काळ सोकावलो श्रीराम विनायक काळे द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

काळ सोकावलो

काळ सोकावलो

 

 

 

          सगळाथाटमाट करून सुमलीवैनी घराबाहेर पडेपर्यंत पावणेदहा होत आले. वाट बघून दीड तास कुचंबलेला दिगू रिक्षावाला जाम वैतागलेला.... पण करतो काय? रिक्षा, ड्रायव्हिंग लायसन, बॅच काढणे ते रिक्षासाठी बँकलोन प्रपोजलपर्यंत सगळी मदत सुमलीवैनीच्या नवऱ्याने बाबलशेठने केलेली, दिगू त्याचा मिंधा ! वैताग गिळून मऊ आवाजात दिगू म्हणाला, “वैनीबायऽऽ, बेगुन आवरा नी भायर पडा कणकवली मालवण गाड्यो इल्यो काय पोरकरणींची आनी वांगडच्या मानसांची झुंबड होतली, मगे नंबर लागान् तुज्या झीलाक ढोसपाजान होयसर दीड वाजतलो.... म्हनान सांगतय.. लवकर हास्पिटल गाटुया नी नंबरलावया....” खानदानी तोऱ्यात दिगुकडे तुच्छतेचा कटाक्ष टाकीत कानातल्या कुड्याचेमळसुत्र फिरवून घटट् करीत सुमलीवैनी गरजली, “नंबराची भिती माका? या गावकारनीक भितीघालतस तू नंबराची? म्येल्या शिरा पडो रे तुज्या तोंडार.... तू माका हेलकारीन समाजलस कायरे कोल्या? आमचे ये पंच्यायत समितीचे मेंबर आसत या इसारलस की कायबाळेढोका.... आचरा तिटयार क्येदा मोटा दुकान आमचा.... धा गावात ह्येंची काय ‘वट’ हात्या वळाकतस ना तू? अरे परत्यक्ष मांगले डाक्टरांची बदली त्येंनी फिरवल्यानी, तेदुकु त्येंच्ये वशाळे, आनी नंबराचो कायदो तू माका शिकवतस?”

         सुमलीवैनीची सरबत्ती ऐकून दिगु चूप झाला. सगळा जामानिमा करून ठीक दहा वाजता सुमलीवैनी रिक्षातचढली. तिच्या मागोमाग नवसाच्या बाबूला कोऱ्या दुपटयात गुंडाळुन अलवार जोजवीत रूक्मिन काकी आणि दुधाची बाटली, जादाची झबली दुपटी अश्या सरंजामाची ठेली सांभाळीत गोठणकराची आकवार पोरगी मीना रिक्षात बसली. सुसाट पळत रिक्षा हॉस्पिटलच्या मेनगेटवर पोचली. बारा डिसेंबरला डोस पाजायची तारीख असल्याचे बोर्ड पंधरा दिवसापूर्वीचझळकलेले... दशक्रोशीतल्या पोरकरणींची नुस्ती झुंबड जमलेली... खाली उतरण्याचा निर्देश करीत दिगुने मान पाठी वळवली मात्र, त्यासरशी फिस्कारत सुमलीबाय गरजली, “रे घुबडा ऽऽ हय खय थांबलस ? रिक्षा भुतू घी" मग रिक्षातून मानवबाहेर काढुन तोंडाने, “गावकारीण ईलीऽऽ वाजूक होवा” अशी दमदार हाळी दिगुने घातली मात्र ! अन्काय आश्चर्य !! वसुदेव बालकृष्णाला घेवून यमुनेच्या पात्रात शिरल्यावर त्या कृष्णपरमात्म्याचा अंगुष्ट स्पर्श झाल्यावर यमुनेचे पात्र दुभंगले तव्दत् नवल घडले. “ग्येबाय् माज्येऽऽ बाबल शेटची घरवाली ....” असे कुजबुजत बाया बापपड्या चटाचटा बाजुलावझाल्या. हॉस्पिटलच्या दारासमोर नाव नोंदणीसाठी मांडलेल्या टेबलापुढे दिगुची रिक्षा थांबली. तेवढ्यात कोरलेल्या भुवयांची धनुकली करीत किनऱ्या पण जरबेच्या सुरात नावनोंदणी करणारी नर्स कडाडली, “कोण रे तू टिकोजी? काय अक्कल नावाची वस्तु आहे का तुझ्याकडे ? एवढ्या गर्दीतून रिक्षा आत आणायची हिंमत कशी झाली तुझी?”

       मिशीवरून पंजा फिरवीत दिगु म्हणाला, “अवो नर्शिण बाय, रिक्षात बाबल शेटची घरवाली आसा झिलाक ढोस पाजूक आनललो हा....” दिगुने केलेला नर्शिण बाय हा उल्लेख ऐकुन ती कुर्रेबाज नर्स तडकून म्हणाली, “शीऽऽ काय गावंढळ माणसं आहेत. मला सिस्टर म्हणतात, कळलं का गावंढळा ? पहिले रिक्षा मागे घे.” यावर ओशाळुन हात जोडून अजिजीच्या सुरात दिगु बोलला, “स्वारी हां शिस्टर, आपले बाबलशेट हायत ना ते पंचायत समितीचे मेंबर..." त्याचं बोलणं तोडीत टिचकी वाजवुन हाकलल्याचा आविर्भाव करीत सिस्टरवम्हणाली, "पहिले रिक्षा मागे घे, कोण कुठले बाबल की ठाबल शेट? मंत्री, आमदार,सीईओ कि कलेक्टर ? मी ओळखत नाही." त्यावर तिच्या कानाशी लागत शेजारी उभीअसलेली आया म्हणाली, “अहो म्याडम, तिठ्यावर मोठ्ठ दुकान आहे ते ... आपल्या मांगले डॉक्टरांचे मित्र आहेत ते.” आयाचं बोलणं उडवून लावीत नर्स फणकारली, “असुदेत असलेतर ! फुकटात डोस पाजुन घेणार हे सोकाजी आणि रूबाब केवढा तालेवाराचा ! मी मोजीत नाही असल्या गावंढळ पुढाऱ्याना.”

         दिगुनेरिक्षा मागे फिरवून उभी केल्यावर सुमलीवैनी खाली उतरली. “वैनीबाय, मिया अर्द्या घंट्यात येतय्, तंवसर तुमी ढोस पाजून घेवा.” अस सांगुन दिगु तिथून सटकला.सुमलीवैनीने मिनीटभर विचार केला अन् डोक्यावरच्या पदराच टोक धरून ती पुढे सरकली.सिस्टरच्या टेबलसमोर थांबलेल्या सगळया बायका आचऱ्यातल्या वैनीबायचा दबदबा जाणणाऱ्या नी मानणाऱ्या. त्या चटचट बाजुला झाल्या. टेबलासमोर गेल्यावर उसनं हसु आणित सुमलीवैनी म्हणाली, “आमी पैल्यानाच इलंव बाबुक ढोस पाजूक, आमचे यजमान पंच्यायत समितीच्ये मेंबर आसत ...” तिला थांबण्याची खुण करून नर्स म्हणाली, “हे बघा बाई....तुमचे यजमान कोण आहेत नी काय आहेत ते नकोय मला ते कोणीही असूदेत, तुम्ही नंबरात थांबा आधी. या बायका किती वेळच्या थांबल्यायत् अन् तुम्ही मध्येच कशा काय घुसताय? लोकप्रतिनिधी आहेत ना तुमचे मिस्टर ? जनतेचे सेवक म्हणवतात ना स्वतःला ? मग तुम्हीही शिस्त पाळायला नको का? बघताय काय माझ्या तोंडाकडे? जा मागे सरका नी नंबर धरा पहिले.”

        सुमलीवैनीवमान खाली घालुन मागे फिरणार एवढ्यात टेबलासमोर नंबर धरून असणारी कोळशेकारीण भालावत म्हणाली, "जावने हो नर्शिणबायनू सुमलीवैनीक फुडचो नंबर दिलास तरी कोणव काय तकरात करनार नाय घेवा तेचो नंबर." तिच्या बोलण्याला रांगेत थांबलेल्या इतर बायानीही मान डोलावून होकार दर्शविला. वैतागलेली नर्स म्हणाली, “तुम्ही मला शहाणपणा नका शिकवू. शिस्त म्हणजे शिस्त ही काय मोंगलाई आहे होय? भलताच आगावुपणा मला नाही चालायचा.” सुमलीवैनी हिरमुसली होउन मागे होत नंबरात उभी राहिली. बोलल्याप्रमाणे अर्ध्या तासाने दिगु आला. सुमलीवैनी गेटसमोर नंबरातच उभी होती. ती फणकाऱ्याने दिगुला म्हणाली, “तु थांबा नुको... आनी पुन्ना येवव नुको.. माजो नंबर कदि लागतलो देव जाना... तु येंका जावन् सांग की माका नर्शिणीन नंबराचो कायदो दाकवल्यान हा, तवा तुमी आदी हय येवा आनी तुमचा फुडारपान त्या नर्शिणीसमोर गाजौन दाकवा.” बाबल शेटला सुमलीवैनीचा निरोप सांगायला दिगू सुसाटत निघाला. तो फाट्यापर्यंत पोचला अन नेमका टायर पंक्चर झाला.

    बाबलशेटची वाट बघुन सुमलीवैनी कंटाळली चांगले दोन अडीज तास नंबरात तिष्ठंति झाल्यावर एकदाचा डोस पाजून झाला नी सुमलीवैनी माघारी निघाली. वाटेत कुणीच काही बोलले नाही. घरातपोचून पाणी-बिणी घेतल्यावर रूक्मिनी काकीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. “जळ्ळीनम्येली नरशिन, तेका खाल्यान वाघान.... घुडग्या आमका कायदो शिकवता नंबराचो, आमच्या सुमलीबायची तालेवारी आजून वळकल्यान नाय हा म्हनान नाचान देकवल्यान, वाबलशेटका नायतेची घमेंड उतरूक लावलय तर नावाची रूक्मिन नाय मी." आता सुमलीवैनीनेही गुळणी सोडली. “काय गरगरौन दाकवल्यान माका... बिचारी कोळशेकारीण दुकु मज्यासाटना आपलो नंबर सोडुक तयार झाली, पण त्या ‘आधला’ म्हंता कसा ..” नेमक्या ह्या वाक्यासरशी गोठणकराची मीना फस्सकन् हसली आणि आपली चुक लक्षात येऊन सुमलीवैनीने ओशाळून जीभ चावली. तिच्या ओशाळण्याचं कारणही तसच भारदस्त होतं. तिने नर्सला उद्देशून म्हटलेला शब्द ‘आधला’ त्या शब्दाला अख्ख्या आचरा गावात वेगळा संदर्भ होता अन् तो रूक्मिनकाकीला भिडणाराच नव्हे तर झोंबणराही होता.

         रूक्मिनकाकीचं माहेर देवगड तालुक्यात 'फणसे' हे गाव.. त्या भागात सापाची एक बिनविषारी जात आहे त्याला ‘आधला किंवा आधेल’ म्हणतात तर आचरा चिंदर या गावात त्याच जातीला दिवड म्हणतात. रूक्मिन काकी नवी नवरी असताना तिला घरामागे माडाच्या तळीजवळ पिवळं धम्मकआधेलं दिसलं तेव्हा तीने घाबरून दिराला हाक मारली, “भावजीनू ऽऽऽ ह्या बगा केवढा मोठा आधेल" दिराला ती काय म्हणते हेच कळेना. प्रत्यक्ष जनावर बघितल्यावर तो म्हणाला, “ह्या व्हय आमी येका दिवड म्हंतो.” रूक्मिन दिवडाला आधेल म्हणते यावरसगळी फिस्सकन् हसली. रूक्मिन काकी दिवडाला आधेल म्हणते ही गोष्ट गावभर झाली आणिरूक्मिन काकीलाच ‘आधेल’ हे टोपण नाव पडलं. सुमलीवैनीचं माहेर पण देवगड तालुक्यातलं पुरळ हे गाव. ती सुध्दा दिवडाला आधेल म्हणायची. तीला रूक्मिन काकीला ‘आधेल’ म्हणतात हे माहिती होतं अन् कां म्हणतात हे पण माहिती होतं. म्हणुन अनाहूतपणे ‘आधेल’ हाशब्द तोंडून आल्यावर सुमली ओशाळली, “काकी चुकॉन शब्द इलो मी त्या नर्शिणीक येंगडावसाटी ‘आधेल’ म्हटलंय नी मीना रांडू हसलां वगीचतरी.... माका माफी करग्ये काकी....” सुमलीची अजीजी बघून सुखावत काकी म्हणाली, “तां जावने ग्ये पन दिग्याकडेन निरोप दिलो तरी बाबलशेट कशे इले नाय म्हंतय मी !!“

       दिगुचं पंक्चर काढुन बाबलशेठचं दुकान गाठीपर्यंत एक वाजला. सुमलीचा निरोप ऐकुन भडकलेल्या बाबलशेठने टाकोटाक हॉस्पिटल गाठलं. गेट समोर रिक्षा थांबवून बाबलशेठ खाली उतरला.त्याला बघुन आया पुढे आली. सुमलीवैनी बाबुला डोस पाजून घरी गेल्याच ऐकुन शांत झालेला बाबलशेठ मग घरी गेला. तो ओसरीवर खुर्चीत टेकला मात्र रूक्मिन काकीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. रिक्षा हॉस्पिटलच्या गेट मधून आत गेल्यापासून ते बाबूला ढोस पाजून बाहेर येईपर्यंतची इत्थंभूत वार्ता अभिनयासह सादर झाली. “बाबलशेठ तां काय नाय, त्या नरशिणीक वाडीत हंयसर आनुन सुमलीवैनीची मापी मागुक लावा तर तुमचा फुडारपन खरा म्हनान मी.” रूक्मिन काकीचा उपोद्घात झाला तशी सुमली गरगरत पुढे आली. “आनी काय होऽऽ मी दिगुकडेन निरोप धाडललो तुमका पन दुकान सोडूण तुमी काय हस्पीटलात इलासनाय. तुमी लगेच इला असतास तर थयच्या थय फैसलो झालो आसतो. चार लोकासामनी माजो इनशाट करनारी ती नरशिण, तेका थयच धडो शिकौक व्हयो हुतो. पन तुमका माजी अगत नाय. खचो तुमचा फुडारपान ....!” सुमली मुसमुसत आत गेली.

        दुपारची जेवणं झाल्यावर पुन्हा सगळी कथा झाली. पुढचे बेत ठरले. बाबलशेठने मांगले डॉक्टरांसह नरशिणीच्या झिंज्या धरून तिला घरी आणायची, तिने सुमलीवैनीचे पाय धरून माफी मागायची, हा सगळा तमाशा चार लोकांच्या समक्ष व्हायला हवा म्हणून वाडीतली झाडून सगळी माणसं बाबलशेठच्या घरी जमवायची असा झणझणीत कार्यक्रम आखून चार वाजताबाबलशेठ घराबाहेर पडला आणि वाडीतली माणसं जमवुन आणायला रूक्मिन काकी निघाली. फुल्ल चार्ज झालेल्या बाबलशेठने दिगल्याच्या रिक्षेत बसुन थेट हॉस्पिटल गाठलं. यावेळी दिगूने मुद्दामच रिक्षा हॉस्पिटलच्या दारात पायऱ्यांसमोर भिडवुन उभी केली.बाबलशेठने तडक डॉक्टर मांगल्यांची केबीन गाठली. वॉर्डबॉय लगबगीने पुढे येवून हात जोडीत म्हणाला, “डॉक्टरसायब क्वार्टरवर आसतले, तुमी जातास थडेन काय तेंका बोलावू हंयसर?” त्यावर आवाजाला धार आणीत बाबलशेठ कडाडले, “जाऽऽ जा! ताबडतोब घेवन् येतुज्या सायबाक. म्हनॉचा बाबलशेठनी लगेच येवक् सांगल्यानी हा.”

      हात जोडुन ह्यॅ, ह्यॅ,ह्यॅ करीत डॉक्टर मांगल्यांची स्वारी प्रवेशली मात्र.... पुढाऱ्याचा संयम सोडुन टिपेच्या सुरात शेठ गरजले, “डॉक्टरऽऽऽ  माका काय डिपॉझिट जप्त झालेलो टिनपाट पुढारी समाजलास काय तुमी? राणेसायबांक डायरेक भेटण्याएवढी पत आसा माजी आनी माज्या मिसेसका तुमची ती दिड दमडीची नरशिण रांगेचो कायदो दाखवणार? आमची हीच लायकी केल्यात काय?” हीगडबड ऐकून ऑफिसमधली मंडळी केबिनकडे धावली. अजीजीच्या सुरात डॉक्टर म्हणाले, “अहो काय झालं? कोणी कसली आगळीक केली ते तर समजूदे आम्हाला.” मग बाबलशेठनी सकाळी घडलेलीघटना साग्रसंगीत वर्णन केली. सगळी घटना ऐकल्यावर तोंडावर दुःखाची कळा आणित डोक्यावर मुटके मारून घेत डॉक्टर वदते झाले, “छयाऽऽछ्या ! हा म्हणजे कहरच झाला म्हणायचा !! ही काय पध्दत झाली काय बोलायची? पंचायत समितीचा सभासद म्हणजे कायवसमजते ही नर्स.”

         मांगले डॉक्टरांची अशी भलावण ऐकून बाबलशेठचा पारा जरा खाली आला. नेमका हाच मोका साधून सकाळचा प्रसंग घडला तेव्हा नर्सच्या बाजूला थांबलेली आया आगीत तेल ओतीत बोलली, “आनी डॉक्टरऽऽ नर्सबाय येवढाच करून थांबली नाय. रांगेतली बायलमान्सा वैनी बायसाटी आपलो नंबर देवक् तयार झालली, पन तेकाव गप करून नर्सबायनी वैनीक रांगेत फाटी जावकलावल्यानी... मी मोजीत नाय असल्या गावंढळ पुढाऱ्यांक असा दुकु सुनावल्यानी..वैनीबायका” बिचारे मांगले डॉक्टर ! आयाचे बोल ऐकून त्यांची वाचा बंद व्हायचीच वेळ आली. मागचा पुढचा विचार न करता चक्क बाबलशेठच्या पायाला हात लावीत डॉक्टर म्हणाले,“मी माफी मागतो तुमची ! झाल तर वैनीसाहेबांचीही माफी मागतो. पण बाबलशेठ हा विषय इथेच मिटवुया.” जमलेल्या स्टाफला जाण्याची खूण करून मांगले घोगऱ्या आवाजात म्हणाले,"जे झालं ते झालं. ती नर्स नव्हे तर मी बोललो असं समजून माफ करा बाबलशेठ. यापुढे अशी वेळ येणार नाही याची खात्री मी देतो. पुढच्या तारखेला तुमच्या घरी माणूस धाडून बाळाला डोस पाजण्याची व्यवस्था मी करीन. हा माझा शब्द आहे.”

           एका फालतू नर्ससाठी डॉक्टरनी इतकी नरमाई कां दाखवावी हे बाबलशेठला कोडच पडलं. त्यांचे आणि मांगल्यांचे संबंध लक्षात घेता एरवी हे मान्य करणं ठीक होतं. तरीपण दशक्रोशीतल्या बाया बापड्यांसमोर आपली पत धुळीला मिळवणाऱ्या मुजोर नर्सला असं सोकळ सोडणं बाबलशेठला पटलं नाही तसच ही गोष्ट अशी गुपाचुपीत मिटवणं सुमलीनेही सुखासुखी मान्य केलं नसतं. बाबलशेठ मग स्वच्छच बोलले. “डॉक्टर तुम्ही समाजतास एवडी सादीगोष्ट नाय ही अहो म्हातारी मेल्याचा दुक नाय, पण काळ सोकावता तेचा काय? तांकाय्येक चलाचा नाय. त्या नरशिणीन आजच्या आज आमच्या घरी येवन् आमच्या बायलेची मापी मागूक व्हयी.” मान खाली घालुन पडेल सुरात मांगले म्हणाले, “हे मोठं अवघड काम आहे.कसं सांगू तुम्हाला?”

           संयम सुटलेले बाबलशेठ निर्वाणीच्या सुरात म्हणाले, “त्या नर्सका बोलवा तर आदी... तुमका जमत नसात तर मी सुनावतय तेका... अहो ही लोकशाही हा की ठोकशाही?” त्या सरशी रमिंदे होत मांगले डॉक्टर बोलले, “तुम्ही माझी अडचण लक्षात घ्या शेठ, दुसरं काय पण सांगा.. खरी अडचण म्हणजे अहो घाडगेसाहेबांपर्यंत जातील या गोष्टी ....” त्यांच बोलणं तोडीत बाबलशेठ म्हणाले, “मी वळकतय तेंका... हयो विषय मी कानावर घालीन तेंच्या... घाडगेसायब म्हंजे आपले आरोग्य मंत्री बोराडेसायब आसत ना तेंचे पावणेच लागतत... तेंची भिती माका नाय वाटत.” आवंढा गिळुन दीर्घ उसासा सोडीत मांगले म्हणाले, “ती नर्सबाई सख्खी मेव्हणी आहे बरं का डी. एच्. ओ घाडगेसाहेबांची... आता पुढे कसं कसं काय काय करायच? ते तुम्हीच ठरवा बाबलशेठ ....!”

                  *********