------भाबी .
आमच्या घराचा कोपरा ओलांडताना भाबी चे घर लागत असे तरीतसे हिंदु वस्तीतील हे एकच मुसलमानाचे घर होते
पण पूर्वापार ते लोक तिथेच रहात ..जवळ एक तुरबत पण होती
आम्हाला ही सवय झाली होती त्यांची
रोज संध्याकाळी घरी परतत असताना भाबी दिसत असे
त्या वेळी ती तुरबती मध्ये उदबत्ती लाऊन आलेली असे
बारीक किरकोळ अंगकाठी ..
रंग गोरापान .डोळे मोठे मोठे आणी काजळ घातलेले
नाकी डोळी नीटस म्हणतात ना तश्शी ..
चेहेरा पण एकदम लोभस ..
आणी कायम तोंडावर हास्य ..
एक साधासा सलवार कमीज आणी दुपट्टा घेतलेल्या तीला पहिले की प्रसन्न वाटे !
क्यो वहिनी छुटा क्या हाफिस ?
तिचा रोजचा प्रश्न आणी माझे रोजचे उत्तर
कधी कधी तुर्बतीच्या कट्ट्यावर आमच्या पाच मिनिटे गप्पा पण होत
तिच्या नवऱ्याचे फर्निचर चे दुकान होते
घरात तिच्या दोन छोट्या शाळेत जाणाऱ्या मुली आणी म्हातारा सासरा असे
तसे चांगले चालले होते सारे .
भाभी च्या नवऱ्याला सिगारेट आणी तंबाखू चे मात्र फार व्यसन होते
भाभी म्हणत असे मर्द की जात है शौक तो पालेगी ना !!
मुझे कोई तकलीफ नय देता वो ..
इतके साधे आणी सरळ होते तीचे म्हणणे
आणी हळू हळु भाभी ची तब्येत खंगु लागली
माझ्या लक्षात आल्यावर विचारले मी . तेव्हा समजले
भाभी च्या नवऱ्याने बाहेर एक मुस्लीम बाई ठेवली होती
मग एके दिवशी कट्ट्यावर बसलो आम्ही ..बोलत
मी म्हणाले तीला अग हे काय नवीन ऐकते आता ??
क्या करना वैनी उन्हे अभी लडका चाहिये
मै बोली कायकू वास्ते चाहिये लडका इतनी अपनी इस्टेट भी है क्या ?
“जो है रोज का रोज चलता है ..होऊर बाकी बेटीयोका भी सब्भी पढाई लीख्खाई
करना मंगता है ना ..
“नय चाहिये मुझको और बच्चा ..सो करके बोलते है मुझे
तु अब औरत नय रही कुच्च दम नय तुझमे
मै नयी देख लुंगां अब .,.!!
माहेरची चार बुक शिकलेली भाभी आणखी मुले नको म्हणत होती
म्हणुन हा मार्ग काढला होता तिच्या शोहर ने
मी हतबुद्ध .हे आता काय आठवले त्याला
भाभी च्या ससूर नी पण समजावले .पण पठ्ठ्या ऐकायला तयार नव्हता
मी म्हणाले आता काय ग करणार .?
क्या करेगी वैनी वैसे भी हमारेमे तो दो तीन बीबिया होती ही है
मर्द लोगां ये भी “शौक “करेंगे ना
भाभी ची “मर्द “लोक आणी त्यांचे शौक याची मर्यादा संपत नव्हती !!
आता दिवस आणखीन च वाईट सुरु झाले
पैसा पुरेना झाला ..
बराचसा पैसा भाभीचा नवरा ठेवलेल्या बाई कडे देवू लागला
सासर्याचे दुखणे हे सारे पाहून आणखीन बळावले
मुलगा हाताबाहेर जातोय पाहून म्हाताऱ्याने हाय खाल्ली
पाच मुले मेल्या वर हा एक जगला होता म्हणुन जीव होता फार म्हाताऱ्याचा त्याच्यावर
पण देखण्या गुणी सुनेची होणारी ओढाताण
आणी सुंदर हुशार नातींची होणारी हेळसांड पाहवेना त्याला ..
आताशा दिवस मोजायला लागला होता तो अल्ला कडे जाण्या साठी
हळू हळू दुकानाचा धंदा पण कमी होवू लागला होता
एके दिवशी ती बाई सगळे दागिने घेवून आपल्या दुसऱ्या यारा बरोबर पळून गेली
आता मात्र परिस्थिती हाता बाहेर गेली .
भाभी चा नवरा आता भरपूर दारू प्यायला लागला ..
घरात पैसे पुरेना दुकानचा धंदा पण थंडावला होता ..
घरी आल्यावर भाबीचा नवरा आता रात्री तिच्या अंगावर हात टाकू लागला
पोरी पण जाणत्या होत्या आता .
त्यांच्या समोर तमाशा नको आणी मुलींची पण आबाळ थांबावी म्हणुन
शहाणपणा करून भाबीने त्याच वर्षी मुलीना शिकायला माहेरच्या गावी पाठवले
भाबिच्या माहेरची माणसे आर्थिक सुबत्ता असलेली होती
त्यामुळे मुलींचे शिक्षण मार्गी लागले .
भाबीच्या सासर्याने आता “हाय “खाल्ली ..
जेवण खाण हळू हळु सोडून दिले त्याने ..
घराची ही सारी दुरवस्था ..त्याला उघड्या डोळ्याने पाहवेना
आणी एके रात्री झोपेतच तो अल्ला ला “प्यारा “झाला ..!
त्या रात्री भाबीचा नवरा कुठेतरी दारू पिवून पडला होता
त्याला हुडकून घरी आणावे लागले ..
नशेत च त्याने वडिलांचे दफन ..केले
भाबीचा आता उरला सुरला आधार पण संपला ..
पैशाची इतकी ओढाताण होती की ..
भाबीने चार घरची भांडी धुणी करण्याचा निर्णय घेतला ..
जेथे “फुले “वेचली तेथे गोवऱ्या वेचायची पाळी आली तिच्या वर ..
चार घरची कामे केल्या शिवाय पोट भरणे केवळ अशक्य होते तिच्या साठी
बरे तर बरे दुकान गेले पण अजून घराचे छप्पर डोक्यावर होते
नवऱ्याच्या व्यसनात हे पण गेले तर मात्र अवघड होते ..
ती बाहेर कामे करते म्हणुन नवऱ्याच्या खानदान ची इज्जत खराब होत होती
त्यामुळे रात्री पिवून आला की मार चुकत नव्हता ..
आता मात्र मला राहवेना ..
एक दिवस गेले मी तिच्या कडे तिच्या शी बोलायला ..
भाबीचा अवतार पाहवत नव्हता ..हाडांचा सापळा झाला होता नुसता
“अग काय चाललेय हे ..कीती सहन करशील ..
वयनी क्या करना नसीब ही ऐसा पलट गया ...
बुरे दिन आ गये खुदा जैसे रूठ गया !
मला राग च आला ..काही खुदा वगैरे नाही ..
तुच तुझ्या नवऱ्याचे जास्त कौतुक करून ..शेफारून ठेवला आहेस त्याला
अग कीती मारतो तुला तो ..कसे इतके सहन होते ग ?
क्या करना वयनी मर्द की जात और वो भी शोहर .मै कुच नय बोल सकती
अग काय वेडी आहेस की काय उद्या हे घर पण विकले तर काय रस्त्यावर येणार
हाकलून दे त्याला घरातून ..
मग होईल बघ सरळ ..कोण ठेवून घेणार आहे त्याला ?
वयनी अब क्या बताऊ तुमको
कैसा भी हो लेकिन औरत को किसी मर्द का सहारा होनाच होना
वो भले ही शराबी हो या जुवारी ..औरत का सहारा मर्द ही होता है
मर्द अगर साथ नही तो ये बाहर के आदमी औरत को ..नोच्कू खायेंगे
फिर उस औरत को कोय नय बचा सकता !!
एक क्षण भर मी स्तंभित झाले
काय खोटे होते त्यात ..
ही अर्धशिक्षित बाई जगातले मोठे “सत्य “सांगून गेली होती ..!!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------