तोतया वारसदार - भाग 37 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 37

तोतया वारसदार

पात्र रचना

अक्षय साने            महादेवराव – सखारामपंत – रेवती --- अक्षय

वैशाली साने           अक्षय ची बायको.

शलाका साने           अक्षय ची मुलगी.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

सुधा                        - विश्रामची बायको.

दिनेश आणि प्रांजल            -विश्रामची मुलं.

मालती                      - अनिलची बायको.

विनय                       - अनिलचा मुलगा

                   

 

भाग  ३७                  

भाग ३६  वरून पुढे  वाचा....

 

“अग तुझ्याशी बोलल्या शिवाय, मला तरी चैन पडणार आहे का? तू केंव्हा फ्री असशील ते मला कळणार नाही, तेंव्हा तूच मला मिस् कॉल देत जा. मग मी कॉल बॅक करीन. चालेल ना?” – निशांत.

“ओके मी देईन  मिस् कॉल, पण मी कुठे कॉल करू? तुझ्या जवळ तर फोन नाहीये. सारंग सरांच्या ऑफिस मधे करू का?” – वर्षा

“नाही कालच सारंग सरांनी सांगीतलं की, “त्यांनी माझ्या साठी तत्काल फोन साठी अर्ज दिला होता, कालच तो फोन माझ्या घरी लागला आहे  म्हणून.” मग निशांत ने एका कागदावर लिहिलेला फोन नंबर वर्षाला दाखवला, आणि वर्षाने तो टिपून घेतला. “पण आज तर आम्ही साताऱ्याला चाललो आहोत. नागपूरला पोचल्यावर मी तुला कॉल करतो. मग पुढचे काय प्लॅन्स असतील ते सांगतो. ओके?” – निशांत.

“ओके”  वर्षा म्हणाली. 

“दुसऱ्या दिवशी, सकाळी ७ वाजता रोहन आणि निशांत निघाले. साताऱ्याला  पोचता

पोचता  दुपारचे साडे तीन वाजले. एक दिनेश आणि विनय सोडता सगळेच घरी होते.

“या तुमचीच वाट बघत होतो.” – विश्राम

रोहन आणि निशांत आत मधे आले, विश्राम, अनिल, सोफ्यावर बसले होते. शेजारच्या खुर्चीवर एक पन्नाशी ओलांडलेला एक गोरा पान हॅंडसम माणूस बसला होता, बहुधा साने असावेत, असा निशांतने अंदाज बांधला. शेजारी तितकीच देखणी ४०-४५ वर्षांची महिला होती ती त्यांची बायको असावी पण त्यांच्याही पलीकडे एक देखणी आणि आईवर गेलेली एक विस बावीस वर्षांची तरुणी होती ती सान्यांची मुलगी असावी. निशांत आपला अंदाज हलक्या स्वरात रोहनच्या कानाशी लागून बोलत होता, पण रोहनचं त्यांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं तो मंत्रमुग्ध होऊन त्या मुली कडे एक टक भारावल्या सारखा बघत होता. निशांतच्या ते लक्षात आलं त्याने एक कोपरखळी मारून रोहनला भानावर आणलं.

प्रांजल पाणी  घेऊन आली, म्हणाली “चहा घेऊन येते. तुम्हाला फ्रेश व्हायचं असेल तर आटोपून घ्या.”

दोघं फ्रेश होऊन हॉल मधे आले तेंव्हा चहा आणि बिस्किटं समोर होती.

“चला, आता मी ओळख करून देतो. विश्राम म्हणाला. “ हे साने साहेब, अक्षयराव, ह्या त्यांच्या सुविद्य पत्नी, वैशाली ताई, आणि ही त्यांची मुलगी, शलाका.” विश्राम थोडा थांबला आणि मग पुढे म्हणाला “हा रोहन सौमित्राचा मुलगा, हा लंडनला असतो. हा निशांत. हा शोधकर्ता आहे. सारंग वकिलांनी दिलेलं हे काम हा अत्यंत कुशलतेने करतो आहे. त्याचाच परिपाक म्हणजे आपण आज इथे जमलो आहोत. कालपर्यंत लक्ष्मण सुद्धा इथेच होता. कालच ते लोकं वापस गोकर्णला गेलेत. रोहनला पण शोधकार्यात खूपच इंट्रेस्ट निर्माण झाला, म्हणून तो पण निशांत बरोबर सध्या काम करतो आहे.” – विश्राम  

“विश्राम, हे अक्षय साहेब वगैरे म्हणणं आता सोडून दे. त्यांची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. दुसरं म्हणजे मी वंशावळी आणि इतिहास वाचला, पण मला नीटसा बोध झाला नाही. जर पुन्हा तपशीलवार सांगीतलं तर बरं होईल. सगळ्या आयडिया स्पष्ट झाल्या तर चर्चा करायला आणि गप्पा मारायला सोपं होईल. काय म्हणतोस?” – अक्षय.

“एकदम बरोबर. त्याच साठी मी  निशांत आणि रोहनला बोलावून घेतलं. ते पण गोकर्णला गेले होते. जाता जाता, ते कारवारला पण गेले आणि तिथल्या वसंतराव परांजप्यांना पण भेटून आले. आता हेच दोघं तुम्हाला सविस्तर माहिती सांगतील. निशांत, आता घे सूत्र तुझ्या हातात” विश्राम म्हणाला. आता साने निशांत कडे पाहू लागले. निशांत जरा सावरून बसला. त्याने वंशावळी आणि त्याचं नोटिंग असलेली वही बाहेर काढली आणि त्याने सांगायला सुरवात केली.

“काका, तुम्ही वंशावळी वाचलीच आहे, त्यामुळे मी इतिहासाचे धागे दोरे नीट सुटे करून सांगतो, तुम्ही जर वंशावळी समोर ठेवली, तर संदर्भ घेतांना ते सोपं पडेल. ओके असेल, तर सुरू करतो” – निशांत.

“ओके.” – अक्षय.

मग निशांतने सर्व हकीकत अगदी सुरवातीपासून सर्व घटनाक्रम जसाच्या तसा सांगितला. मधून मधून अक्षय प्रश्न करत होता, त्याला पण योग्य असं उत्तर निशांत देत होता. सर्व सांगून झाल्यावर अक्षयचं समाधान झालं असं निशांतला वाटलं आणि तो थांबला. आता घड्याळात नऊ वाजले होते. विश्रामची बायको, सुद्धा आता उठली, म्हणाली, “मला असं वाटतं की नऊ वाजून गेले आहेत, तेंव्हा आपण जेवून घ्यावं. बाकीच्या गोष्टी नंतर बोलता येतील.

जेवणानंतर पुन्हा बैठक भरली.

“हूं, अक्षय, वहिनी आणि शलाका, जेवण्याच्या अगोदर निशांतने अगदी आत्ता पर्यन्त, ज्या ज्या घडामोडी झाल्यात, त्या अगदी मुद्देसूद वर्णन केल्या. आता तुमच्या ज्या काही शंका असतील, त्या अगदी नि:संकोच विचारा.” – विश्रामने सुरवात केली.

“निशांत, वारसदारांना शोधा, असं विनायकरावांनी लिहून ठेवलं आहे, बरोबर?” – अक्षय

“बरोबर आणि त्या प्रमाणेच सर्व शोधा शोध सुरू झाली आहे.” – निशांत.

“हे जेंव्हा विनायकरावांनी लिहून ठेवलं, तेंव्हा कोणीच वारसदार त्यांच्या समोर नव्हता, पण आता जर व्यंकटेश आणि सौमित्रशी संपर्क स्थापित झालाच आहे, तर इतरांना शोधायची काय जरूर आहे?” – अक्षय.

“तुमचं म्हणण बरोबर आहे, पण इच्छापत्रात, महादेव रावांच्या वंशातले सर्व वारसदार शोधा असंच लिहिलं आहे, व्यंकटेश आणि सौमित्राचा पत्ता लागला तर बाकीच्या लोकांना शोधायची जरूर नाही, असं लिहिलं नाहीये, त्यामुळे यच्चयावत सर्वांना शोधायचा कसून प्रयत्न करणंच  अपेक्षित आहे.

“हे जरा विचित्रच आहे.” – अक्षय.

“समस्त गोखले मंडळींशी संपर्क स्थापित झाला आहे, आणि त्या सर्वांनी इतक्या मोठ्या प्रॉपर्टी वरचा हक्क सोडण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. आता याच्या पेक्षा अजून काही विचित्र असू शकतं का? हवं तर विचारा तुम्हीच, या रोहनला आणि विश्राम काकांना.” – निशांत.

“काय रोहन, निशांत म्हणतोय ते खरं आहे का?” – अक्षय.

“हो काका. आम्हाला कोणालाच या प्रॉपर्टी मधे इंट्रेस्ट नाहीये. आता इथे लक्ष्मण नाहीये, पण त्याला सुद्धा, या प्रॉपर्टी मधे अजिबात स्वारस्य नाहीये, आणि ते त्याने स्पष्ट सांगीतलं आहे. इतकंच काय, कारवारचे वसंतराव परांजपे, त्यांनी सुद्धा अनिच्छा दाखवली आहे.” – रोहन

“कमाल आहे, एवढी ९-१० कोटींची मालमत्ता, कोणालाच नको आहे. विचित्र तर आहेच, आणि आश्चर्याची गोष्ट पण आहे.” – अक्षय.

“मग आता, अक्षय काय म्हणतोस? तुला क्लेम करायचा आहे का? म्हणजे निशांत तसं सारंग सरांना कळवून टाकेल. ते पण खुश होतील. निदान कोणी तरी मिळाला म्हणून.” – विश्राम.

“विश्राम अरे, काय बोलतो आहेस तू. छे छे मी काय करू या संपत्तीचं? माझ्या जवळ इतकं आहे की मीच बऱ्याच गरजू मुलांना शिकवतो आहे. मला नको आहे ही संपत्ती. मी काय म्हणतो, जर कोणी समोर आलाच नाही, तर एवी तेवी याचा ट्रस्ट बनलाच आहे, तो तसाच ठेऊन गरजू लोकांना मदत करू. हवं तर आपण सगळे त्यात भर पण घालू. कशी वाटते आहे माझी आयडिया?” – अक्षय.

“अशा रीतीने विचित्र गोखल्यांच्या टीम मधे साने  आणि परांजपे यांची भर पडली आहे. सगळ्यांनी एकमताने संपत्तीचा डाव उधळून लावला आहे. आता वारसदारांचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.” – विश्राम

“अजून कोणीच नाहीये का? निशांत तू म्हणत होतास की त्र्यंबक आणि गोविंद परांजपे यांच्याशी अजून संपर्क व्हायचा आहे म्हणून. म्हणजे आशेला जागा आहे.”- अक्षय

“हो तो एक विषय अजून बाकी आहे. पण त्र्यंबककाकांच्या बाबतीत आशेला काही जागा आहे असं वाटत नाही. गोविंद राव काय  म्हणतात ते बघावं लागेल.” – निशांत.

“असं का म्हणतो आहेस? त्र्यंबक काकांचा काय प्रॉब्लेम आहे?” – अक्षय.

“त्र्यंबक काकांचा मुलगा तरुणपणी अपघातात गेला. तेंव्हापासून ते विरक्त झाले आहेत. सध्या ते वाराणसीला एका आश्रमात आहेत. तिथे त्या दोघांनी आश्रमाला वाहून घेतलं आहे. त्यांना या संपत्तीचा मोह पडेल असं वाटत नाही.” – निशांत.

“मग आता पुढचं पाऊल काय?” – अक्षय.

“आता आधी नागपूरला जाणार, सारंग सरांना सर्व अपडेट देणार, मग ते जर म्हणाले, तर वाराणसी आणि नाशिक करणार. अजून एक शेवटचा मुद्दा आहे, त्याला हात लागला नाहीये.” – निशांत.

“शेवटचा मुद्दा कोणचा?” – अक्षय.

“महादेवरावांचा चौथा मुलगा आणि सखारामपंत आणि विश्वनाथराव यांचा भाऊ, दिनकर. पेशव्यांना इंग्रजांनी  ब्रह्मावर्ताला नेलं. त्यानंतर अनेक वर्ष मराठी लोकांचा कानपूरला ओघ सुरू होता. दिनकर बराच नंतर म्हणजे साधारण १८४० – ४५ च्या सुमारास कानपूरला पोचला. वंशावळी च्या इतिहासात, त्याचा एवढाच उल्लेख आहे. १८५७ चं स्वातंत्र्य युद्ध झालं, त्यात तो होता, म्हणजे असा अंदाज आहे, पण त्या नंतर त्याचा ठाव ठिकाणं काही कळला नाही. ती शाखा पण तपासून बघावी लागणार आहे. हे सगळ्यात कठीण काम आहे. महाराष्ट्रात शोध करणं हे तुलनेने सोपं होतं, पण पर राज्यात जाऊन शोध घ्यायचा म्हणजे जरा कठीण होणार आहे.” – निशांत.

“म्हणजे आता प्रथम वाराणसी मग नाशिक आणि मग कानपूर असा प्रवास होणार आहे तर. या तुमच्या शोधकार्यात तुम्हाला यश मिळो  अशी शुभेच्छा.” – अक्षय

“बरं पण एक राहिलं. अक्षय, मी तुला बोललो होतो, आम्ही एक गेट टुगेदर करणार आहोत, नागपूरला. त्यासाठी त्या वाड्याचं दुरुस्ती काम हाता घेणार आहोत, तुम्ही पण यायचं आहे.” – विश्राम.

“नक्की. तू निश्चिंत रहा.” – अक्षय.

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com