यक्षनगरी मांगेली Balkrishna Rane द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

यक्षनगरी मांगेली

यक्षनगरी मांगेली    

(   महाराष्ट्र -      कर्नाटक -गोवा सीमेवरील गाव)     ऑगस्ट महिना हा वर्षा सहली साठी एकदम उत्तम ! या दिवसात पाउस कमी असतो.मधे मधे कोवळे ऊन असते.अंगावर रोमांच उठवणारा वारा असतो. आम्ही ' मैत्रेय १९८२ 'विज्ञानशाखा आज ५/८/२०२६ वर बुधवारी असेच दोडामार्ग येथील मांगेली गावी गेलो. आमची ट्रॅव्हलरने झरेबांबर वरूनखोक्रल  येथून उजवीकडे वळत मांगेलीचा घाट चढायला सुरुवात केली.आकाशात सावळ्या ढगांनी गर्दी केली होती.रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांबूची बेट दिसत होती. शेतात व रस्त्याच्या कडेने स्वच्छ पाणी वाहत होत. इथे पाणी झऱ्यासारखे शेतातून वाहते म्हणून याला झरेबांबर म्हणत असावेत.पुढच्या सुखद दृश्य मालिकेची ही झलक होती.जसजसे आम्ही घाट चढत होतो तसतशी उत्सुकता वाढत होती. एकही खड्डा नसलेला...सर्प कांतीसम तुळतुळीत रस्ता ...सभोवारची  गर्द हिरवी वनराई डोळे निववित होती.अजून वस्ती किंवा इतर वाहने दिसत नव्हती.थोडा वेळ गेला दोन कठीण वळण काढत आम्ही अगदी उंचावर पोहोचलो.आता रस्ता सरळ होता.पण समोर  पांढऱ्याशुभ्र धुक्याचे अनेक दाट पडदे एका पाठोपाठ समोर येत गेले. गाडी धुक्यातून पुढे सरकत होती .डाव्या बाजूला हिरवा उतार समोर पांढर धुक...धुंद रोमँटिक फील या अस वातावरण येत होता..मला तर कालिदासाच्या मेघदूताची आठवण झाली. विरही यक्ष आपल्या  बाजूने तरंगत जाणाऱ्या काळसर ढगाला सांगतो  तू तरी माझी व्यथा माझ्या प्राणप्रिय पत्नीकडे पोहचव.खरोखरच त्यावेळी मांगेलीत असच वातावरण  होते.      काही वेळाने गुरांचा एक घोळका धुक्यात सामोरा आला.पुढे वस्ती असल्याचे ते लक्षण होते.आता धुक थोड विरळ झाले होते.रस्त्याच्या आजुबाजूला दोन्हीकडे विखुरलेली घरे दिसत होती. घरे छोटी  होती व छप्परे तीव्र उताराची होती.वाऱ्या पावसाला तोंड देण्यासाठी अशी बांधणी केली असावी.सगळी घरे प्लास्टिक किंवा करडाची आवरण असलेली होती.घरात ओलसरपणा येऊ नये या साठी तस केलं होत. मध्ये दोन मुलांकडे धबधब्याबद्दल विचारणा केली. थोड पुढे गेल्यावर ग्रामपंचायतीची लाठी दिसली.दरडोई दहा रुपये भरले.त्यांनी डावीकडे वळा अस सांगितले उजवीकडे वर मळा  किंवा सडा आहे जिथे एक मंदिर... नामशेष झालेल्या किल्लाचे अवशेष आहेत.तिथून मांगेलीतली घर खेळण्यातल्या घरांसारखी भासतात....अगदी वेंगुर्ले येथील लाईट हाऊस दिसते असं नंदकुमार देसाई म्हणाला.( आम्ही तिथे गेलो नाही.) गावात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा... आरोग्य केंद्र आहे. आता धुकं थोडं विरल झाले होते.पण आजूबाजूला धुक्याचे सौम्य आवरण होते.एवड्यात उजवीकडे डोंगरशिखरावरून झेपावणारे तीनशुभ प्रपात मुक्तपणे खाली झेपावताना दिसले.डोळे आणि मनआनंदीत झाले.वाटेत शेतकरी शेतात काम करताना दिसत होते.नाचणीची रोपे लावत होते. त्यांचे चिखलात माखलेले पाय...डोक्यावरच्या टोप्या...गाडीचा आवाज आला की मान वळवून बघणे मजेशीर होते.गाड्या लावण्यासाठी तयार केलेल्या जागेत गाडी लावली. तिथे पाठिमागे दोडामार्गचा अवघा परीसर दिसत होता.लहान मोठे डोंगर... त्यात हिरव्या रंगांच्या अनेक छटा... मध्ये मध्ये पडलेलं पिवळं ऊन... सुंदर दृश्य होतं ते ! समोर दिसणारे धबधबे कधी स्पष्ट दिसत तर कधी धुक्याच्या आवरणाखाली दडून जात.डावीकडे खाली डोंगर उतारावर मांगेलीतली काही घरदिसत होती.   ' दूर ..दूर माझे घर जोगाईच्या पलिकडे     पाठ राखती तयांचे डोंगराचे उंच कडे. 'या कवितेत वर्णन केलेले  गावच जणू समोर दिसत होते.आम्ही रेनकोट ...छत्र्या काखेत मारून डावीकडचा लयदार रस्ता चालायला सुरुवात केली.उजवीकडेरस्त्याच्या कडेला स्वच्छ पाण्याचे खळाळते छोटे छोटे प्रवाह दिसत होते. प्रसन्न वातावरण...स्वच्छ खेळती हवा... पायाखालची वळणवाट...वा-यावर डोलणारी झुडपे...मनाचा कोपरान कोपरा फुलून आला होता. काही पिवळी,निळी फुलपाखरे तिथे भिरभिरत होती.चार ते पाच मिनिटांत आम्ही मुख्य धबधब्याच्या समोर होतो.तिथल्या पुलावर उभे राहिले की समोर उंच कड्यावरून कोसळणारे पाणी दिसत होतं.वारा आणि धुकं यामुळे क्षणाक्षणाला समोरचा धबधबा रंग बदलत होता.धबधब्याचे पाणी नंतर मोठमोठ्या खडकांवरून उड्या घेतप्रचंड वेगाने आम्ही उभ्या असलेल्या पुलाखालून खळाळत जात होतं.दगडांवर पाणी आदळून  शुभ्र फेसाळ फुलांची उधळण होत होती. आम्ही डावीकडच्या पायवाटेने वर चढलो. तिथून  वरचा धबधबा अधिक जवळ व स्पष्ट दिसत होता.धुकं कमी झाल्याने धबधबा मस्त दिसत होता.वा-यामुळे कोसळणार पाणी इकडे तिकडे हेलकावे खात कड्याच्या कातळांवर आदळत होते... पाण्याचे तुषार उधळत जात होते.खरतर पाय तिथून हलत नव्हता. पण पुन्हा खाली पुलावर आलो. आज बुधवार असल्याने फारशी गर्दी नव्हती.जे काही तरुण तरुणी होते.ते हुल्लडबाजी करत नव्हते.(यापूर्वी तिथे हुल्लडबाजीची प्रकरणे झाली होती पण स्थानिक यांनी खंबीर भूमिका घेत त्यांना आळा घातला.)त्यामुळे एक हवीहवीशी वाटणारी शांतता...धिरगंभिरपणा तिथे होता.मी पुलाला टेकून समोरचा धबधबा डोळ्यांत साठवून लागलो...अगदी आकंठ पिऊ लागलो. सगळे सोबती खाली उतरल्यावर आम्ही पुन्हा गाडी तळाकडे परत फिरलो.पण तेवढ्यात मघापासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावली.टिटटिप पाऊस बरसू लागला.सगळी गात्र गात्र झाली.गाडीकडे येईपर्यंत पाऊस थांबला.  गाडी कडून पुन्हा एकदा समोर दिसणारे धबधबे  बघत उभे राहिलो.शुभ्र धुक्याचा एक पुंजका हलके हलके तरंगत मोठ्या धबधब्याच्या जवळून वर गेला. पुन्हा एकदा विरही यक्ष व अलकानगरीत त्याची वाट बघणारी, त्याची पत्नी आठवली.परतीच्या प्रवासात पर्वतांच्या कुशीत वसलेल्या मांगेलीला न्याहाळत आम्ही खाली उतरलो.वाटेत दोन तरुण मुले जी बुलेट वरून आम्हाला ओलांडून गेली होती त्यांची बुलेट पुढे डावीकडच्या गटारात गेली होती व ती काढण्याचा ते प्रयत्न करत होते.  परतीच्या प्रवासात आम्ही दोडामार्ग येथील श्री दादासाई मंदिर,तिलारीचा  विस्तिर्ण जलाशय...तेरवण मेडे येथील धरणाचे दरवाजे... पांडवकालीन नागनाथ मंदिर व बाजूची तिर्थ तळी पाहिली.      आंबोली ही दुर्गा...रौद्र...भिषण...गूढ...गंभीर... विस्तिर्ण...तिचं सौंदर्य हे तिच्या रौद्रपणात आहे.तर मांगेली धनलक्ष्मी सारखी...नजाकत भरी... दागदागिने घालून नटल्यासारखी...सहज... आडपडदा न ठेवणारी  .,.निर्मळ.खरी खुरी यक्षनगरी.बाळकृष्ण सखाराम राणे8605678026​