जाळ
प्रॅक्टिकलची जरनल्स भरली ना विज्ञान एक आणि दोन? सबमिट करायचीयेत उद्या." मी सुनीला विचारलं. आम्ही संध्याकाळी तिच्या घरी एकत्र बसून सबमिशन उडवत होतो.
"हो झालीयेत." तीने जांभई देत सांगितलं.
"बघू?" मी विचारलं.
"बॅगेतून घे माझ्या." तीने पाय आणि पाठ सरळ करत अंग मोडत मला सांगितलं. तिचे डोळेपण आज दिवसभर जडवल्यागत झालेले दिसतं होते.
मी तिच्या बॅगेतून जरनल काढलं आणि चाळलं. बघतोय तर तीचं नव्हतं ते. त्या खालचं तीच होतं. आधीचं मी नाव पाहिलं तर सचिन गाडे.
"या गाड्याच जरनल काय करतंय इथं?" मी विचारलं.
"..." सुनी गप्प.
" सुने.. कार्टे.. मर मर करुन लोकाला जरनल्स कम्प्लिट करुन देण्याइतकी भगिनी निवेदिता बन असं कोंणी सांगितलंय तूला?" मी म्हणालो.
"अरे.. मी फक्त आकृत्या काढून दिल्यात त्याला. त्याने लिहिलं होतं. आकृत्या जमेनात. म्हणून मग मीच बोलले दे करुन देते." ती म्हणाली.
"त्यासाठी जागरण गोंधळ घातला असशील. तोंडावरूनच दिसतंय." मी विचारलं.
"झाला थोडा वेळ काल झोपायला. " ती म्हणाली.
" तूला ना सुने सूट दिली कि सुटलीच लगेच 120 ने तू. आजारी पडशील कि अशाने." मी म्हणालो.
"नाही रे बाबा! कधीतरी जागरण सोसू शकतं कि सुनीला, एवढं काय? झोप करते कव्हर मी, तू गेलास कि जेवून गुडपच होणारे. बरं तर बरं मी नाजूक साजूक नाही म्हणून.. पण काही लोकांना ऍलर्जी होते, सोसत नाही. हे माहित असूनपण समोरचं सांगेल तसं वागतात. आणि मग त्रास ओढवून घेतात." ती म्हणाली.
"काय?? कोणाचं सांगतीयेस?" मी विचारलं.
"श्वेता आली नव्हती शाळेत आज." ती म्हणाली.
" हो बरं नाही तीला. असं कळलं. सकाळी आई बोलली तिची." मी म्हणालो.
"काय झालंय कळलं नाही का मग?" सुनी म्हणाली.
" सांगेल कि बरी झाली कि मी नाय विचारलं. " मी बोललो.
" जाडू!! खडूस कांद्या. असं असतं का? तीला बरं नाही तर शाळेतून आल्यावर जायचं ना मग परत विचारायला." सुनी म्हणाली.
"अगं असेल काही किरकोळ. होईल कि बरी. उद्या सांगेल. " मी म्हणालो.
" कसला कोरडा पाषाण आहेस रे तू, श्वेताला सांगतेच." सुनी वैतागून म्हणाली.
"अगं नाही डोक्यात आलं. आता काय माफीनामा लिहून देऊ का?" मी म्हणालो.
"तू तीला काल सकाळी माळावर नेलस." ती म्हणाली.
"सुने, ती होऊन आली होती..मी नेलं नव्हतं ओढत ओढत. " मी म्हणालो.
"तेच ते रे.. तीला त्या गाजरगवताची ऍलर्जी आहे. त्यात गेलं कि तिच्या हातापायांला पुरळ येतात. चेहरा सुजतो. मी गेले होते शाळेतून डायरेक्ट. तुझ्यासारखं नाही आपलं. येईल समोरचं सांगायला म्हणून वाट बघत बसायला. माणूस घाण्या कुठला. तिची आई म्हणाली श्वेता इतकी घाबरते त्या ऍलर्जीला कधी तसल्या गवतात जात नसायची. काल कशी गेली काय माहित? आणि हे घेऊन आली." सुनी सांगत होती.
"अरे बापरे.. एवढं झालं..मला नव्हतं वाटलं असं होईल.. मीच तर तीला त्या गवतात झोपायला लावलं होतं." मी अनावधानाने बोलून गेलो.
"का sssssssss य???" सुनी इतकी जोरात ओरडली कि तिचे आईबाबा धावत रूम मध्यें आले.
"काय झालं रे पोरांनो?" आईबाबा आम्हाला विचारत होते.
सुनीने तिचे दोन्ही हात डोक्यावर ठेवले होते आणि मी एक हात कपाळावर मारून घेतला होता.
🍁🍁🍁🍁
सुनी मला ओढत ओढत घराबाहेर घेऊन आली.
सोबत चिमटे आणि धपाटे पण चालू होते. शिवाय...
"जाड्या.. नालायक.. बेशरम.. वाटलं नव्हतं. तू असलं काही करशील." सुनी दबक्या आवाजात शिव्यापण देत होती.
"अगं थांब थांब.. यडे.. तू समजतीये तसलं नाही काही.. सुने.. आई गं.. चिमटा नको काढू.. " मी कळवळत होतो.
"काय तसलं नको समजू..?? तीला गवतात का झोपायला लावलं तू? मूर्खा.. आणि तोंड वर करुन सांगतोयस मला. " सुनी म्हणाली.
"ऐक कि जरा. अगं ऐकून तर घे.." मी म्हणालो.
"श्वेताला भेटायला पाहिजे कसलं टेन्शन आलं असेल तीला. मी आपलं तब्येतीच विचारून आले. हा घोळ माहीतच नव्हता मला. देवा.. काय वाटत असेल तीला? एकतर कोणाला काही बोलणार नाही ती. मला बोलवच लागेल तिच्याशी. त्यात ही ऍलर्जी." सुनी स्वतःशी बडबड करू लागली.
"ए.. ए मूर्ख.. काहीपण काय बडबडतीये? " आता मी वैतागलो. "चल माझ्यासोबत. बसं सायकलवर." मी म्हणालो.
"कुठं?? " सुनी म्हणाली.
"श्वेताकडे. चल आणि काय ते जाणून घे. यडपट. सुतावरून स्वर्ग गाठतंय." मी तीला सायकलवर बसवली आणि पाच मिनिटात आम्ही श्वेताच्या घरी होतो.
"हा.. जा आणि बोल तिच्याशी. मी आहे इथंच बाहेर." असं म्हणून मी बाहेरच थांबलो. सुनी गेली श्वेताच्या घरात.
पंधरा मिनिटं वाट बघितल्यावर दोघी श्वेताच्या बेडरूमच्या खिडकीतून डोकावल्या. फिदिफिदी हसत माझ्याकडे बघत होत्या. मी माझं तोंडच विरुद्ध दिशेला फिरवलं. अजून जोरात हसायचा आवाज आला मला.
पाच मिनिटांनी सुनीने मागून येऊन पाठीत गुद्दा घातला.
" जंतर मंतर.. अब्रा का डब्रा..काय होतं ते? जादूगार जाडू." सुनी हसू कंट्रोल करत म्हणाली.
"जे काही असेल. पण ते ते नव्हतं जे तू समजतं होतीस. मूर्ख कार्टी." मी म्हणालो.
"ठीके.. ते ते नव्हतं जे मी समजतं होते. पण खरं जे काही होतं ते फार भारी होतं." सुनी म्हणाली.
"गप!! तेवढ्या वेळात किती काय काय येऊन गेलं तुझ्या डोक्यात माझ्याबद्दल??" मी म्हणालो.
"जाडू ss!! अरे.. तसं नाही म्हणजे.. कसं आहे. कि.. " ती म्हणत होती.
"कसं नाहीये..?? तू मला चुकीचा समजलीस सुने?? असंच आहे." मी म्हणालो.
" अय अरे नाही. म्हणजे कसं सांगू? " सुनी म्हणाली.
" श्वेता काय म्हणाली? " मी विचारलं.
" तिने सांगितलं जे झालं ते. " ती म्हणाली.
" सगळं? " मी विचारलं.
" हो." ती म्हणाली.
मला खूपच राग आला आता दोघींचापण. दोघीनी मिळून माझ्या भावनांची थट्टा लावली आहे असं मला वाटायला लागलं. आधी सुनीने नको तो अर्थ काढला आणि मग तीला जे घडलं ते सगळं सांगून श्वेताने अती केलं... वरून दोघीही माझ्यावर हसत होत्या. श्वेताला मी जे काही सांगितलं त्यातला एक गंभीर असा आशय गर्भ निघून मी मूर्ख ठरत आहे असं मला वाटू लागलं. त्यात सुनिसुद्धा सामील झाली होती.
"सुने तू आणि ती श्वेता खड्ड्यात जा. मी बोलणार नाही तुमच्या दोघींशी." असं म्हणत मी रागावून सायकल घेऊन निघालो. सुनीच्या घरी आलो माझी बॅग उचलली.
"सुनी येतीये मागून." असं तिच्या आईला म्हणत तिच्या घरून माझ्या घरी आलो.
🍁🍁🍁🍁
दुसऱ्यादिवशी लवकर शाळेत जाऊन मी इकडे तिकडे करत राहिलो. मग मी प्रार्थना झाली तसा वर्गात येऊन बसलो. शिक्षकांकडे लक्ष देतच दिवस घालवला. सुनीने मधल्यासुटीत प्रयत्न केला माझ्याकडे यायचा पण मी उठून निघून गेलो. मला अजिबात कोणाशी बोलायचं नव्हतं. श्वेता त्याही दिवशी आली नव्हती. मी बोलत नाहीये असं बघून सचिन सुनिकडे सतत जात होता. मला नव्हता आज फरक पडत.
आतून एक धुनी पेटल्यासारखी झाली होती. कदाचित माझ्या भावनाना असं discuss करुन त्याच्यातलं मर्म हलक्यागत कचऱ्यासारखं माझ्यावरच उधळणं ही गोष्ट मला सहन होत नव्हती. ते पण सुनिकडून? आधी मी जे बोललो त्याचा चुकीचा अर्थ काढला आणि नंतर खरं कळलं तरी माझीच खिल्ली उडवल्या गेली. मला दोघींचा वैताग आला होता.
🍁🍁🍁🍁
शाळा सुटली. रामदास सोबत हलकं फुलकं बोलत मी माझी मनस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्याशी बोललं कि त्याचं साधं सरळ आणि सोज्वळ बोलणं मनाला आल्हाद द्यायचं.
मला वाटलं सुनी गेली असेल. पण ती सायकल स्टॅन्ड मध्यें उभी होती. तिने तिची बॅग माझ्या सायकलच्या कॅरिज वर ठेवली होती. तिच्यासोबत सचिन सुद्धा उभा होता. तीला सतत काहीतरी सांगत असायचा. मला बघितलं तसं तीचं त्याच्या वरचं लक्ष उडालं. मी पटपट चालत माझ्या सायकलजवळ गेलो. तिची बॅग उचलून माझ्याजवळ लावलेल्या तिच्या सायकलवर ठेवली आणि माझी सायकल काढू लागलो. तिने परत तिची बॅग माझ्या सायकलवर ठेवली.
मी ती उचलली आणि खाली टाकली.
"अरे ए तूला अक्कल आहे का?" असं म्हणत सचिन ने ती उचलली आणि सुनिकडे दिली.
मी सायकल काढली आणि निघालोच होतो. तितक्यात सुनीने सायकल पकडली.
"सुने सायकल सोड." मी म्हणालो.
"जाडू नाही. इतका का रागावलाय ते सांग? " ती म्हणाली.
"काय गरज आहे सुने? तूला काय फिकीर? रस्ता सोड माझा. " मी म्हणालो.
"त्याला नाही गरज तर, तू का पुढे पुढे करतीयेस नेत्रा? तुझी कदर नाहीये त्याला. बघतीयेस ना कसा वागतोय." सचिन म्हणाला.
"तू मध्यें बोलू नको. आज तर नकोच. " मी त्याला म्हणालो.
"मध्यें वैगरे नाही हा? नेत्राशी नीट वागतं जा जरा. तूला परत परत नाही बोलणार मी." तो म्हणाला.
हे तो मुद्दाम मला डिवचण्यासाठी करायचा. सुनिसमोर मी काहीतरी आक्रस्तळेपणा करावा आणि मी वाईट ठरावा. सुनीवर इंप्रेशन मारायची गरज त्याला होती. मला नाही. आजची परिस्थिती त्याला नीट कळली नव्हती बहुतेक. माझं डोकं भरलं होतं.
मी सायकलवरून उतरलो. त्याचा एका हाताने गळा धरला. मला मारण्यासाठी उचललेला एक हात मी पकडून त्याला मागे रेटत भिंतीवर नेऊन अदळला. माझ्या त्याला तसं धरण्याने जागचं हलता येत नव्हतं. त्याने माझा त्याच्या गळ्यावर पकड असलेला हात धरला होता. पण त्याचा उपयोग नव्हता मी सचिनच्या आवरण्यापलीकडे गेलो होतो.
"मला ना फिकीर नाहीये तू असण्या नसण्याची किंवा सुनी काय विचार करेल याची. उगाच तुझं नुकसान होईल. तेव्हा माझ्यापासून लांब राहायचं. काय??" त्याला धमकी देऊन थोडा जोर वाढवला. तो पाय झाडू लागला.
सुनी माझ्या त्या अवताराने जागेवर खिळली होती.
"सोड!! सोड..!" तो दबक्या आवाजात म्हणाला.
मी त्याला सोडला. तो धापा टाकत, खोकत तिथेच बसला. सुनी मागे सरली. मी सायकल घेऊन घरी गेलो. मी संस्कृतच्या ट्युशनला गेलो नाही. घरीच अभ्यास केला. मला सुनीला फेस नव्हतं करायचं. तासभर अभ्यासात गेल्यावर एक पेपर घेतला. त्यावर खरडायला घेतलं.
🍁🍁🍁🍁
एक बारीकशी भावना माझी,
तू खिल्ली उडवलीस.
अन एक नाजूकस गुपित,
त्याची तू दशा केलीस.
उगवतं कधी असं मनात
वेडं बागडं अन गोंधळलेलं.
तूला सारं ठाऊक असून ही
तू त्याची कत्तल केलीस.
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁