द्विदल
"काल संध्याकाळी मला केशरी आभाळं आणि त्याच्या बॅकग्राऊंड वर उतरणारं प्लेन दाखवलं त्याने. " श्वेता मला दुसऱ्यादिवशी शाळेत सांगत होती.
"काल?" मी विचारलं.
"मग काय! मीच हट्ट केला. मला दाखव कि तुमची टेकडी. परत ती शाळा आणि इतर सगळं चालू झालं कि वेळ नाही मिळणार. नंतर बघू वैगरे चाललं होतं त्याचं. पण हट्ट करुन बसले तेव्हा तयार झाला. My god यार सुनी काय देखावा होता गं!! खूपच सुंदर. तू पाहिला असशील ना?" तिने विचारलं.
" हो बऱ्याचदा!" मी म्हणाले.
"हम्म.. पण ते दाखवताना जे काही बोलतो ना, ते ऐकून वाटतं कि कवी मनाचा आहे.. Poet.." श्वेता म्हणाली.
" हो का!! मला नाही वाटलं तसं कधी." जाडू कविता करतो मला माहित होतं. पण मी कशी तीला सांगणार त्या गुळजाडचं सिक्रेट?
" म्हणजे तुझ्याशी असं कधी poetry type बोलला नाही तो? मला म्हणाला कि, आभाळं संध्याकाळी केशरी का दिसतं माहिते का?
म्हणे, क्षितिजावर रंगबिरंगी पाखरं सुंदर दिवस दिल्याबद्दल सूर्याचे आभार प्रदर्शन करायला फुलं उधळतात, त्या फुलांच्या रंगांची केलेली उधळण आपल्याला दिसते.
Scientifically दोघांनाही न पटणारं पण poetry साठी ठीक, म्हणून मी ऐकलं. पण नंतर आम्ही वेड्यासारखे हसत बसलो होतो. हा पक्का नाटकी आहे गं! पण बोलतो असं कि वाहत जायला होतं." श्वेता सांगत होती. मी ऐकत होते.
पण मागे कोणीतरी उकळत होतं.
"ऐकलं का गं स्नेहा... माऊलाई दर्शन सतत केल्यामुळे ती पावते बरं का?" पल्लीचा आवाज आला.
" हो मग.. एका बरोबर सिनेमा.. दुसऱ्यासोबत सोबत टेकडी.. नंतर तो दुसरा तिसरीलाच घेऊन टेकडीवर.. तर परत पहिल्यासोबत गट्टी आणि घरी आण सोड.. म्हणजे कसं कि गॅपच नाही द्यायचा मध्यें.. ही माऊलाई नेमकी कोणाला पावतीये तेच कळत नाहीये. " स्नेहाचा आवाज आला.
" मलातर इतकं कळतंय बाई.. असू आपण मार्कांनी आणि बुद्धीने वैगरे कमी.. पण असं पोरं वैगरे फिरवायचे उद्योग नाही करत बसत. " पल्ली म्हणाली.
लांच्छन! माझ्यावर.. मला अजिबात सहन झालं नाही. मी उठून पल्लीचे केस धरणार तितक्यात फाडकन आवाज झाला. मी पाहते तर श्वेताचा पंजा पल्लीच्या गालावर उमटला होता. स्नेहा उठून बोलायला लागली तर श्वेताने तिच्याही ठेऊन दिली. सगळा वर्ग शॉक लागून गार पडला.
मुलांच्यात भांडणे वैगरे व्हायची. पण मुलींमध्ये टॉन्ट्स पास व्हायचे आणि वाद व्हायचे. श्वेताने मात्र या दोघींवर हात उचलला होता.
" बिचेस!! हिंमत कशी झाली तुमच्या दोघींची. चिप कुठल्या. लायकी आहे तुमची सुनीला मैत्रीण म्हणवून घ्यायची. घाणेरडं बोलताय तिच्याबद्दल. शांत बसलीये म्हणून अति करता का? चला प्रिन्सिपलं कडे जाऊ. मी काय केलं ते मी त्यांना सांगते.. तुम्ही स्वतःच्या निर्लज्ज जिभेने काय काय गरळ ओकलत ते सांगा... चला दोघी.." श्वेता ओरडली.
तिचा फक्त समजूतदारपणाचं नाही तर प्रसंगी समजून घेऊन पटकन दुसऱ्यासाठी आवाज उठवण्याची क्षमता अजबच होती. आजवर वर्गात असं धाडस सुनीने केलं होतं. तेच श्वेताने पण केलं. सुनीसाठी ती भांडली. तिची कड घेतली.
"Shameless कुठल्या." श्वेता रागाने लाल होऊन तळपत होती.
जाडू तिथे आला.
"सुने, श्वेता... काय झालं? " त्याने विचारलं.
" कधीची ऐकतीये रे यांचं. तुझ्याबद्दल आणि सुनिबद्दल काहीही बोलतायत निर्लज्ज कुठल्या... तुमच्या असल्या भुंकण्यामुळे सुनी नाही, पण तुमचीच बदनामी होईल. तीला आणि तिच्या मैत्रीला तुमच्या सर्टिफिकेट ची गरज नाहीये. समजलात ना. इथे सगळ्यांना ठाऊक आहे. काय आणि कसं नातं आहे त्यांचं. परत तिच्या वाटेल जाल तर मी मध्यें उभी आहे लक्षात ठेवायचं इथून पुढे." श्वेता कडाडली.
वर्गात सर आले आणि सगळी सारवा सारव झाली. तासात मनं लागतच नव्हतं. आतून खूप disturb झाले होते मी. माझ्या स्वभावाला भलताच रंग देऊन हि पल्ली आणि स्नेहा काहींच्या काही पसरवू बघत होती. श्वेताने चांगलीच अद्दल घडवली दोघीना. ती सुद्धा जाडूसारखी जीव लावू लागली होती. पण सुनीसारखं पटकन बिथरून मोकळं होणं पण तिच्यात होतं. तिचा तो अवतार बघून मला स्वतःला आवरावं लागलं. भन्नाटच आहे श्वेता. मला तीला माझी साइड घेतल्याबद्दल thanks म्हणण्याची ईच्छा झाली.
🍁🍁🍁🍁
तास सुटले तसे आम्ही जड पावलांनी निघालो. जाडू आणि श्वेता सोबत होते. सचिन सूचक नजरेने बघत होता. मी त्याला नजर दिली, पण आत्ता मला त्याच्याशी बोलू वाटेना.
" श्वेता thanks यार..." मी म्हणाले.
" वेडीयेस का? Thanks म्हणतेस. हे असलं थर्ड रेटेड बोलणं तुझ्यासाठी बरी खपवून घेईन मी. " ती म्हणाली.
" पण हे झालं कसं काय? पल्लवी तर तुझी चांगली मैत्रीण होती ना? मग अचानक तीला काय झालं? " जाडुने विचारलं.
" तुझ्यामुळे.. " मी म्हणाले. जाडू आज सापडला होता. बघतेच त्याला. चार्मिंग बोका काय. असं डोक्यात वादळ आलं.
" माझ्यामुळे? " तो नवलाने म्हणाला.
"ती पल्ली केव्हापासून तुझ्या मागे आहे. मला सतत टॉर्चर करतं रहायची. तुझ्याशी बोल या विषयावर वैगरे. तू काही दाद दिली नाहीस. आणि मग.. मग तीला तुझी श्वेतासोबत झालेली मैत्री खपेना. त्यात माझंपण श्वेताशी छान जुळतंय हे हि तीला बघवेना. म्हणून मग असं केलं तिने आणि आता तर मार खाल्ला. तिच्यासोबत स्नेहानेपण खाल्ला." मी म्हणाले.
"अगं मग मी कुठे आलो यात? सगळं त्या तुझ्या पल्लीचच कि. बिनडोक पोरगी." तो असला गोंधळून बोलला कि मला फिसकन हसायला आलं. ते बघून श्वेतापण हसायला लागली.
"अरे यार.. तुझ्यामुळेच तर अशी आक्रस्ताळेपणा करतं सुटलीयेना ती. कसं कळेना तूला?" श्वेता हसत म्हणाली.
"जाडू.. तू खूपच इनोसंट सारखा करतो यार." मी म्हणाले.
"नाही अजिबात नाही. तिचं तसं डोकं चालतंय यात माझा काय दोष? कोण स्वतःच्या मनात काय घेऊन चाललंय याच्याशी मला का देणं घेणं असावं? तिचे विचार तिचं म्हणणं काहीही असू देत. तिने ते तिच्यासोबत ठेवावेत, नाहीतर ज्याच्या बद्दल आहेत त्याच्यासमोर व्यक्त करावेत. हे असं अडून अडून करू पाहायचं आणि मग साध्य होत नाही म्हणाल्यावर ज्याचा आधार घेतोय त्यालाच बोल लावायचे. ते पण तूला सुने? जिने नेहमी तीला चांगली मैत्रीण म्हणून वागवलं. श्वेता बरोबर बोलली. लायकी नाहीये तिची तुझ्यासोबत मैत्री करायची.आयुष्यात त्या मुलीचं तोंड बघणार नाही मी. कारण तिने तुला हर्ट केलंय." जाडू गम्भीरपने म्हणाला.
"हे हि बरोबर आहे गं.. तिच्या विचित्र डोक्याच्या खेळासाठी इतर कोंणी कसं काय जबाबदार असू शकेल?" श्वेता म्हणाली.
"बरं जाऊ द्या ते. अशा लोकांबद्दल बोलून वेळ घालवायला वर नाही आला आपला. सुने तू ठीक आहेस ना?" जाडू म्हणाला.
"हो मी ठीके आता. मला नाही वाटतं पल्ली परत तोंड उचकटेल आता." मी म्हणाले.
" सोड तिचं. By the way श्वेताच या शाळेतलं पहिलं कांड. सेलेब्रेशन करणं बनतं हा!!" तो म्हणाला.
"होका!!?" श्वेता म्हणाली.
" मग. चला वातावरण हलकं करायला माझ्याकडून कुल्फी. " जाडू म्हणाला.
"वाह रे जाडू!! पल्लीपासून पिच्छा सुटला म्हणून कुल्फी देतोय आणि सांगतोय श्वेताचं कारण." मी म्हणाले.
" कायपण हा सुने!!" तो गोरामोरा होत म्हणाला.
" अरे हा खरच कि. माझं निमित्त पुढं करतोय." श्वेता म्हणाली.
"मी आणतो कुल्फी थांबा इथंच." तो अग्रवालमध्यें गेला.
"तुझ्यासाठी मुलं भांडलीयेत का कधी?" मी श्वेताकडे बघत म्हणाले.
"हो तिकडच्या शाळेत झालंय एक दोनवेळा असं." ती म्हणाली.
"इथं जाडूसाठी झालं आज." मी म्हणाले.
"अं!!" तीला कळलं नाही बहुतेक.
" पल्लीच्या चिडण्यात तुझ्या बाबतीतली जेलसी सुद्धा कारण होतं." मी श्वेताकडे बघत म्हणाले.
"म्हणजे?!" श्वेता म्हणाली.
" पल्ली तुझ्या मागे बसते. तिला दिसतं असणार ना दर तासाला तू जाडूकडे वळून बघतेस ते. मला कळतंय म्हणजे तिलापण कळत असणार ना काय चाललंय ते. " मी तिरकस नजर लावत बारीक हसत म्हणाले.
ती क्षणभर स्तब्ध झाली. मग काही लक्षात येऊन,
"आईशपथ सुने!!" म्हणत मोठ्याने ओरडून हसू लागली.
"त्या बोक्याला कधी कळायचं देव जाने." मी हसत म्हणाले.
"बोका?? कुठंय बोका?" जाडू समोरून येत म्हणाला.
आम्ही डबल जोरात हसू लागलो.
🍁🍁🍁🍁
तूझ्या विना प्रवास असू शकतो?
तुझ्या साथीला पर्याय असू शकतो?
आजमावून बघायला काय जातंय,
बघू माझा जीव जातो कि राहतो.
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁