तोतया वारसदार
पात्र रचना
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी.
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
रोहन - सौमित्रचा मुलगा
चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर
उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको.
भाग ५४
भाग ५३ वरून पुढे वाचा....
रूम वगैरे बघून झाल्यावर निशांत म्हणाला की त्यांना सर्व व्यवस्था आवडली आहे आणि एक दोन दिवस तिथे राहायला आवडेल.
“मग मंडळींना केंव्हा घेऊन येता? त्यांना सुद्धा बघू द्या इथली व्यवस्था.” -चंद्रकांत
“नाही, आमचं लग्न झालेलं नाहीये, आम्हीच दोघं आहोत, तुम्हाला चालेल?- रोहन
“न चालायला काय झालं? सामान आणता न? तुम्ही खोल्या सिलेक्ट करा.” -चंद्रकांत.
खोली मधे सामान ठेवल्या नंतर, चंद्रकांत म्हणाले, “आंघोळी साठी गरम पाणी हवं असेल, तर गीझर आहे, बरं चंहा पाठवून देतो, जेवायला काय पसंत कराल?”
“सारखं हॉटेल मधे जेवून कंटाळा आला आहे. तुमच्याच पसंतीचं खास कोंकणी जेवण आवडेल.” – रोहन.
“ठीक आहे, बरं तुम्ही आधी आंघोळ करून दर्शनाला जाणार आहात का?” – चंद्रकांत
“नाही नाही, आज दुपारी असंच देवळात जाऊन येऊ, मग उद्या सकाळी आंघोळ करून काय अभिषेक करता येतो का ते बघू.” – रोहन.
“अभिषेक आणि पूजा करायची असेल, तर त्यांची व्यवस्था मी करू शकतो. सकाळी ७ वाजता चालेल?” – चंद्रकांत.
“चालेल, आम्ही त्यांच्या आधीच तयार राहू.” – रोहन.
“ठीक आहे, आता तुम्ही आराम करा, जेवण्याची तयारी झाली की मी तुम्हाला निरोप देतो.” – चंद्रकांत.
चंद्रकांत गेल्यावर, रोहन म्हणाला, “निशांत यांच्या समोर विषय कसा काढायचा ते ठरवावं लागेल. जरा आयडियानेच बोलावं लागणार आहे. त्यांचा गैर समज झाला तर वसकन अंगावर यायचा.”
“तू चिंता करू नको, मी बोलतो जेवतांना. रीलॅक्स” – निशांत.
जेवण छानच होतं. त्यांची तारीफ करता करता, निशांत आणि रोहन इतर अवांतर गोष्टी बोलत होते. आणखी कोणी गेस्ट नसल्याने चंद्रकांत गोखले सुद्धा निवांत होते, आणी त्यांच्या बरोबर गप्पा गोष्टीत भाग घेत होते. बोलता बोलता निशांतनी सहज विचारतो आहे, असा आविर्भाव आणून विचारलं, “गोखले साहेब, तुम्ही मूळचे इथलेच का?”
“हो इथलेच. आमच्या बऱ्याच पिढ्या याच घरात गेल्या. माझा जन्म सुद्धा याच घरातला.” – चंद्रकांत.
“म्हणजे गेली कित्येक वर्ष तुम्ही हाच गेस्ट हाऊस चा व्यवसाय करता आहात? इथे तर फारसे टुरिस्ट येतांना दिसत नाहीत. मग कसं काय करता? – निशांत.
“नाही, मी बरेच वर्ष मुंबईला होतो. माझी IPCL मधे नोकरी होती. मी केमिकल इंजीनियर आहे. मागच्याच वर्षी रिटायर झालो, आणि मग मी आणि माझ्या बायकोनी ठरवलं की आपल्या वाडीलोपार्जित घरी जाऊन राहायचं.” – चंद्रकांत.
“म्हणजे बरीच वर्ष तुम्ही इथे नव्हता, मग इथली व्यवस्था कोणी दुसरं बघत होतं का? कारण आत्ता तर आम्हाला सगळंच चकाचक दिसतंय.” – निशांत.
“तसे आम्ही दरच वर्षी यायचो इथे पण ते काय चार दिवस. इथे शेजारी दुसरे गोखले राहतात, ते अधून मधून माणसं लावून घर ठीक ठाक करून घ्यायचे, बागेची व्यवस्था पण तेच बघायचे. आता आम्ही आल्यावर आम्हीच करतो सगळं. हे घर पण रेनोवेट करून घेतलं. छान चाललं आहे.” – चंद्रकांत.
“किती पिढ्या झाल्यात हो तुमच्या या घरात?” – निशांत हळू हळू उद्दिष्टा कडे सरकत होता.
“हे घर तसं बऱच जुनं आहे, पण माझ्या आजोबांचे आजोबा आधी मुंबईला होते, ते इथे प्रथम आलेत.” – चंद्रकांत.
निशांत आणि रोहन यांनी एकमेकांकडे पाहिले. सगळ्या कड्या बरोबर जुळत होत्या.
“तुमच्या आजोबांच्या आजोबांचं नाव दिनकर होतं का?” – निशांत.
“हो, पण तुम्हाला कसं माहीत? तुम्ही तर आत्ताच इथे आलात.” – चंद्रकांत.
“दिनकर महादेव गोखले. कानपूरला असतांना त्यांनी १८५७ च्या युद्धात सक्रिय सहभाग घेतला.” – निशांत.
चंद्रकांत गोखल्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलले. हलकीशी संशयाची आणि भीतीची छाया चेहऱ्यावर उमटली. म्हणाले, “ही सगळी माहिती तुम्हाला कुठून मिळाली? कोण आहात तुम्ही? पोलिस? मला कुठल्या सापळ्यात अडकवण्याचा विचार आहे तुमचा? काय तुमच्या मनात आहे ते सांगून टाका. काय ठरवून आले आहात तुम्ही?”
“गोखले साहेब, चिंता करू नका, आम्ही साधीच माणसं आहोत. पण हे खरं की आम्ही काही निश्चित हेतु धरून इथे तुमच्याकडे आलो आहोत.”- निशांत.
“काय हेतु धरून आला आहात? सांगून टाका एकदाचा.” - चंद्रकांत.
“सांगतो अगदी सविस्तर सांगतो. जरा काकूंना पण बाहेर बोलावता का?” – निशांत.
“हे आता अवघड होत चाललं आहे. तिचा काय संबंध? तिला का ओढता आहत या मधे? मला आता तुमचं संशय यायला लागला आहे. तुम्ही इथून निघालात तर बरं होईल.” – चंद्रकांत.
“दिनकर राव, लढाई संपल्यावर शांताराम भिडे यांच्या बरोबर नीवेन्डीला गेले.”- निशांत.
“अरे काय चाललंय काय तुमचं? हे सगळं तुम्हाला कसं माहीत?” – चंद्रकांत.
“गोखले साहेब,” निशांत म्हणाला, “तुमचे सर्व गैरसमज आम्ही दूर करू, हे बघा, आम्ही काही गोष्टींची माहिती नव्हती, तीच शोधण्यासाठी आलो आहोत. आम्ही पोलिस नाही, पण एका अत्यावश्यक कामासाठी इथे आलो आहोत.” मग रोहनला समोर करून निशांत म्हणाला,”हे रोहन गोखले. हे इंग्लंडला असतात. गोखल्यांच्या वंशावळीत काही कड्यांबद्दल माहिती नव्हती म्हणून हे मुद्दाम लंडन वरुन इथे आले आहेत. आमच्या काही प्रश्नांची उत्तरे जर तुम्ही दिलीत, तर म्हणजे आम्हाला अभिप्रेत असलेले गोखले तुम्हीच आहात हे निश्चित पणे कळेल, मग आम्हाला पडलेल्या अतिशय महत्वाच्या प्रश्नावर तुमच्याशी चर्चा करायची आहे.” निशांत असं म्हणाला आणि रोहनचा पासपोर्ट चंद्रकांत गोखल्यांना दाखवला.
पासपोर्ट तर गोखल्यांनी पाहिला. पण गोखले आता गोंधळून गेले होते, ते विचार करत होते, की ही माणसं पोलिस तर वाटत नाहीत, बदमाशही वाटत नाहीत, पण यांचं गूढ बोलणं काही समजत नाहीये, पुन्हा बायकोला पण बोलवा म्हणताहेत, काही उमज पडत नाहीये. थोडा विचार केल्यावर त्यांच्या मनाने कौल दिला की ऐकून घेऊ यांचं म्हणण, नाही पटलं तर सरळ बाहेरचा रस्ता दाखवू, ते तर आपल्याच हातात आहे. मग त्यांनी उज्ज्वलाला म्हणजे त्यांच्या बायकोला आवाज दिला. ती बाहेर येऊन बसली, मग गोखल्यांनी तिला सारांश रूपात झालेलं बोलणं सांगितलं. मग म्हणाले, “हूं, विचारा काय विचारायचं आहे ते.”
“दिनकर गोखल्यांच्या वडिलांचं नाव काय होतं आणि ते कुठे राहत होते?” – निशांत.
“महादेव, आणि ते इथेच म्हणजे, हे घर प्रथम त्यांनीच बांधलं” – गोखले.
दिनकर गोखले कानपूर हून थेट नीवेन्डीला का आणि कशाकरिता गेले होते.”- निशांत.
लढाई संपल्यावर पोलिस त्यांच्या मागे लागले होते म्हणून.” – चंद्रकांत.
“नीवेन्डीला असं काय कारण होतं की ते तिथे गेले?” – निशांत.
“ते युद्धात जबर जखमी झाले होते, त्यांचे मित्र शांताराम भिडे नीवेन्डीचे, तिथे त्यांच्यावर चांगले उपचार झाले असते म्हणून तिथे गेले.” – गोखले.
“नीवेन्डी हून ते मुंबईला का गेलेत? वेळणेश्वरला का आले नाहीत? सखाराम पंत गोखले तर निष्णात वैद्य होते ना?” – निशांत.
“वेळणेश्वर च्या घराची सरकार दरबारी नोंद होती, म्हणून टाळलं असेल. सगळं स्थिर स्थावर झाल्यावर आले की ते इथे. पण सखाराम पंत गोखले हे नाव तुम्हाला कसं माहीत?” – गोखले.
निशांतनी त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पण पुढचा प्रश्न विचारला. “त्यांच्या भावांची नावं माहीत आहेत का? म्हणजे महादेव रावांच्या इतर मुलांची नावं? हा महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे.” – निशांत.
“असं सांगता नाही येणार, सखाराम पंत हे दिनकर रावांचे मोठे बंधु होते, बाकी सर्व माहिती लिहिलेली आहे, आणि जपून पण ठेवली आहे. कुठे ते आठवत नाहीये, पण शोधून सांगतो.” – गोखले म्हणाले, पण मग बायको कडे वळून म्हणाले की “तुला आठवते का कुठे असेल ते लिखाण?”
“लिखाण कशाला पाहिजे? माझ्या लक्षात आहेत नावं, मोठे सखाराम, नंतर विश्वनाथ, नंतर कौशिक , नंतर दिनकर, मग नर्मदा आणि गोदावरी.” – उज्ज्वला.
निशांत आणि रोहनने मोठा श्वास सोडला. “आमचा शोध इथे संपला. ज्यांच्या शोधात आम्ही फिरतो आहोत, ते गोखले तुम्हीच आहात अशी आमची खात्री पटली आहे. आता मी काय सांगतो ते अगदी लक्ष पूर्वक ऐका. खूप महत्वाचं आहे. काही प्रश्न पडतील तुम्हाला, पण ते लगेच विचारा. ठीक आहे?” – रोहन.
“सांगा, आम्ही ऐकतो आहोत.” – गोखले.
“गोखले घराण्याचा मूळ पुरुष वेळणेश्वरचे महादेवराव त्यांना चार मुलं आणि दोन मुली. त्यापैकी सखाराम आणि विश्वनाथ यांचा वंश वाढला. म्हणजे दिनकररावांच्या बद्दल आज पर्यन्त आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आता ती माहिती, जी तुम्ही द्याल ती, जोडावी लागेल.” रोहन तासभर अगदी मुद्देसूद पणे एक एक गोष्ट संगतवार सांगत होता. रोहनने महादेव रावांच्या वंशाचा संपूर्ण संपूर्ण इतिहास चंद्रकांत पुढे उलगडला. चंद्रकांत आणि उज्ज्वला अधून मधून काही स्पष्टीकरण मागत होते, आणि त्याला निशांत समर्पक उत्तरं देत होता. सगळं ऐकून घेतल्यावर आणि वंशावळी आणि डायरी पुन्हा पुन्हा पाहिल्यावर, त्यांचा चेहरा जरा गंभीर झाला. म्हणाले,
“हा सगळा खटाटोप तुम्ही वारसदार शोधण्यासाठी करता आहात? विश्वास बसत नाहीये. एवढी मोठी संपत्ती घ्यायला आत्ता पर्यन्त कोणीच तयार झालं नाही? आश्चर्य आहे.”
“आश्चर्य आहे खरं, पण हेच सत्य आहे. आता तुमचा विचार सांगा.” – निशांत.
“आमचा काय विचार असणार? आमचा त्या संपत्तीशी काय संबंध आहे? कष्ट केले विनायकरावांनी, आणि तुम्ही आम्हाला विचारता आहात. आयत्या बिळावर नागोबा होऊन बसण्याची गोखल्यांची परंपरा नाहीये. आमचे पूर्वज दिनकरराव देशा साठी लढले, त्यांच्याच वंशजाने फुकटच्या संपत्तीची लालसा धरली हे त्यांना मुळीच आवडणार नाही. सॉरी. देव दयेने आमच्या जवळ भरपूर आहे, आता आणखी कशाला हवंय? आणि ते ही या वयात?” - चंद्रकांत.
आता हतबुद्ध होण्याची पाळी निशांत आणि रोहन यांची होती. ते स्तिमित होऊन बघतच राहिले. निशांत विचार करत होता की सगळेच गोखले इतके निर्मॉही कसे? पण त्यांच्या जवळ या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पुन्हा एकदा ते डेड एंड ला पोचले होते.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com