तोतया वारसदार
पात्र रचना
सारंग - वकील, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
डॉ प्रशांत - डॉक्टर, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
किरीट - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे सदस्य
निशांत - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता
नयना - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर
महादेवराव - घराण्याचा मूळ पुरुष.
सखारामपंत - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक
विश्वनाथ - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.
कौशिक - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.
दिनकर - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून
कानपूरला गेला
चंद्रकांत गोखले - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर
उज्ज्वला - चंद्रकांत गोखल्यांची बायको.
विश्वास - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.
स्वानंदी - विश्वास ची बायको.
सुनील - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.
नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर
पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.
रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला
स्थायिक
रेवती सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला
स्थलांतर.
अक्षय साने - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय
सहावी पिढी. सुरतला स्थायिक.
अंबिका सखाराम पंतांची मुलगी अकाली मृत्यू.
कावेरी रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न
श्रीरंग कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या वेळेस सैन्यात गेला.
सीता, सरिता जान्हवी – श्रीरंग च्या मुली.
शंकरन - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.
विनायक भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक
व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.
जय व्यंकटेशचा मुलगा.
रोहन - सौमित्रचा मुलगा
लक्ष्मण आणि वर्षा - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.
गोकर्णला स्थायिक.
विश्राम आणि अनिल - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –
सहावी पिढी.
साताऱ्याला स्थायिक.
दिनेश आणि प्रांजल - विश्रामची मुलं. सातारा
विनय - अनिलचा मुलगा सातारा.
विश्वंभर - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.
माधव - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला
स्थायिक
वसुंधरा - माधवची बायको.
चिन्मय आणि विवेक - माधव ची मुलं.
हेमांगी - चिन्मयची बायको.
कावेरी - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.
वसंतराव परांजपे कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज
प्रभावती वसंतरावांच्या पत्नी
त्र्यंबक वसंतरावांचे काका.
गोविंद वसंतरावांचा धाकटा भाऊ.
श्रीकांत आणि विक्रम -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात.
सुधाकर गोखले निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.
विशाखा सुधाकररावांची बायको.
बबन - सारंग सरांचा चपराशी
सुभाष गोखले -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार
भाग ७४
भाग ७३ वरुन पुढे वाचा .......
“ठीक आहे, पण मग हा फोटो कोणाचा आहे?” असं म्हणून त्याने निशांतने आणलेला अश्विनचा फोटो टेबलावर ठेवला.
तो फोटो पाहिल्यावर सुभाषचा चेहरा पांढरा फटक पडला. ह्या बाऊंसर ची त्याने कल्पनाच केली नव्हती, तो बघतच राहिला. पण लवकरच सावरला.
“हा तर मामाचा फोटो आहे. तुमच्याकडे कसा आला?” – सुभाष
ते महत्वाचं नाहीये. आणि तुम्ही प्रश्न विचारू नका. आम्ही विचारणार. आणि त्याचं उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात.” – प्रशांत.
सुभाष काही बोलला नाही. पण आता तो थोडा घाबरला होता. सारंग आणि निशांत काय चीज आहे हे त्याला बबन वारंवार सांगत होता, पण त्याच्या मते, त्याने त्याचं काम इतकं चोख केलं होतं की सारंग त्यात काही चुका काढू शकेल असं त्याला वाटलंच नाही. पण आता सारंग सरांच्या गोलंदाजीवर खेळणं त्याला मुष्कील होत होतं.
डॉ. प्रशांत सुभाषने दिलेल्या कागद पत्रांची चाळवा चाळव करत होते, त्यांनी तीन कागद बाहेर काढले. म्हणाले,
“तुमच्या जवळ पासपोर्ट आहे?” – प्रशांत.
“साहेब, मी महापालिकेत क्लार्कची नोकरी करणारा साधा माणूस आहे. मी परदेशात जायची स्वप्न सुद्धा बघत नाही, मग माझ्या जवळ पासपोर्ट कुठून असणार?”-सुभाष.
“ओके, मग ही डिग्री, मॅट्रिकचं सर्टिफिकेट आणि बांग्ला देशच्या शाळेचं सर्टिफिकेट, हे कशाकरिता जोडलं आहे?” – प्रशांत.
आता सुभाषच्या चेहऱ्यावरचा रंग थोडा बदलला. जरा बरा झाला. सुभाष थोडा सावरला.
“ते मी अविनाशचा मुलगा आहे, याचं प्रूफ म्हणून जोडले आहेत.” – सुभाष.
“हूं, बरोबर आहे, या तिन्ही सर्टिफिकेट वर तुमच्या वडीलांतचं अविनाश हेच नाव आहे. पण डिग्री दिल्यावर, मॅट्रिकचं आणि शाळेचं सर्टिफिकेट जोडण्याची आवश्यकता नव्हती.”– प्रशांत
“साहेब, कुठलाही संशय राहू नये म्हणून जोडली.” – सुभाष.
“हे तुम्ही बरं केलत. डिग्रीचा तर प्रश्न नाही, पण आम्ही बोर्डात चौकशी केली तेंव्हा आम्हाला असं कळलं की तुम्ही मागच्याच महिन्यात सर्टिफिकेटच्या कॉपी साठी अर्ज केला होता म्हणून. ते हेच सर्टिफिकेट आहे का?” – प्रशांत.
“हो साहेब, माझ्या जवळचं ओरिजिनल हरवलं होतं म्हणून मी कॉपी मागीतली. काही चुकलं का साहेब?” – सुभाष.
मागेच बसलेले सर्व गोखले मंडळी शांतपणे सवाल जबाब ऐकत होते. चौकशी कशी असते हे सर्व प्रथमच पहात होते.
“पण आम्ही शाळेत जेंव्हा चौकशी केली, तेंव्हा कळलं की असा कुठला पत्र व्यवहार झालाच नाहीये.” – प्रशांत.
“साहेब, शाळेच्या पत्र व्यवहाराबद्दल मला कसं कळणार?” – सुभाष.
“प्रशांत, मला सुभाषचं म्हणण पटतंय पत्र व्यवहार ही शाळेची अंतर्गत बाब आहे. त्याबद्दल सुभाषला माहीत असण्याचं काहीच कारण नाहीये.” – सारंग.
“ओके. सुभाष, तुम्ही हे बांग्ला देशच्या शाळेचं सर्टिफिकेट दिलं आहे ते सुद्धा तुमच्या वडिलांचं नाव अविनाश आहे हे प्रूव करण्यासाठीच आहे न?” – प्रशांत.
“हो साहेब.” – सुभाष. त्याला कळतच नव्हतं की चौकशी कुठल्या दिशेने चालली आहे ते. तो गोंधळून गेला होता. त्याने बबन कडे पाहीलं, पण बबनने नजर चुकवली.
प्रशांतच्या हातात आता निशांतने आणलेलं सर्टिफिकेट होतं. त्याने सुभाषने दिलेलं सर्टिफिकेट पण काढलं. आणि दोन्ही टेबल वर ठेऊन म्हणाला,
“ही दोन्ही सर्टिफिकेट बघा आणि तुमचं मत सांगा.”- प्रशांत.
सुभाषने बांग्लादेशच्या शाळेचं निशांतने आणलेलं सर्टिफिकेट बघितलं आणि त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. बबन सुद्धा भीतियुक्त आश्चर्याने बघतच राहिला. सगळं संपलं आहे, हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तो थर थर कापत होता. सुभाषने त्यांच्याकडे पाहीलं, आणि त्याचंही अवसान गळून पडलं.
“सुभाष आश्विन गोखले, हे दुसरं सर्टिफिकेट निशांतने बांग्लादेशला जाऊन तुमच्या शाळेतूनच आणलेलं आहे. आम्ही त्यांना तुम्ही दिलेलं सर्टिफिकेट दाखवलं तेंव्हा त्यांनी तुमचं सर्टिफिकेट खोटं आहे असा निर्वाळा दिला. त्यांनी तसं लेटर पण दिलं आहे. चंद्रपूरच्या शाळेत तुम्ही ज्या माणसाच्या बरोबर संगनमत करून बोर्डाला परस्पर पत्र पाठवण्याची बदमाशी केलीत, तो माणूस पण पकडल्या गेला आहे. शाळा बहुधा त्याला नोकरीतून काढून टाकेल. बोर्ड आणि यूनिवर्सिटी या दोन्ही शासकीय संस्था आहेत. तुमचे उपद्याप कळल्यावर ते लोकं तुम्हाला सोडणार नाहीत. आमच्या अंदाजा नुसार तुम्ही महापालिकेत सुद्धा नाव बदललेलं असावं, एवढं सगळं झाल्यावर पालिका सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. तेंव्हा किमान ५ वर्षा साठी तयारीत रहा.” – सारंग.
हे ऐकल्यावर सुभाष रडायलाच लागला. म्हणाला.
“साहेब, मी चुकलो, खूप मोठा अपराध केला आहे तुमचा, माझी बायको आहे, मुलगा आहे ती उघड्यावर पडतील हो. माझ्यावर दया करा. बबनराव तुम्ही तरी सांगा हो सरांना.”
“सुभाषशेठ, बबनराव सांगतीलच तुम्हाला, पण आता कॉफी हाऊस मधे नाही तर लॉकअप मधे. काय बबनराव बरोबर आहे ना?” – सारंग.
आता बबन सुभाषच्या बाजूला येऊन उभा राहिला, तो ही रडतच होता. पण सारंग सरांना विनंती करायची सुद्धा त्यांच्यात हिम्मत नव्हती.
मग सारंग सर मागे आले आणि सर्व गोखल्यांच्याकडे वळून म्हणाले,
“आता मी इंस्पेक्टर धनशेखर यांना बोलावणार आहे. ते आल्यावर यांची सगळी कथा सांगून या दोघांना त्यांच्या सुपूर्त करणार आहे. तुमची संमती आहे का?”
पांच मिनिटं शांततेत गेली. तो पर्यन्त सुभाष आणि बबनच्या काळजाचं पाणी पाणी झालं. मग अचानक दोघंही उठले आणि व्यंकटेश आणि सौमित्रचे पाय धरले.
“साहेब, आम्ही तुमचं खूप मोठा अपराध केला आहे. तुम्ही जी शिक्षा द्याल ती आम्हाला मान्य आहे पण पोलिसांत देऊ नका. आमचा संसार उघड्यावर पडेल हो. दया करा.” असं म्हणून दोघंही पायावर डोकं ठेवून रडायला लागले.
सारंग सर आता समोर आले. आणि जरा दरडावूनच म्हणाले,
“बंद करा आता तुम्ही ही नाटकं. उठा आणि तिथे जाऊन उभे रहा. बसण्याचा अधिकार तर तुम्ही गमावलाच आहे. रडून गोंधळ घातला तर इथेच पिटाई होईल. उठा.”
दोघे चूप चाप उठले, आणि आपल्या जागी जाऊन उभे राहिले. रडणं चालूच होतं.
मग सारंग सर पुन्हा गोखले मंडळी कडे वळून म्हणाले,
“मी पोलिसांना बोलावतो आहे. निशांत, तुमचा टेलीफोन दाखव कुठे आहे?” – सारंग.
आता सुधाकर गोखले बोलायला उठले.
“मी सुधाकर गोखले. कानपूर. मी तसा बाहेरचा आहे. पण आत्ता इथे जे काही घडलं, त्याचा साक्षीदार आहे. मला जरा माझं मत मांडायचं होतं, तर परवानगी आहे का?”
दोन मिनिटं कोणीच बोललं नाही, मग व्यंकटेश बोलला.
“सुधाकरराव तुम्ही म्हणाले की तुम्ही बाहेरचे आहात म्हणून, पण आम्हाला तसं वाटत नाही. तुम्ही खुशाल बोला.”
“मला असं वाटतं की, किती झालं तरी सुभाष एक गोखले आहे. म्हणजे दूरचा का असेना आपल्याच गोत्राचा आहे. त्याने मार्ग सपशेल चुकीचा निवडला, तरी त्याचा हेतु चांगला होता. त्याला समाज सेवा करण्यासाठी पैसा हवा होता. त्याच्या अपराधाचं मी समर्थन करत नाहीये, पण आपलाच एखादा माणूस चुकला असेल, तर आपण एक संधि देतोच, तसाच विचार सुभाषच्या बाबतीत व्हावा असं मला वाटतं. निशांतने त्यांची कुंडली काढलीच आहे, त्यावरून तो निर्ढावलेला गुंड किंवा सराईत बदमाश वाटत नाही. तो जर पुन्हा आयुष्यात कधीही वाम मार्गाला लागणार नाही अशी ग्वाही देत असेल, तर जरा विचार करावा. त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात कोणाचाच फायदा नाहीये. मी माझं मत मांडलं. शेवटी निर्णय तुमचाच असणार आहे.”
हॉल मधे टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता पसरली. सुधाकरराव असं काही बोलतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण निश्चितच सर्व विचारात पडले होते. सुधाकररावांच बोलणं ऐकल्यावर सुभाष आणि बबन सुद्धा मान वर करून त्यांचं बोलणं ऐकत होते. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आता पुढे काय होईल हाच विचार त्यांच्या मनात होता.
अचानक सर्वच बोलायला लागले. सारंग सरांनी हात वर करून सर्वांना थांबवलं.
“आत्ता सुधाकरराव जे बोलले, त्यावर चर्चा करायची आहे का? तसं असेल, तर सुभाष आणि बबनला दुसऱ्या हॉल मधे पाठवतो. म्हणजे सर्वांना आपापली मतं मोकळे पणाने मांडता येतील. मग सर्वानुमते जे ठरेल त्या प्रमाणे अॅक्शन घेऊ.” सारंग सर म्हणाले.
सर्वांच्या वतीने व्यंकटेशने होकार दिला.
“निशांत, या दोघांना मागच्या हॉल मधे घेऊन जा. काय चहा आणि नाश्त्याची व्यवस्था कर. जो पर्यन्त ते या घरात आहेत, तो पर्यन्त ते आपले पाहुणे आहेत.”- सारंग.
निशांत त्यांना मागच्या हॉल मधे घेऊन गेला. मॅनेजरला बोलावून चहा पाण्याची व्यवस्था करायला सांगितली.
मग सारंग म्हणाले की “सर्व एकाच वेळेस बोलले तर कोणालाही कोणाचं काय म्हणण आहे ते कळणार नाही. त्यामुळे एक एक जण बोला. सर्वांचं बोलणं झाल्यावर आपण जरूर पडली तर व्होटिंग घेऊ.”
सर्वात सीनीयर व्यंकटेश, म्हणून सर्वांनी त्यालाच आपलं मत मांडायला सांगीतलं. मग व्यंकटेश बोलायला उभा राहिला.
क्रमश:........
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com