तोतया वारसदार
पात्र रचना
निशांत - शोधकर्ता
विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.
माधव - विश्वंभर – राजाराम – माधव.
वसुंधरा - माधवची बायको.
चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं.
हेमांगी - चिन्मयची बायको.
भाग ७१
भाग ७० वरुन पुढे वाचा .......
परस्परांची ओळख झाल्यावर, माधव म्हणाला,
“हूं, मग निशांतराव, प्रथम तुमच्या कामाचं स्वरूप आम्हाला कळलं तर बरं होईल. कारण आमचं अजूनही असं मत आहे की इतक्या बारीक सारिक तपशीला करता कोणी नागपूर ते तंजावर असा प्रवास करणार नाही. ही माहिती फोन करून तुम्ही सहज घेऊ शकत होता. तेंव्हा तुम्ही खरं काय आहे ते सांगा.”
“आम्ही काही कुलवृत्तांत वगैरे च्या संदर्भात ही जाहिरात दिली नव्हती. खरं कारण हे आहे, की नागपूरचे विनायक गोखले हे सखारामपंत गोखल्यांची सहावी पिढी.” या वेळी निशांतनी त्यांना चिन्मयच्या पत्रातला मजकूर दाखवला, ज्यात सखारामपंतांचा उल्लेख होता. “तर, ह्या विनायकरावांनी मृत्यूपूर्वी आपलं मृत्यूपत्र केलं होतं आणि त्यात नमूद केलं आहे की, महादेवरावांचे सर्व वंशज शोधून काढा आणि इस्टेट त्यांच्या मधे विभागून द्या. आमच्या शोध मोहिमेत जवळ जवळ सर्वच गोखल्यांचा पत्ता लागला आहे. फक्त विश्वंभर यांच्या शाखे बद्दल माहिती नव्हती ती आत्ता मिळाली. पण ही सर्व कथा खूप मोठी आहे. जर तुमची परवानगी असेल, तर तपशीलवार सांगतो.” – निशांत.
“सांगा पण जरा आटोपशीर पणे सांगा उद्या पुन्हा आम्हाला हॉस्पिटल आहे.” – माधव.
मग निशांतनी सुरवात केली. अगदी सुरवाती पासून आत्ता पर्यन्त ज्या ज्या घडामोडी झाल्या, सुभाष प्रकरण वगळून, त्या सर्व तपशीलवार सांगितल्या. सर्व ऐकल्यावर माधवराव म्हणाले,
“विनायकरावांच्या दोन्ही मुलांनी एवढी १० कोटींची इस्टेट नाकारली? हे काही मनाला पटत नाही. खरं काय कारण आहे? विनायकरावांनी त्यांना बेदखल तर केलं नाही? विश्वास नाही बसत.”
“नाही बेदखल करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण त्यांच्यात काहीच बेबनाव नव्हता. फक्त शेवटची काही वर्ष बोलणं चालणं बंद होतं, कारण विनायकरावांना त्यांनी इथे भारतात यावं असं वाटत होतं आणि इंग्लंड मधे मुलांचा व्यवसाय असल्याने त्यांना शक्य नव्हतं एवढंच. म्हणून त्यांनी सर्व गोखल्यांना विचारा असं सांगीतलं. पण गंमत अशी की मुलंच काय, जितक्या गोखल्यांशी संपर्क झाला आहे, त्यापैकी कोणीही गोखले इस्टेट घ्यायला तयार नाहीत. तुमचा काय विचार आहे?” – निशांत.
“कोण कोण गोखले आहेत? ते तरी कळू द्या.” – माधवराव
“विश्वंभररावांचे बंधु, गंगाधरराव यांचे वंशज विश्राम आणि अनिल. ते साताऱ्याला असतात.
ओंकाररावांचे बंधु श्रीपती यांचे वंशज लक्ष्मणराव. हे गोकर्णला असतात.
ओंकाररावांची बहीण कावेरी, यांचे वंशज वसंतराव परांजपे आणि गोविंद परांजपे. हे कारवारला असतात.
सखारामपंतांची मुलगी रेवती, तिचे वंशज अक्षय साने. हे सुरतला असतात.
विश्वनाथरावांचा भाऊ दिनकरराव यांचे वंशज चंद्रकांत गोखले. हे वेळणेश्वरलाच असतात.
सखारामपंतांचा मुलगा रंगनाथ, त्याची मुलगी कावेरीचे वंशज शंकरन गोखले. हे कोजिकोडेला असतात.
आणि या सर्वांची मुलं. आता सांगा तुमचा काय विचार आहे?” – निशांत.
“निशांत, आमची तर बुद्धिच चालत नाहीये. सर्वांनीच इस्टेट नाकारली?” – माधव.
“हो पण प्रत्येकाची कारणं वेगळी आहेत. पण काका तुम्ही सांगा ना तुमचा काय विचार आहे?” निशांत.
‘हे बघ निशांत, आम्ही तिघंही डॉक्टर आहोत. इथे आमचं मोठं हॉस्पिटल आहे. आमचा बंगला केवढा आहे हे तू बघतोच आहेस. आम्ही नागपूरची इस्टेट घेऊन काय करू? काय कमी आहे आम्हाला. विना कष्टाचा पैसा नको आम्हाला.” - माधव.
“सर्वच गोखले सारखे कसे? सर्वांची कारणं वेग वेगळी आहेत, पण शेवटचं वाक्य सेम आहे. “विना कष्टाचा पैसा नको आम्हाला”. तुम्ही सर्व गोखले अगदी एकाच माळेचे मणी आहात.” – निशांत म्हणाला
“मग आता काय ठरवलं आहे? आम्ही तर बाजूला झालो आहोत.” – माधव.
असं आहे काका, ८ तारखेला सर्वच गोखले मंडळी नागपूरला जमणार आहेत. विनायकरावांचा १९ खोल्यांचा बंगला आहे. त्याला कंप्लीट रिनोव्हेशन करून समस्त गोखल्यांच्या स्वागता साठी तयार आहे. १५ दिवस वाडा एका ४ स्टार हॉटेलला सोपवला आहे. कसलीच काळजी नाहीय. २४ तास सर्विस. तुम्ही सर्वांनी पण नागपूरला यायचं आहे. तिथेच चर्चा होऊन सर्वानुमते इस्टेटी बाबत निर्णय घेतल्या जाईल. इतके दिवस किंवा वर्ष म्हणूया आपण, कोणीच कोणाला ओळखत नव्हतं. पण आता गॅदरिंग च्या निमित्ताने सर्वांची ओळख होईल. नाते संबंध पुन्हा जुळतील.” – निशांत.
“कोण कोण येत आहेत?’ – माधव.
“A TO Z सर्वच.” – निशांत.
“अरे आमचं हॉस्पिटल आहे, ते वाऱ्यावर सोडून कसं येता येईल? आणि ते ही एका आठवड्याच्या आत? वरतून १५ दिवस खूप होतात. आम्हाला पेशंट लोकांना असं निराधार सोडता येणार नाही.” – माधव.
“काही करा काका, पण अश्या इवेंट सारख्या सारख्या होत नसतात. ही संधि सोडू नका, अशी माझी कळकळीची विनंती आहे.” – निशांत.
“ओके विचार करतो. पण आता बराच उशीर झाला आहे. तुझं पण जेवण राहिलं असेल न? चला आपण जेवून घेऊ.” – माधव.
जेवण झाल्यावर निशांत जायला निघाला, तेंव्हा माधव म्हणाला,
“निशांत तू उद्या सकाळी ८ वाजता ये. आपण ब्रेक फास्ट टेबल वर सविस्तर बोलू. चालेल?” – माधव.
‘ओके. उद्या ८ वाजता येतो. गुड नाइट.” – निशांत म्हणाला आणि हॉटेलवर निघाला.
हॉटेल वर गेला तेंव्हा बरीच रात्र झाली होती, म्हणून त्याने सारंग सरांना फोन केला नाही.
सकाळी सकाळी सारंग सरांना फोन करून पूर्ण अपडेट दिलं.
“पार्टी जेन्यूइन वाटली का?” – सारंग
“१०० टक्के. सर चिंताच नको. यांनी सुद्धा तेच वाक्य उच्चारलं, जे सर्वच गोखल्यांनी म्हंटलं.” – निशांत.
“असं? कोणचं वाक्य?” – सारंग.
“विना कष्टाचा पैसा नको आम्हाला.” हे वाक्य. आता सांगा पार्टी जेन्यूइन आहे की नाही.” – निशांत.
“याचाच अर्थ असा की आपला शोध निष्फळ ठरला. बरं ते गॅदरिंग ला यायला तयार आहेत की नाही?” – सारंग.
आत्ता तिकडेच निघालो आहे. मला ब्रेक फास्टचं आमंत्रण आहे. तेंव्हाच फायनल सांगणार आहेत.” – निशांत.
“ठीक आहे. निघ तू. नंतर मला अपडेट दे.” सारंग सर म्हणाले आणि फोन ठेवला.
निशांत चिन्मयच्या घरी पोचला तेंव्हा सगळे डायनिंग टेबल वर बसून चर्चाच करत होते. तास भरायच्या चर्चे नंतर सर्वांना गॅदरिंगला येण्यासाठी राजी करण्यात निशांत यशस्वी झाला.
“आम्ही येऊ, पण १५ दिवस शक्य नाहीये. ४-५ दिवस चालतेय का? कारण १५ दिवस आमचं हॉस्पिटल सांभाळायला कोणी तयार होणार नाही.” – माधव.
“आता तुमची अडचणच असेल, तर चालेल. निदान सर्वांशी संबंध तरी येतील आणि ओळखी होतील.” – निशांत. “आणि हो खर्चाची काळजी करू नका, ती बाब आम्ही सांभाळू.”
“ठीक आहे. फायनल. आम्ही ८ तारखेला नागपूरला पोचतो.” – माधव.
निशांत मग सर्वांचा निरोप घेऊन निघाला. दुसऱ्या दिवशी नागपूरला पोचला. संध्याकाळी सारंग सर आल्यावर मीटिंग भरली.
निशांतनी सारंग सरांना पूर्ण अपडेट दिलं. त्यांचंही समाधान झालं. म्हणाले,
“म्हणजे निशांत ही अत्यंत अवघड कामगिरी तू एका हाती पार पाडलीस. तुझं कितीही कौतुक केलं तरी ते अपुरं आहे. शाबास.” सारंग सरांनी त्यांच्या पाठीवर थाप दिली. निशांतला एकदम भरून आलं. भावाचं कौतुक पाहून नयनाच्या पण डोळ्यात पाणी आलं.
विनयने निशांतला मिठी मारली. सगळं वातावरण भारल्या सारखं झालं होतं.
“बरं आता आपण वाड्यावर जायचं का? सगळी तयारी किती झाली आहे? आता फक्त ५ दिवस उरले आहेत.” – सारंग.
मग सगळे जण वाड्यावर गेले. तिथे सारंग आणि निशांत अगदी कसून पाहणी करत होते. हॉटेलची टीम आली होती, आणि ते वाड्यात त्यांची सिस्टम बसवण्याच्या प्रयत्नात होते. सारंग सरांनी त्यांची पण विचारपूस केली. “
काही मदत हवी असल्यास नयना आणि विनय आहेतच मदतीला.” असं सांगीतलं.
हॉटेलच्या लोकांनी सर्व व्यवस्था अगदी चोख केली होती. निशांत आणि सारंग सर दोघेही प्रसन्न झाले.
दोन दिवस झाल्यावर सारंग सर संध्याकाळी वाड्यावर आले. सर्व तयारी पुन्हा एकदा नजरेखालून घातल्यावर, म्हणाले,
“आता दोनच दिवस राहिले आहेत. लोकं यायला सुरवात होईल. कोण कोण केंव्हा येणार आहेत याचा सर्व प्रोग्राम तुमच्या जवळ आहे ना?” – सारंग.
“हो सर सर्व इन्फॉर्मेशन आम्हाला नयना मॅडमनी दिली आहे. १० गाड्या २४ तास तयार आहेत. कोणालाही कसलाही त्रास होणार नाही. तुम्ही निश्चिंत रहा. आज रात्री पासून नयना मॅडम आणि विनय सर इथेच राहायला येणार आहेत.” मॅनेजरने खात्री दिली.
सारंग सरांनी समाधानाने मान डोलावली आणि ते निघाले.
दुसऱ्या दिवसा पासून मंडळी यायला सुरवात झाली.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com