भाग 2 वरून पुढे
" मॅडम आपला स्मॉल साईझ पिझ्झा आणी हॉट कॉफी " वेटरच्या आवाजाने अदिती भानावर आली.खरंतर मनात प्रेमरंगाचा मयूरपिसारा फुलला होता. आपल्या केसांशी चाळे करत अजूनही ती त्याला चोरनजरेने न्हाहाळतच होती पण साधी नजरा नजरही न व्हावी केवढं हे दुर्दैव. पोटात असंख्य फुलपाखरांनी अगदी थव्याने उडून मनला खट्याळ गुदगुल्या कराव्या असेच काहीसे तिला भासत होते.मनाच्या लडिवाळ द्वंदात तिने पिझ्झा आणी हॉट कॉफी कधी संपवली हे तिला देखील कळले नाही.
" मॅडम आपले बिल " वेटरने परत एकदा तिच्या मनातल्या पहिल्या प्रेमद्वंदाला भंग केले होते. पैसे देण्यासाठी अदिती आपली पर्स चाचपडू लागली होती पण दुर्दवाने ती पर्स तिच्या रूमवरच विसरली होती .
" अशी कशी मी पर्स विसरू शकते ...आता काय होणार...हे सर्व माझ्यावर लबाड मुलगी या नजरेने तर नाही पाहणार ?" अदितीच्या घायाळ मनाला शंकेच्या इंगळया पोखरू लागल्या होत्या.
" idea ... मेघाला पैसे घेऊन इथेच बोलावते" तिच्या गोबऱ्या गालावर संतुष्टेची एक लकेर उमटली होती. पण कितीही फोन लावले तरी मेघाचा फोन नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर येत होता.
" आज आपलं नशीबच वाईट आहे वाटते " मनाच्या डोहात शंकेचा भोवरा फिरू लागला होता. ती काउंटरवर जाऊन काही वेळातच पैसे आणून देण्यासाठी विनंती करू लागली. बिल काउंटर वाल्यांनीही अगदी सरळ सरळ बजावून सांगितले
" जोपर्यंत पैसे घेऊन येणार नाही तोपर्यंत मोबाईल त्यांच्याकडे ठेवावा लागेल".
अदिती मुंबईत नवीनच होती. मुबंईत ती मेघाशिवाय कुणालाच ओळखत नव्हती शिवाय त्यांची रूमही कॅफेपासून बरीच दूर होती तसेच कुणाही अनोळखी व्यक्तीजवळ आपला मोबाईल देणे तिला योग्य वाटत नव्हते. शंकेच्या विचाराच्या तप्त उन्हात ती होरपळून निघत होती.
" काय प्रॉब्लेम झालंय ?" कुणाच्यातरी प्रेमळ स्वरांनी तिला धीर आला. बिल काउंटर वाल्यांनी सर्व घटना अगदी क्रमाक्रमाने सांगितल्या.
" काही हरकत नाही यांच बिल मी देऊन देतो त्यात काय एवढं " अगदी बारीक नाजूक हास्य देऊन तो तरुण म्हणाला.
" नको नको मी करीन काहीतरी मॅनेज...खरंच नको " नकार देत अदिती म्हणाली.
" मुंबईसारख्या शहरात कुणाहीजवळ आपला खाजगी मोबाईल ठेवणे बरोबर नाही .अहो माझा मघाशी तुम्हाला धक्का लागला ना हवं तर त्याचीच भरपाई समजा " समजूत काढीत तो तरुण म्हणाला.
त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असतांना अदिती आपले भाग हरपून गेली होती. हे समग्र जग हिमगरासारखं अगदी गोठून स्तब्ध झालंय. या सुंदर जगात निश्चल अशी शांतता पसरलीय आणी त्या निरव जगात अदिती एकटीच उभी राहून त्या तरुणाकडे पाहत रमून गेली होती. वाऱ्याच्या थंडगार झुळकेने तिचे केस भुरुभुरु उडत होते. रात्रीच्या काळोखात किजव्यांनी टिक टिक करीत लुकलुकाव तसें तिचे नेत्र लुकलुकत होते. त्या जगातून कुणीतरी प्रेमगीत छेडावं तसं कॅफेत सुरु असलेलं नवं संगीत तिच्या कानात शिरू लागलं होत.
💞 पाहताक्षणी वाटे कुणी आपुला
हे वेड जे स्वप्नातुनी जपलं
दिसतांना लपत
हसताना रुसत
सरल्यावर उरत ...प्रेम हे
विरलेले धागे
जुळलेले धागे
श्वासांचा बंध ....प्रेम हे 💞
( song credit :- प्रेम हे सिरीयल )
तो तरुण कितीतरी वेळपासून बोलत होता पण अदितीच्या कानात त्याचे कुठलेच शब्द शिरत नव्हते. शेवटी तो तरुण कॅफेच्या बाहेर जायला निघाला. नकळतपणे स्तब्ध झालेली अदितीही त्याच्यामागोमाग पाषाणाच्या पुतळ्याप्रमाने बाहेर जायला निघाली. बाहेरच्या वर्दळीने अदिती या जगप्रवाहात परतली.
" नक्की काय झालं होत मला....कुठल्या विश्वात हरवून गेले होते मी....कुठली भावना असेल ही ..प्रेम तर नसावं ना ? " तिच्या मनाच्या पडद्यावर कितीतरी प्रश्न उमटले होते. या सर्व भावनाचक्रात तिला उमगलं कि तिने त्या तरुणाचे साधे नावही विचारले नाही. दूर जाणाऱ्या तरूणाला ती हाका मारत होती पण त्याने कानात हेडफोन घातले असल्यामुळे त्याला तिचा आवाज ऐकू येणं जरा कठीणच होत.
अदिती रूमवर परतली . कुठल्यातरी भावनाशून्य जगात ती परत रमली होती. त्या भावनाशून्य जगात गुलाबांची गुलाबी सुमने फुलली होती आणी ती सुमनेही केवढी खट्याळ त्या पुष्पांनीही त्याच्याच चेहरा तयार केला होता.
" देवा परत एकदा तो मला भेटू दे निदान धन्यवाद तरी म्हणू दे...किती मूर्ख आहे ना मी त्याच नाव तरी विचारायला हवं होत. या धुंद जगाच्या कुठल्या कोपऱ्यात मी हरवले होते कुणास ठाऊक " अदिती स्वतःशीच हितगुज करीत होती. मनोमन परत त्याच्या भेटीची आस तिला लागली होती.
" काय मॅडम कुठे हरवलात.... एकट्या एकट्याच हसत आहात. प्रेमात पडल्या वाटतंय कुणाच्यातरी" कुचका देत मेघा म्हणाली.
" तुझं आपलं काहीतरीच "
" सांग सांग काय झालंय अदिती काहीतरी नक्कीच आहे. तुझ्या चेहऱ्यावरील छटा सर्व काही सांगून जात आहे " मेघा तिला बालिशपणे चिडवीत होते.
" काही नाही ग " आपल्या भावना लपवून लटका राग दाखवत अदिती म्हणाली.
भावना हा शब्द जरी तीन अक्षरांचा असला तरी किती प्रचंड सामर्थ्य असतं ना त्या शब्दात . एकदा जर कुठलाही मनुष्य भावना या संज्ञेत अडकला तर तो कुठल्या तळाला जाईल हे कुणीच सांगू शकत नाही .अदितीही आकर्षण म्हणावं कि पहिल्या नजरेतल प्रेम म्हणावं या भावनेच्या दलदलीत ती अडकत चालली होती. त्या तरुणाच्या एका भेटीसाठी ती मोरप्रतीक्षा करीत होती.
क्रमश ....
पुढचा भाग काही तासात