तोतया वारसदार
पात्र रचना
बबन सारंग वकिलांचा चपराशी.
सुभाष गोखले बबनचा बार मधला मित्र.
भाग ४१
भाग ४० वरून पुढे वाचा....
“पण सुभाष, हे सर्टिफिकेट तू चंदूला हाताशी धरून करून घेऊ शकतो, सारंग सर बोर्डात काही करू शकतील, असं मला वाटत नाही.” – बबन.
“तो शेवटचा उपाय आहे. इथे नाहीच जमलं, तर तेच करावं लागेल. पण बबनराव, तुम्ही म्हणाला होता, की हे सर्व कोर्टाला सबमिट होणार आहे, आणि कोर्टाच्या निर्णयानुसार सर्व संपत्तीचं वाटप होणार आहे, अश्या परिस्थितीत जर कोर्टाने सांगीतलं, की बोर्डाकडून प्रमाणित करून आणा, तर आपण सरळ जेल मधे. ही एक फार मोठी रिस्क आहे, ती घ्यायची का, याचा विचार करावा लागेल.” – सुभाष.
“नको, नको, तुम्ही कसंही करून बोर्डात जमवाच. आपल्याला इतका मोठा धोका पत्करायचा नाहीये.” – बबन.
“ठीक आहे करतो मी काही तरी जुगाड.” – सुभाष.
मीटिंग संपली. दोघंही जण आपापल्या घरी जाण्यासाठी पांगले. सुभाष पूर्ण वेळ विचार करत होता, की हे काम जरा अवघड दिसतंय. वेळ द्यावा लागणार आहे. पण आता साहेब, सुट्टी द्यायला तयार होणार नाही, त्या कारकुनाला पटवायचं म्हंटलं तरी त्यासाठी सुद्धा वेळ लागणारच होता. मग बराच विचार करून त्याने ठरवलं की घरून निघतांनाच जेवून निघायचं आणि लंच टाइम मधे बोर्डात जायचं. हे ठरवल्यावर, त्याच्या जीवाला जरा शांतता लाभली.
दुसऱ्या दिवशी लंच टाइम मधे सुभाष बोर्डात गेला. त्या संबंधित कारकुनाला भेटल्यावर, सुभाषने आपली ओळख दिली. आपलं महापालिकेचं कार्ड दाखवलं. आणि कामाच्या प्रगती बद्दल विचारलं.
“वडिलांचं नाव बदलून मागणारे तुम्ही पहिलेच आहात, पत्ता चुकीचा आहे म्हणून लोकं येतात, त्यांना आम्ही इलेक्ट्रिक बिल आणायला सांगतो. तुम्हाला वडिलांचं नाव बदलायचं आहे, तर काही सपोर्टिंग कागद आणा.” – कारकून.
“काय आणू? माझ्या जवळ शाळेचं सर्टिफिकेट आहे. ते दाखवू?” – सुभाष.
“दाखवा. आणलं आहे का?” – कारकून.
“हो. हे घ्या. बघा.” सुभाषनी चंद्रपूरच्या शाळेचं दुरुस्त केलेलं सर्टिफिकेट दाखवलं.
कारकुनाने ते पाहिलं, आणि म्हणाला, “हां ,हे ठीक आहे. थांबा, मी जरा नोंदी तपासतो, कुठे चूक झाली आहे ते कळेल.”
“साहेब, जाऊ द्या ना, कुठे चूक झाली आहे त्यात मला काही इंट्रेस्ट नाहीये, तुम्ही नवीन सर्टिफिकेट बनवून द्या, आणि विषय संपवून टाका.” – सुभाष.
“साहेब, असं नसतं. सर्टिफिकेट जरी मी बनवणार असलो, तरी सही आणि शिक्का साहेबच करणार, त्यांना सर्व डिटेल्स द्यावेच लागतात. तुम्ही महापालिकेत नोकरी करता, तुम्हाला तर माहितीच आहे, काम कशी चालतात ते.” – कारकून.
सुभाष धसकला. त्याने जर रेकॉर्डस पाहिलं तर त्याला शाळेकडून आलेली माहिती मिळेल. मग काय होईल देव जाणे. थोडा विचार करून सुभाष म्हणाला, “साहेब, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. कामं कशी चालतात ते मला कळायला हवं होतं. साहेब, चिंता करू नका, माझं काम तुम्ही करा, तुमचं मी करतो.” – सुभाष.
तो पर्यन्त कारकुनाने ते रजिस्टर काढलं होतं आणि त्यात तो माहिती चेक करत होता.
“शाळेने जी माहिती पाठवली होती त्यात अश्विन असाच स्पष्ट उल्लेख आहे. आणि आता तुम्ही जे सर्टिफिकेट दाखवता आहात, त्यात अविनाश लिहिलेलं आहे. म्हणजे आम्हाला माहिती देण्यात शाळेचीच चूक झालेली आहे. आमची नाहीये. ठीक आहे. साहेब, हे सर्टिफिकेट मी बनवतो आणि साहेबांसमोर ठेवतो. तुम्ही पुढच्या आठवड्यात या, बुधवारी या. मी कागद तयार ठेवतो.” – कारकून.
“ठीक आहे साहेब. धन्यवाद.” असं म्हणून सुभाष निघाला.
आता त्याला बरंच हलक वाटत होतं. डोक्यांवरचं एक ओझं उतरलं होतं. केंव्हा एकदा ही बातमी बबनला सांगतो असं झालं होतं. संध्याकाळी बबनच्या ऑफिस समोर सुभाष उभा होता. बबनची वाट पाहत होता. अर्ध्या तासाने बबन ऑफिसच्या बाहेर पडताना सुभाषने पाहीलं, आणि तो समोर आला. बबनने त्याला पाहीलं, त्याला जरा आश्चर्यच वाटलं.
“अरे, सुभाष तू आत्ता इथे? या वेळेस? आपलं तर काहीच ठरलं नव्हतं, काही खास आहे का?” – बबन
“हो खासच आहे. चल कुठे जाऊन चहा घेऊ.” – सुभाष.
मग सुभाषनी त्याला आज बोर्डात काय झालं ते सांगितलं. बबनला पण आनंद झाला.
“आता आठ दिवसांत ते पत्र हातात आलं की यूनिवर्सिटी मधे जायचं. आपलं काम जवळ जवळ पूर्ण होत आलं आहे. तुझ्याकडची काय खबर बात आहे?” – सुभाष म्हणाला. तो खुशीत होता.
“अरे, काही विशेष घडलं नाहीये. गाडी अजून तिथेच अडली आहे. काल साने मंडळी सूरत हून साताऱ्याला पोचली आहेत. मग सगळे जण गोकर्णला जाणार आहेत. निशांत वाराणसीला जाणार होता, पण अजून तिथेच आहे. तो बहुधा सर्वांबरोबर एंजॉय करतो आहे, आमच्या खर्चाने. सारंग सरांना हे त्याच भटकणं कसं चालतं, देव जाणे. तो जाईल तेंव्हा कळेलच.”- बबन.
“एका दृष्टीने हे बरंच झालं. आपल्याला थोडा अजून वेळ मिळेल. त्यांचा शोध पूर्ण व्हायच्या अगोदर आपलं काम झालं पाहिजे, नाही तर काही उपयोग नाही.” – सुभाष
“बरोबरच आहे तुझं म्हणण, तू लाग कामाला. बरं आता निघूया?” – बबन.
“ओके” सुभाष म्हणाला आणि दोघंही आपापल्या घरी जायला निघाले.
******
बोर्डात, कारकुनाने, सुभाषची फाइल नीट लक्ष पूर्वक बघितली. वडीलाचं नाव बदलण्याचा अर्ज त्यांच्या समोर होता. काही केल्या त्याच्या ते पचनी पडत नव्हतं. पुन्हा वरतून सुभाष म्हणाला होता, की तुम्ही माझं काम करा, मी तुमचं करीन, हे पण त्याच्या चांगलं लक्षात होतं. कुठे तरी मोठा हात मारण्याच्या प्रयत्नात हा माणूस आहे हा माणूस आहे, या बद्दल आता त्याची खात्री पटत चालली होती. सर्टिफिकेट बनवायचं तर साहेबांकडे जायलाच हवं म्हणून तो सगळं बाड उचलून साहेबांकडे गेला.
“साहेब, हा एक दुरूस्तीचा अर्ज आला आहे.” – कारकून.
“ठीक आहे, सगळं बघून घ्या आणि दुरुस्त सर्टिफिकेट बनवा, आणि घेऊन या माझ्याकडे. साधी आणि नेहमीची गोष्ट आहे. – साहेब.
“साहेब, हे जरा वेगळं आहे.” – कारकून.
“काय वेगळं आहे?” – साहेब.
“वडिलांच नाव चुकीच पडलं आहे असं अर्जात म्हंटलं आहे.” – कारकून.
“सर्टिफिकेट केंव्हा इश्यू झालं आहे?” – साहेब.
“१२-१३ वर्षांपूर्वी.” – कारकून.
“इतकी वर्ष हा माणूस झोपला होता का? आणि आत्ताच काय जरूर भासली त्याला? काय भानगड आहे, दाखवा जरा.” – साहेब.
मग कारकुनाने सगळी माहिती त्यांच्या समोर ठेवली. साहेब जरा विचारात पडले. मग म्हणाले, “काही तरी प्रॉपर्टी ची भानगड दिसते आहे. नाव चुकीच असल्याने त्याचा हक्क कदाचित मारल्या जात असेल. त्या वेळेस आपल्याला शाळेकडून चुकीची माहिती दिल्या गेली. असा याचा अर्थ होतो. तुम्ही असं करा, शाळेच्या प्रिन्सिपल ला पत्र पाठवा, आणि सुधारित माहितीची सत्यता पडताळून घ्या. त्यांचं उत्तर आल्यावरच हे सुधारित सर्टिफिकेट इश्यू करा.” – साहेब.
“साहेब, मला काय वाटतं सांगू का?” – कारकून.
“बोला” – साहेब.
“तुम्ही म्हणाला की प्रॉपर्टीची भानगड असेल म्हणून. साहेब तुम्ही म्हणता तसा प्रॉपर्टीचाच प्रश्न असेल, पण प्रॉपर्टीचा वारसदार अविनाशचा मुलगा असावा, जो इथे नाहीये, किंवा हयात नाहीये. हा माणूस त्या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो आहे, असा मला संशय येतो आहे. नाहीतर १२ वर्षांनंतर सर्टिफिकेट बदलून मागण्यात दूसरा काय हेतु असावा? बोर्डाचं सर्टिफिकेट हे बेसिक डॉक्युमेंट असतं, म्हणूनच हा सगळा उपद्व्याप हा माणूस करतो आहे.” – कारकून.
“अरे बापरे, माझ्या हे लक्षातच आलं नाही. तुम्ही म्हणता, तसं असण्याची शक्यता असू शकते. मग आता काय विचार आहे? बदलून द्यायला नकार द्यायचा?” – साहेब.
“मला असं वाटतं की” कारकून म्हणाला, “त्याला जे करायचं असेल, ते त्याने करावं, आपला काय संबंध आहे? त्यांच्या शाळेला मी पत्र पाठवतो, जर त्याने दिलेलं सर्टिफिकेट खरं असेल, तर शाळेला तसं पत्र द्यायला काहीच हरकत नाही. पण जर काही लांडया लबाड्या करून त्याने सर्टिफिकेट मिळवलं असेल, तर त्याचं काय करायचं ते शाळा पाहून घेईल. आपण मधे पडायचं काहीच कारण नाही.” – कारकून.
“मला तुमचं म्हणण बरोबर वाटतंय असंच करा. आपल्या डोक्याला ताप नको. आधीच परीक्षा आणि निकालांचं खूप ओझं असत.” – साहेब.
“ठीक आहे. पण साहेब मी त्याला पुढच्या बुधवारी त्याला बोलावलं आहे, तो आल्यावर त्याला काय सांगू?” – कारकून.
“सांगून टाका की शाळेला पत्र पाठवलं आहे म्हणून, पण नको. काय घोळ घातला आहे तुम्ही, सगळाच गोंधळ झाला आहे.” - साहेब.
“साहेब असं करतो, तो आल्यावर त्याला सांगतो की शाळेला पत्र पाठवलं आहे म्हणून, आणि नंतर पाठवतो. त्याला काय करायचं ते करू द्या.” – कारकून.
“ठीक आहे, काय करायचं ते करा, पण आपल्यावर शेकणार नाही हे बघा.” – साहेब.
“ठीक आहे.” – कारकून.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com