स्नेहसंमेलन
“भरजरी ग पितांबर दिला फाडून
द्रौपदी शी बंधु शोभे नारायण
हे गाणे कानावर पडले की माझे मन लगेच भुतकाळात जाते
मी सातवीत असेन शाळेत स्नेह संमेलनात नेहेमी भाग घेत असे
माझी उंची खुप असल्याने शक्यतो पुरुष भूमिका मला मिळत असत
पण या वेळी का कोण जाणे बाईंच्या मनात आले मला स्त्री भुमिका द्यावी
संगीत नाटक करायचे ठरले होते त्यामुळे प्रत्येक पात्राला गाणे येत असावे असा निकष होता
माझ्या एका उंच मैत्रिणीला बाईनी कृष्णाची भुमिका दिली
आणी मला द्रौपदीची भुमिका मिळाली
माझा आवाज चांगला होताच ..कृष्णाची भुमिका करणारी मैत्रीण पण चांगली गायची
भुमिकेला योग्य असा तिचा आवाज थोडा घोगरा होता
द्रौपदी आणी कृष्ण असा एक छोटा नाट्य प्रवेश करायचा असे ठरले
कृष्णाचे बोट कापते ते द्रौपदी ला दिसताच
ती चटकन आपला भरजरी पितांबर फाडून त्याची चिंधी कृष्णाच्या बोटाला बांधते
असा हा महाभारतात गाजलेला “प्रसंग..
त्याच्यावर साधारण अर्धा तास अवधीचे नाट्य करायचे ठरले
या नाट्यात चार पाच गाणी असल्याने खरा प्रवेश पंधरा वीस मिनिटाचा च होता
तालमी सुरु झाल्या .
नारायणां रमा रमणा मधुसुदना
मनमोहना ..करुणा घना
अशा माझ्या गाण्याने प्रवेशाची सुरवात होत असे
दोघांचे बंधु भगिनी प्रेम दाखवताना
मध्ये मध्ये कृष्णाची आणी माझी दोन तीन गाणी असत
मग प्रसंगांनुरूप कृष्णाचे बोट कापून रक्ताची धार लागत असे
चिंधी घेवून मी त्या प्रसंगात कृष्णाच्या बोटाला बांधत असे .
आणी मग गाणे असे ..
“भरजरी ग पितांबर दिला फाडून
द्रौपदीशी बंधु शोभे नारायण “
या गीताने त्या प्रवेशाची सांगाता होत असे
असे पाच सहा दिवस तालमीचे पार पडले
नाट्यप्रवेश खरोखर मस्त बसत होता सर्व खुष होते
एकदा असेच तालीम सुरु असताना
अचानक आमच्या एक बाई म्हणाल्या
असे चिंधी फाडून बांधण्या पेक्षा
यापेक्षा आपण खरेच जर द्रौपदीची साडी फाडली तर
प्रसंग जास्त जिवंत होईल
आणी जसे गाण्यात म्हणले आहे तसे भरजरी पितांबर फाडल्या प्रमाणे पण होइल .
सर्वाना ही कल्पना आवडली .
आता ती कशी प्रत्यक्षात आणावी यावर विचार सुरु झाला ..
मग आमच्या एक हौशी बाई म्हणाल्या माझ्या कडे एक मोरपंखी साडी आहे .
ती मी देते ..तीच्या पदराच्या कडेला एक वीत लांबीची किनार पण आहे .
ती किनार आपण निम्म्यात कापून ठेवू
ऐन वेळेला द्रौपदी ने थोडा जोर लावला की त्याची किनार फाटेल
आणी खरा खुरा प्रसंग जिवंत होईल .
सर्व जण या आयडिया ने खुष झाले
फक्त यात अडचण एकच होती की बाईंचा भरजरी शालू खुप जड होता
आम्ही सर्व लहान मुली ..कधी साडी नेसुन माहीत नाही
त्यामुळे हा शालु नेसून तो सावरून अगदी लीलया त्याची किनार फाडणे याला खुप सराव करायला हवा होता .
मग ठरले की रंगीत तालमीच्या आधी पण दोन तीन वेळा हा शालू नेसून सराव करायचा
मग प्रत्येक सरावाच्या वेळी बाई मला घट्ट पिना लावून चापून चोपून शालु नेसवत
आता साडीच्या पदराच्या खालून पाच सहा ठिकाणी किनारी कापण्यात आल्या
कारण प्रत्यक्ष प्रयोगा पर्यंत ही साडी पाच सहा वेळा टर्कावली जाणार होती .
पहिल्यांदा जेव्हा तालमीत हे मी केले तेव्हा तो प्रसंग इतका वठला की
बाईनी माझी पाठ थोपटली .
फक्त माझा धसमुसळा स्वभाव पाहुन इतकेच सांगितले की जेव्हढी कापली आहे तेव्हढीच किनार काप
नाहीतर शालु फाटायची शक्यता आहे .
आमचा मुख्य प्रवेश जरी अर्धा तासाचा होता तरी तयारी आणी वेळ हे सारे धरून
माझ्या अंगावर तो शालू तीन ते चार तास रहात असे .
मला छान सराव झाला होता ..प्रवेश संपला तरी तो शालु नेसुन मला मिरवावे असे वाटे
मग बाईच रागाने मला बोलावून तो शालु सोडवून घेत
त्याला इतक्या पिना असत की खुप हलक्या हाताने तो सोडवावा लागे.
त्या काळी अशा प्रकारचा शालु खुप महाग होता .
बाईनी तो शालु संमेलना साठी नेसायला देणे ..आणी
शिवाय प्रत्येक वेळी एक इंच किनार फाडू देणे हे सुद्धा खुप कौतुकास्पद होते .
माझ्या घरी जेव्हा हे ऐकायला मिळाले तेव्हा आईला पण खुप नवल वाटले
आपल्या लेकीचा धसमुसळा स्वभाव तीलाही चांगलाच माहीत होता .
त्यामुळे तीचे प्रश्न सुरु झाले
खरेच का ग तुझ्या बाई शालु देणार आहेत ?
आणी त्याची किनार पण फाडू देणार आहेत ?
मी होकार दिल्यावर आईने मला बजावले होते ..
“ताई फार भारीतला असतो बर का हा शालु
जपून नेस आणी काळजी घे त्याचे नुकसान होणार नाही याची
माझे नुसतेच आपले मान डोलावणे आणी खेळायला पळणे..
अखेर रंगीत तालमीचा दिवस उजाडला
आज आमचे मुख्याध्यापक सर्व स्टाफ आणी काही परीक्षक मंडळी यांच्या समोर
सर्व स्नेह संमेलनाची तालीम होणार होती
त्या दिवशी आमचे काही पालक पण कौतुकाने पाहायला येणार होते
त्यात माझी आई आणी तिची मैत्रीण पण होती
संमेलन सुरु झाले आमचा कार्यक्रम पाचव्या नंबरला होता
आणी खरोखर आमची नाट्य छटा इतकी वठली की संमेलनाच्या सर्व कार्यक्रमात भाव खावून गेली
विशेषतः शालु फाडायचा प्रसंग खुप च “वठला “
माझे ते शालु नेसलेले सुरेख रुपडे पाहुन आईच्या डोळ्यात पाणी आले
तिची मैत्रीण म्हणाली अग दृष्ट काढ बाई लेकीची
काम पण सुंदर करते गाते पण छान आणी दिसते पण गोंडस
त्या वेळी आमचे लहान पण इतके “निरागस “होते की
आपण सुंदर दिसतो गातो सुंदर वगैरे गोष्टी आम्हाला फारशा समजत नसत
एव्हाना रंगीत तालमी पर्यंत एक एक इंचाच्या अशा साडीच्या सहा पट्ट्या कापून झाल्या होत्या
आता पदराची लांबी बर्यापैकी कमी झाली होती.
आता मुख्य स्नेह्संमेलन पार पडले की बाईंच्या शालूचे “हाल “ थांबणार होते
बाई मात्र खरोखर हौशी होत्या .
कुणी काही म्हणले तरी आपल्या किमती शालु पेक्षा नाट्य प्रवेश छान होतोय म्हणून त्याना आनंद होता .
मला पण त्यांनी “खाजगीत “सांगितले होते
तु मस्त करतेस काम शालूची नको काही काळजी करू
अशा तऱ्हेने स्नेह्संमेलन सुंदर पार पडले .
थोडे दिवसांनी अभ्यासाच्या नादात आम्ही सारे विसरलो पण ..
आणी अचानक शाळेत बातमी आली की
संमेलना ला आलेल्या परीक्षकांनी आमच्या नाट्य छ्टेला प्रथम क्रमांक दिला होता
त्यामुळे आता आमची नाट्य छटा जिल्हा स्तरावर गेली होती
याचे आणखी चार प्रयोग करावे लागणार होते .
संपूर्ण शाळा खुष झाली .
कारण असा क्रमांक कित्येक वर्षात शाळेला मिळाला नव्हता
मुख्याध्यापक बाईनी खास कौतुक केले आमच्या दोघींचे
त्या दिवशी मात्र आईने घरी गेल्यावर खरोखर दृष्ट काढली माझी .!!
आता पुन्हा काय करायचे शालूचे ..
पण असा प्रश्न आमच्या बाईनी अजिबात पडू दिला नाही
माझ्या शालुचा सारा पदर फाडून गेला तरी चालेल मला बिलकुल दुक्ख नाही
असे त्यांनी मुख्याध्यापक बाईना सांगुन टाकले
खरेच खुप मोठ्ठे मन होते त्यांचे असे आत्ता विचार करताना वाटते
त्यावेळी तर काहीच समजत नव्हते .
यानंतर जिल्हा स्तरावर पण आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला
त्या वर्षी खुप कौतुक झाले आमचे आणी आमच्या शाळेचे
खरोखर जेव्हा बाई परत घेऊन गेल्या शालु तेव्हा बराचसा पदराचा भाग फाटून गेला होता .
ही आठवण मात्र कायम मनात राहिली
आता शाळा सोडून कित्येक वर्षे झालीयत
बाई आहेत का नाही तेही नाही माहीत
पण त्यांचा “दिलदार पणा आणी शाळे साठी त्यागाची वृत्ती मात्र सर्वांच्या अजून स्मरणात आहे