भाग सहा
मीना ताई आणि अनघा फार्महाऊसवर येऊन पोहोचल्या . ती चांगली प्रशस्त जागा होती . सगळ्या सुख सोयी तिथे होत्या . अनघा आणि मीना ताईंनी तिथे रहायला सुरुवात केली . सुरवातीला अनघा ऑफिस ला जायची पण मग हळूहळू तिने ऑफिस ला जाणं बंद केलं .
दिवस सरत होते . इथे अजित रावांनी आणि अर्चना ताईंनी त्यांच्या ओळखी च्या लोकांना , त्यांच्या सर्कल मधे हेच सांगितले की , अनघा ला त्यांनी काही दिवसांसाठी परदेशी पाठवले आहे तिथे त्यांच्या मित्राची कंपनी आहे तिथे अनघा शिकायला गेली आहे . काही दिवसांनी ती परत येईल आणि मग अजित रावांचा बिझनेस सांभाळेल .
दिवस जात होते आणि येत होते . दिवसाचे आठवडे झाले आठवड्यांचे महिने झाले आणि बघता बघता नऊ महिने सुद्धा पूर्ण झाले . पण या नऊ महिन्यांमध्ये अजित राव किंवा अर्चना ताई एकदा ही अनघा ला बघायला आले नाही की त्यांनी फोन करून विचारपूस केली नाही .
" अजित !! मी काय म्हणते नऊ महिने तर पूर्ण झाले अनघा ची डिलिव्हरी झाली असेल ना आता . त्या बाळाचं काय करायचं ते बघावं लागेल . अनघा ला लवकरात लवकर सोडवून परत आणावं लागेल . आपण अजून किती दिवस असं खोटं बोलणार आहोत . आता लोकं विचारपूस करायला लागलेत. "
अर्चना ताईंनी त्यांच्या किटी पार्टी वरून परत आल्यावर अजित रावांना विचारलं .
" Hmm !! मी पण तोच विचार करतोय . बरं ठीके . तू एक काम कर आधी मीना ताईंना फोन करून माहिती घे की डिलिव्हरी झाली का जर झाली असेल तर आपण उद्या किंवा परवा जाऊन तिला घेऊन येऊ . आणि पुढच सगळं मी बघतो . " अजित राव इतकं बोलून निघून गेले .
अर्चना ताईंनी मीना ताईंना फोन लावला ...
" Hello !! "
" Hello " पलिकडून आवाज आला .
" सदानंद बोलतोय का ... ??? " अर्चना ताईंनी पुरुषी आवाज ऐकून विचारलं .
" हो वहिनी साहेब मी सदानंद बोलतोय . " सदानंद ने सांगितले
" अरे पण मीना ताई कुठं आहेत मग आणि तू त्यांचा फोन का घेतलास " अर्चना ताईंनी विचारले .
" वहिनी साहेब !! ताई आणि अनघा ताई घाईघाईने दवाखान्यात निघून गेल्या आणि फोन घरीच विसरून गेल्या . तो वाजत होता म्हणून मी उचलला . " सदानंद ने सांगितलं .
" बरं !! कुठल्या दवाखान्यात गेल्या त्या . पत्ता दे . " अर्चना ताईंनी विचारले .
" ते मला माहित नाही ताई साहेब . माझं तसं काहीच बोलणं होऊ शकलं नाही . " सदानंद बोलला .
" कायssss अरे हा काय मूर्खपणा आहे . त्या कुठल्या दवाखान्यात गेल्या ते तुला माहीत कसं नाही . " अर्चना सदानंद वर पुन्हा ओरडली .
" आता वहिनी साहेब ... मला कळलंच नाही त्या एकदम निघून गेल्या तर ... " सदानंद बोलला .
अर्चना ताईंनी रागात फोन ठेऊन दिला आणि अजित रावांना सांगायला निघून गेल्या .
अजित रावांनी त्यांच्या लोकांना कामाला लावलं तरी त्यांना कळलं नाही की अनघा कुठल्या दवाखान्यात गेली आहे . शेवटी त्यांनी तो नाद सोडला .
त्या गोष्टी ला एक महिना लोटला पण अनघा बद्दल कुठलीही बातमी कळत नव्हती . त्या दिवशी घरात मोठी पार्टी होती . अजित रावांनी त्यांच्या कुठल्या तरी महत्वाच्या प्रोजेक्ट च्या पूर्ण होण्या प्रित्यर्थ ती सक्सेस पार्टी ठेवली होती . तिथे अजित रावांच्या सर्कल चे सगळे मोठे मोठे लोकं आले होते . पार्टी रंगात आली असताना च तिथे अचानक . अनघा आणि मीना ताई हातात तान्हं बाळ घेऊन येतात . सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे जातं . सगळ्यांमध्ये कुजबुज सुरु होते . अजित राव अनघा ला बघून रागाने लाल झाले होते .
अनघा हळूहळू आत येते . सगळ्यांच्या प्रश्न वाचक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या . त्या गर्दीतून एक आवाज आला ..
" अरे हिला तर परदेशी पाठवलं आहे असं कळलं होतं . पण ही तर इथेच आहे . "
दुसरा आवाज आला...
" ते ठीके पण हिच्या हातात हे बाळ कोणाचं आहे ...?? "
एक अजून आवाज आला ...
" अरे !!! हिचं लग्न झाल्याची बातमी तर कळलीच नाही . हे बाळ हिचं च आहे का ... ?? "
आणि मग त्या गर्दीत बरेच आवाज उठले .
" अरे बापरे .... म्हणजे असं आहे तर ... ही अविवाहित आई झाली तर ... म्हणून लपवली होती का हिला . "
त्या सगळ्या आवाजांचा अजित रावांना त्रास होऊ लागला तसा त्यांनी हातात माईक घेतला आणि बोलले ..
" Excuse me ladies and gentleman ... काही महत्त्वाच्या कारणास्तव आज ची ही पार्टी रद्द करण्यात येत आहे . आपण लवकरच पुन्हा भेटुयात . Please don't mind . "
त्यांच्या ह्या अनाउन्समेंट नंतर हळूहळू लोकं तिथून जाऊ लागली पण जाता जाता ही कुजबुज सुरु होतीच . अजित राव रागा रागा ने आत निघून गेले . त्यांच्या पाठोपाठ अर्चना ताई , अनघा आणि मीना ताई सुध्दा निघून गेल्या .
" तुझी हिम्मत कशी झाली ह्या पापाच्या गाठोड्या ला इथे घेऊन यायची . मला कळलं असतं की हे विषारी फळ घेऊन तू इथे येशील तर मी ह्याला कधीच संपवून टाकलं असतं . माझ्या घराण्यावर तू काळीमा फासली एक अविवाहित आई चं कलंक तू तुझा माथ्यावर तर घेतलंच पण ते आमच्या माथ्यावर पण लावलं आज मी ह्या पापाच्या गाठोड्या ला उचलून फेकून देणार आहे घरातून . " अजित राव इतकं बोलून अनघा च्या दिशेने पुढे वाढले .
" खबरदार.... त्याला हात लावाल तर . " अनघा जोराने ओरडली . तिच्या ओरडण्याने अजित राव जागीच थांबले .
" स्वतः च्या नावावर काळ फासलं गेलं म्हणून तुम्हाला इतका त्रास झाला . तुमची मुलगी एक अविवाहित आई आहे हा विचार सुद्धा तुम्हाला सहन झाला नाही तिचं पाप लपविण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न केलेत . लाजेने तुमची मान खाली गेली . पण ... घरा बाहेर च्या एका अनाथ मुलीला या अवस्थे पर्यंत आणताना तुम्हाला काहीच वाटलं नाही... हे बाळ जर पापाचं फळ आहे तर ते फळ या जगात येण्यासाठी कारण कोण आहे बाबा... " अनघा संतापाने कापत होती .
" अनघा ... हे काय वाट्टेल ते बडबडतेय . तुझं तुला तरी कळतंय का काय बोलतेय ते अजित ..... ही काय बोलतेय. ?? " अर्चना ताई अनघा वर ओरडत बोलल्या .
" मी सांगते खरं काय आहे ते ...आई ऐक...
क्रमशः
>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<>.<