तोतया वारसदार
पात्र रचना
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष.
सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक
विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.
कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.
दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून
कानपूरला गेला
चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर
उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको.
विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.
स्वानंदी - विश्वास ची बायको.
सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.
नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर
पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.
रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला
स्थायिक
रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला
स्थलांतर.
अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय
सहावी पिढी. सुरतला स्थायिक.
अंबिका सखाराम पंतांची मुलगी अकाली मृत्यू.
कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न
श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.
विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
जय व्यंकटेशचा मुलगा.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –
सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
दिनेश आणि प्रांजल - विश्रामची मुलं. सातारा
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.
माधव - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला
स्थायिक
वसुंधरा - माधवची बायको.
चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं.
हेमांगी - चिन्मयची बायको.
कावेरी - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.
वसंतराव परांजपे कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज
प्रभावती वसंतरावांच्या पत्नी
त्र्यंबक वसंतरावांचे काका.
गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ.
श्रीकांत आणि विक्रम -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात.
सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.
विशाखा सुधाकररावांची बायको.
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष गोखले -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार
भाग ७३
भाग ७२ वरुन पुढे वाचा .......
त्याला बबनने म्हणजे आमच्या प्यून ने आपल्या जाळ्यात ओढलं. मी जी गोखल्यांची फाइल बनवली होती ती बबनने वाचली आणि त्याचं डोकं फिरलं. हे सुद्धा निशांत मुळेच कळलं. पण क्लेम साठी त्याने ज्या काही लटपटी केल्या आहेत, तो अपराध आहे, त्यामुळे त्याला सोडता येणार नाही.” – सारंग सरांनी मग त्याने काय काय करामती केल्या त्याचा सर्व तपशील सांगीतला.
“माय गॉड, मग आता सारंग सर तुमची काय योजना आहे?” – व्यंकटेश.
“उद्या त्याचा आणि आमचा सामना रंगणार आहे. तुम्ही सर्व हजर असणार आहात.
दूसरा दिवस. सकाळी ११ वाजता सुभाष वाड्यावर हजार झाला. बबनला पण सारंगने बोलावलं होतं. तो पाच मिनिटं अगोदर आला. हॉल मधे दोन खुर्च्या मांडल्या होत्या, समोर तीन खुर्च्या आणि मधे सेंटर टेबल. मागच्या बाजूला तमाम गोखले मंडळी बसली होती. सेंटर टेबल वर सुभाषने शपथ पत्रासह दिलेल्या अर्जाच्या दोन प्रती ठेवल्या होत्या. सारंग, किरीट आणि डॉ.प्रशांत तीन खुर्च्यांवर बसले. सुभाष आल्यावर त्याला बसायला सांगीतलं. नयनाने खूण केल्यावर हॉटेलच्या माणसाने त्यांच्या समोर चहा आणि बिस्किटं ठेवली.
“घे सुभाष चहा घे. मग आपण बोलू निवांत. मी ओळख करून देतो. हे डॉ. प्रशांत. हे C.A. किरीट आणि मला तू ओळखतोच. आम्ही तिघं ट्रस्टी आहोत. तू जे काही मला सांगीतलं आहेस, त्यांची आता पडताळणी होणार आहे. जे काही प्रश्न विचारले जातील, त्यांची समाधानकारक उत्तरं तू दिलीस, तर तुझा अर्ज फायनल होईल. तयार आहेस का? की अजून वेळ हवा आहे? तुझ्या अर्जाची तूच दिलेली कॉपी इथे आहे, ती बरोबर आहे का याची हवं असल्यास खात्री करून घे मग आपण सुरवात करू.” – सारंग.
“सर, मला इथे वाड्यावर का बोलावलं? ऑफिस मधे का नाही? आणि ही सगळी मंडळी कोण आहेत? आपली मीटिंग तर आपल्या मधेच असायला हवी, मग हे लोक का जमले आहेत?” – सुभाष.
“तुझे प्रश्न एकदम रास्त आहेत. मी सांगतो. हा वाडा विनायकराव गोखल्यांचा आहे.
ते डावीकडून पहिल्या दोन खुर्च्यांवर बसले आहेत, ती विनायकरावांची मुलं आहेत. ते लंडनला असतात. ते आणि बाकी बसलेले सगळे, गोखलेच आहेत, आणि सर्व वारसदार आहेत. कोणालाही इस्टेटीत वाटा नको आहे. कोणीही क्लेम केलेला नाहीये. क्लेम करणारे तुम्हीच एकटे आहात. त्यामुळे तुमची स्क्रूटिनी आवश्यक आहे, आणि ती ही या लोकांच्या समोर, कारण विनायकरावांची इस्टेट कोणाच्या हातात जाते हे जाणून घेण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे. तुमची याला हरकत नसेल, तर आपण चौकशी सुरू करू.” – सारंग.
सारंग सराचं बोलणं ऐकल्यावर, सुभाष मनातून चांगलाच घाबरला. त्याने बबन कडे पाहिले, बबनने मान दुसरीकडे वळवली. त्यालाही कळत नव्हतं की नेमकं काय चाललं आहे ते. त्याला सारंग नावाच्या तोफेच्या तोंडी जायचं नव्हतं. त्याने आपला चेहरा निर्विकार ठेवला. सुभाषचा आता नाईलाज झाला, तो म्हणाला,
“हो सर चालेल न, गोखले आहेत म्हणजे सगळे माझेच नातेवाईक आहेत, फक्त मी ओळखत नाही एवढंच. करू या आपण सुरवात” – सुभाष.
“ओके, किरीट सर करा सुरवात.” – सारंग. पण सुरवात प्रशांत ने केली.
मग प्रशांतनी अतिशय शांत स्वरात सुरवात केली. त्यांनी सुभाषने अर्जा बरोबर दिलेला अविनाशचा फोटो घेतला आणि म्हणाला, “हा अविनाशचाच फोटो आहे. तुमच्या आईचा फोटो नाही लावलेला इथे?”
“नाही, त्यांची कॉपी करायला वेळ नाही मिळाला, हा मी आणला आहे बरोबर.” सुभाषनी आणलेले दोन फोटो समोर ठेवले. दोन्ही फोटो कुरतडल्या सारखे फाटले होते. त्यात सुभाष आणि त्याची आई होती. आता सगळे पेपर झाले ना बरोबर?” सुभाष म्हणाला.
“ओके,” सारंग म्हणाला, “बबन, या फोटोंच्या सहा कॉपी काढून आण पटकन.”
१० मिनिटांत बबन कॉपी घेऊन आला. तो पर्यन्त सर्व चहा पित होते आणि प्रशांत शपथ पत्र वाचत होता.
शपथ पत्र वाचून झाल्यावर, प्रशांतने सुभाषला विचारले की
“सर्व बरोबर आहे ना? की अजून काही राहिलं आहे?”
“नाही साहेब, सर्व गोष्टी लिहिल्या आहेत.” – सुभाष.
“तुम्ही तुमचे आणि तुमच्या आईचे फोटो आणले आहेत, आत्ताच बबनने त्यांच्या कॉपी पण काढून आणल्या आहेत, त्या तुमच्या शपथ पत्राला जोडा, आणि त्या तश्या जोडल्या आहेत असं शपथ पत्रात लिहा. आणि त्या फोटोवर सही पण करा. जसा तुम्ही तुमच्या वडिलांचा फोटो जोडला आहे तसा.” – सारंग.
सुभाषने जसं सारंग वकील म्हणाले, तसं केलं.
प्रशांतने शपथ पत्राला लावलेला फोटो पाहिला. मग त्याने निशांतने हिंदमोटर वरुन शेजाऱ्यांनी दिलेला फोटो काढला, आणि समोर ठेवला.
“या फोटोत तुमच्या आई बरोबर कोण आहे?” – प्रशांतने विचारले.
सुभाषने फोटो पाहिला, त्यात आश्विन होता. सुभाषच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्याने बबन कडे पाहिलं, बबनच्या चेहऱ्यावर सुद्धा आश्चर्य होतं, त्याला ही कळत नव्हतं की हा फोटो कोणी दिला ते. पण त्याने आपला चेहरा निर्विकार ठेवला. पण एका क्षणातच सुभाषने स्वत:ला सावरलं. त्यांच्या आता लक्षात आलं होतं की लढाई आता विरुद्ध बाजूकडे झुकत चालली आहे ते.
“हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला?” – सुभाष.
“ते महत्वाचं नाहीये, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या.” – सारंग.
“मामा आहे. हा फोटो आम्ही हिंद मोटरला असतांना काढलेला आहे.”
“हा तुमचा मामा आहे का? काय नाव आहे मामाचं?” – सारंग.
“सुबोध बॅनर्जी. पण आता त्याला मृत्यू पावून तीन वर्ष झालीत.” सुभाषनी खरं खरं सांगीतलं.
“तुमचा मामा पण तिथेच नोकरीला होता का?” – सारंग.
“हो.” – सुभाष.
“म्हणजे, बंगलादेशातून तुम्ही सगळे बरोबरच भारतात आले का?” – सारंग.
“नाही, मामा अगोदर आले, त्यांना एका ठिकाणी नोकरी मिळाली, मग त्यांनी आम्हा सगळ्यांना तिथे बोलावून घेतलं.” – सुभाष.
“तुमच्या मामाचा मुलगा आता कुठे असतो?” - सारंग
“त्याला मूल बाळ नाही साहेब. आणि मामी ला जाऊन पण वर्ष होत आलं.” सुभाषची आता बुडत्याचा पाय खोलात अशी अवस्था झाली होती. आता त्याला खोट्या माहितीची इमारत बांधणं आवश्यक होतं.
“हिंद मोटर मधे तुम्ही आणि मामा कुठे राहत होता?” – सारंग.
आता सुभाष मनातून घाबरला होता, सारंग वकील म्हणजे काय चीज आहे, हे त्याच्या हळू हळू लक्षात येत होतं. त्यांनी बबन कडे पाहिलं, बबनने त्याची नजर चुकवली आणि तो खाली बघू लागला. सुभाष जवळ आता आक्रमक होण्याशिवाय पर्याय नव्हता. तो म्हणाला
“साहेब, माझ्या मामाचा आणि या केसचा काय संबंध आहे? तुम्हाला कसंही करून माझा क्लेम डावलायचा आहे होय ना?”
“नाही असं नाहीये.” -सारंग म्हणाला
“त्याचं काय आहे सुभाष,” प्रशांत म्हणाला, “तुम्ही तुमचे वडील, विनायकरावांचे चिरंजीव आहेत, हे नी:संदिग्ध पणे सिद्ध करू शकला नाही, त्यामुळे कोणी तरी असा हवा, की जो याबद्दल काही ठोस पुरावा देऊ शकेल. त्यामुळे आम्ही विचार करत होतो, की तुमचा मामा किंवा त्यांचा मुलगा, या बाबतीत काही सांगू शकेल म्हणून.”.
“नाही साहेब, आता मामा आणि मामी दोघेही नाहीत, त्यामुळे घर नाही, आणि घराचा पत्ता पण नाहीये.” – सुभाष.
“सुभाष, तुम्ही आणलेल्या, या तुमच्या फॅमिली फोटो मधे तुमचे वडील पण असावेत असं वाटतंय पण तेवढा भाग फाटल्या सारखा दिसतोय.” – सारंग.
“होय साहेब, खरं आहे, पण त्याला काय करणार? तुमच्याच सांगण्यावरून, फोटो जसा मिळाला तसा आणला.” – सुभाष.
प्रशांतने आता, निशांतने हिंद मोटर वरुन, शेजाऱ्यांनी दिलेला दूसरा फोटो बाहेर काढला, आणि तो सुभाषने दिलेल्या फोटो जवळ ठेवला. निशांतने आणलेल्या फोटोत फाटलेल्या जागी आश्विन होता. तो फोटो दाखवून प्रशांत म्हणाला “सुभाष आता तुम्हाला काय सांगायचं आहे?”
सुभाषच्या मनात चाललेली चल बिचल आता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तरी तो म्हणाला
“माझ्या फोटोत बाबाच होते. हां असं असेल, दोन फोटो काढले असतील. एका फोटोत बाबा आणि एकात मामा. पण साहेब हा फोटो तुम्हाला कुठे मिळाला?”
प्रशांतने सुभाषच्या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही. तो सुभाषला म्हणाला,
“तुम्ही आणलेला फोटो अविनाशचाच आहे यात शंका नाही. कुठे काढला आहे हा फोटो?”
“माहीत नाही साहेब, घरी जो सापडला तो आणला. खूप जुना आहे.” – सुभाष.
“ठीक आहे, पण मग हा फोटो कोणाचा आहे?” असं म्हणून त्याने निशांतने आणलेला अश्विनचा फोटो टेबलावर ठेवला.
तो फोटो पाहिल्यावर सुभाषचा चेहरा पांढरा फटक पडला. ह्या बाऊंसर ची त्याने कल्पनाच केली नव्हती, तो बघतच राहिला. पण लवकरच सावरला.
“हा तर मामाचा फोटो आहे. तुमच्याकडे कसा आला?” – सुभाष
ते महत्वाचं नाहीये. आणि तुम्ही प्रश्न विचारू नका. आम्ही विचारणार. आणि त्याचं उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात.” – प्रशांत.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com