साधना खंडित न होता उलट धनुर्विद्येतली अद्भुत रहस्ये माझ्यापुढे उलगडत गेली. या गोष्टींचे मर्म तिरकामठा हे आम्ही साधन मानीत नाही यात आहे.""कौशल्यपूर्ण तीर मारून मी कुत्र्यांचे भुंकणे बंद केले. त्यानंतर मत्सराने पेटणारे तुम्ही राजपुत्र गुरू द्रोणांसह माझ्या कुटीनजीक आलात. अर्जुना...! तुमच्या चेहेऱ्यावरचे भाव पाहिल्यावरच अशुभाची चाहूल लागून माझे हृदय कंप पावू लागले. तरल संवेदनशीलता हा आम्हा निषांदाचा जणू वारसाच आहे. तरीही तुम्हा क्षत्रियांच्या क्षमाशीलतेवर, त्यागी वृत्तीवर माझा भरवसा होता. अर्जुना, शरणागत कपोताच्या रक्षणासाठी स्वतःचे मांसखंड हसत हसत छेदून देणारा, एवढेच नव्हे तर पूर्ण भरपाई होण्यासाठी स्वतःचा देहच भक्ष्य म्हणून 'श्येन' पक्षाला अर्पण करणारा निस्वार्थी राजा शिबी...! तुम्ही राजपुत्र त्याचे वारस असल्यामुळे माझ्या धनुर्विद्या साधनेचा उचित सत्कार तुम्हाला करावयाचा असेल असेही मला वाटले होते. पण..." दीर्घ उसासा टाकून एकलव्य किंचित काल स्तब्ध झाला.आवंढा घोटून अवकाशाकडे दृष्टीक्षेप टाकीत एकलव्य उद्‌गारला, "धनुर्विद्या शिकविणे नाकारून मला अपमानीत करून, लाथाडून लावणारे माझे परमप्रिय गुरू द्रोण! त्यांच्या एका शब्दासरशी माझे पंचप्राण, माझ्या योगक्षेमाचे एकमात्र साधन नष्ट करून मला मातीमोल करण्याचे सामर्थ्य जणू असा माझा अंगठा...! गुरूदक्षिणा म्हणून मी तो तात्काळ छाटून दिला. माझी निःस्सीम गुरू भक्ती आणि अतुलनीय त्यागाने दिपून जाण्याऐवजी आपल्याला तुल्यबळच नव्हे, वरचढ ठरणारा धनुर्धर संपला म्हणून आसुरी आनंदाची प्रभा तुझ्या चेहेऱ्यावर विलसलेली दिसली अन् आत्यंतिक द्वेषापोटी सर्प फुत्काराप्रमाणे तू निश्वास टाकलास." एकलव्याने अर्जुनाच्या नजरेला नजर भिडवताच अर्जुनाची नजर खाली झुकली. एकलव्याचे बोलणे पुन्हा सुरू झाले. "अर्जुना, त्या वेळच्या तुझ्या वृत्ती बालसुलभ म्हणून दुर्लक्षितही करता येतील. पण अर्जुना आयुष्याच्या सुवर्णपर्वातही तू महाविखारी महत्वाकांक्षा बाळगणारा, मत्सरात्माच राहिला आहेस. माझे शर संधान अगुंष्ठाबरोबरच खंडित व्हावे हा तुझा दुष्ट हेतू कसलीही भाडभीड न ठेवता माझ्या समक्ष व्यक्त करणारा तू उन्मत पार्थ! श्रीकृष्ण परमात्म्याच्या निरंतर सहवासात राहूनही त्याचा अमृतमय उपदेश विसरून श्वान पुच्छ नलिका न्यायाने तुझ्या पूर्व वृत्ती ऊफाळल्यामुळे दंभ, मद, मत्सरादिंवर तू काबू ठेऊ शकला नाहीस.""सकृत् दर्शनी, पूर्व परिचय नाही अशी धारणा असतानाही मला तुच्छ लेखीत वनचर म्हणून तू संबोधिलेस. पण मागाहून माझ्या शरसंधानाचा प्रत्यय आल्यावर मात्र त्याच वनचराला दांभिकतेने गुरूबंधू म्हणून संबोधिण्याचे तुझे धारिष्ट्य, तुझ्या अंगी मुरलेल्या कुटील राजनीतीला अन् सर्पफणेप्रमाणे केवळ दिखावू अशा तुझ्या विनयी वृत्तीला शोभणारे आहे! इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर, आयुष्याच्या उतरणीला लागल्यामुळे, असहाय्य अगतिक झाल्यामुळे तरी मला भेटल्यावर-निदान माझी ओळख पटल्यावर तरी पश्चात्तापाचे दोन कामचलाऊ शब्दही तू उद्‌गारले नाहीस. उलट अंगुष्ठरुपाने जीवन सर्वस्व गमावल्यावरही मी अद्यापि जिवंत आहे, एवढेच नव्हे तर माझे शरसंधान कौशल्यही शाबूत आहे, ते खंडित झाले नाही या बद्दल खदखदणारे वैषम्य... शिष्टाचार म्हणून तरी कृतक आनंद व्यक्त होण्याऐवजी मनीचे वैषम्य तू व्यक्त केलेस.""अशिष्ट अर्जुना...! केवळ मृत्तिका रूपाने गुरूची स्थापना करून आत्यांतिक श्रद्धेने, आत्मप्रेरणेतून, आत्मबलावर, केवळ धुनर्विद्याच काय स्वयंसाधनेद्वारा कोणतीही साधना करणाऱ्या एकलव्याची उपासना केवळ अगुंष्ठ छेदाने खंडित व्हावी ही शक्यता तरी तू कोणत्या आधाराने गृहित धरलीस? अर्जुना, तुला कदाचित अजूनही ज्ञात नसेल पण गुरूद्रोणांना गुरूदक्षिणा म्हणून मी अंगठा छाटून दिल्यापासून माझ्या सर्व निषाद बांधवांनी तिरकामठ्याला उजव्या हाताच्या अंगठ्याच्या स्पर्श करणेही वर्ज्य केले आहे. आता आम्हा निषादांच्या लेखी शरसंधानामध्ये उजव्या हाताचा अंगठा हा त्याज्य अवयव असून निषादांच्या भावी पिढ्याही हा वारसा जतन करतील. अगुंष्ठ छेदासाठी का होईना गुरूकृपेचा लाभ निषादांसारख्या नीच वर्णियांना झाला. हा सुवर्ण क्षण आम्ही निषाद युगानुयुगे हृदयांतरी जपू...!"एकलव्याच्या सडेतोड आणि परखड कथनाने पार्थ चांगलाच वरमला. एकलव्याच्या अमोघ शरसंधानाचा प्रत्यय आल्यावर विरोचित वृत्तीने त्याचे कौतुक करण्याऐवजी अनावधानाने, तेजोभंग झालेल्या अवस्थेतही मर्मभेदक शब्द मुखावाटे उच्चारिले जाऊन त्याला डिवचण्याचे निंद्य कृत्य आपल्या हातून घडावे यांची खंत पार्थाला वाटली. त्याहीपेक्षा नागरी संस्कार आणि शिष्ट वर्तन यांचा वाराही न लागलेल्या या सामान्य अरण्यवासीने नीतिकोविद असलेल्या, देववाणीचे ऋजू संस्कार झालेल्या आपल्या मुखातून सहजोद्‌गार म्हणून निघालेल्या शब्दांमधूनही आपला हेतू, आपली भावना अचूक ओळखावी याचे आश्चर्य पार्थाला वाटले. एकलव्याच्या शरसंधाना विषयी असंख्य प्रश्न शंका पार्थाच्या मनी उद्भवल्या.श्रेष्ठ धनुर्धर गुरू द्रोणांनी वर्णिल्याप्रमाणे शरसंधानात अचूकता आणि भेदक सामर्थ्य येण्यासाठी धनुर्विद्येमध्ये अंगुष्ठाचे नियंत्रण अन् वापर आत्यंतिक महत्वपूर्ण! बाणाची दिशा, गती व परिणामकारकता निर्भर असलेले मर्मस्थान म्हणजे अंगुष्ठ!! त्यांचा हा धडा आयुष्यभर मनात जपून आपण भरत खंडातील एकमेव, सर्व श्रेष्ठ धनुर्धर ही उपाधी प्राप्त करून ती सार्थही केली. मत्स्य भेद, किरात रूपधारी शंकरांशी युद्ध असे किती प्रसंग आठवावे... प्रत्येक प्रसंगी प्रतिस्पर्ध्यावर मात करून गुरूद्रोणांच्या कथनाचे यथातथ्य प्रत्यंतरही आपण घेतले. आपल्या शरसंधानाला तर दिव्य अस्त्रांची जोड असायची. खेरीज गांडीव धनुष्य, अक्षय भाता या अमोघ साधनांची जोड असतानाही एकलव्याच्या कौशल्यापुढे ते सारे उणे ठरले. एकलव्याने अंगुष्ठ, अस्त्र, धनुष्य निवड, विशिष्ट पद्धतीनेच कुशल तंत्रज्ञांनी सिद्ध केलेले शर सारे-सारे निरर्थक ठरवित दाखविलेली अद्भूत किमया!आयुष्यभर धनुर्विद्या साधना करूनही आपले कसब एकलव्यापुढे थिटे ठरावे ही बोचरी जाणीव पार्थाच्या मनात ठसठसत राहिली. एकलव्याच्या शरसंधानात निश्चित आपणाला नव्हे तर गुरूद्रोणानांही अगम्य असणारे इंगित रहस्य असलेच पाहिजे या निष्कर्षाप्रत तो आला. अन् तसे असेल तर काहीही करून ते इंगित आपण एकलव्याकडून ज्ञात करुन घ्यावे. हा विचार त्याच्या मनात मूळ धरू लागला. या रहस्याचा उपयोग आपणाला होणार नाही. हे आता अटळ सत्यच आहे. तथापि आपल्या वारसांना तरी कुरूंचा दैदिप्यमान वारसा पुढे चालविताना आपल्या सामर्थ्यात खचितच भर घालता येईल असा हेतू पार्थाच्या मनात उद्भूत झाला. अत्यंत लीन होऊन आर्जवी मार्दवयुक्त स्वरात पार्थाने पृच्छा केली."एकलव्या...! माझ्या हातून तुझा उपमर्द करण्याचा जो अपराध अजाणतेपणामुळे घडला, त्या बद्दल मी मनःपूर्वक क्षमा मागतो. माझी एकच विनंती आहे. एकलव्या! शरसंधानातील लक्ष्यवेध, शब्दवेध या कौशल्यांबरोबरच त्याहीपेक्षा श्रेष्ठ नारायणास्त्र, पाशुपतअस्त्र, पर्जन्यअस्त्र, अग्न्यास्त्र अशी एकूण एक प्रलयंकारी अस्त्रेही मी साध्य केली होती. या अस्त्रबळावर माझ्या अगणित प्रतिस्पर्थ्यांना मी नामोहरम केले अन् कंठस्नान घालून त्यांचे अस्तित्व शून्यवत ठरविले. पण शरचक्राची जी किमया तू करुन दाखवलीस असे काही अस्त्र माझ्या ऐकिवात नाही. या किमयेमागे काही वेगळे, मला अज्ञात असे अस्त्र वा काही अद्भुत रहस्य असावे अशा निष्कर्षाप्रत मी आलो आहे. सर्व अस्त्रे अन् शरसंधान कौशल्यही पूर्णपणे गमावून या क्षणी मी हतप्रभ झालो आहे. हे तू जाणतोसच. तरीही धनुर्विद्या, धनुर्विद्येतील रहस्ये मला प्राणांहूनही प्रिय आहेत. एकलव्या केवळ जिज्ञासा तृप्ती म्हण वा कुतूहल शमन म्हणून तरी तुझ्या शर संधानामागील रहस्य कोणते आहे? ते तू कोणाकडून कसे साध्य केलेस? एकलव्या...या माझ्या प्रश्नांची सत्य आणि केवळ सत्यच उत्तरे तू द्यावीस अशी माझी विनंती आहे."पार्थाचे हे कथन सुरू असताना शरचक्रातील मंदगती तीरांच्या जागी नवीन तीर सोडून शरचक्र अखंडित ठेवण्याचे एकलव्याचे कार्य सतर्क सजगतेने सुरू राहिले. पार्थाचे कथन पूर्ण झाल्यावर शरचक्रातून माघारी आलेले तीर उपसून काळजीपूर्वक भात्यात ठेवून एकलव्य बोलू लागला. "अर्जुना, अस्त्रे कोणतीही मला ज्ञात नाहीत. अरे! अस्त्र विद्या जाणण्यासाठी मंत्र शिकले पाहिजेत. अन् मंत्र येण्यासाठी देववाणी गीर्वाण भारती अवगत केली पाहिजे. आम्हां निषादांची बोली म्हणजे पैशाची! नियमादिंचे कसलेही बंधन नसलेली आम्हा निषादांची ती आदिम बोली! आता नगरजनांशी क्वचित येणाऱ्या संपर्कातून गीर्वाण भारती-देव वाणी मधील काही शब्द मला अवगत आहेत इतकेच. त्यातही आश्चर्याचा काही भाग नाही की कसले रहस्यही नाही. अर्जुना भाषा हा तर मानवाचा सहजाविष्कार...तो विशिष्ट जनसमूहापुरता मर्यादित कसा राहणार? त्यामुळे कदाचित माझ्या बोलीने तिच्या मर्यादा ओलांडिल्या असणे संभवते.""पण अर्जुना! धर्माज्ञा ओलांडून, जनक्षोभ पत्करून आम्हा निषादांना देववाणी, मंत्रविद्या अन् अस्त्रविद्या शिकवायला तरी कोण गुरू धजावेल? खेरीज एकदा गुरू द्रोणांनी मला शिष्यत्व नाकारील्यावर कोणा ज्ञानवंताचा अनुग्रह प्राप्त होईल अशी अपेक्षा तरी मी कशी बरे करू धजावेन? वाक्पटू अर्जुना, वनामध्ये विहार करणारे म्हणून आम्ही वनचर अशी उपाधी देववाणी पारंगत असलेला तू... मोठ्या मानभावीपणाने देत आहेस. पण अर्जुना, निषाद असलो तरी मीही मनुष्यदेहधारीच असल्यामुळे मनुष्याची समस्त मूलगामी लक्षणे माझ्यामध्येही स्थित आहेत. अज्ञानाचे सोंग पांघरून 'नागर' ऐवजी 'जानपद' अर्जुन असे संबोधन करावयाचे चातुर्य एकलव्याकडेही आहे हे तू विसरू नकोस. तर पूर्व अनुभवावरून शहाणपण आले असता पुन्हा मागचीच चूक करून अस्त्रविद्येच्यापाठी जाण्याचा विचारही माझ्या मनाला शिवला नाही. हे सत्य आणि सत्यच आहे रे अर्जुना!""स्वतःला मोठा धनुर्धर म्हणविणारा तू! पण लक्ष्यवेध, शब्दवेध या पलीकडेही शरसंधानातील काही कौशल्ये असू शकतात; असू शकतील, एवढी साधी शक्यता गृहित धरण्याचे, विद्या साधनेने सहज येणारे नम्रत्वही तुजपाशी नाही. म्हणूनच पाशुपतास्त्र, पर्जन्यास्त्र अशी अवजड नावे उच्चारुन अस्त्राविना धनुर्विद्या जणू निरर्थक आहे असे ठरवू पाहणारे तुझे ज्ञान हेच मुळी घोर अज्ञान आहे. कदाचित योद्ध्याला, वधकाला सामर्थ्यसंपन्न बनविणारे हे शब्दभ्रम विशिष्ट वेळी, विशिष्ट स्थळी, विविक्षित काळापुरते अन् विशिष्ट मर्यादेपर्यंत धनुर्विद्येतील मुलभूत किमयांपेक्षा परिमाणकारक असतीलही. कदाचित त्यांच्या प्रलयंकारी स्वरूपामुळे स्वतःच्या सामर्थ्याचा डिंडिभ वाजवीत अखिल विश्वात सामाज्य पसरवू इच्छिणारे शासक त्यांना अधिक महत्व देत असतीलही पण म्हणून काही त्यांचे श्रेष्ठत्व थोडेच सिद्ध होते? अस्त्ररूप शब्दभ्रमांचे स्वामित्व किती अशाश्वत अन् तकलादू आहे हे का मी तुला सांगण्याची गरज आहे? पार्था! प्राणसंकट गुदरले असता ऐन मोक्याच्या क्षणी त्यांनी कर्णाला कसे फशी पाडले हे तुझ्या बाबतीत 'चक्षुर्वेः सत्यम्' आहे आणि एवढे दूर तरी कशाला जायला हवे? अवघ्या काही घटिकांपूर्वी तुला निःष्प्रभ करून त्यांनी कसे तोंडघशी पाडले हे तू अनुभविले आहेस अन् मी सुद्धा त्या समग्र घटनेचा साक्षीदार आहे.""अर्जुना! आता तूच सांग, ही अस्त्रे म्हणजे अळवावरच्या पाण्यासारखी भ्रामक अन् क्षणभंगूरच नव्हेत काय? तुला ज्ञात झालेली धनुर्विद्येतील कसबे म्हणजे हिमनगाच्या जलप्रवाहा बाहेर दिसणाऱ्या भागा एवढी अल्प आहेत असे का समजेनास. परंतु आपण साध्य केलेले ज्ञान हाच चरम सीमेचा बिंदू आहे असे मानून त्या बेभरवशी अस्त्रांच्या मागे तू लागलास. तुझी आयुष्यभरची धनुर्विद्या साधना म्हणजे केवळ नृशंस नरसंहार आहे. रक्त पिपासू अर्जुना... अंगठ्याचा वापर न करताही तीर सोडता येईल की नाही? एकदा या गोष्टीचे प्रत्यंतर तरी घेऊया.... एवढा साधा विचार जरी एखाद्या बेसावध क्षणी तुला सुचला असता तरी धनुर्विद्येतील अनंत रहस्यांचे दालन आपोआप उलगडले असते तुझ्यापुढे! आणि एका यःकश्चित निषादाच्या सामान्य कसबाचे अप्रूपही नसते वाटले तुला. डोळ्याला झापडे बांधून उभी हयात घाण्याच्या चाकोरीत फिरणारा निर्बुद्ध वृषभ आणि प्राप्त झालेल्या अत्यल्प ज्ञान संपुष्टात बंदिस्त राहून त्या पलिकडच्या अज्ञात, अस्पर्श ज्ञानकक्षांचा विचारही न करणारा तू अल्पतुष्ट अर्जुन...! दोघांमध्ये श्रेष्ठ कोण अन् कनिष्ठ कोण हे मजसारख्या पशूवृत्तीने राहणाऱ्या निषादाने कसे ठरवावे?"वनामध्ये स्वच्छंद विहरणारी रानपाखरे अन् त्याच वृत्तीने जीवनाला सामोरे जाणारे आम्ही निषाद सुद्धा त्याच रानाची लेकरे! स्वतःच्या अंगभूत, निसर्गदत्त मर्यादांमध्ये आम्ही राहतो.... पण स्वतंत्र बाण्याने! प्रत्यही येणाऱ्या विविध अनुभवांना सामोरे जाताना सहज स्फुरणाऱ्या कल्पना स्वबलावर वास्तवात आणण्याचा प्रयत्न आम्ही करतो. कारण आपण कसे जगावे हे दुसरा सांगू शकत नाही आणि आपणाला काय आवडते याची खातरजमा त्रयस्थाला विचारुन करायची नसते हे आमचे सरळ सोपे तत्वज्ञान! अर्जुना कोणतीही जीवनविद्या कोण कुणाला देऊ शकत नाही. ती कोणीही दुसऱ्याकडून घेऊही शकत नाही. ती मूलतः जशी स्वयंभू असते तशी तिची प्राप्ती सुद्धा स्वयंभूच असते..." एक दीर्घ श्वास घेऊन दस्यू लुटारुंच्या कोंढाळ्याभोवती फिरणाऱ्या शरचक्रातील मंदगती तीरांच्या जागी नवे तीर सोडून माघारी येऊन जमिनीत रूतलेले तीर सावधपणे उपसून पाठीवरच्या भात्यात ठेवल्यावर एकलव्याचे खंडित झालेले कथन पुढे सुरू झाले."अर्जुना हे ज्ञान मला हस्तिनापुरात अपमानित होऊन माघारी वनाच्या दिशेने जाताना प्राप्त झाले. मी ज्ञान प्राप्तीसाठी मोठ्या लालसेने गुरूद्रोणांचे शिष्यत्व पत्करायला हस्तिनापुरात आलो. त्यावेळच्या घटनांचे तुला विस्मरणही झाले असेल. अर्जुना! द्रोणांची भेट होईपर्यंतच्या काळात माझे समवयस्क असलेले तुम्ही कौरव-पांडवादी राजपुत्र मोठ्या एकतानतेने धनुर्विद्येतील पूर्वपठित भागावर प्रभूत्व संपादन करण्यासाठी सराव करीत होता. वस्तुतः तुमचा तो सराव म्हणजे कंटाळवाणे अधांनुकरण आहे हे उमगलेल्या स्वतंत्र वृत्तीच्या या निषाद पुत्राचा चांगलाच भ्रमनिरास झाला होता. कौशल्य हे का निरर्थक आवृत्त्या करून मिळते? हे ध्यानी येउन त्याच वेळी नीरस अध्ययन आपणाला रमवू शकणार नाही. हे ओळखून जरी मी माघारी आलो असतो तरी आयुष्यभर डागण्या देणारा पुढचा तो अवहेलनेचा प्रसंग आणि हे एकलकोंडे जिणे तरी टळले असते." इतक्या प्रदीर्घ काळानंतरही त्या आठवणींनी एकलव्याचे नेत्र आर्द्र होऊन त्याच्या घशात हुंदका दाटून आला."अर्जुना, पूर्व स्मृतिंनी मी आजही इतके व्यथित व्हावे याचे आश्चर्य तुझ्या मुखावर दिसत आहे. अरे, क्रीडेखातर केवळ करमणूक वा मनोरंजनाच्या हेतूने मृगयेच्या नावाखाली निष्पाप पशुपक्षांची निघृण हत्या... कत्तल करून धर्म कृत्याच्या साफल्य प्राप्तीचा आनंद मानणारे तुम्ही शासक... गुरू द्रोणांचे शिष्यत्व पत्करण्याची इच्छा वनचर निषादाने बाळगावी हेच मुळी तुमच्या लेखी औध्दत्य ठरते. अर्जुना... अगुंष्ठ छेदामुळेही झाले नाही एवढे दारुण दुःख द्रोणांनी मला नाकारल्यामुळे झाले. त्यावेळी तुम्ही राजपुत्रांनी परस्परांना नेत्रपल्लव्या करीत केलेली कुत्सित स्मिते आणि उपहासपूर्ण भाषणे... त्यांनी माझ्या काळजावर झालेल्या व्रणांची खपली काढताच आजही मी व्यथित झालो कारण अर्जुना... निषाद, वनचर असलो तरी त्यावेळी मी सुद्धा निषाद राज हिरण्यधनींचा पुत्र... तुम्हा सारखाच... राजपुत्रच नव्हतो का?""तुम्हा नगरजनांमध्ये नसेल एवढा मान-सन्मान माझ्या पित्याला केवळ तो राजा आहे म्हणून, निषाद प्रजाजन द्यायचे. आमच्या जमातीत एकदा का एखाद्याला राजा म्हणून निवडले की मग तो करील तसा आचार आणि तो इतरांना सांगेल ती संहिता असा मुळी रिवाजच असतो. दुष्काळाच्या परखड काळातसुद्धा अन्न-अन्न करीत भटकणारे निषाद त्यांना महत्प्रयासाने मिळणारे एखादे रानफळ असीम राजनिष्ठेपायी स्वतःच्या मुखात टाकणाचा मोह त्यागून उरी फुटेतो धावत येऊन राजा असलेल्या माझ्या पित्याला द्यायचे; अन् केवळ एकच फळ आणले म्हणून माझा पिता त्यांना निर्दयपणे झोडायचा. असे राजवैभव संचितात असलेला मी राजपुत्र अपमानाचे शल्य उरी खुपत असतानाही कसा काय जिवंत राहिलो याचे कोडे मला अद्याप उलगडलेले नाही. अर्जुना, शब्दब्रह्माची घमेंड मिरविणारे तुम्ही नागर.. वाटेल ते शब्द वाटेल त्या अर्थाने वापरून तुमची पवित्र देववाणी किती विटाळता याची थोडी तरी कल्पना तुला असावी होती...""म्हणे धनुर्विद्या मला प्राणांहूनही प्रिय आहे...! किती व्यभिचारी शब्द योजना आहे रे तुझी! ऐन मोक्याच्या क्षणी धनुष्याला प्रत्यंचा चढविताना उडालेली तुझी त्रेधातिरपिट अजूनही माझ्या अंतःचक्षूसमोर स्पष्ट दिसत आहे. अर्जुना तुझ्या शब्दांमध्ये तिळमात्र जरी सत्याचा अंश असता तरी सारे बळ एकटवून शरसंधान केल्यामुळे शक्तिपात होऊन तू मुत्यू पत्कारला असतास; पण तुझा एक तरी 'तीर' शत्रूचे काळीज विंधूनच गेला असता. तुझ्या श्रद्धा आणि तुझ्या निष्ठा किती पोकळ अन् ढोंगी असतात हे मला आजच उमगले. अन् माझी क्षमा याचना करण्यासाठी तू उच्चारलेले शब्दही किती निरर्थक अन् कावेबाज आहेत रे!... म्हणे अजाणतेपणी घडलेला अपराध!! वा रे वा... धन्य रे तू अर्जुना!!! आधी समोरच्या व्यक्तीचा योजनापूर्ण उपहास करावयाचा अन् मागाहून माझे हे कृत्य अजाणतेने घडले म्हणत क्षमा याचनेचे सोंग करायचे, अर्जुना हा दांभिकपणा तुम्हा शासकांनाच खुलून दिसतो.""माझ्या शरसंधानाचे वरपांगी कौतुक करून त्यातले मर्म माझ्याकडून ज्ञात करून घेण्यामागचा तुझा धूर्त हेतू... पार्था! मी पुरता ओळखला आहे रे! ते मर्म इंगित जाणून घेऊन त्याचा उपयोग तुला झाला नाही.... म्हणजे तो होणारच नाही म्हणा... तरी तुझे उत्तराधिकार घेणारा तुझा वारसदार इतरांपेक्षा बलसंपन्न आणि वरचढ होण्यासाठी तरी खचितच व्हावा! हा तुझा सुप्त हेतू न ओळखण्या एवढा हा निषाद अज्ञ नाही. अर्जुना तुझ्या लेखी जरी मी शूद्र असलो तरी मी स्वतः तसे मानीत नाही. कदाचित माझा वर्ण इतर वर्णियांच्या मालिकेत अंतिम स्थानावरही असेल, पण माझ्या मते चातुवर्णियांपेक्षा भिन्न असा माझा 'पाचवा' स्वतंत्र वर्ण असावा. तुला ज्ञात असणाऱ्या धर्मग्रंथामध्ये तसा उल्लेख नसावा, म्हणजे नसेलही, इतर कोणत्या आधारामध्ये तसा उल्लेख असला तरी त्याचे तुला कितपत ज्ञान असेल हा प्रश्नच आहे! पण आम्हा निषादांच्या दंतकथांमध्ये .... पारंपारिक गीतांमध्ये मात्र असे काही उल्लेख मी ऐकले आहेत. माझी अल्प विकसित बुद्धी आणि मर्यादित विश्व यांच्या आधारे अलीकडेच मला या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली आहे.""अर्जुना, तुझा धूर्त हेतू मला आकळला आहे. तरीही माझ्या शरसंधानामागचे रहस्य मी तुला खचितच कथन करीन. तुझ्या कुतूहल शमनासाठी नव्हे तर तुझा भ्रमनिरास करण्यासाठी! मी पूर्वी कथन केल्याप्रमाणे आम्हा निषादांचे जीवन मुळी तीर कामठ्याशी बद्ध असते. इतके की, तिरकामठ्याविना दिसेल तो खात्रीने निषाद नव्हे हे तू पक्के समज! आम्ही निषादांनी शतकानुशतके निष्ठेने सांभाळलेली ही परंपराच धनुर्विद्येतील अवघड रहस्ये आम्हापुढे उलगडीत जाते. धनुर्विद्या ही श्रवण, पठण वा कथनाने अवगत होणारी शब्दविद्या नव्हे. ती शिकायची नसते की शिकवायचीही नसते. असीम अंतःप्रेरणेने ती प्रस्फुट झाल्यावर अगदी सहजपणे ज्ञानेंद्रियांमध्ये मुरते आणि मगच तिच्यावर प्रभुत्व मिळवायचे अन् टिकवायचेही असते. म्हणून धनुर्विद्येमध्ये आम्हा निषादांचा ना कुणी गुरु असतो की अंधानुकरण करणारे धनुर्विद्या पिपासू शिष्यगणही निषादांच्या वस्तीत जन्म घेत नसतात.""अर्जुना, पंखात बळ आल्यावर माता पित्यांपासून अलग होऊन स्वतंत्र राहणारे पाखरू सुगीच्या वेळी आपोआप गोड आलाप घेत सुंदर घरटे विणते. तद्वत हिंडू फिरु लागलेले निषादाचे पोर तिरकामठा घेऊन रानावनात हिंडू लागले की ते सहज प्रेरणेने त्याचा वापरही अवगत करते. अर्जुना! द्रोणांचे शिष्यत्व पत्करायला मी हस्तिनापुरी आलो तेव्हा माझ्या खांद्याला लटकावलेला ओबड-धोबड 'कामठा' अन् पाठीला वेलींच्या भात्यात अडकवलेले तीर... ज्यांच्याकडे पाहून आपल्या जवळच्या कातीव कोरीव इंद्रधनुष्यी रंग छटा असलेल्या धनुष्यांशी अन् नाजूक सुबक आखीव रेखीव बाणांशी तुलना करीत तुम्ही नाके मुरडून कुचेष्टा केलीत... तो कामठा नी ते तीर सुद्धा मी स्वतः बनविलेले होते. शस्त्रशाळेतील पोटार्थी कारागिरांनी घडविलेली नक्षीदार धनुष्ये आणि आखीव रेखीव बाण आयते वापरणाऱ्या तुला क्षत्रियाला यामागचे तत्व तरी कसे कळावे? धनुष्य हे स्त्री सारखे आहे. त्याच्या वरपांगी सौंदर्यावरुन त्याचे श्रेष्ठत्व ठरत नसते. ज्या धनुर्धराला तीरकामठा स्वतः बनविता येत नाही, तो शरसंधानातले कौशल्य कसे काय हस्तगत करणार...?""तिरकामठा स्वतः बनविल्यावरच लक्ष्यवेधातले खरे इंगित समजते. 'धनुर्विद्यारहस्या' सारख्या तुझ्या जडजंबाल ग्रंथराजांच्या वाटेलाही न गेलेला मी अक्षर शत्रू निषाद! पण तिरकामठ्याचे माझे शास्त्र मी बसविले आहे. माझा वेत्रकाष्ठापासून बनविलेला हा कामठा सात पेरांचा आहे. प्रत्येक पेरातील अंतर तर समान आहेच पण काष्ठाची गोलाईसुद्धा सारखी आहे. त्याची लांबी साडे सहा 'वितस्ती' आहे. लक्ष्यवेधामध्ये वध्य लक्ष्य, त्याची शरीरस्थिती, धनुर्धरापासूनचे अंतर आणि वेध घेण्याचा प्रकार....म्हणजे त्याला जीवे मारायचे की फक्त इजा करायची, एखादा अवयव छेदावयाचा की केवळ बद्ध करायचे हे ध्यानात घेऊन काष्ठाची लांबी कमी जास्त असावी लागते. साधारणपणे तीन भिन्न लांबीची काष्ठे उपयोगी पडतात. दरवेळी इतक्या प्रकारची काष्ठे बरोबर कशी वागविणार? म्हणून मी या पूर्ण लांबीच्या वेत्रकाष्ठाला दोन्ही बाजूंनी समान अंतरावर तीन/तीन छेद घेऊन सोईप्रमाणे कमी जास्त लांबीची प्रत्यंचा फक्त बदलतो.""प्रत्यंचेसाठी घोरपडीच्या आणि गव्याच्या आतड्याचा वापर मी करतो. ही आखूड प्रत्यंचा घोरपडीच्या आतड्याची असून ती कंबरेभोवती वेष्ठून मी सोबत वागवितो. अर्थात अलिकडे प्रत्यंचा न बदलताही इष्ट परिणाम साध्य करायचे कसब अंगवळणी पडले आहे हे खरे! आता हे तीर पहा. या तीरांसाठी वापरलेले दंड १२ मुष्टी, ११ मुष्टी, ९ मुष्टी, ७ मुष्टी अशा भिन्न लांबीचे आहेत. त्यांची गोलाई अन् वजने ही कमी जास्त असावी लागतात. आखूड पल्ल्यासाठी जड तीर तर लांब पल्ल्यासाठी हलके तीर वापरणे इष्ट असते. शरचक्रातील तीर वजनाने अत्यंत हलके, पुच्छाची लांबी जास्त असलेले, तीक्ष्ण अग्रांचे आहेत. म्हणून ते अधिक काळापर्यंत आवर्तने घेऊ शकतात. तीरासाठी निवडावयाचा दंड पूर्ण वाढ झालेला, विशिष्ट नक्षत्रावर तोडलेला असतो. तीरांची अग्रे सुद्धा परिणाम लक्षात घेऊन भिन्न धातूंची अन् आकारांची आहेत. सूचीकाग्र तीर पक्षांच्या मृगयेसाठी वापरतो. हा चंद्रकोरीच्या आकाराप्रमाणे अग्र असणारा तीर पहा. भूमीवर सरपटणारे जनावर त्याला इजा ही न पोचवता या तीराने स्थान बद्ध करता येते. अग्राची दोन्ही टोके भूमीत घट्ट रुतून सर्पवर्गीय प्राणी जागच्या जागी अडकतो. तीराचा मध्यभाग गुळगुळीत आहे. म्हणून सर्पाला इजा होत नाही पण त्याला मागे पुढे जाताही येत नाही.""अर्जुना, माझ्या शरसंधानातले महत्त्वाचे इंगित तीराच्या पुच्छामध्ये आहे. पुच्छाची लांबी, वापरावयाची पिसे कोणत्या पक्षाच्या, कोणत्या अवयवाची हे मी अनुमानाने अन् अनुभवाने ठरविले आहे. गृघ्र, गरूड, ससाणा, हंस आणि कावळयाची पिसे ही मी पुच्छासाठी वापरतो. पुच्छामध्ये अडकविलेली पिसे उलट सुलट दोन्ही दिशांनी कार्य करणारी आहेत म्हणून लक्ष वेध करून माझे तीर माघारी येतात; अर्थात तीर सोडतानाचे विशिष्टतंत्र आहे. त्यामुळेही विशिष्ट अंतरावर लक्ष वेध केल्यावर तीराला विरुद्ध दिशा मिळते. अर्जुना, ही सगळी तंत्रे तीं शिकलेल्या शास्त्राला सम्मत नसतीलही पण ती अनुभव सिद्ध आहेत. आम्हा निषांदाचा तिरकामठा प्राण ओतून सिद्ध केलेला असतो. म्हणून कोणताही निषाद प्रसंगी प्राण देईल पण स्वतःचा तिरकामठा देणार नाही. आमच्या जमातीत एखाद्या निषादाला मृत्यू आला की त्याच्या शवासोबत त्याच्या तिरकामठ्यालाही श्रद्धेने अन् सन्मानाने मूठमाती देण्याचा रिवाज आहे.""अर्जुना! माझे श्वानमुखीचे शरसंधान पाहून गुरू द्रोणांच्या मार्गदर्शनाखाली त्याहीपेक्षा वरचढ अशी कौशल्ये प्राप्त करणे तुला सहज शक्य होते. पण तू मात्र माझा द्वेषच केलास, अन् परिणाम स्वरूप मला अंगुष्ठ गमवावा लागला. अर्जुना, त्यावेळी माझे काळीज तीक्ष्ण शराने विंधले असतेत तरी चालले असते परंतु सत्तामदाने बेहोश झालेल्या तुम्हा राजपुत्रांना मला सुखाने मरण देण्यापेक्षाही मला हतप्रभ करून असहाय्यतेने आयुष्यभर मरणभोग सहन करीत जीवनाच्या आनंदापासून वंचित करण्यातच अधिक स्वारस्य वाटले. अन् म्हणून माझा अगुंष्ठ छेदून माझा जणू जीवन रस शोषून कायमपणे निराशेच्या गर्तेत लोटून तुम्ही हास्य विनोद करीत निघून गेलात. पण अर्जुना! सृष्टीत जसे क्रौर्य आहे तशी करूणासुद्धा आहे. मला असहाय्य अगतिक करून तुम्ही अरण्याबाहेर गेला असाल नसाल... त्यावेळी तुमच्या मृगया क्रीडांमध्ये लक्ष्य वेध चुकल्यामुळे एक पंख अर्धवट तुटून लोंबत असलेल्या स्थितीतही उडणारे आंगठ्याएवढे पाखरू मला दिसले, अन् त्याच क्षणी माझ्या समोरचा अंधःकार दूर झाला.""अंगठा तुटला म्हणून काय बिघडले? प्रत्यंचेवर ठेवलेला तीर पकडण्यासाठी हाताच्या पंजावर केवळ दोन बोटे उरली तरी पुरेशी आहेत हा विचार... ही प्रेरणा त्या पंख छेदलेल्या पाखराने मला दिली. अर्जुना! तर्जनी, मध्यमा, अनामिका, करंगुली यापेकी कोणत्याही दोहोंचा उलट सुलट वापर करून मी तीर सोडू शकतो. एवढेच कशाला? डाव्या उजव्या कोणत्याही हाताचा वापर मी करू शकतो. अर्जुना! असा अचंबित होऊ नकोस. माझ्या सगळ्या कसबांचे कथन अजून पूर्ण झालेले नाही. आता प्रत्यक्ष बघच!" एकलव्य भूमीवर आसनस्थ झाला. दोन्ही पायांच्या अंगठ्यांनी वेत्र काष्टावर पकड घेऊन त्याने ते जमिनी समांतर स्थिर केले. दोन्ही ओठांमध्ये धरून त्यावर तीर सज्ज केला. मग ओठानीच प्रत्यंचेसह तीरावर घट्ट पकड घेत त्याने प्रत्यंचा ताणली अन् मानेला हिसका दिला. यावेळी थरथरणाऱ्या प्रत्यंचेने सर्प फुत्काराप्रमाणे ध्वनी निर्माण केला. तो ऐकून एखादा बलिष्ट नागराज तर समीप आला नाही ना या भीतीने पार्थ दचकून मागे सरकला. या वेळचा तीर शरचक्रात भूमीलगत रिंगण घेऊ लागला. त्याचा वेग एवढा तीव्र की शरचक्रातील इतर तीरांपूर्वीच त्याचे मंडल पूर्ण होऊ लागले.यावेळी शरचक्रामधील मंदगती तीर बदलताना एकलव्याने डावा हात, एक हात, एक पाय, यांचा वापर करूनही तीर सोडून दाखविले. आश्चर्याने थक्क झालेल्या अर्जुनाला तो म्हणाला, "अर्जुना, ही काही आश्चर्य करण्यासारखी कसबे नाहीत. कसब असेलच तर अशा विविध प्रकारे तीर सोडता येतात का? हा विचार सुचणे हेच असावे. अर्थात तुम्हा क्षत्रियांना हा विचार तरी का अन् कसा सुचावा? तुम्ही धनुर्विद्या प्राप्त करता ती फक्त प्रतिस्पर्ध्याचा प्राणघात करावयाच्या एकमात्र हेतूनेच! तुमचे ध्येय्यच सीमित असल्यामुळे तुमच्या प्रभुत्वावरही मर्यादा येणे सहजच आहे! अर्जुना अंगुष्ठ छेदनाच्या वेदनांनी मला आणखीही एक महत्वाची दृष्टी दिली. शराघाताने होणाऱ्या यातना, विशेषतः लक्ष्याचे मर्मस्थळ विंधल्यावर त्याला होणाऱ्या यातनांची दाहकता किती तीव्र असेल हे सत्य मला प्रथमच आकळले. या विचारांनी माझ्या चित्तवृत्तींमध्ये एवढे मूलगामी परिवर्तन झाले की, अर्जुना अंगुष्ठ छेदानंतर आजपर्यंतच्या माझ्या मृगयेत एकाही जीवाची हत्या दूरच, त्याला साधा ओरखडाही उठू नये याची दक्षता मी घेत आलो आहे.""अर्जुना, माझ्या नैसर्गिक उर्मीही आता बदललेल्या आहेत. कदाचित तू विश्वासही ठेवणार नाहीस, पण मी मांसाशन पूर्ण वर्ज्य केले असून कंदमुळे, फळे हाच माझा आहार आहे. माझ्या अघोरी साधनेचे व्रताचरणात रुपांतर झाल्यावर माझ्या संवेदना अधिक तीव्र झाल्या. माझे अवधान पटकन केंद्रित होते. अन् प्रायः विचलित होत नाही, याचाही प्रत्यय मला आला. आता अरण्यविहार करताना मृगयेचा शुद्ध सात्विक आनंद मला मिळू शकतो. कसा ते तू प्रत्यक्षच बघ!" असे म्हणत एकलव्याने त्यांच्या माथ्यावर आकाशात उंच भराऱ्या घेणाऱ्या एका गरुडाकडे अंगुलीनिर्देश केला. भात्यातून एक अत्यंत हलका, नाजूक सूचीकाग्र तीर निवडून जवळच्या रानवेलीचा हातभर लांबीचा तुकडा तीराभोवती वेष्टित वेलीचे एक टोक अग्रात खुपसले. तीर सज्ज करुन वेध घेताच 'सुईऽऽक' असा स्वर काढीत कामठ्यावरुन सुटलेला तीर गरुडाच्या दिशेने सरसरत गेला. काही निमिषातच गोल गोल घिरट्या मारीत गरगरत गरुड भूमीवर पडला. त्याच्या दोन्ही पंखाच्या टोकाकडच्या पिसांमध्ये एखाद्या कसबी शिंप्याने शिलाई घ्यावी तद्वत गुंफलेली वेल दिसली. दोन्ही पंख वेलीच्या तुकड्याने एकत्र बद्ध झाल्यामुळे त्याला धड बसताही येईना. गरुड जमिनीवर आल्यानंतर सूचीकाग्र तीर तरंगत येऊन एकलव्यासमोर जमिनीत रुतला. जखडबंद गरुड क्रोधाने चित्कार करीत पंखांचा फडफडाट करायचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिला. थोड्या प्रयत्नानंतर त्याच्या पंखात गुंफलेली वेल सुटली अन् भरारी मारीत तो दृष्टी आड गेला. गरुडाच्या दिशेने विस्मयाने पहाणाऱ्या अर्जुनाला एकलव्य म्हणाला, "तुझे कुतूहल शमन म्हणा, सुप्तहेतू पूर्ती व्हावी असे प्रांजळ कथन कसलाही आडपडदा न ठेवता मी केले आहे. आता माझे कथन सत्य आहे की, सत्याचा आभास निर्माण करणारे असत्य आहे हे मात्र तुझे तुलाच ठरवायला हवे. कारण नेत्र दूषित असले, विचारांमध्ये विखार असला की अवघ्या चराचरातच व्यंग भरले आहे असे वाटू लागते.""अर्जुना! गुरुच्या एका शब्दासरशी परिणामांची फिकीरही न करता धनुर्विद्येचे मर्मस्थान, चरितार्थाचे एकमेव साधन असलेला अंगठा छेदून देणारा एकलव्य, तू पूर्वी केलेल्या अपमानाचा, अन्यायाचा कोणताही किंतु मनात न ठेवता, ऐन मोक्याच्या क्षणी तुला सहाय्यभूत ठरलेला वनचर एकलव्य, असत्य भाषण करील ही शंकाही घेणे केवळ तुलाच शोभते. कारण आयुष्याचे श्रेय आणि प्रेय म्हणून जपलेले सत्य कथनाचे दिव्य व्रत क्षुल्लक स्वार्थासाठी मोडणाऱ्या धर्मराजाशी तुझे रक्ताचे नाते आहे. कपटनीतीचा आधार घेऊन प्रतिस्पर्धी असहाय्य निःशस्त्र असता त्याचा प्राणघात करुनही स्वतःला श्रेष्ठ पराक्रमी पुरुष म्हणवून घेण्याची तुझी मानसिकता आहे. अर्जुना, तू अन् धर्मराज दोघांच्या कृत्यामागे कृष्णाचा आग्रही सल्ला असल्याचे गुळगुळीत समर्थनही तू करु नयेस. कारण अंतिम निर्णय अन् कार्यवाही तुम्ही स्वतःच्या बुद्धिनुसारच केलीत. कुणी सांगावे... भगवंताने तुमची कसोटीही घेतली असेल. तुमचे सामान्यत्व सिद्ध करावयाची ती कृष्णनीतीही असेल.""अर्जुना! माझ्यापुरते पहावयाचे तर सत्य आणि असत्य यातला भेदही मला पुरतेपणी उमगलेला नाही. द्रोणांनी केलेला माझा अव्हेर सत्य की, मी स्वयं प्रेरणनेने शिकावे यासाठी त्यांनी केलेला उपाय हे सत्य? माझा अगुंष्ठ छेद हे सत्य की, अगुंष्ठाशिवाय धनुर्विद्या साधना करण्यासाठी दूर दृष्टीने केलेले दिशा दर्शन हे सत्य? कारण आता वाटणारे असत्य क्षणभरानंतर सुद्धा सत्य ठरू शकते उलट सुवर्ण कांतीने झळाळणारे सत्य याचा मुलामा उडाल्यावर हिणकस असत्य ठरते. म्हणजे आपल्यासमोर आहे ते सत्य की असत्य हे ठरविणे शेवटी प्रत्येकाच्या कुवतीवर अवलंबवून असते. मला तर त्याही पलिकडे जाऊन वाटते की या भूतलावर शाश्वत स्वरूपाचे सत्यही अन् असत्यही वास करीत नसावे."साक्षात योगेश्वराच्या मुखी शोभावी अशी शब्दकळा आणि त्याने दाखविलेल्या विश्वरूप दर्शनाची उपमा सार्थ ठरावी असे शरसंधान कौशल्य यामुळे पार्थ भारावून गेला. त्याचे मस्तक आदराने झुकले. आवाजात अतीव मार्दव आणीत तो म्हणाला, "निषादराज, हा इंद्रप्रस्थाचा सत्ताधारी, नरपुंगव, वीर शिरोमणी, श्रेष्ठ धनुर्धर आणि श्रीकृष्णाचा परमभक्त पार्थ तुमच्यापुढे नतमस्तक झाला आहे. आपण उदारमनस्क असून पूर्णप्रतापी सूर्यासमान स्वयंप्रकाशी असून वेद वाणीच्या तोडीचे माधुर्य अन् आशय तुमच्या वाणीमध्ये आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाचे हे नव्याने दर्शन झाल्यामुळे माझे अष्ट सात्विक भाव जागृत झाले आहेत. मी आपणावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन व्हावे यास्तव आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. मात्र तत्पूर्वी या दासाची एक नम्र विनंती आहे. मला आयुष्यभर कर्तव्याभिमुख करुन माझा शौर्य स्फुल्लिंग सतत जागृत ठेवणाऱ्या कृष्णाचा मी ऋणी आहे. म्हणूनच अंत्यसमयी त्यांनी माझ्यावर विश्वासाने सोपविलेले एक अवघड कार्य पूर्ण करणे हे माझे आद्य कर्तव्य ठरते."आपल्या कथनाचा इष्ट परिणाम निषादावर होतो आहे अथवा नाही याचा अंदाज घेण्यासाठी अर्जुन किंचित विराम घेऊन एकलव्याच्या मुखावरील भाव अवलोकन करू लागला. त्याच्या निर्विकार मुद्रेवरून अर्जुनाला काहीच अंदाज घेता येईना. "निषादराज, साक्षात श्रीकृष्णांनी निर्धारित केलेले कार्य पूर्ण करण्यास मी असमर्थ ठरलो असलो तरी काही विधिसंकेतानुसार आपण माझ्या सहाय्यार्थ आला आहात. काही घटिकांपूर्वी भरत वर्षामध्ये स्वतःच्या पराक्रमाने सुवर्णपान म्हणून जपावे असा इतिहास निर्माण केलेल्या पार्थावर कर्तव्यच्युत झाल्याचा जणू ठपकाच येऊ घातला होता. माझ्या समक्ष, माझ्या दौर्बल्याचा फायदा घेऊन यदूवंशियांची संपत्ती आणि नारीवर्गाचे अपहरण दस्यू लुटारू करू पाहत होते. त्यांना साधा प्रतिकारही मी करू शकलो नाही, हे लांच्छन माझ्या चरित्राला कायमचे चिकटले असते. परंतु तुम्ही मला या दारुण जनापवादापासून वाचविले आहे.""निषादराज, महाभारत युद्ध पर्वाला आपल्या सहाय्याचा नवासर्ग, इतिहासकार, चरित्रकार यांना आता जोडावा लागेल. कृष्ण निर्वाणानंतरही कृष्ण कृपेचा साक्षात्कारच मला तुमच्या रूपाने झाला आहे. हे मी प्रांजळपणे कबूल करतो. आता क्षणाचाही विलंब न लावता दस्यू लुटारुंच्या ताब्यातील यादवांची संपत्ती आणि नारीजनांचे विमोचन करून, त्यांना शरचक्राबोहर काढून मजकडे सुपूर्द करून, हस्तिनापुरापर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी, आपण आशीर्वाद द्यावेत यास्तव मी आपणांस वंदन करीत आहे." अर्जुनाचे हे कथन ऐकल्यावर एकलव्य नेत्रातून पाणी येइपर्यंत खदाखदा हसला. "अर्जुना, आपला हेतू मोठ्या संभावितपणे दुसऱ्यांच्या गळी उतरून ईप्सित साध्य करण्यासाठीचे तुझे शब्द लाघव, धुरंधर मुत्सद्यालाही लाजविणारे आहे. माझ्या सामर्थ्यावर स्वतःचा हेतू साध्य करताना माझ्या इच्छा अनिच्छेची फिकिर तरी तू कां करावीस? तुझी उक्ती तुझ्या राजनीतीला शोभणारीच आहे.""मजसारख्या यःकश्चित निषादाला हस्तिनापुराच्या कुरू कुलभूषण सम्राटाने विनंतीपूर्वक सहाय्य करण्याची संधी द्यावी हे माझे जणू परमभाग्यच म्हणायला हवे! या पामराला अशी लोकोत्तर संधी देऊन त्याचे आयुष्य उजळून निघावे असा सन्मान जणू करीत आहोत असे भासवीत भ्रामक शब्दांचे बुडबुडे काढून माझ्या अंगी नसलेले गुणही मला चिकटवून माझ्या सामर्थ्याच्या ढालीआड स्वतःचे अकर्तृत्व लपविणारी तुझी निर्लज्ज नीती, तुझी राजकारण पटुता सिद्ध करणारीच आहे. तुझ्या दैदिप्यमान इतिहासातील एक काळेकुट्ट पर्व पुसून टाकून संभाव्य जनापवाद टाळण्यासाठी चाललेली तुझी धडपड आणि तुझा कावेबाज स्वार्थी हेतू, पार्था, माझ्या पूर्णपणे लक्षात आला आहे. एकदा का या दस्यु लुटारुंच्या कचाट्यातून सुटून तू सुरक्षितपणे राजप्रासादात जाऊन पोहोचलास की, कर्तव्यपालनाचे साफल्य आणि श्रेय तुला खचितच गवसणार आहे.""अर्जुना...! तुझे चरित्रकार उपमा उत्प्रेक्षांची उदार हस्ते उधळण करीत तुझ्या दैदिप्यमान इतिहासाला कर्तव्य पालन पर्वाच्या सुवर्ण पानांची पुष्टी देतील. कदाचित या पर्वाला कृष्ण लीलेचे परिमाण देऊन तुझे दौर्बल्य आणि अकर्तृत्व हे कृष्ण विरहाचे फलित असल्याचे सामान्य बुद्धीला पटणारे तर्कट रचून सत्य कथनाच्या आभासाने त्या पर्वाला एक वेगळीच झळाळीसुद्धा येईल. निषादाचे सहाय्य हे तर निमित्त मात्रच आहे! कुणी सांगावे? साक्षात कृष्ण परमात्म्यानेही तुझ्या सहाय्यार्थ निषादरूप धारण केले असेल, हे सत्य कुणीही स्वाकारील. अर्जुना! मला शब्दभ्रमाच्या जाळ्यात अडकवून विचार करण्याचा अवधीही न देता आपला हेतू साध्य करण्याच्या गडबडीत अनवधानाने तुझी वृत्ती उघड व्हावी अशी एक चूक तू करून बसला आहेस.""अर्जुना, माझे शरसंधान आणि सामर्थ्य या बळावर स्वतःचे प्राक्तन बदलू पहात असतानाही केवळ स्वतःच्या श्रेयाचाच विचार करण्याचा मोह तुला टाळता आला नाही. यादवनारींची सुटका हे तुझे इप्सित नसून स्वतःचे दौर्बल्य, पराक्रमशून्यता हे न्यून झाकायचे, हेच तुझे इप्सित तू सरळ सरळ उघड करीत आहेस. तुझे कथन किती दुटप्पी आहे पहा बरे...! एकीकडे आपल्या अन्यायाची शिक्षा भोगण्याचे औदार्य दाखवित असता कर्तव्य पालनासाठी यादव समूहासह अगोदर हस्तिनापूर गाठणे किती गरजेचे आहे, हे तू पटवित आहेस. अन् त्यासाठी केवळ शाब्दिक क्षमायाचना हीच जणू तुझ्या हातून घडलेल्या अन्यायाची शिक्षा आहे अन् तेवढीच पुरेशी आहे असे मानून तुला यदुवंशीय आणि त्यांची संपत्ती यासह सुरक्षित पोहचविण्याची हमी मी द्यावी, असे अत्यंत सावध शब्द योजना करीत तू सूचित केले आहेस.""अर्जुना, त्याही पुढे जाऊन तुझ्यासारख्या परम कृष्ण भक्ताच्या मुखातून उमटलेले शब्द म्हणजे मजसारख्या निषादाला सांगितलेली दुसरी भगवद्गीताच आहे, असा आव आणून आणखी कसलाही विचार करण्यात वेळ न दवडता मी तत्क्षणी तुझ्या सांगण्याप्रमाणे वर्तावे असेही तू गृहित धरीत आहेस. अर्जुना, तुझा हा संभावित संधिसाधूपणा लक्षात आल्यावर तुझ्या समोर आऽ वासून राहिलले प्राक्तन ही नियतीची उचित योजना आहे, असे माझे मत बनत चालले आहे. घटनारंभी तुझ्या सारख्या वीराची झालेली गलितगात्र अवस्था पाहून तुझ्यावर अशी वेळ येता कामा नये होती असा विचार माझ्या मनात आला. जनमनातील तुझी प्रतिमा, धनुर्विद्येतील तुझे सामर्थ्य, अक्षरशः पायदळी तुडवून तुला नगण्य ठरवीत दुर्लक्षून, दस्युंनी चालविलेली बेधुंद लुटालूट पाहिल्यावर निर्णयाच्या अंतिम क्षणी तुझ्या सहाय्यार्थ तिरकामठा उचलण्याचा झालेला मोह मलाही आवरता आला नाही. यास्तव माझ्याशी संबंध नसलेल्या घटनेत मी हस्तक्षेप केला.""अर्जुना, या घटनेतील माझा हस्तक्षेप ही तुझ्या लौकीकाच्या दृष्टीनेही इष्ट घटना असताना देखील, अपयशाच्या अंतिम क्षणी, क्षात्रतेजाला न शोभणारी मग्रुरी तुला काबूत ठेवता आली नाही. म्हणूनच मी तुझा बदला घेतला तरी चालेल असे तू म्हणू शकलास. माझ्या हेतूविषयी शंका घेऊन पार्था, तू तिसऱ्या वेळेलाही माझ्यावर अन्यायच करु पाहिलास! बदला घेणे हा बलवंतांचा स्थायीभाव असेलही; परंतु त्यासाठी लागणारी तामसी विवेकशून्यता, अर्जुना, माझ्याकडे तरी नाही. कदचित हस्तिनापुरातील अपमानाचा प्रसंग आणि अगुंष्ठ छेद या दोन्ही वेळी बदला घेण्यासाठी मी असमर्थ होतो, म्हणून गप्प राहिलो असा सोईस्कर समज तू करून घेतलेला दिसतो. म्हणून या क्षणी असहाय्य, बलहीन आणि दस्यूंकडून तू पराभूत असता हा मोका मी साधावा असे मोठ्या उदार मनस्कतेने तू मला सांगतोस. वाघ-सिंहादिकांनी शिकार करून भक्ष्यावर यथेच्छ ताव मारला की, त्यांनी त्यागिलेले उच्छिष्ठ कोल्हे, गिधाडांनी खावे त्या प्रमाणे मी तुझ्यावर सूड उगवावा एवढा का मी अधम आहे?""अर्जुना, माझ्यावर अन्याय झाला आहे हे सत्य असले तरी त्याचा बदला घ्यावा ही भावना माझ्या मनाला स्पर्श करू शकली नाही. एकतर माझा अव्हेर खुद्द गुरू द्रोणांनी केला. तसेच गुरूदक्षिणा म्हणून अंगुष्ठ छेदाची मागणीही त्यांनीच केली. तथापी त्यांचा बदला मी का घ्यावा? माझा स्वीकार, अव्हेर काहीही निर्णय ते घेऊ शकतात. प्रत्येक निर्णय दुसऱ्याच्या इच्छेनुसार कसा घेता येईल? अंगुष्ठ छेदापूर्वी त्यांच्या प्रेरणेने मी विद्या प्राप्त केली, याची खातरजमाही त्यांनी केली होती. त्याहीपलीकडे जाऊन सांगायचे तर आपल्या इच्छा अनिच्छांचे नियंत्रण खुद्द त्यांच्या हाती तरी कुठे होते? ते कुरू वंशीयांकडून अन् मुख्यत्वे तुझ्यासारख्या शिष्योत्तमाकडून केले जात आहे हे माझ्या ध्यानी आले होते. दोन्ही घटनांचे वेळी त्यांच्या नेत्रातील असहाय्य अगतिक भाव मी अचूक टिपले होते.""बरे या घटनांमागील प्रेरक शक्ती तू आहेस असे गृहित धरले तरी प्रत्यक्ष कृतीमध्ये तुझा सहभाग शून्य असल्यामुळेच तुझा बदला घेणेही असमर्थनीय नव्हे का? अर्जुना खरेतर बदल्याच्या भावनेत सतत होरपळत राहून हे सुंदर जीवन सुडाच्या प्रवासात विद्रुप करायचे हा माझा पिंडच नव्हे. आयुष्य जसे आहे तसे जगणारा, इतरांना जणू देणारा मी एक निर्मळ वृत्तीचा निषाद आहे! अर्जुना मोहाचा एक क्षणही मानवाचे पतन व्हावयास पुरेसा ठरतो. हे संपूर्ण घटनेचा साकल्याने विचार करता माझ्या ध्यानी आले आहे. म्हणूनच तुला सहाय्य करण्याची सूचना तू करीत असलास तरी असा अविवेकी निर्णय घेऊन पातकाचा तिहेरी धनी मी कशाला होऊ? "एकतर आपल्याशी संबंध नसलेल्या घटनेत हस्तक्षेप करू नये हा निषाद म्हणून माझा श्रेष्ठ धर्म आहे. दुसरे म्हणजे लुटालूट करणे हा दस्यूचा व्यवसाय असून तोच त्यांचा योगक्षेम आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की, यदुवंशीयांना सुरक्षितपणे हस्तिनापुरापर्यंत नेण्याचे उत्तरदायित्व तुझ्यावर असून देखील त्याचा गांभिर्याने विचार देखिल तू केला नाहीस. अर्जुना, स्वसामर्थ्याच्या फाजिल आत्मविश्वासामुळेच हा अनवस्था प्रसंग तू ओढवून घेतला आहेस. एवढेच नव्हे तर तुझ्या अहंकारापोटी भग्नमनस्क यदुवंशीयांवरही दुरवस्था आली आहे. एखादी शस्त्र सज्ज अश्वस्वारांची तुकडी जर तू बरोबर घेतली असतील तर हा लाजिरवाणा प्रसंग उद्भवलाच नसता. पण सामर्थ्याची, लौकिकाची फाजिल घमेंड बाळगून पवित्र राजधर्माची पायमल्ली तू केली आहेस.""अर्जुना, निसर्ग नियमानुसार तुझे प्राक्तन तुझ्या समोर ठाकले असता या घटनेला येथील वृक्ष-लतांप्रमाणे मी ही एक नगण्य साक्षीदार आहे, याचे भान न ठेवता विधी योजनेत हस्तक्षेप करावयाचे पातक माझ्या हातून घडले असते. तथापि भावनेच्या आहारी जाऊन आततायी निर्णय न घेण्याचे बाळकडू निर्सगाने आम्हां निषादाला चाटविलेले असते. त्यामुळेच स्वतःची चूक सुधारण्याची संधी मी अद्यापही गमावलेली नाही. अर्जुना, हस्तिनापूर पर्यन्तचा तुझा प्रवास सुकर व्हावा अशा माझ्या सदिच्छा जरूर राहतील. पण तुझ्या विनंतीप्रमाणे आशीर्वाद देणे हे मला तरी अनुचित वाटते. मी तुझ्यापेक्षा कनिष्ठ पंचमवर्णीय असल्यामुळे मी तुला आशीर्वाद देणे हा पवित्र धर्म संकेताचा भंग होईल. बरे सामर्थ्य श्रेष्ठत्वाचा मुद्दा विचारात घेतला तरीही तुझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरणे दूरच पण मी तुला तुल्यबळही होऊ शकत नाही. कारण माझे शरसंधान अंगुष्ठाशिवाय आहे. अन् ही बाब तुझ्या धनुर्विद्या शास्त्राला संमत असणे मला तरी असंभव वाटते.""अर्जुना, आशीर्वाद देण्याचा अधिकार सिद्धवाणीच्या तपाचरणी ऋषि मुनींनाच शोभतो. त्यामुळे तुलाच काय पण अखिल विश्वात कोणालाही आशीर्वाद देण्याएवढे तपःसामर्थ्य वा कर्तेपण मजकडे नसताना मी तुला आशीर्वाद देणे म्हणजे तुझा उपहास तुझी वंचना करणेच ठरेल.! त्यापेक्षा उर्वरित जीवन प्रवासात माझ्या वृत्ती शांत संयमी रहाव्यात असा आशीर्वाद इंद्रप्रस्थाचा स्वामी या नात्याने तूच मला दे...!" असे बोलत निषादाने अर्जुनाचे पद वंदन केले. अर्जुनाने वामहस्त उंचावित त्याच्या नमस्काराचा स्वीकार केला. "पार्था! शेवटी प्रत्येकाच्या प्राक्तनात जे अटळ आहे ते ज्याचे त्यानेच भोगायला हवे. आता या प्रसंगातून सुरक्षितपणे बोहर पडण्यासाठी मी तुला सहाय्य केलेच तरीही हस्तिनापूर गाठीपर्यंत अजूनही दीर्घपल्ला बाकी रहातो. त्या संपूर्ण मार्गात तुला सुरक्षिततेची हमी देण्याएवढे सामर्थ्य मजकडे नाही... आणि असलेच तरीही आतातेच तुझे उदाहरण पहाता तसा धाडसी निर्णय घेण्याएवढे आता माझे वयही राहिलेले नाही..."एकलव्याचे कथन पूर्ण झाले. शरमेने अधोवदन झालेल्या पार्थाला आपल्या संवेदनाच जणू बधीर झाल्याची जाणीव झाली. एकलव्याने आपला तिरकामठा सज्ज करून दस्यू लुटारुंच्या कोंढाळ्याकडे मोहरा वळविला. त्याने एकामोगामाग एक असे तीन तीर सोडलेले पहाताच पार्थ अनिमिष नेत्रांनी त्या बाणांची किमया पाहू लागला. तीनही तीरांनी शर चक्राचा भेद केल्यावर गरगरा फिरणारे शरचक्रातील तीर एक एक करून माघारी येत एकलव्याच्या समोर जमिनीत रूतले. शरचक्राचा वेढा दूर होताच दस्यू संघनायकाने परिस्थितीचा अंदाज घेऊन साथिदारांना संकेत केला. तत्क्षणी आनंदाने आरोळ्या मारीत द्रव्य आणि यादवनारी यांच्यासह दस्यू समूह मार्गस्थ होऊन काही क्षणताच गर्द वनराईमध्ये दिसेनासा झाला. हताश झालेला पार्थ दोन्ही हातांनी मस्तक गच्च आवळीत मटकन खाली बसला. एकलव्याने निर्विकारपणे जमिनीत रूतलेले तीर उपसून काळजीपूर्वक भात्यात ठेवले. कामठा खांद्याला लटकावून पार्थाकडे पहाणे जाणीवपूर्वक टाळून एकलव्य मंद मंद पावले टाकीत आपल्या राहुटीच्या दिशेने चालू लागला.   

                         *******""""