स्वप्नद्वार.... भाग 9 ( अंतारंभ)
अगदी दोन्ही हात जोडून माफी असावी. हा भाग लिहायला खूप उशीर लागला म्हणून. पुढचा दीर्घ महाएपिसोड उद्या प्रकाशित होईल 🙏
भाग 8 वरून पुढे
" हेच ते वाक्य आहे जे मी त्या तळघरात वाचल होत " मार्दव स्वरात निशांत म्हणाला.
" काय आहे ते वाक्य? " इतिहासतज्ञ संकेत यांनी कुतूहल असलेल्या नजरेने प्रश्न विचारला. त्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती. विष्णगुप्त यांचा निराशाने झाकोळलेला चेहरा आता दिव्य तेजाने लुकलुकत होता.
" जेथे बोचरा दाहक काळोख आहे तेथे त्याला चिरून भेदणारा पवित्र प्रकाशही आहे... जीथे असत्य आहे तिथे त्यावरुद्ध प्रचंड मजबुतीने उभ राहणार सत्यही आहे ... जीथे अधर्म आहे तीथे त्यावरुद्ध आपले बाहूकंट थोपटणारा धर्मही आहे .. जीथे निराशा आहे तीथे आशेचा एक किरणही आहे " त्यांच्या कंठाच्या बासरीतून ज्ञानाचे सुर बाहेर पडले . आचार्य विष्णुगुप्त यांची पांढरी लांबसडक दाढी वाऱ्याच्या झोतात गिरक्या घेत होती.
" काय आहे ते वाक्य निशांत? " विष्णुगुप्तांनी प्रश्नांचा एक कटाक्ष निशांतवर फेकला.
" ते वाक्य आहे... जेव्हा गर्द काळोख्या भव्य पाषाणात निरव निश्चिल अशी शांतता पसरेल.. अमानवी शक्तींचा तेथे थुयथुयाट असेल.. तेथेच अगदी सूक्ष्म प्रकाशाचा महाशक्तिशाली बिंदू त्यांना निस्तनाभूत करण्यास पुरेसा असेल ". निशांतच्या माथ्यावरील रेषा सरळ रेषेत ताठरल्या होत्या.
" हे वाक्य नक्की कशाशी संबंधित असेल? " आपल्या विचारक्षेत्रातून डोके बाहेर काढून इतिहासतज्ञ संकेत म्हणाले.
" मला तर हा एक उपदेश वाटतोय.. ज्यामध्ये सत्याचा असत्यावर सदैव होणारा विजय दर्शवितो आहे " आचार्य विष्णुगुप्त यांची गोंधळलेली नजर त्या पानावरुन गरगर फिरत होती.
" नक्की या ओळींचा काय अर्थ असेल आणि ह्या ओळी त्या तळघरात लिहिण्याचं कारण तरी काय असू शकत. राजा वीरवर्धनने इतक्या लेण्या, शिल्प कोरलेत.... भव्य असा सुवर्ण गरुडाचा पुतळा उभारला. तो ह्या ओळी कोठीही कोरू शकला असता पण त्याने ते नखनीशांत नकारात्मक उर्जास्थळ म्हणजेच ते तळघर का निवडलं असावं. नक्कीच यात राजा वीरवर्धनचा काहीतरी गूढ उद्देश तर असेल ? " निशांतच्या मनात उलट सुलट प्रश्नांचा अग्नी भडकू लागला होता.
" एकदा जर डॉक्टर आले तर या बुद्धिबळाच्या पटलावरील सर्व डाव अगदी स्पष्ट होऊन जाईल. त्यांना ऐतिहासिक लेखक रमेश सहस्त्रबुद्धे यांच्याकडून कुठली माहिती मिळाली आणि या तळघरात लिहलेल्या वाक्याचा त्यांना मिळालेल्या माहितीशी काही मेळ आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे आता फक्त डॉक्टरच देऊ शकतात " एवढा वेळ शांत असलेला योगेश म्हणाला.
" हो बरोबर आहे... नक्कीच डॉक्टर आशेचा किरण घेऊन येतील. त्यानंतरच आपण या खेळातला समोरचा डाव ठरवू. कारण इथे एक चुकीचा डाव आणि सरळ नरकाच द्वार अर्थातच मृत्यू.. ऐकायला जरी कटू वाटत असल तरी हेच कठोर सत्य आहे " शांत स्वरात निशांत म्हणाला. त्याचे ते कटू शब्द ऐकुन सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेची चादर पसरली. या खेळातील सर्व लयबद्ध चाली... कुठे आक्रमक पवित्रा तर कुठे बचावात्मक धोरण हे सर्व डॉक्टरांची माहिती कळल्यावरच ठरणार होत. म्हणून सर्वजण डोळ्यात प्राण आणून डॉक्टरांची मोरप्रतीक्षा करीत होते. निशांतच्या मनाचा अश्व कानात वारा भरल्यासारखा इकडे तिकडे उलट सुलट विचारांनी धावत होता.
अखेर तो क्षण आला....प्रतीक्षा संपली. डॉक्टर जड पावलांनी परतले होते. त्यांच योग्य ते आदरतिथ्य करून चर्चेची सुरवात झाली. डॉक्टरांचे शब्द ऐकण्यासाठी सर्वांच्या चेहऱ्यावर हजार सश्यांची उत्सुकता होती. त्या निश्चल स्थिरतेचा भंग करत डॉक्टरांनी सर्व घटना एकापाठोपाठ सांगितल्या. निशांतच्या चेहऱ्यावरील भाव क्षणाक्षणाला बदलत होते. कपाळावर आठ्यांनी गर्दी केली . शेवटी उदासीनतेचे गर्द वलय त्याच्या चेहऱ्यावर निर्माण झाल. न राहवून तो म्हणाला
" म्हणजे आपण जेथून या लढाईला सुरवात केली होती. अजूनपर्यंत आपण तिथेच आहो जराही पुढे सरकलो नाही तर "
" तसंच काही म्हणावं लागेल " निराशेच्या स्वरात डॉक्टर म्हणाले.
" असं काही नाही आहे. .. एक पाऊल आपण पुढे टाकलंय आपल्याला सापडलेलं ते वाक्य. त्याला आपण विसरू शकतो . So think positive guys " सर्वांना धीर देत इतिहासतज्ञ म्हणाले.
" कुठलं वाक्य? " आपला चष्मा बरोबर करत डॉक्टरांनी प्रतिप्रश्न केला.
" जे वाक्य मी तळघरात वाचल होत तेच वाक्य आम्हाला राजा वीरवर्धन यांनी मृत्यसमयी लिहलेल्या त्यांच्या शेवटच्या ग्रंथात सापडलंय " निशांत म्हणाला. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची एक लहर उमटून गेली. निशांतनी ते वाक्य डॉक्टरांनी दाखवलं. डोळे मोठे करून डॉक्टर ते वाक्य पुन्हा पुन्हा वाचत होते.
" नक्कीच हा काहीतरी छुपा संदेश आहे " आपल्या विचारकक्षेतुन बाहेर येऊन त्यांनी सांगितलं.
" म्हणजे? " निशांतने उत्सुकतेने विचारले.
" मी सांगतो.. छुपा संदेश म्हणजे... काहीतरी गुप्त माहित जी सरळ सरळ न लिहता कुठल्यातरी कोड्यात लिहलेली असते. या छुप्या संदेशाचा वापर पुरातन राजे मोठ्या प्रमाणात आपल्या सैन्याला सावध करण्यासाठी करायचे . एखाद्या शत्रूराज्यात जर गुप्तहेर असला तर तो आपल्या राजाला काही मूर्तिमंत माहिती देण्यासाठी या छुप्या संदेशाचा वापर करायचा " मोठ्या ऐटीत आपल्या ज्ञानाचा परिचय देत इतिहासतज्ञ म्हणाले.
" एक धूसर गोष्ट माझ्याही लक्षात आली आहे आणि हा माझा अंदाजही असू शकतो... ऐतिहासिक लेखक रमेश सहस्त्रबुद्धे यांचे शेवटचे शब्द असे होते... खंड 1 मध्ये काहीच असं विशेष नमूद केलेलं नाही आहे. ती अमानवी शक्ती खंड 2 शी निगडित आहे. जो फक्त त्यांनी हस्तलिखित स्वरूपात लिहायला सुरवात केली होती आणि त्यानंतर काही दिवसातच सुरु झाला भयग्रस्त स्वप्नांचा असुरी खेळ ज्याच्या शेवट त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने झाला. मृत्यूसमयी त्यांच्या ओठावर दोनच नावे होती ठगांचा प्रमुख चेतनसिंघ आणि त्याचा मुलगा अलोकसिंग म्हणून नक्कीच ती अमानवी शक्ती या दोंघापैकि एकाची असेल. पण कुणाची सरदार चेतनसिंघ कि अलोकसिंग " डॉक्टर एकाएकी शांत झाले.
" काहीतरी नक्कीच चुकतंय आपलं " निशांत स्वतःशीच म्हणाला. शंकेची पाल त्याच्या मनात चुणचुणली.
" मला तरी असं वाटतंय कि जे आपल्या हातात सध्या आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करायला हवं " खड्या आवाजात आचार्य विष्णुगुप्त म्हणाले.
" म्हणजे नक्की काय? " सर्वांनी एका सुरात विचारलं.
" म्हणजे ह्या छुप्या संदेशाचा अर्थ निदान आपण समजून घेण्याचा प्रयत्न तरी करायला हवा".सर्वांनी आचार्य विष्णुगुप्त यांच्याशी सहमती दर्शवली.
आता सर्वजण आपापल्या परीने त्या वाक्याचा अर्थ काढत होते . इतिहासतज्ञ संकेत आपली काही ऐतिहासिक पुस्तके चाडून त्या छुप्या संदेशाचा उलगडा करण्याचा अतोनात प्रयत्न करू लागले होते. निशांत ते वाक्य आपल्या मनात वारंवार छोकू लागला होता. विचारचक्राच्या क्लिष्ठ जाळ्यात तो अडकला होता.
" गर्द काळोखा पाषाण.... निरव निश्चल शांतता.... अमानवी शक्तीचा थुयथुयाट.." विचारचक्राचे क्लिष्ठ जाळे अधिकच भक्कम होत होते. एवढ्यात त्या विचारचक्राच्या क्लिष्ठ जाळ्याला भेदून निशांतच्या चेहऱ्यावर हर्षेउल्हासाचे तुषार पसरले. आनंदी स्वरात तो म्हणाला
" हा छुपा संदेश आता माझ्या लक्षात आला आहे. पूर्णपणे नाही पण जे मी सांगणार आहे त्याची शक्यताही नाकारता येणार नाही ".
सर्वांच्या नजरा आता निशांतकडे वळल्या होत्या. निशांत काय सांगणार म्हणून सर्वांनी आपले कान टवकारले होते.
" गर्द काळोखा पाषाण म्हणजे ती गुहा.. निरव निश्चल शांतता तिथेच होती आणि अमानवी शक्तींचा भयानक थुयथुयाटही तिथेच होता. मी स्वतः त्या गुहेत जाऊन परतलोय म्हणून हे सर्व वर्णन अगदी तंतोतंत जुडतंय"
" मग प्रकाशाचा सूक्ष्म महाशक्तिशाली बिंदू याचा अर्थ काय आहे? " डॉक्टरांनी प्रश्न उपस्थित केला.
" ते माझ्याही विचारशक्तीच्या पलीकडचं आहे " मान खाली घालून निशांत म्हणाला.
" राजा वीरवर्धन आपल्याला मार्ग दाखवतोय. म्हणजे या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा या अमानवी शक्तीचा अंत ही त्याच गुहेत असेल म्हणूनच तर राजा वीरवर्धने हे वाक्य त्या तळघरात लिहून ठेवलंय. राजा वीरवर्धन हा कुशाग्र बुद्धीमतेचा..त्याने रेखीव असे मनोहर शिल्प, लेण्या करल्या, ऐटदार असा सुवर्ण गरुडाचा पुतळाही उभारला पण हे वाक्य त्याने त्या तळघरात लिहणं का पसंत केलं असाव त्यामागेही काहीतरी गूढ सत्य असावं भविष्यात जर कुणी या अमानवी शक्तीच्या काटेरी कुंपणात अडकलं तर त्याला त्यातून सुखरूप निघता यावं यासाठी हा प्रबंध असावा ".
सर्वांनी आचार्य वीरवर्धन यांच्याशी सहमती दर्शवली.
" आता आपल्याला वेळ न दवडता त्या गुहेचा शोध घ्यायला हवा. आपल्याकडे आता वेळेची वाळू खूप कमी शिल्लक राहिलीय. जशी जशी रात्र वर येईल तशी तशी ती नकारात्मक अमानवी शक्ती अधिकच बळकट होईल "काहीश्या स्थिर स्वरात आचार्य वीरवर्धन म्हणाले.
सर्वजण आता जीवाचे रान करून त्या गुहेला शोधत होते. पण निराशेचा प्रवास काही संपतच नव्हता. परत एकदा ते सर्वजण ती गुहा शोधण्यात अपयशी ठरले. आतापर्यंत एकही शब्द न बोललेला आर्य आचार्य वीरवर्धन यांना हळुवारपणे म्हणाला
" गुरुवर्य आपण रुद्रदमनला फक्त काही क्षणासाठी जर बोलावू शकलो तर.... ".
आचार्य वीरवर्धन यांच्या मनाच्या शांत सरोवरात क्रोधाच्या असंख्य लहरी उठल्या. पण त्या सर्व लहरी लपवून अतिशय सौम्य शब्दात ते म्हणाले
" रुद्रदमणला इथे बोलावणे शक्य नाही बाळा.. तो ज्या संकटाशी झुंज देतोय ते संकट या समग्र सृष्टीला हानी पोहचवणार आहे ".
" मला एक कल्पना सुचलीय. डॉक्टर तुम्ही जर परत अनाहतभेदन या क्रियेचा वापर करून त्या स्वप्नदुनियेत मला पाठवलं तर त्या गुहेत जाऊन मी त्या अमानवी शक्तीच्या अंताचा उलगडा करू शकतो".
सर्वांच्या नजरा आता डॉक्टरांकडे रोखल्या . निशांतचे ते शब्द ऐकुन डॉक्टरांचे पातळ ओठ सुकले. डोक्यात विचारचक्र अतिशय तीव्र गतीने फिरू लागले होते.
विचारचक्राला शांत करत ते म्हणाले.
" शक्य नाही "
" पण का? "
क्रमश....
टीप :- रुद्रदमन कुठल्या काळ वादळाशी झुंज देतोय यासाठी वाचा " चाहूल वादळाची ".