मुक्त
माझं खरडून झाल्यावर. मानसिक थकव्याने मला घेरलं. काही करू वाटेना. थकून झोप आली म्हणून झोपलो. दोन तासांनी जाग आली. संध्याकाळ संपत आली होती. आईने उठवलं कसं नाही मला? सुनिकडे जायला हवं.. सुनिकडे?? अचानक आठवलं. विसरलोच होतो. मी रागावलोय तिच्यावर. पण मनातला तिच्यावरच्या मायेचा कप्पा खूप मोठा असल्यामुळे जागं आली कि पहिला विचार त्यातूनच तिचाच येणार हे स्वाभाविक होतं. माहित नाही किती काळ राग धरू शकणार होतो तिच्यावर. पण आत्ता लगेच तरी माघार शक्य नव्हती.
ती येणं आता मला शक्य वाटत नव्हतं. दुपारच्या त्या प्रसंगाने तर नाहीच. पण काय सांगावं? सुनी आहे ती.. ती स्वतःला त्रास करुन घेईल या भीतीचा गोळापण पोटात मधूनच उमटत होता. तरीही यावेळी मी मन निष्ठुर केलं होतं.
माझा झोपायच्या आधी खरडलेला तो कागद फडफडत होता. मी हातात घेतला. क्षणभर बघितलं आणि चमकलो. तिसरं कडवं कुठून आलं. सुनीचं अक्षरं?? सुनी आली होती. मी झोपलो असताना. तिने त्याच्याच खाली तिसरं कडवं लिहिलं होतं.
"तुझ्या भावनेला नव्हतं टोचायचं
ना तुझ्या मनाला रडवायचं होतं.
अशी कशी चूक झाली रे माझी?
मी स्वतःला वेळीच आवरायचं होतं."
असं करते ही. मनात कितीही आलं रागवावं तरी.. पण नाही यावेळी मी ताणणार होतो. मी मनात आलेली तिच्याबद्दलची कणव झटकली.
🍁🍁🍁🍁
सकाळी उठत मी माझ्या रुटीनला लागलो. शूज घालून पळत टेकडीची वाट धरली. माझ्या नादात मी व्यायाम आटोपला. खाली आलोच होतो तेवढ्यात मला कोणीतरी हाक मारली.
"दयानंद शेळके" सुनीचे बाबा आणि माझे लाडके काका. त्यांना पाहिलं कि प्रसन्नता चटकन येऊन शिवायची. त्यांचं हसणं आणि डोळे सुनीने घेतले होते. ते माझ्याकडे आले.
"गुडमॉर्निंग काका!!" मी म्हणालो.
"गुडमॉर्निंग.. झाला व्यायाम? " त्यांनी विचारलं.
"हो.. निघालोच होतो. आज या वेळी? थोडं उशिराने येताना तुम्ही?" ते सात नंतर यायचे. मी सातच्या आत घरी पोहोचायचो.
"हो.. आज लवकर आलो. माझं उरकलय तसं. चल जाऊयात." ते म्हणाले.
जरा वेळ अवघडलेली शांतता आणि मग त्यांनीच सुरुवात केली.
"सुनी आली होती रडत माझ्याकडे काल रात्री. बोल म्हणता बोलवेना तीला. मग जरावेळाने सांगू लागली काय झालं ते. मला म्हणे बोला त्याच्याशी. आता आजवर मला कधीच अशी वेळ आली नाही तुम्हा पोरांच्या भांडणात बोलायची. पण मग तीला मी आधी कारण विचारलं. तर तिने सांगितलं कि काहीतरी अशी एक नाजूक गोष्ट होती तुझी, जी तीला कळली मग श्वेताने आणि तिने मिळून त्याची मस्करी केली. त्यावरून तू रागावलायस. " ते म्हणाले.
" हो.. काय करणार? मला रागच आला सुनी आणि श्वेताचा. प्रत्येक गोष्ट नाही ना मस्करीत घेता येत. एका लेव्हल पर्यंत ते ठीक असतं. मला यावेळी नाही जमलं आवरायला. केली मग आगपाखड. मला नाही आवडत अजिबात सुनीवर रागवायला. पण तिने यावेळी खूपच बालिशपणा केला. " मी म्हणालो.
"असं अजिबात समजू नको कि सुनी माझी मुलगी म्हणून मी तिचा पक्ष घेईन. तू तिच्यापेक्षा कमी नाहीस मला. पहिले तर तीला हे खरंच समजायला हवं कि या वयात येणाऱ्या मनातल्या बदलाना जशी ती सामोरी जातीये तसंच इतरही जात असतात. तेव्हा इतरांच्या भावनांना असं हलक्यात घेतल्यामुळे त्यांचं मन दुखावलं जाऊ शकतं. तू जे सध्या खेचून धरलंय त्यामुळे तीला ही गोष्ट नक्कीच समजून येईल कि तूला त्याचा त्रास झाला.
समोरचा सतत माफ करतं असेल तर त्या माफिची किंमत राहतं नाही. मग त्या माफ करणाऱ्या व्यक्तीला गृहीत धरायची सवय लागते. हे ही मी तीला बोललोय. तुझ्याकडून जर खरंच आगळीक घडली असेल तर तो रागावणारचं, तुमची मैत्री काही इतकी उथळ नाही कि, त्यात छोटा दगड पडला तर सगळा प्रवाह थांबेल. मी तीला समजावलं काल.
तीला सांगितलं मी कि, तो जर आता इथून पुढे कुठलाही मानसिक व्यवहार तुला सांगून करतं असेल तर त्याबाबतीत संवेदनशील रहा. मित्रांच्यात मस्करी करावीच पण त्यालाही मर्यादा निश्चित करुन घ्याव्या लागतात. तीला समजलंय असं म्हणाली ती. पण तू तिच्याशी कुठवर अबोला धरणार आहेस हे तुझ्यावर आहे. मी त्यात अजिबात मध्यस्ती करणार नाही. तू तुझा वेळ घे. मला एवढंच तूला सांगायचं होतं." काका म्हणाले.
" काका.. मी फार काळ सुनीवर रागवून नाही बसू शकतं. आम्हाला सवय आहे एकमेकांची. सुनीला त्रास होईल असं मी बिलकुल वागणार नाही. जे झालं ते रागाच्या भरात झालं. ती घाबरली असणार खरं. मी कायमचा अबोला धरेन असं वाटून. असं मी कधीच करू नाही शकत. काकू आणि तुमचा पण किती जीव आहे माझ्यावर. पण मला खरंच जरा वेळ हवाय. " मी म्हणालो.
"हवा तितका घे. तोवर सुनीला मी समजवतो. तू नको काळजी करु. तूला मी लहानपणापासून ओळखतोय. तुझ्याकडून सुनीला त्रास होणं शक्य नाही माहिते मला. म्हणून मी निर्धास्त आहे. काय? " काका म्हणाले.
🍁🍁🍁🍁
वर्गात बसताना सुनी आणि श्वेता त्यांच्या बेंचवर बसलेल्या दिसल्या. मला बघून त्यांनी माना खाली घातल्या. दोघींचे चेहरे पडले होते. एक बरं होतं त्या दोघी तरी होत्या एकमेकींना. पण मी एकटाच होतो.
मी बेंच वर येऊन बसलो समोर पाहतो तर.
फळ्यावर दोन फूट बाय सहा फूट, उंची आणि लांबी मध्यें ठळक अक्षरांत " sorry " लिहिलं होतं.
मी दोघींकडे बघितलं. त्यांनी मला बघून परत पुढे बघायला सुरुवात केली.
"कोण कोणास म्हणाले?? असो!! जे कोंणी म्हणाले आणि ज्याला कोणाला म्हणाले अशा दोघांची परवानगी होकारार्थी घेत मी हे पुसतो." असं म्हणत सरांनी ते पुसले.
मी शांतपणे लक्ष देऊ लागलो. त्या दोघीपण त्यांच्या त्यांच्या बीजी राहिल्या. मधल्यासुटीत मी पारावर गेलो. त्या दोघीपण आल्या माझ्या भोवती बसल्या एकदम शांतपणे जेवण केलं आणि निघून गेल्या. शाळा सुटली तेव्हापण तेच. माझ्या आजूबाजूला सायकल चालवत राहिल्या. घर आलं तशी सुनी गेली. माझं आलं तशी श्वेता गेली. मी नाहीच बोललो. बोलल्या तर त्यापण नाहीत.
दुसरा दिवस पण तसाच. फळ्यावर सॉरी लिहिलेलं. दिवसभर काहीही न बोलता फक्त माझ्यासोबत असायच्या. मी जिकडे जाईल तिकडे येत राहायच्या. बोलत काहीही नव्हत्या. बोल पण म्हणत नव्हत्या. मी असताना एकमेकींमध्ये पण काहीच विषय काढत नव्हत्या. मी पण त्यांना काहीही म्हणत नव्हतो.
सगळा आठवडा असाच गेला.
हे खूप त्रासदायक झालं माझ्यासाठी. त्यापेक्षा रोज भांडलेलं परवडलं अशी अवस्था होती. दोघीनी निराळ्या प्रकारच आंदोलन सुरु केलं होतं हे. सुनी आणि श्वेता माझ्याकडे असं बघत रहायच्या कि जसं काय चार दिवस मीच त्यांना उपाशी ठेवलंय? आठवडा असाच गेला. रविवारी मी जरा निवांत उठलो.
डोळे चोळत बाहेर आलो तर आमच्या घरातल्या झोपाळ्यावर या दोन माकडीनी बसल्या होत्या. आईने दिलेले काजू खात.
" च!!" मी परत रूम मध्यें गेलो. माझं आवरून बाहेर आलो. जॉगिंग करतं टेकडीकडे निघालो. मागणं दोन्ही माकडीनी लगबगीने येत होत्या. रविवारी टेकडीवर गर्दी असत म्हणून मी फक्त तिथली सकाळ अनुभवायला जातं असे. मी लिंबाच्या खालच्या कट्ट्यावर जाऊन बसलो. दोघी आल्या. वर ढकलत आणलेल्या सायकली लावून माझ्या बाजूला येऊन बसल्या.
"बास कि रे आता जाडू!" सुनी म्हणाली. तीच बोलणार होती म्हणा.
"खरंच यार, बसं झालं ना आता. " श्वेता म्हणाली.
"कंटाळा आलाय असं राहायचा. समोर असूनपण नाही बोलायचं. " सुनी म्हणाली.
"मग काय? एकत्र असूनपण नाही राहायचं. " श्वेता म्हणाली.
मी दोघींकडे पाहिलं. सुनी डोळ्याने पाणावली होती. श्वेता रडवेल्या चेहऱ्याने बघत होती.
"आपला मित्र कसा आहे. तो आजवर कसा वागतं आलाय. कुठल्या गोष्टी त्याला पटतात आणि पटत नाहीत हे सगळं माहित असून पण एखाद्या खवचट व्यक्तीसारखं बोलून त्याच सख्ख्या मित्राची अशी लांच्छनास्पद थट्टा करायची." मी सुनिकडे बघत म्हणालो.
"एखाद्याने मनातला कोणालाही न सांगितलेला वेगळा असा भाव समोरच्या व्यक्तीला आपलं म्हणून सांगावं आणि अनुभवायला द्यावा तर त्याचं व्यक्तीने त्या गोष्टीची दुसऱ्यासोबत मिळून खिल्ली उडवावी." मी श्वेताकडे बघत म्हणालो.
" हे सुद्धा बसं झालं ना? मी रागवण्यासाठी? कि हे कारण पुरेसं नाहीये आणि मीच overreact करतोय? सुनी? श्वेता? यावर काही बोलणार आहात का?" मी विचारलं.
"कळली आम्हाला आमची चूक. इथून पुढं नाही होणार असं. मला नव्हतं वाटत तू इतका रागावशील. मला माहित आहे तू कसा आहेस. मी असं हलकं काहीही समजून चुकीचा अर्थ नव्हता काढायला हवा. माफ कर यार जाडू. मी इतक्यावेळा सचिन सोबत असते. त्याच्या घरीही गेले आहे.सगळंच तूला माहित नाहीये आमच्यात काय घडतं. पण तरीही तुझ्याकडून माझ्याबद्दल असं बोलताना मी कधीच ऐकलं नाही. तू निर्मळ असतोस आणि मलाही तीच बुद्धी दिलीयेस आता. मला खरंच खूप वाईट वाटतंय. मी श्वेताची पण माफी मागितली. तीला सुद्धा यात खेचलंच ना मी. पश्चाताप थंड होतं नाहीये जाडू माझा. मी काय करू?" सुनी रडवेली होत म्हणाली.
" तू विश्वासाने मला जवळ करुन आपलं एक छोटं सिक्रेट सांगितलंस आणि आपल्यात घडलेली ती अनपेक्षित गोष्ट पण मी तीला सांगितली. त्यातली खोली विचारात न घेता मी त्याची थट्टा केली त्याबद्दल मला पण खूप वाईट वाटतंय. असं नव्हतं करायला हवं मी पण. तू खूप sensetive आहेस ही गोष्ट मी मनात जपेन. सगळं असं हलक्यात घेणं चूकच आहे. आम्हा दोघीना शिक्षा दिलीस ते बरोबरच केलंस तू. But I promise असं माझ्याकडून कधीही घडू देणार नाही परत." श्वेता म्हणाली.
"ठीके. येऊ मग मी?" असं म्हणत मी उठलो.
" जाडू??!! " सुनीने माझा हात धरला.
मी वळत तिचा कान धरला.
" टवळे.. तुलाच शिक्षा द्यायला हवी होती. हिला पण मध्यें खेचलीस... तु दहा उठा बशा काढ कान पकडून. तरच माफ करेन " मी म्हणालो.
" दोघीत दहा चालतील ना? " सुनी डोळे पुसत हसली आणि म्हणाली.
" तिचा काय संबंध?? यात पण तुझं तिरपागडं डोकं लावं.. तू एकटीने दहा म्हणजे दहा!! आणि ते पण आमच्याकडे पाठ करुन" मी म्हणालो.
दोघी उठल्या आणि सुनीने कान धरले.ती वळली. उठाबशा काढू लागली. मी श्वेताला खुणावलं. आम्ही हळुवार पावलांनी लांब गेलो. येणारे जाणारे सुनिकडे बघत हसत होते. आम्हीही लांबून तिच्या त्या वेडगळ प्रकाराकडे बघत हसत होतो. तिच्या दहा उठाबशा झाल्या मागे वळून बघतीये तर आम्ही गायब. दूर नजर टाकल्यावर मी तिचा पोपट केल्याचे तिच्या लक्षात आले. ती वेड्यासारखी दगड घेऊन मागे धावत होती माझ्या. शेवटी मला पकडून तिने चिमटे काढले. स्वतःही खुपवेळ हसत बसली.
"श्वेता!! मी हा केक आणलाय इमॅजिन कर हं!" मी दोन्ही तळवे उभे धरून हातात केकचा box धरल्याचा अभिनय करतं उभा होतो.
"डोळे मिटून तूला कापायचाय. वीस पिसेस करायचे. पण तुझी सूरी माझ्या हाताला टच झाली तर तुला माफी नाही." ही ट्रिक सुनीला माहित होती तीला कळलं काय ते.
"Ok!!" ती म्हणाली.
तिने डोळे गच्च मिटून मोजत तुकडे करायला घेतले. वीस झाल्यावर म्हणाली. "झाले. No touch."
पण ते बघायला आम्ही होतो कुठे. श्वेता डोळे मिटून वेड्यासारखी सूरी हलवत टेकडीवर उभी होती. तिने डोळे उघडले. आम्ही गायब. सुनी आणि मी दगडमागे लपलो होतो जाम हसायला येत होतं..
" ए स्टुपिड्स.. यड्यानो.. शी ss यार!!" श्वेता ओरडू लागली. आम्ही तिच्याकडे बघुन हसत ओरडत धावत आलो. शेवटी तिघांनी एकमेकांना कव देत मागच्या संपूर्ण प्रकरणावर पडदा घातला. पूर्वीसारखे हसत खेळत आम्ही घरी निघालो.
🍁🍁🍁🍁
माफी तूला देऊ कि स्वतःला?
विसरून जाऊ तूला कि स्वतःला?
तुझ्याशिवाय श्वासही निषीद्ध आहे
विचार कि तुझ्यातल्या माझ्या मनाला. 🍁🍁
- क्रमशः
शब्दभ्रमर 🍁🍁