अविवाहित आई - 4 manasvi Manu द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अविवाहित आई - 4

भाग ४

खोलीतील एकटेपणा अनघाला आता टोचू लागला होता. काहीवेळ ओक्साबोक्सा रडल्यावर, तिने डोळ्यांत साचलेले अश्रू पुसले आणि ती ताडकन उठून बाथरूममध्ये गेली. आरशात स्वतःच्या प्रतिबिंबेकडे पाहताना तिला स्वतःचीच ओळख पटत नव्हती. चेहऱ्यावरचा मेकअप विस्कटला होता, डोळे सुजले होते. तिने गार पाण्याचे हबके तोंडावर मारले. आरशातल्या त्या थकलेल्या प्रतिमेकडे बघून ती पुटपुटली,


"असं नाही होऊ शकत .....हे ...हे कसं होऊ शकत... नाही ... नाही हे ...हे खरं नाहिये ... "

तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं. तिने आपला फोन शोधला आणि कातर झालेल्या स्वरात अमोलचा नंबर डायल केला. फोनची रिंग वाजत होती, पण पलीकडून कोणीही उचलत नव्हतं. 'ट्रिंग... ट्रिंग...' असा तो आवाज अनघाच्या काळजाचा ठोका चुकवत होता. तिने पुन्हा एकदा प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा तिला हताशच व्हावं लागलं. चिडून, निराशेच्या भरात तिने तो फोन बेडवर भिरकावून दिला आणि स्वतःच्या हाताने आपलं डोकं धरून ती सोफ्यावर कोसळली. मेंदूमध्ये विचारांचे काहूर माजले होते.

तिचा श्वास जड झाला होता. मनात आठवणींचे काहूर माजले होते—अमोलसोबत घालवलेले ते निवांत क्षण, माऊंट अबूची ती सहल, आणि भविष्याबद्दलची ती स्वप्ने! त्या स्वप्नांचा आता चक्काचूर झाला होता. ती पुन्हा एकदा आरशासमोर उभी राहिली. बाहेर येऊन तिने हलका मेकअप केला, विस्कटलेले केस सावरले आणि एक खोल श्वास घेत स्वतःशीच निर्धार केला...

"काही झालं तरी मला ही जबाबदारी घ्यावीच लागेल."
हे शब्द उच्चारताना तिच्या स्वरात एक प्रकारचा खंबीरपणा होता, पण डोळ्यांतली भीती अजूनही कायम होती. ती खोलीबाहेर येऊन खाली गेली. तिचा मलूल झालेला चेहरा आणि डोळ्यांतली अस्वस्थता पाहून मीना ताईंना काहीतरी गंभीर घडल्याची चाहूल लागली. त्या अनघाच्या जवळ गेल्या आणि काळजीने विचारू लागल्या...

"अनघा ...बेटा काय होतंय तुला . तू आजपर्यंत माझ्या पासून काहीही लपवलं नाही , मग आज का एकटीच त्रास सहन करतेय . आज पर्यंत आपण मैत्रीणी सारख्या राहिलो ना , मग आज का लपवते ...सांग ना बाळा काय झालं तुला ." मीना ताईंनी मायेने अनघाच्या डोक्यावरून हात फिरवला.

"थांब ना ... एकदा अजून एक फोन लाऊ दे मग सांगते . "

अनघाने पुन्हा एकदा अमोलचा नंबर लावला, पण नशिबाने जणू काही तिच्यावर रोष धरला होता. पुन्हा फक्त रिंग गेली. अनघाचा चेहरा पूर्णपणे रडवेला झाला. तिने मीना ताईंचा हात पकडला आणि जे काही घडलं होतं, ते सर्व मोकळेपणाने सांगून टाकलं. तिच्या तोंडून ते सत्य ऐकल्यावर मीना ताईंच्या पायाखालची जमीन सरकली. त्या मटकन खाली बसल्या.

"अनघा....अगं हे काय सांगतेय तू ...काही काय बोलतेय ...?? " मीना ताईंच्या डोळ्यात पाणी आलं.‌

"हो आत्या !!! जे आहे ते असंच आहे . अगं मला पण खूप मोठा धक्का बसला जेव्हा मला हे कळलं . पण आत्या आता खूप उशीर झाला आहे . आता माझ्याकडे काही पर्याय नाही गं . " अनघा पण सोफ्यावर थकल्यासारखी बसली. तिचे डोळे सुजले होते आणि तिचे हात थरथरत होते.

"असं कसं ...आपण या वर काही उपाय शोधून काढूच ना. नको काळजी करुस मी ...मी आहे तुझ्यासोबत . होईल सगळं नीट . " मीना ताईंना स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, त्या घाबरून बोलल्या.

"नाही आत्या आता काहीच होऊ शकत नाही . मी ... मी बोलले डॉक्टरांशी . ती माझी मैत्रीण आहे ना प्रांजल तिची मोठी बहीण गायनिक आहे . मी तिला भेटले .पण तिने पण. हेच सांगितले की .... आता वेळ निघून गेली आहे . काहीच करता येणार नाही." अनघाने ओंजळीत चेहरा लपवला आणि हुंदके देऊ लागली. त्या हुंदक्यांच्या आवाजात तिचं सर्वस्व हरवल्याचं दुःख होतं.

"मग आता गं....?? आता काय करणार आहोत आपण " . मीना ताईंनी अनघाचा हात हातात घेतला.

"आत्या !! आता खचून नाही चालणार . आपल्याला ही जबाबदारी घ्यावीच लागेल . आपल्या कडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये ." अनघाने उठून मीना ताईंना मिठी मारली.

मिठीत असतांनाच मीना ताईंनी अनघाच्या पाठीवरून हात फिरवत विचारलं, "अनघा !! तू अमोल.... अमोल शी बोललीस का ...???"

"नाही ना गं !! मी कधी पासून प्रयत्न करतेय पण तो फोनच घेत नाहिये माझा ." अनघा पुन्हा एकदा रडू लागली.

"तू ... तू शांत हो बरं आधी ... मला माहित आहे प्रसंग खूप मोठा आणि धक्कादायक आहे . पण .. पण बाळा यात तू एकटी नाहीस मी आहे तुझ्यासोबत ... नको काळजी करुस .. आपण ....आपण बसून बोलुयात ना . सगळं ठीक होईल ." मीना ताई तिला धीर देत होत्या.

काही दिवस उलटले. अनघाची तब्येत हळूहळू खालावत गेली. तिचे जेवण कमी झाले होते आणि तिचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता. घरातल्या कुणालाच काही कळेना, पण हवेत एक अस्वस्थता पसरली होती. त्या दिवशी रविवार असल्याने अजित राव आणि अर्चना घरीच होते. सकाळच्या वेळी सगळे नाश्ता करायला बसले असताना, अनघाचा विषण्ण चेहरा पाहून अर्चनाने प्रश्न विचारला...

"अनघा !! अगं काय झालंय तुला . आजारी का वाटतेय बेटा , काही होतं, काही होतंय का ... ?? "

"नाही आई !! सगळं ठीक आहे , मला काहीच झालं नाही . ते कामाचा लोड जास्त आहे ना म्हणून... " अनघाने खाली मान घालून उत्तर दिलं. तिचं हे बोलणं ऐकून अजित राव संतापले. त्यांना अनघाचं वागणं, तिची ही शांतता अस्वस्थ करू लागली होती.

"तसं असेल तर सोडून ते नोकरी , आणि आपला बिझनेस जॉईन कर... " अजित राव नेहमीच्या अधिकारात बोलले.

अनघाने काहीच उत्तर दिलं नाही. तिला एकदम मळमळून आलं. तिचे पोट कालवले आणि ती धावत वॉश बेसिनकडे गेली. तिला जोरात उलट्या होऊ लागल्या. हे दृश्य पाहून अजित राव आणि अर्चना ताईंना धक्काच बसला.

"काय गं ... काय होतंय . खाण्यात काही वेड वाकडं आलं का... उलट्या का होतायत....??? " अर्चना ताईंनी काळजीत विचारले .
"नाही तसं काही नाही वहिनी . तिला जरा बरं नाही . मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जाते ." मीना ताईंनी सावरत म्हटलं.

"हो ...दाखवा डॉक्टर ला मला लक्षण काही बरं वाटतं नाहिये . बघा काय ते ." अजित राव टेबलावरून उठून निघून गेले.
अर्चनाने एकदा अजित रावांकडे बघितलं आणि मग अनघा आणि मीनाताईंकडे बघितलं. त्यांना काहीच समजत नव्हतं. त्यांनी मीना ताईंना हळूच विचारलं,

"हा सगळा काय प्रकार आहे मीना ताई ... नक्की काय झालं आहे हिला .. ?? "

मीना ताईंना काहीच कळेना. त्या खाली मान घालून उभ्या होत्या. अनघा वॉश बेसिनजवळच उभी होती. तिची प्रकृती इतकी खालावली होती की तिला उभे राहणेही कठीण जात होते. तिचे डोके फिरत होते आणि समोरची सर्व सृष्टी तिला धूसर वाटत होती. तेवढ्यात वरच्या खोलीत गेलेले अजित राव रागाने धाडकन खाली आले आणि त्यांनी मोठ्याने हाक मारली....

"अनघाssssss"

त्यांच्या आवाजातला तो कडाडणारा रोख पाहून तिथे उपस्थित सर्वांची घाबरगुंडी उडाली. त्या आवाजातील तिखटपणा अजित रावांच्या रागापेक्षा अधिक त्यांच्या मनातील संशयाची जाणीव करून देत होता. अनघाला वाटले की आता सर्व काही संपले आहे. तिने थरथरत्या हातांनी भिंतीचा आधार घेतला. आता सत्य समोर येण्याची वेळ आली होती, ज्या सत्याने तिचं संपूर्ण आयुष्य कायमचं बदलणार होतं.
क्रमशः