तोतया वारसदार - भाग 46 Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तोतया वारसदार - भाग 46

तोतया वारसदार

पात्र रचना

निशांत                      शोधकर्ता

दिनकर                      महादेव रावांचा चौथा मुलगा.

सुधाकर गोखले                निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

सारंग, किरीट, प्रशांत           ट्रस्टी

भाग  ४६                   

भाग ४५ वरून पुढे  वाचा....

 

“ओके. तसं करू, मी चेक सारंगला देतो, बबन कॅश काढून ठेवेल. तूला जेंव्हा जमेल, तेंव्हा घेऊन जा.” – किरीट.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निशांतने नागपूर – दिल्ली आणि दिल्ली - वाराणसी अशी विमानांची टिकीटं  बूक केली.

वाराणसीला  पोचल्यावर हॉटेल मधे जाऊन फ्रेश झाल्यावर निशांत विश्वनाथ मंदिरात गेला. दर्शन वगैरे आटोपल्यावर, त्याने अखंडानंद स्वामींच्या आश्रमा बद्दल चौकशी सुरू केली. बहुतांश लोकं बाहेर गांवांवरून दर्शनाला आले असल्याने, कोणाला काही कल्पना नव्हती. मग फुलांच्या दुकानात चौकशी केल्यावर एकाने सांगितलं की थोड्या अंतरावर एक सराई आहे, तिथे बरेच साधू राहतात, त्यांना कदाचित माहिती असेल, तसे इथे इतके आश्रम आहेत, की सांगणं मुश्किल आहे. मग निशांत त्या सराई म्हणजे धर्मशाळे वर पोचला. तिथे मात्र आश्रमाचा पत्ता लागला. तो पत्ता घेऊन तो आश्रमात पोचला. एका सेवेकरी माणसाने समोर येऊन त्यांची चौकशी केली. निशांतने त्याला सांगीतलं की त्र्यंबक परांजपे नावाच्या गृहस्थाला भेटायला आला आहे. त्या सेवेकर्‍याला काही माहीत नव्हतं. तो म्हणाला की मी तीन महिन्यांपूर्वीच आलो आहे इथे, तुम्ही थांबा मी एका जुन्या माणसाला घेऊन येतो. दूसरा माणूस आल्यावर त्याने सांगीतलं की दोघंही आता हयात नाही. त्र्यंबक रावांना जाऊन एक वर्ष झालं, आणि त्यांची पत्नी जाऊन तीन महीने झालेत. आता इथे करण्या सारखं काहीच नव्हतं. मग त्या माणसाला निशांत म्हणाला की “त्यांची डेथ सर्टिफिकेट मिळतील का?”

“ते तुम्हाला ऑफिस मधे मिळेल.” आणि त्या माणसाने ऑफिस चा रस्ता दाखवला.

ऑफिस मधे गेल्यावर त्याने तिथल्या व्यवस्था बघणारा जो साधू होता, त्याला सर्टिफिकेट  बद्दल विचारलं.

“तुम्ही कोण? आणि परांजप्यांचे डेथ सर्टिफिकेट तुम्हाला कशाला हवे आहेत. परांजपे गेली कित्येक वर्ष इथे आहेत, पण मी तुम्हाला इथे कधी पाहिल्याचं आठवत नाही. मी नाही देऊ शकणार तुम्हाला सर्टिफिकेट. माफ किजिए पर हम नहीं दे पाएंगे तुम्हें सर्टिफिकेट.” राखानंद स्वामी म्हणाले. त्यांचा स्वर शांत पण ठाम होता. निशांत आता काय बोलायचं याची जुळवाजुळव करत होता. त्याच्याकडे राखानंद बघत होते, ते म्हणाले, “या तुम्ही आता, मला बरीच कामं आहेत.”

निशांत म्हणाला “स्वामीजी, माझ्या करता ते सर्टिफिकेट मिळणं आवश्यक आहे. तुम्हाला सांगतो, विनायक गोखले नावाचे गृहस्थ आपल्या मागे बरीच मालमत्ता सोडून गेले आहेत. त्यांच्या मृत्यूपत्रा प्रमाणे त्यांचे वारसदार शोधण्याची जाबदारी सारंग वकिलांना दिली आहे. मी सारंग सरांच्या वतीने इथे आलो आहे. यांचं नाव वारसदारांच्या यादीतून काढून टाकावं लागेल, त्या साठी मला सर्टिफिकेट ची जरूर पडेल. त्याशिवाय कोर्ट मान्य करणार नाही. मग देता ना सर्टिफिकेट?”  निशांत म्हणाला आणि त्याने वंशावळी उघडून त्यांना दाखवली, विनायकरावांच मृत्यूपत्र देखील दाखवलं. ते सर्व बघितल्यावर मग राखानंदांची चर्या बदलली. ते म्हणाले,

“हे बघा आता अखंडानंद स्वामी हयात नाहीयेत. त्यामुळे देशभरातल्या मठांचा कारभार एक पंच कमिटी चालवते. मला तुमचं म्हणण पटतंय, पण त्यांच्या समोर ही बाब ठेवावी लागेल. त्यांनी हिरवा कंदील दिला, तरच मी तुम्हाला सर्टिफिकेट ची कॉपी देऊ शकेन.” – राखानंद

“म्हणजे कमिटीने ओके केलं तर तुम्ही सर्टिफिकेट द्याल?” – निशांत.

“हो” – राखानंद

“मग मी उद्या येऊ का? तो पर्यन्त होईल?” – निशांत.

राखानंद हसले. “नही बेटा, इतने जलदी नाही हो पायेगा. तुम्हाला महिनाभर तरी वाट पाहावी लागेल.” – राखानंद

“इतका वेळ लागेल? का हो?” – निशांत.

“कमिटी चे  सदस्य देशभराच्या मठांना भेटी देत फिरत असतात. दर महिन्याच्या १० तारखेला सर्व एका ठिकाणी जमतात. तिथे सर्व मठांचे व्यवस्था बघणारे पण उपस्थित असतात. आता मागच्याच आठवड्यात हृषीकेश ला बैठक झाली. त्यामुळे पुढची बैठक होई पर्यन्त थांबावच लागेल. तिथे मी तुमची विनंती कमिटी समोर ठेवीन. पुढे ते म्हणतील तसं.” – राखानंद.

“पुढची बैठक कुठे होणार आहे? म्हणजे मी पण तिथे येतो.” – निशांत.

“आत्ता तरी मला माहीत नाही. पण तुम्ही यायची जरूर नाही. मला तुमची विनंती रास्त वाटते आहे. कमिटी नकार देईल असं वाटत नाही. तुम्ही तुमचा पत्ता आणि फोन नंबर  देऊन ठेवा. पत्र तुमच्याकडे पाठवल्या जाईल. चिंता करू नका.” – राखानंद 

आता बोलण्यासारखं काही उरलं नव्हतं. निशांतने सारंग सरांच्या ऑफिस चा फोन नंबर आणि पत्ता दिला, आणि तो तिथून निघाला.

संध्याकाळी सारंग सरांना अपडेट दिल. त्यांच्याच ऑफिसचा पत्ता आणि फोन नंबर दिल्याचं पण सांगीतलं.

“मग आता नाशिकला यायला निघतो आहेस?” – सारंग.

“काल पासून माझ्या मनात एक विचार घोळतो आहे. सांगू का?” – निशांत

“सांग.” – सारंग.

“नाशिक जवळच आहे, तिथल्या आश्रमाचा पत्ता पण आपल्याजवळ आहे. शोधाशोध करायची भानगड नाहीये, आता मी इतक्या दूर वाराणसीला आलोच आहे, तर असा विचार करतो आहे, की एक चक्कर कानपूरला मारावी. आणि बघावं तिथे दिनकररावांबद्दल काही माहिती मिळते का ते?” – निशांत.

“निशांत तू अचाट मुलगा आहेस. सुरवात करतांना आम्हाला तर एक तरी वारसदार मिळेल की नाही यांची शंका होती, पण तू जे काही करून दाखवलंस त्याला तोड नाही.

आता तू दिनकरच्या वंशजांना शोधायला निघाला आहेस. जा, जा तुला या कामात पण यश मिळो, हीच शुभेच्छा.” -सारंग सर जरा भावुक झाले होते. त्यांचा स्वर नेहमीप्रमाणे वकिलांसारखा कणखर आजिबात नव्हता.

“पण निशांत, मला सांग, कानपूर हे नागपूर पेक्षाही खूप मोठं शहर आहे हे तुला माहीत आहे ना? तिथे, कसलाही धागा, सुगावा नसतांना, भाषेची पण अडचण असतांना, तू सुरवात तरी कुठून आणि कशी करणार आहेस? गवताच्या ढिगार्‍यांत सुई शोधण्या सारखं काम आहे हे.” – सारंग.

“हो कल्पना आहे मला. पण मी प्रयत्न करून बघावं म्हणतो आहे. यश मिळालं तर उत्तमच आहे, नाहीतर परिस्थितीत काहीच फरक पडणार नाही. मग काय करू?”-निशांत

“नाही नाही, मी अडवत नाहीये तुला. तुझ्या योजने प्रमाणे कर तू. तुला फ्री हँड आहे आमच्याकडून.” – सारंग.

निशांत दुसऱ्या दिवशी कानपूरला निघाला. कानपूरला पोचल्यावर आधी एक चांगलं हॉटेल शोधून रूम घेतली. संध्याकाळ झाली असल्याने, त्या दिवशी काहीच हालचाल करता आली नाही. पण हॉटेलच्या डेस्क ऑफिसरशी बोलतांना त्याने महाराष्ट्र मंडळाचा विषय काढला. त्याने फक्त नाव ऐकलं होतं पण या पेक्षा तो काही माहिती देऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी वेगळा डेस्क ऑफिसर होता, त्याला विचारलं, तो म्हणाला, “मला काही माहीत नाही, पण आमच्या कडे दोघं जण मराठी आहेत, त्यांना विचारून बघा, कदाचित त्यांना माहिती असेल. त्यांनी दोघा जणांना बोलावलं. निशांतने त्यांनाही महाराष्ट्र मांडला बद्दल विचारलं. पण महाराष्ट्र मंडळा सारखं काही असतं हेच त्यांना माहीत नव्हतं. शेवटी कंटाळून निशांत बाहेर पडला.

मग त्याने हॉटेल मधे चौकशी केली आणि थोड्या वेळा करता टेलीफोन डायरेक्टरी मागून घेतली. त्यामधल्या गोखले नावाच्या पानांचं झेरॉक्स हॉटेलच्याच झेरॉक्स मशीन वर काढून घेतलं. आता वन बाय वन गोखल्यांना फोन करून जो बोलायला तयार असे, त्याला भेटायला जायचं असं त्याने ठरवलं. या कामात खूप सारे गोखले त्याला फ्रॉड समजून शिव्या घालण्याची शक्यता होतीच, पण निशांतने तो धोका पत्करायचं ठरवलं.

आणि मग डेस्क ऑफिसरशी निशांत बोलला. त्याला फोन वापरायचा होता, पण बरेच फोन करावे लागणार असल्याने, आणि त्याने बिसिनेस वर परिणाम होईल, फोन लाइन अडकल्यामुळे, कस्टमर चे फोन येणार नाहीत, असं कारण देऊन त्याने फोन वापरायला नकार दिला. मग निशांत बाहेर पडला आणि एका PCO वर गेला, त्यांच्याशी बोलल्यावर, त्याने दुपारी गर्दी नसते तेंव्हा यायला सांगितलं. मग दुपारी फोन कॉल सुरू झाले.

अनोळखी असल्याने, बऱ्याच गोखल्यांनी बोलायला नकारच दिला. आता शेवटचे चार उरले होते, निशांत जवळ जवळ निराश झाला होता, पण तरीही त्याने नेटाने प्रयत्न करणं सुरूच ठेवले होते. अखेर एक जण बोलायला तयार झाला.

“मैं गोखले साब से बात करना चाहता हूँ.” – निशांत.

“गोखले बोल रहा हूँ. आप कोन साब बोल रहे हैं? क्या काम हैं?”

“साहेब, मी नागपूर वरुन इथे आलो आहे. आपण मराठीतून बोलू शकतो का?”– निशांत

“बोला, काय काम आहे? मला कुठलंही लोन किंवा पॉलिसी नको आहे.” – गोखले.

“नाही सर, तसं काहीच नाहीये. मी नागपूरच्या विनायक गोखल्यांचा प्रतिनिधी म्हणून इथे आलो आहे. त्यांचा एक पूर्वज बाजीराव साहेबांच्या बरोबर कानपूरला आला होता, त्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या वंशजा बद्दल माहिती हवी होती. त्यासाठी इथलेच कोणी गोखले मदत करू शकतील, असं वाटलं, म्हणू हा प्रपंच केला.” – निशांत.

“अरे बापरे, दीड दोनशे वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे, मी काय मदत करणार तुम्हाला? मला काहीच कल्पना नाहीये. सॉरी, मी तुम्हाला मदत नाही करू शकत.” – गोखले.

“सर, तुम्हाला नसेल माहीत पण अजून कोणाला तरी नक्की माहीत असेल, मी कोणालाच ओळखत नाही पण तुम्ही काही नावं सुचवू शकता न, मी त्यांच्या कडे चौकशी करेन. मी संध्याकाळी येऊ का तुम्हाला भेटायला?” – निशांत.

“या खटाटोपातून काही साध्य होईल असं मला वाटत नाही, पण या तुम्ही संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास.” – गोखले.

 

क्रमश:........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com