भाग 5 वरून पुढे
खोलीत कुणाच्यातरी धारदार शस्त्र असलेल्या सावल्या अधिकच गडद होत चालल्या होत्या. शरीरात उसडलेल्या वेदनेमुळे अदितीला एका जागेवरून साधं हलताही येत नव्हतं. तरीसुद्धा ती त्या सावल्यांचा कानोसा घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करीत होती. मनात एका अनामिक भीतीची हुरहूर लागली होती. एवढ्यात कुणाच्यातरी सॅण्डलचा आवाज तिच्या कानावर आदळू लागला
तश्या त्या सावल्याही कुठेतरी अदृश्य झाल्या. अदितीच्या आईने तिच्या खोलीत प्रवेश केला. अदितीची अशी अवस्था पाहून आईच्या नेत्रात दुःखरूपी साचलेले मळभ गालावरून ओघळू लागले होते. अदितीच्या कपाळावरून मायेचा हात फिरवत नक्की काय घडले याची ती प्रेमळपणे विचारणा करीत होती. अदितीने सर्व घटना विस्तारित करून एकापाठोपाठ सांगितल्या. आपल्या एकुलत्या एका मुलीची अशी अवस्था पाहून वेदनेच्या आणी खिन्नतेच्या छटा आईच्या चेहऱ्यावर उमटल्या. अदितीला उठवत ती चहा देण्याच्या प्रयत्न करीत होती. अदितीने बराच प्रयत्न केल्यावर ती उठून बसण्यात यशस्वी ठरली.
खिडकीतून उन्हाचा बारीकसा कवळसा तिच्या कपात पडला होता. त्या कवळस्याकडे पाहत ती शून्यात हरवली होती. नक्की काय होत त्या बारिकश्या कवळस्यात तीच तिला ठाऊक.
" एकटी एकटीच चहा पितेच का गं म्हशी?" मेघाच्या कर्कश्य स्वरांनी अदितीची तंद्री भंग पावली. सूर्याच्या कवळस्याला न्याहाळत असलेली तिची नजर आता मेघावर खिळली होती. समोर काकूंना बघून मेघाने अनपेक्षितपणे आपली जीभ चावली. काकूंनीही हलकेच स्मितहास्य देऊन तिला बसण्यास सांगितले. चहाचा एक घोट घेत मेघा अदितीशी गप्पा मारीत होती पण त्या गप्पाही अगदी मनसोक्त नव्हताच .कारण काकू तिथे त्यांचा संवाद कान देऊन ऐकत होत्या. काही वेळाने काकू अदितीच्या तब्येतीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तसेच तिला डिस्चार्ज कधी मिळेल याची विचारपूस करण्यासाठी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्या. आता मेघा आणी अदिती यांच्या गप्पांना उधाण आल होत.
" नक्की काय झालंय ग अदिती ...काकूंनी तर फक्त गंभीर दुखापत झालीय एवढंच सांगितलं होत आणी तुला तर चक्क गोळी लागलीय?" मेघाच्या मनात असलेली कुतुहुलता तिच्या आवाजात चांगलीच जाणवत होती. अदितीने घडलेल्या सर्व घटनांचा तपशील मेघाला सांगितला.
" काय तो ईशांत होता...ईशांत कर्णिक ? "
" हो गं स्वतःचा काहीतरी वेगळाच अवतार त्याने करून ठेवला होता..लांबसडक केस, वाढलेल्या दाढीमिश्या, चेहऱ्यावरची निरागसता मावळून त्याजागी भयाण क्रूरता दिसत होती..पण नेत्र मात्र तशेच होते...अगदी बोलके.. नक्की काय झालं असेल त्याच्यासोबत? " अदितीने स्वतःशीच प्रश्न विचारला
" लग्न झाल्यावर सर्वजण बदलून जातात अदिती मॅडम...गौरी फार छळत असेल त्याला म्हणून असा अवतार करून घेतला असेल त्याने " मिश्चिलपणे हसून मेघा म्हणाली. चेहऱ्यावर बनावटी हास्य आणून अदितीही हसू लागली होती पण मेघाच्या उत्तराने तिच्या मनाच समाधान मात्र नव्हतं झालं .
" मला परत त्याला भेटायला हवं" अदिती मनाशीच म्हणाली. तिच्या घायाळ नागिणीच्या मनाला शंकेचे साळींदर टोचत होते.
-------------------------------------------------------------------
" हा नक्की कोण आहे ? वेक्टर तर निश्चितपणे नाही आहे...कुठल्या दुसऱ्या गँगचा सदस्य असेल कि काही वेगळंच रहस्य आहे ? " त्या क्षणिक काळात अजिंक्यच्या मनाला बरेच प्रश्न सतावत होते...तो उंचपुरा,धाडधिप्पाड तोंडाला मंकीकॅप असलेला पुरुष कसलीही तमा न बाळगता अर्जुनवर गोळी चालवणारच होता...काही शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडले
" ते रहस्य तुझ्यासोबतच संपून जाणार आहे ".अर्जुनच्या मानेवरून घामाचे दोन टपोरे बिंदूं सरळ रेषेत ओघळू लागले होते..कपाळावर आठ्यांचं जाळ पसरलं होत. दूर फेकलेल्या बंदुकेला शोधण्याचा तो निरर्थक प्रयत्न करीत होता. त्या पुरुषाच्या हातातील बंदुकेच्या खटका दबणारच ...एवढ्यात तो पुरुष जिवाच्या आकांतान किंचाळला .डोक्याच्या मागच्या भागातून रक्त ओघळू लागलं होत. क्षणातच त्याने प्राण सोडले. अर्जुनची सैरभैर नजर सर्वत्र फिरू लागली होती. शेवटी ती नजर अजिंक्यवर स्थिरावली. अजींक्यने अगदी दूरवरून बरोबर नेम साधला होता.
" ते रहस्य तुझ्यासोबतच संपून जाणार आहे " त्या पुरुषाच्या शब्दाने अर्जुनच्या कुतूहलाच वासरू दावणीला हुंदोळे देत होत.
" कोण होता हा ? कुठल्या गँगचा सदस्य असेल हा ?" अर्जुनने प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचं उत्तर अजिक्यलाही ठाऊक नव्हतं. त्याने फक्त नकारार्थी मान डोलावली. मिशन धवल पूर्ण झालं होत. अजिक्य आणी अर्जुनने तिथले सर्व फॅन्टनाईल चिकटलेले ज्यूटचे पोते आपल्या ताब्यात घेतले होते .शिवाय दुसऱ्या ग्रुपनेही कारखान्याला उध्वस्त करून तेथील रसायन आपल्या बरोबर घेतले होते.
प्रतापराव देसाई यांनी मिशन धवल यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची घोषणा केली. सर्वांच्या चेहऱ्यावर सकारात्मक विजयी हास्य तराळलं होत. फक्त त्या गर्दीत अर्जुन मात्र एकटाच शांत दिसत होता.
" कुठल्या वळणावर येऊन ठेपलोय मी ...नक्की काय होतय माझ्यासोबत..आयुष्यात प्रत्येकजण आपल्याला सोडून जातात .फक्त एकच व्यक्ती आपल्याबरोबर सदैव राहत असते ती म्हणजे आपण स्वतः पण मी स्वतःसोबतही का पूर्णपणे एकरूप होऊ शकत नाही आहे .त्या पुरुषाचे ते न समजणारे शब्द "ते रहस्य तुझ्यासोबतच संपेल ".रेल्वेस्टेशनवर त्या मुलीचे कुठलेतरी विचित्र शब्द नक्की कुठल्या भ्रमात जगतोय मी. कि माझ्या जीवनाचं काहीतरी वेगळंच सत्य आहे ?" निशांत स्वतःशीच हितगुज करीत होता.
प्रतापराव देसाई आणी अजिक्य कॅबिनमध्ये बसून कसल्यातरी महत्वाच्या विषयावर चर्चा करीत होते.
" सर अर्जुनवर काल परत एकदा जीवघेणा हल्ला झाला. पण हा हल्ला कुठल्याही गँग्सशी निगडित नाही एवढे मात्र निश्तिच आहे. कारण ज्याने अर्जुनवर बंदूक रोखली होती तो कुठल्याच गँगचा सदस्य वाटत नव्हता. सर मला तर वाटत हा हल्ला त्याच्या..."
" शशश..ही गोष्ट फक्त आपल्या दोघांतच राहायला हवी..सध्या व्हेक्टरशी आपला संघर्ष अटळ आहे. अर्जुनच या युद्ध्यात आपल्यासाठी विजयीध्वज फडकरणारा मेरुपर्वत आहे "
" पण सर मला म्हणायचय जर काही गोष्टी अनपेक्षितपणे त्याच्या आयुष्यात".
" परत परत त्यांच गोष्टी काढू नकोस ...जर काही गोष्टी अनपेक्षितपणे घडल्या तर त्यासाठी अतिशय कठोर पाऊले उचलण्याची माझी तयारी आहे .देशात शांतता राखण्यासाठी कितीही अशांततेचं पाऊल मी उचलू शकतो"
" सर पण हे चूक आहे ना ? " खिन्नपणे अजिक्य म्हणाला.
" प्रेमात आणी युद्धात सर्वकाही माफ असतं अजिक्य" प्रतापराव देसाई याच्या चेहऱ्यावर बारीकस हास्य उमटलं पण ते सकारात्मक होत कि नकारात्मक हे अजिक्यलाही उमजतच नव्हतं . अजिक्यच्या माथ्यावरील रेषा सरळ रेषेत ताठरल्या होत्या. सरांना नक्की काय म्हणायचं आहे हे त्याच्या अजूनदेखील लक्षात येत नव्हतं.
एकांतात समुद्रकिनारी बसून अर्जुन आपल्या अस्तित्वाचं शोध घेत होता.
" किती दिव्य शक्ती असते ना या विध्वसंक लाटांमध्ये अगदी कितीही मजबूत इमारत, विशालकाय वृक्षाला क्षणात जमीनदोस्त करते. थोर विचारवंत असे म्हणतात माणसाची सर्वशक्ती त्याच्या मनात भरली असते पण माझं मन का माझ्या अस्तित्वाच शोध घेण्यास असमर्थ ठरतंय. देवा काही गोष्टींचा उलगडा लवकर होऊ दे रे" अर्जुन स्वतःशीच बोलत होता.
एका महिन्यानंतर
अदिती आपल्या स्कुटीवरून ऑफिसला जात होती. हवेत असलेल्या गारव्यामुळे तिच्या शरीराला थंडीचा बोचरा स्पर्श होत होता. दूरच्या दुकानातून" आओगे जब तुम ओ साजणा" हे गीत तिला ऐकू येत होत. स्कुटीवरून जात असतांना पानगळ सुरु असलेल्या वृक्षाची सुकलेली पर्णरंध तिच्या केसावर अलवारपणे विसावा घेत होती. एवढ्यात कुणाचीतरी दुचाकी गाडी भरघाव वेगाने तिच्यासमोरून गेली
" काय नालायक असतात काही तरुण जरादेखील दुसऱ्यांच्या जीवाचा विचार करीत नाही. भरघाव वेगाने गाडी चालवून स्वतः तर मरतातच पण कमीत कमी दुसऱ्या निष्पाप लोकांचा तरी विचार करावा " अदिती मनातच त्या तरुणाला शिव्या हासडत होती.
त्याच गाडीचा पाठलाग करीत दुसरी दुचाकी गाडी भरघाव वेगाने अदितीसमोरून गेली.
" हा तर ईशांत आहे .नक्की कुठे जातोय हा ? आणी याची वेशभूषा तरी का अशी असावी " अदितीच्या मनात प्रश्नचक्र वेगाने फिरू लागलं होत.
" आज ईशांतला गाठून त्याच्याशी बोलायलाच हवं .ज्या ईशांतला मी ओळखायचे तो असा बिलकुलच नव्हता. शिवाय गौरीलाही वयक्तीकरित्या भेटणं होईल " अदितीने गाडीचा वेग वाढवत ईशांतचा पाठलाग करायला सुरवात केली.
क्रमश..