कोंदण पर्व एक - भाग 15 Shabdbhramar द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोंदण पर्व एक - भाग 15

उजेड 


दुखणं.. मग ते कुठलंही असू द्या. 

राग.. मग तो कशाचाही असू द्या.. 
आपल्या मानसिक पडझडीला हे कारणीभूत असतात. 
मला ती होऊ द्यायची नव्हती. 
मी शांत होत आलो तसं माझं विचारचक्र सुरु झालं. सुनीला त्याने गुलाब दिलाय.. किंवा आणखी काही. आपल्याला काय? सुनी त्याला काय म्हणालीये कुठे माहित आहे आपल्याला? 


त्या सचिनने तीला थांबवण्यावरून काहीही गैरसमज करुन घेत लगेच इतकं टोकाचं वागणं चुकीचं आहे. शांतपणे आणि विचारीपणाने ही गोष्ट हाताळणे गरजेचे आहे.


सुनिकडे पाहता ती तर स्थिर होती. नेहमीसारखंच तिचं वागणं होतं. मी विचारात पडलेला पाहून तीन माझ्याकडे बघत मला डोळ्यांनी "काय रे?" असं खुणावलं पण.. मी काही नाही.. अशा अर्थाने मान हलवली. तशी ती माझ्याकडे पाहून स्मित करत पुढे बघू लागली.


🍁🍁🍁🍁


" सकाळी तू निघून का आलास? " सुनी दुपारच्या सुट्टीत मला विचारत होती.


" अगं तुमचं काही काम होतं मी कशाला थांबू तिथे? मला थोडीच थांब म्हणला होता तो? " मी बोललो.


" तेच तू जिथे असायला हवा तिथेच नसतो नेमका. मला तुझी तिथं गरज होती. पण ठीके. तू काय म्हणाला असता हा विचार करुन मी तेच बोलले." ती म्हणाली.


" म्हणजे..मी नाय समजलो.. झालं काय नेमकं? " मी विचारलं.


" तेच जे तू समजून तिथे थांबला नाहीस. सचिन ने मला गुलाब देऊ केला. " ती म्हणाली. अगदी सरळ चेहरा ठेऊन.


" मग..किती गुद्दे खाल्ले त्याने? " मी उपहासात्मक बोललो.


" जाडू.. ती बोलायची गोष्ट होती रे..असं मी कसं करेन? पण ऐक तर काय झालं. " ती म्हणाली.


" बोल." मी श्वास सोडत म्हणालो.


तिने सांगितलेली हकीकत अशी.


सुनीला थांबवून त्याने गुलाब पुढे केला.
" याचा अर्थ सचिन?? " सुनीने विचारले.


" नेत्रा! आज valentine day आहे. आणि.. मला तूला हे सांगायचंय की तू मला आवडतेस." तो म्हणाला.


मला क्षणभर काही कळेना. काय बोलावं? असला प्रसंग आयुष्यात पहिल्यांदाच. तू असता तर काहीतरी पटकन सुधरलं असतं. पण मग तुझा विचार येताच तुझीच बुद्धी सुचली मला एकदम. मी म्हणाले त्याला.


" हे बघ सचिन. तू मेहनती आहेस. हुशारीने पुढे पण जायला बघतोयस. तेव्हा ह्या अशा गोष्टी स्वतःच्या त्या हेतू आड येऊ देऊ नकोस. तू तुझ्या भावना मांडल्या. मी त्याचाही अनादर करत नाही. पण माझ्याकडून या प्रश्नाच्या कुठल्याही उत्तराची अपेक्षा करू नकोस. असे निर्णय मी एकटी अजिबात घेणार नाही. तूला माहित आहे ना? माझ्यासाठी अशा गोष्टीमध्ये सर्वात पहिले परवानगी कोणाची असेल? या बाबतीत माझ्या आई वडिलांच्या ही आधी ती व्यक्ती आहे... तेव्हा हे कायम लक्षात ठेव आणि तुझ्या प्रगतीकडे लक्ष दे.. या गोष्टींसाठी आयुष्य आहे पुढं आणि लोकं ही पुष्कळ येत राहतील. आत्ता ही वेळ बरोबर नाही. आपण मित्र आहोत. तूला माझ्याकडे ती जागा नक्की आहे. पण ती मैत्री टिकवायची असेल सध्या तर ही गोष्ट सोड." 


आणि एवढं बोलून मी त्याचा तो गुलाब न घेताच निघून आले. तू नेमका अशा वेळीच आपल्या सुनीला सोडून निघून आला. कसला खडूस असशील ना.. खडूस कांद्या.


बरं झालं होतं, मी तीला काहीही चुकीचं बोलायच्या आत स्वतःला सावरलं होतं ते. संयम.. हाच अजून ही कमी पडत होता. सुनीचा आपल्यावर असलेला जीव आपण दर वेळी दुर्लक्षित करत येतो आणि प्रत्येक वेळी ती मला त्याची जाणीव करुन देते. माझं महत्व तिने सचिनला आत्ता पण ठणकावून सांगितलं. प्रत्येक वेळी मीच माती खातो. त्या समर आणि सचिनची देहबोली पाहून आपल्या काय काय मनात येऊन गेलं याची खरंच लाज वाटायला हवी. 


सुनी प्रत्येकवेळी माझा विचार करते. माझी बुद्धी, माझे विचार तीला किती सहज समजतात. खरंतर तीच मला बऱ्याचदा वैचारिक पाठबळ देते. आणि माझ्या आत चालणाऱ्या विचारांशी सुद्धा नकळतपणे सदैव सुसंगत असते. अजून तरी खूप काही शिकायचंय मला नात्यातलं. सुनी किती sorted आहे. तिच्यात उपजतच खूप समजूतदारपणा असल्याचे लक्षण किती सहज ती दाखवत होती. तिची मनापासून माफी मागायला हवी होती खरंतर.


" अय कुठे हरवलास? " ती म्हणाली.


" सुने!! सॉरी गं!.. माझ्यासारखा ना माठ, ठोंब्या, येडपट आणि बिनडोक मीच आहे. हे तू प्लिज मान्य कर. " मी म्हणालो.


" हे खरंय. पण ही सर्टिफिकेट आज स्वतःला का देतोय तू?? " तिने विचारले.


" तुझ्याशी स्पष्ट बोललेलंच चांगलं असतं. मनात भलतंच धरून चाललो की माझ्याकडनं चुकीचं काही घडलंच म्हणून समज. मला राग आलेला. तूला valentine day ला द्यायला आणलेलं चॉकलेट मी फेकून दिलं. गुलाबपण.. मला वाटलं तूला सचिन ने दिलं तर तू घेणार. मग आपण कशाला ठेवा. त्या रागाच्या भरात मी ते फेकलं. किती मूर्ख आहे मी. तू सगळं मला नेहमी मनात धरून ठरवते आणि करते. मला काय वाटेल याची तूला सतत परवा असते. आणि मी..." मी सरळ कबुली दिली.


तिने शाळेच्या स्कर्टच्या खिशातून पांढरा गुलाब काढला. Five स्टार चं चॉकलेट पण. ते दोन्ही मी आणलेलेच होते.


" विटभट्टी पाशी फेकलेले ना? दिसलें मला. गुलाब सुकलाय जरा पण चॉकलेट ठीके अजून. चल खाऊ. " ती म्हणाली.


मी शरमेने वितळलो होतो. सुनीने तिचं थोरलेपण परत सिद्ध केलं होतं. मी पार भुईसपाट झालो.


" जाडू तुझ्यासाठी मी सगळ्यात प्रिय व्यक्ती आहे हे तूला मला कसल्याही गोष्टीने सांगायची गरज नाहीये. तुझं माझं फार वेगळं आहे रे जाडू. हे साधं सोपं गणित नाहीये... आणि रागावतो काय रे एवढ्या तेवढ्याने. हक्काने, सरळपणे देता नाही आलं का मला हे? त्या कालच्या सचिन ने बघ कसं सरळपणे देऊ केलं मला. " ती म्हणाली.


"माझी वेळ नेहमी चुकते सुनी. " मी म्हणालो.


" अरे कसली वेळ नी काय.. तुझ्यासाठी मी अन माझ्यासाठी तू नेहमी हजर असणार आहोत.. होना? एवढं आईच्या पाठी लागून, खोटं बोलून पैसे घेतलेस. मला तेव्हाच संशय आला. " ती म्हणाली.


" तूला काय माहित? " मी चाचरत बोललो.


" मी तू आवरत असताना आलेले घरी. तुझं झालं का विचारायला. आई म्हणाली की तो आवरतोय आणि कसलीशी drawing बुक घ्यायचीये म्हणे शाळेत सांगितलंय.. तू आणलीस का? असं पण विचारलं मला. मला कळेना पण मी हो म्हणाले. मला आला डाऊट. म्हणून तूला भेटल्या भेटल्या happy valentine day विश केलं. मला वाटलं. देशील तू. तर कसलं आलंय. मानमोडया स्वभावाचा माझा जाडू मित्र...रागात फेकून देतोय पण सुनीला देईना.. हाय रे देवा..!!" ती ने सगळं आधीच जाणून घेतलेलं. तरी वरून मला चिडवतीये. 


"ए चले!! तुझ्यासाठी आणलंय कोणी? आ?! उगाच काहीपण!! जीला द्यायचंय तिला देणार होतो. पण ऐनवेळी प्लॅन कॅन्सल केला मी." मी पण तीला चिडवत म्हणालो.


" आईशपथ!!? माझ्यासाठी नाहीये हे? मग.. ओ!! पल्लीसाठी आणलंय ना? थांब देतेच तीला तुझ्या नावाने. पल्ले sss!!! " असं ओरडत ती पळत सुटली.


" ए येडी कुठली थांब..!" असं म्हणत मी पण तिच्या मागे धावलो. सचिन लांबून आमच्याकडे बघत असलेला मला दिसला होता. सध्यातरी एका संधीवर हे युद्ध थांबलं होतं.


🍁🍁🍁🍁


माझं व्यायामातलं लक्ष आता चांगलंच वाढत चाललं होतं. मी सहजपने दोनेक किलोमीटर पळू लागलो होतो. वडिलांकडून दंड मारण्याची माहिती करुन घेत. टेकडीवरल्या माऊलाई मंदिराच्या कट्ट्यावर मी माझी बलोपासना चांगलीच वाढवली. माझ्या पोटाचा, मांड्याचा, हातांचा, थुलथुलीतपणा कमी होऊ लागला होता. स्किपिंग रोप आणून मी व्यायामानंतर 300-300 दोरीवरच्या उड्या मारू लागलो. माझा स्टॅमिना वाढतं चालला होता. उंची वाढीला लागून. बांधा आता काहीसा सरळ होत चाललेला. शाळेचे आणि रोजचे वापराचे नवे कपडे मला अचानक मधेच घ्यावे लागले. त्या बदलाने आई बाबा जाम खुश होते. पोरगं मन लावून न सांगता करतंय याचा आनंद मी त्यांच्या डोळ्यात पहात होतो.


मार्च मध्यें दहावीच्या परीक्षा संपल्या आणि आम्हाला आमच्या वार्षिक परीक्षेचे वेध लागले. परीक्षा संपूर्ण वर्षभर किंवा सहामाहीत शिकलेल्या गोष्टीच्या असतात हे साधं तत्व आधीपासून बाणवलेला मी परीक्षेच्या काळात माझं रुटीन छान सांभाळून होतो. वर्षभर गंभीरपणे वर्गात लक्ष आणि नीटपणे सगळ्या रिव्हीजन्स केल्यामुळे मला सगळे पेपर उत्कृष्ट गेले होते. यावेळी पण मी आणि सुनी सेपरेट प्रयत्न करत काही काळ गुडूप झालो होतो. मला आता टोमणे वैगरे द्यायची टाप कोणाच्यात नव्हती. त्यामुळे सचिन, समर वैगरे माझ्यापासून चार हात लांबच होते.


सुनी आपलं समाजकारण करत सचिनचे प्रश्न सोडवून देतच होती. तिच्या "त्या" बोलण्याचं त्याला वाईट वाटलं असणार हे उघड होतं. पण तोही प्रयत्न सोडत नव्हता हे दिसत होतं. सुनीला त्याचा हेतू आता क्लिअर होता. पण माणसात चांगलं शोधण्याची तिची आग्रही भूमिका तिच्या स्वभावानुसार होती. 


पेपर संपले. सुनीला सुट्टीत महिनाभर तिच्या मामीने बोलवले होते. तिकडे ती कथक शिकणार होती. मी माझी बलोपासना आणखी तीव्र करत नव्या बदलाना समोरा जाणार होतो. पुढल्यावर्षीचं सचिनला दिलेलं आव्हान आता डोळ्यासमोर नाचत होतं. शिवाय माझं वाचन आणि माहिती गोळा करण्याचा सपाटा वाढवणार होतो. एक कॉम्प्युटरचा कोर्स सुद्धा लावायचा होता. सुनिकडून कळलं की सचिन गावी आईकडे जाणार होता. शेतात तीला मदत करायला.


आठवी इयत्ता संपून आम्ही नववीला पुढल्यावर्षी नव्या अभ्यासक्रमांना आणि नव्या घटनाना तोंड द्यायच्या आधी आपलं आपलं पोटेन्शीअल वाढवणार होतो.

🍁🍁🍁🍁


अशी सखी सोबत असल्यावर
सजनी काय करायचीये आयुष्यात?
अशी सखी जर जगणं व्यापतीये तर,
काय मजा प्रेमाचं रूप जाणण्यात?


- क्रमशः


शब्दभ्रमर 🍁🍁