तोतया वारसदार
पात्र रचना
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
भाग २३
भाग २२ वरून पुढे वाचा....
घरी पोचल्यावर लक्ष्मण गोखले शास्त्री म्हणाले “बसा, मी आईला आणि बहिणीला बोलावून आणतो.”
त्या दोघी आल्यावर शास्त्री म्हणाले, “ही माझी आई वसुधा, आणि ही माझी बहीण वर्षा. आणि आई हे रोहन गोखले, आणि हे निशांत. रोहन लंडन हून आला आहे आणि निशांत नागपूर वरून. मी म्हणालो होतो ना तुला नागपूरहून कोणी तरी आपली चौकशी करताहेत म्हणून, तीच ही लोकं.”
रोहन लगेच उठला आणि वसुधाताईंच्या पाया पडला. वसुधा ताईंना खूपच कानकोंडल्या सारखं झालं त्या म्हणाल्या, “अरे, अरे, हे काय? अहो पाया काय पडता आहत तुम्ही?”
“काकू अहो इतक्या वर्षांनी आपली भेट होते आहे, पाया नको पडायला? तसेही मी आणि लक्ष्मण चुलत भाउच आहोत.” रोहनच्या बोलण्याचा वसुधा ताईंना काही बोध झाला नाही, त्या मुला कडे प्रश्नार्थक नजरेने बघत होत्या.
“काकू, सर्व सांगतो आम्ही. बसा तुम्ही.” रोहन म्हणाला. “निशांत सांगतोस ना, सविस्तर?”
मग निशांतनी सुरवात केली. “मी तुम्हाला लक्ष्मण राव म्हंटलं तर चालेल ना? का शास्त्री म्हणू.?”
“अहो काहीतरीच काय? नुसतं लक्ष्मण म्हणा. लोकांच्या साठी मी शास्त्री आहे.” लक्ष्मण शास्त्री म्हणाले.
मग निशांतनी विनायकरावांनी लिहिलेली वंशावळी आणि घराण्याचा इतिहास काढला आणि म्हंटलं, “लक्ष्मणराव हे आधी वाचा, मोठ्याने वाचा म्हणजे सर्वांना कळेल. त्या नंतर आपण सविस्तर बोलू.” लक्ष्मणने वाचायला सुरवात केली, तेवढ्यात घरी काम करणाऱ्या मोलकरिणीने चहा आणि बिस्किटे आणून ठेवली.
सर्व वाचून झाल्यावर लक्ष्मणने फोल्डर खाली ठेवलं. त्याचा गोंधळ अजून संपला नव्हता आणि त्याच्या चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसून येत होतं.
“मला हे कळतंय की,” लक्ष्मण म्हणाला “ज्या वेळी हे लिहिलं त्या वेळी व्यंकटेश आणि सौमित्र यांचा पत्ता नव्हता म्हणून वारसदार शोधा असं सांगितलं, पण आता जर त्यांचा पत्ता लागला आहे, तर ही सर्व इस्टेट, रोहन आणि जयला मिळायला हवी. आम्हाला का शोधता आहात तुम्ही.”
“मी सांगतो” रोहन म्हणाला “आम्ही इंग्लंडला राहतो. देव दयेने आमच्या कडे कशालाच काही कमी नाहीये, आमचा मोठा बिझनेस आहे, बाबा आणि काका आता हळू हळू आमच्यावर जबाबदारी सोपवताहेत. अश्या परिस्थितीत इथली भारतातली इस्टेट घेऊन आम्ही काय करणार? तिथे राहून इथली शेती कशी सांभाळणार? आमचा भविष्यात इथे येण्याचा काहीच विचार नाहीये. जयचं तर लग्न पण ठरलं आहे. मराठीच मुलगी आहे, पण ते कुटुंब तिथेच स्थायिक झालं आहे. त्यामुळे बाबांनी आणि व्यंकटेश काकांनी संपत्ती वरचा हक्क सोडला आहे. आता आम्ही नाही, म्हंटल्यांवर वंशावळी नुसार शोधणं भागच होतं. या शोध कार्यात मी मदत करतोय इतकच.” लक्ष्मण शास्त्री जरा विचारात पडले, ज्या संपत्तीशी आपला दुरान्वयाने सुद्धा संबंध नाही ती स्वीकारायची तरी कशी, हे कोडं काही त्यांना सुटत नव्हतं.
“लक्ष्मणराव, कसला विचार करता आहात? माझ्या मते ही विचार करण्या सारखी गोष्टच नाहीये.” रोहन म्हणाला.
“मी सांगते, दादा कसला विचार करतो आहे ते. त्याच्या मते कष्टाचा पैसाच लाभतो. अचानक विना सायास मिळालेली दौलत संकटं घेऊन येते. हो ना दादा?” वर्षा म्हणाली.
“हो, बरोबर आहे, मुळात आपल्याला या पैश्यांची जरूर आहे का? देवाच्या कृपेने सगळंच तर आहे आपल्या जवळ. तुझ्या लग्ना साठी पण तरतूद करून झाली आहे, कसलीच चिंता नाहीये, मग कशाला हवा विना कष्टाचा पैसा? नकोच आपल्याला.” लक्ष्मण बोलला.
लक्ष्मणचे हे उद्गार ऐकल्यावर निशांत आणि रोहन गोंधळात पडले. पुन्हा एकदा रस्ता बंद झाला होता. सहज, विनासायास मिळणारी कोट्यावधीची संपत्ती नाकारणारे गोखले कुटुंब पाहून निशांत विस्मयात पडला. त्याला काहीच सुचेना. तो वर्षा कडे बघत होता. तिच्या चेहऱ्यावर पण संपत्ती गमावल्याचं दुख: दिसत नव्हतं. पाहता पाहता एकदम त्याच्या लक्षात आलं की वर्षा खूपच आकर्षक आहे. तो पाहातच राहिला. वर्षांच्या ते लक्षात आलं, ती अवघडून गेली. म्हणाली “मी पानं घेते, सर्वांना भुका लागल्या असतील ना? आलेच.” असं म्हणून ती लगेच उठलीच. तिच्या चपळ हालचाली ने निशांतला वेडच लावलं. त्याच्या दृष्टीने शोध कार्य वर्षांच्या जवळ येऊन संपलं होतं.
रोहन पण लक्ष्मणचं उत्तर ऐकून स्तिमित झाला होता, तरी पण तो म्हणाला, “लक्ष्मण राव ९ कोटी ही काही लहान सहान रक्कम नाहीये, एकदम घाई घाईत निर्णयापर्यंत पोहोचू नका. शांतपणे विचार करा. कदाचित तुमच्या म्हातारपणाची तरतूद यातून होऊन जाईल. आणि वेगळा विचार केला तर तुम्हाला काही काम करण्याची पण आवश्यकता राहणार नाही.”
“रोहन,” लक्ष्मण शास्त्री म्हणाले, “ गोकर्ण महाबळेश्वर हे अत्यंत जागृत असं पुराण काळा पासून चालत आलेलं जागृत देवस्थान आहे. इथे पूजा करायला मिळणं हे असीम भाग्य आहे. तुमच्या आजोबांनी कमावलेली इस्टेट, काहीही प्रयास न करता मी घ्यायची, हे माझ्या देवालाही पटणार नाही आणि माझ्या मनाला पण पटत नाही.”
“असं असू शकेल ना, की महादेवानेच तुमच्या भक्ती वर प्रसन्न होऊन, तुम्हाला हे वरदान दिलं आहे.” रोहनने लक्ष्मण रावांना समजावण्याचा प्रयत्न केला. “तसंही ही इस्टेट गोखल्यांचीच आहे, कोणा परक्याची नाही. आपले एकमेकांशी गेली पांच पिढ्या संबंध नव्हते हे खरं आहे, पण महादेवानीच आम्हाला प्रेरणा दिली म्हणूनच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो ना. पहा विचार करा.”
लक्ष्मणराव काही बोलले नाही. इतका वेळ हे सगळं चुपचाप ऐकत असलेल्या वसुधाबाईंनी विषय थांबवला, आणि सर्वांना म्हंटलं की “आता चर्चा पुरे, आणि प्रथम जेवून घ्या तीन वाजून गेले आहेत. लक्ष्मणा, अरे तुझ्या बरोबर पाहुण्यांना पण उपाशी ठेवणार आहेस का? आपल्या घरी प्रथमच आलेल्या पाहुण्यांचं आपल्याविषयी काय मत होईल?”
“हो आई, बरोबर आहे तुझं म्हणण, वाढ तू. पण विषयच असा काढला या दोघांनी की घड्याळा कडे लक्षच गेलं नाही. रोहन, निशांत, सॉरी.”
एकदम वेगळ्याच चवीचं कर्नाटकी पद्धतीचं जेवण रोहन आणि निशांतला पण आवडलं.
जेवण झाल्यावर वासुधाबाईंनी सूचना केली की, “जरा विश्रांती घ्या, सकाळपासूनचा शीण दूर होईल. मग हवी तेवढी चर्चा करा. रोहन, तुम्हाला तातडीने जायची घाई नाहीये ना? आमचा चार दिवस पाहूणचार घ्या, मग निघा. या निमित्तानी येणं तरी झालं, नाही तर तुम्ही लंडनला आणि आम्ही इथे, गांठ पडणं शक्यच नव्हतं. आणि निशांत, तू पण संकोच करू नकोस, जसा लक्ष्मण तसेच तुम्ही दोघं. निवांत रहा.”
निशांत आणि रोहन दोघांनी एकमेकांकडे बघितलं, पण काकूंच्या एवढ्या प्रेमळ आग्रहा पुढे आत्ताच काही बोलणं, त्यांना उचित वाटलं नाही. म्हणून ते गप्पच राहिले.
संध्याकाळी लक्ष्मण शास्त्रीना एका साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जायचं होतं, म्हणून ते आठ वाजे पर्यन्त येतो असं सांगून निघून गेले. रोहन आणि निशांत मग काकू आणि वर्षाशी चहा पित पित गप्पा मारत होते. रोहन लंडन विषयी बोलत होता, आणि तिघंही ऐकत होते. इतक्या थोडक्या काळात, रोहन आणि निशांत त्या घरात सामाऊन गेले, की मग काकू वर्षाला म्हणाल्या की “रोहन आणि निशांतला घर दाखवून ये, तेवढाच वेळ जाईल.” वर्षा आनंदाने तयार झाली. तिलाही निशांत बरोबर वेळ घालवायचा होता.
ह्या पलीकडे खोल्या दिसताहेत, त्या बाहेरगावाहून लोकं येतात, त्यांच्या राहण्याची सोय आहे. हा छोटा हॉल इथे छोट्या मोठ्या पूजा आणि अनुष्ठानं होतात. हा मोठा हॉल, इथे मोठ्या पूजा, यज्ञ वगैरे होतात, म्हणजे शतचंडी , महारुद्र, ज्योतिष्टोम यज्ञा सारखे. निशांत आणि रोहन बघत होते. भिंतीत बरीच कपाटं होती आणि त्यात पूजेला लागणारं चकचकीत पितळी साहित्य अतिशय व्यवस्थित मांडून ठेवलं होतं. एका कपाटात मोठमोठ्या सतरंज्या आणि चादरी ठेवल्या होत्या. बाकी, पाट, चौरंग वगैरे नीट एका बाजूला रचून ठेवलं होतं. सगळ्या कपाटांना काचेची दारं होती, जेणे करून आत काय सामान आहे ते दिसावं.
“हे एवढं सगळं साहित्य लागतं दर वेळेला?” निशांतनी उत्सुकतेने विचारलं.
“हो सगळं लागतं. आणि त्या वेळेला आम्हा सर्वांची खूपच धाव पळ होते. अर्थात त्या त्या दिवशी जास्तीची माणसं बोलवल्या जातात, पण घरच्यांच्या वर खूप लोड असत.” वर्षाने सांगीतलं. मग निशांत बरेच प्रश्न विचारात होता आणि वर्षा उत्तर देत होती. रोहनच्या लक्षात सगळा प्रकार आला, निशांत मुद्दाम प्रश्न विचारून वर्षाशी बोलणं वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे, हे त्यांच्या दृष्टीतून सुटलं नव्हतं. पण तो काही बोलला नाही. निशांतचा स्वभाव आणि कामाचा उरक त्याला पण आवडला होता.
रात्री जेवण झाल्यावर बराच वेळ गप्पा चालू होत्या. निशांतने आतापर्यन्त काय काय घडामोडी झाल्या त्याचं वर्णन केलं. अविनाशची कहाणी सांगतांना तो खूपच भावुक झाला होता. इतरांना पण त्या गोष्टीने भरून आलं होतं. निशांतने हे पण सांगीतलं की गोष्ट बाहेर कुठेही बोलायची नाहीये, कारण अविनाशच्या जीवाला धोका होऊ शकतो.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com