gulabache ful Arun V Deshpande द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

gulabache ful

कथा -

गुलाबाचे फुल .

ले- अरुण वि.देशपांडे

-----------------------------------------------------

आफिसात वेळेवर येणाऱ्या मोजक्या कर्मचाऱ्यांत अजितचा समावेश नेहमीच होत असे. बॉसच्या तोंडून वेळेचे महत्व "ऐकण्याची वेळ त्याच्यावर कधीच येत नसे. कारण , वेळेचे नियोजन कसे करावे "- हा विषय अजितचाच अत्यंत आवडीचा . त्यामुळे -त्याच्या सोबत असणाऱ्या सहकारी-मित्रांना नाही म्हटले तरी दिवसातून किमान तीन-चार वेळा तरी शिस्तीचा -डोस "अजित कडून मिळत असे.कामाच्या वेळी काम ,आणि ते संपले की मात्र .मनमोकळेपणाने सर्वजण एकमेकांशी बोलत असत.

अजितच्या साहेबांच्या मते .अजितची टीम म्हणजे एकदम मॉडेल-टीम .इतरांनी अनुकरण करावे अशीच आहे ही टीम.

मित्रत्वाच्या नात्याने वागणाऱ्या अजितचे ऑफिस मधील सर्वांशी अगदी छान जमत असे. सिनियर असो वा एखादा नवा रिक्रूट,असो , प्रत्येकाशी अजितचा सूर लगेच जुळत असे. सहाजिकच अजित म्हणजे एक सर्वप्रिय व्यक्ती आहे"यावर ऑफिसमध्ये सर्वांचे बहुमत होते.

आजकाल कार्यालयीन वातावरण तसे मोकळे असते .स्त्री सहकारी असो वा पुरुष सहकारी .जुन्या काळात संकोचाची भावना असायची .कुणाला आवडेल नाही तर ? त्यापेक्षा अंतर ठेवून मर्यादेत राहिलेलेच बरे ,असे धोरण असायचे.

अजितच्या ऑफिसमध्ये महिला -सहकार्यांची संख्या भरपूर नसली तरी ..बरीच होती .सगळ्या केडरमध्ये जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला सहकारी होत्या . प्रत्येकीचे व्यक्तिमत्व वेगवेगळे .कुणी मोकळ्या स्वभावाच्या , तर कुणी गंभीर ,संसारी सहकारी त्यांच्या रहाटगाडग्यात गुरफटलेल्या . आणि काही स्वप्नाळू दुनियेत वावरणाऱ्या ...

अजितकडे " लग्नाचे स्थळ" या नजरेने पाहणारे अनेकजण होते . असा अनुरूप लग्नाळू तरुण " कुणालाही पसंत पडेल असाच होता .त्यामुळे त्याच्या ओफिसातील अनेकजणी मनातल्या मनात ठरवत होत्या की -..याच्या आवडीप्रमाणे आपण वागू या . .,कदाचित तो आपल्याबद्दल विचार करील ही.

असे काही होण्याची शक्यता नव्हती कारण अजित मनाने गुलहौशी तरुण नव्हता .दिसेल तिच्याकडे पाहून पघळनारा असा मजनू- आशिक नव्हता " आपण बरे आणि आपले काम "अशा मर्यादेत राहून वागणार्या अजितने तशी अनेकींची निराशा केली असेच म्हणावे लागेल.

अजितचे मित्र तर कधी कधी म्हणायचे - वो परी काहांसे लाऊ -तेरी दुल्हन जिसे बनाऊ..के छोरी कोई पसंद ना आये तुजको ...! या गाण्याच्या ओळी एकून अजित हसून त्याकडे दुर्लक्ष करीत असे .जणू त्याला म्हणयचे असे-बाबानो -तुमच्या नादी लागून काय करू ? मी आहे असाच छान आहे.

त्या दिवशी अजित ऑफिसच्या बाहेर पडला .संध्याकाळच्या वेळेस रस्त्यावर वाहनांची गर्दीच गर्दी ,जो तो आपल्याच घाई मध्ये जणू पुढे कोण जातो ?" याचीच शर्यत चालू होती. फुटपाथ "पायी चालणार्या साठी नसतो " असाच गैरसमज टू-व्हीलर वाल्यांनी करून घेतला असावा कारण ,सिग्नलपाशी लाल -दिवा लागला तरी ,न थांबता फुटपाथ वरून मोटार सायकली बेफाम धावणे सुरु होते .अजित हे सगळे दृश्य पहात उभा होता .त्याची बाईक आज रस्त्याच्या विरुद्ध दिशेला पार्क करावी लागली होती. त्यामुळे रस्ता क्रॉस करून जाण्याच्या तो विचारच करीत उभा होता , झेब्रा क्रॉसिंग वरून चालत तो सिग्नल -पोल जवळ उभा होता ,आजुबाजू इतर लोकही उभे होते ,रस्त्याच्या पलीकडे जाण्याच्या तयारीत . इतक्यात एक बाईक -वाला फुटपाथवर घुसला आणि पुढे जाण्याच्या प्रयत्नात ,

त्याने चक्क उभ्या असलेल्या अजितला धडक दिली .. नशीब .अजित सावध होता म्हणून बरे झाले ,त्याला बाईक चुकवता आली ,पण ,तो खाली पडला .एकच गोंधळ उडाला .बेदरकार बाईक-वाल्याला मार लागला ,आणि लोकांचा मार बोनस म्हणून खावा लागला तो वेगळाच .

त्याही अवस्थेत अजितने ऑफिसच्या दिशेने बोट दाखवले .जमावातल्या दोघा -तिघांनी अजितला आधार देत ऑफिसमध्ये आणले , त्यची अवस्था पाहून ऑफिसात असलेले सहकारी धावतपळत आले. सुखरूप अजित थोडा जखमी झालाय "हे पाहून सर्वंना हायसे वाटत होते अजितची अवस्था पाहून एक सहकारी मित्र म्हणाला , अरे, याला शेजारच्या बिल्डिंगमध्ये घेऊन जाऊ या , क्लिनिक आहे तिथे , दाखवून घ्यावे, औषधपाणी -मलमपट्टी झाली म्हणजे काळजी नाही. योग्य सूचना होती ही. डॉक्टरांनी अजितला तपासले , नशीबवान आहात तुम्ही अजित , बेस्वाध असता तर कदाचित दुखापत झाली असती , आता फक्त मामुली मुका मार लागलाय , थोडक्यात मिभावले म्हणूया.

पायाला सूज आलेली आहे , सूज उतरली की चेकअप करून घ्या ,म्हणजे ओके. बाईक मात्र चालवू नका ,आणखी काही दिवस.

आज घरी कसे जायचे ? हाच मोठा प्रश्न होता ..अजित राहायचा त्या भागातला एकजण होता ,पण,तो आता या वेळी हजर नव्हता ,आणि पलीकडच्या रस्त्याला पार्क केलेली त्याची बाईक तसीच सोडून देणे रिस्कीच होते .काय करावे ? प्रश्न पडला .

एव्हढ्यात दुसरा सहकारी मित्र येत म्हणाला .मी सांगतो तसे करा .आपल्या आफिसात आजच रुजू झालेली कॉम्प्यू-ऑपरेटर-मिस.मानसी ,माझ्या परिचयाची आहे आणि, आपण सांगितले तर ती आज अजितला बाईक वर त्याला त्याच्या घर पर्यंत सोडू शकते ,आणि तिथून ती तिच्या घरी जाऊ शकते ,पुढे जवळच रहाते ती. बघा ..चालेल का हे अजित ला ?

या अव्स्थ्तेत चालेल का ?हे काय विचारणे झाले ? असा प्रश अजित सोडून सर्वांनीच विचारला ,त्यामुळे होय,चालेल ",असे उत्तर देण्याशिवाय अजीतला दुसरा पर्याय उरला नाही.

मानसीचा परिचय तिच्या सेक्शनमध्ये असलेल्या सहकार्यांशी झाला होता, .अजित वेगळ्या सेक्शनला असल्यामुळे त्यांचा परिचय होईल असेही नव्हते .त्यामुळे अजीतला तिचा जुजबी परिचय करून दिला गेला.,आणि सर्वांनी मानसीला विनंती केली की-तिने अजितला आज त्याच्या घरी सोडावे. मानसीनेही ते मान्य केले . यात काही वावगे आहे असे तिला वाटण्याचे कारण नव्हते. अशा अडचणीच्या वेळी सहकारी म्हणून मदत करणे "आपले कर्तव्य असते",हे ती जाणून होती.

रस्त्यांनी जातांना दोघे ही काही बोलू शकले नाही .मानसीने हेल्मेट घातलेले होते .गर्दीच्या वेळी बाईक चालवतांना काळजी घ्यावी .हे नव्याने सांगण्याची गरजच नाही .अजितला तिच्या समयसुचकतेचे कौतुक वाटले.वाटले. सोसायटी आल्यावर अजितने तिले थांबवले .आत गेल्यावर पार्किंग मध्ये बाईक लावून टाकीत मानसी म्हणाली ..सर, वर पर्यंत येऊ का ?

नको नको ,अहो, आता लिफ्ट आहे, पायर्या चढून थोडच जायचे आहे मला ? मानसी ,तुमचे आभार.

बस का सर, लगेच झटकून टाकले ,आभार मानून ..मानसी म्हणाली .

तिचे असे उत्तर अजितला अपेक्षित नव्हते . त्याचा गोंधळून गेलेला चेहेरा पाहून तिला हसू आले , ती म्हणाली ,

अहो ,असे परेशान नका होऊ, गम्मत केली.असो.

मी उद्या सकाळी पुन्हा येईन..तुम्हाला ऑफिसात घेऊन जाण्यासाठी , माझ्या स्कुटीवरून घेऊन जाते तुम्हाला .

आज नव्हती आणली मी माझी स्कुटी. आता डॉक्टरांनी सांगेपर्यंत तुम्ही तुमची बाईक नाही चालवायची .कळले का ?

हो हो .समजले .या तुम्ही ,मी सकाळी आफिसच्या वेळा खाली येऊन उभा राहतो. अजितचा निरोप घेऊन मानसी निघून गेली.

ठरल्या प्रमाणे दुसरे दिवशी मानसी अजितला घायला आली. मग दिवसभर .ऑफिसमध्ये कालच्या अपघाताची चर्चा होत राहिली ,त्या पेक्षा जास्त चर्चा अजित -मानसी सोबत जातात याबद्दलच होत होती.. पुढचे आठ एक दिवस ..रोजच ...

मानसीने अगदी वेळेप्रमाणे अजितला घेऊन येणे-नेऊन सोडणे हा उपक्रम पार पाडला .

,

या आठवडाभरात ..मानसी आणि अजित यांची मैत्री झाली, पण, दिवसभरातून भेटी मात्र होत नव्हत्या . नव्याने रुजू झालेल्या मानसीला कामातून फारसा वेळ मिळत नव्हता ,तर अजित टीम लीडर च्या रोल मध्ये घुसला की ,इतर सगळ्या गोष्टी विसरून जायचा लंच - टाईम मध्ये अजितला विचारायचे ..काय मग ? कुठपर्यंत केलीय प्रगती..?

मानसीला म्हणायचे ..तू तर डायरेक्ट बॉसची विकेट घेतलीस पहिल्याच दिवशी .नाहीत तर इतके दिवस किती जणींनी गळ टाकलाय ,पण हा मासा काही गावला नव्हता कुणाला , तुला बर जमले ग मानसी.?

मानसी चुपचाप ऐकत राहिली.. या लोकांना गोसीप " शिवाय करमतच नाही का ? अजीतसर कसे आहेत ? हे अजून कळाले सुद्धा नाही आपल्याला , आणि हे लोक सुतावरून स्वर्ग गाठू पहात आहेत .

स्वतःच्या बाईकवर खूप दिवसांनी आज अजित घरी आला . येतांना त्याला चुकल्या चुकल्या सारखे वाटते आहे असे वाटत होते. मानसीने त्याला त्याच्या वेळेच्या नियमा प्रमाणे .कधीच उशीर होऊ न देता ऑफिसला नेले होते .

तो मोठा अधिकारीपदावर आणि ती एकदमच नव्याने आलेली एक सामान्य कर्मचारी .हा व्यावहारिक दर्शनी फरक सर्वांना दिसणारा होता , पण एक माणूस म्हणून,एक मित्र म्हणून आपल्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे हे त्याला जाणवत होते ,आणि मानसीलाही हे मैत्रीचे नाते आवडले असावे " असा अंदाज करण्यास हरकत नव्हती.

अजितच्या आयुष्यात त्याला इतक्या जवळून भेटणारी मानसी ही पहिलीच तरुणी . सहवासाने माणूस अधिक समजत जातो असे म्हणतात ," बघू या ,हे कितपत खरे ठरेल आपल्या बाबतीत ? मानसीच्या बाबतीत त्याला वाटू लागले होते की आपली एकमेकांची मन अधिकाधिक जवळ यावीत, यातून नातेबंध जुळून यावेत .हे असे वाटणे वावगे वाटावे असे नक्कीच नव्हते " हा विचार त्याच्या मनाचा हुरूप वाढवणारा होता.

मानसी आणि अजित यांची मैत्री पक्की होते आहे असे सर्वांना जाणवत होते ,या मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि पुढे लग्नात व्हावे "ही इच्छा उघडपणे बोलून दाखवणारे ऑफिसात आपल्या आजूबाजूला आहेत हे मानसीला जाणवू लागले.ही कुजबुज ,या अपेक्षा , सर्वांचे हे असे बोललेले अजितला आवडते आहे ..ही गोष्ट सुद्धा तिच्या नजरेस पडत होती

ऑफिस सुटल्यावर मानसीला आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची "तिला आपल्या मनातील भावना व्यक्त करून दाखवायच्या हे ठरवून अजितने मानसीला भेट देण्या साठी "गुलाब " घेतला ,मोठ्ठा -लाल गुलाब ..जणू त्याच्या प्रेमाचे प्रतिक . पार्किंग मध्ये नेहमी प्रमाणे संध्याकाळी दोघांची भेट झाली ,तो म्हणाला तिला- कॉफी घेऊ या , मग निघू घर कडे ,चालेल ना ?

नकार द्याचा विचार तिच्या मनात होता ,पण, शब्दातून काही तो आलाच नाही , हो"चालेल ,घेऊ या कोफी ,एव्हढेच म्हणाली.

मानसी , इतक्या दिवसा नंतर .आपण मोकळेपणाने बोलू शकतो असे मैत्रीचे नाते आपल्या नक्कीच आहे असे मी समजतो.आपल्या मैत्रीच्या नात्याचे बदलते भाव-रंग एव्हाना सर्वांच्या लक्षात आले आहेत , तुला माझ्या बाबतीत काय वाटते हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे",

मानसी - मला तू खूप आवडतेस. माझ्या या प्रेम-भावनेचा तू स्वीकार करावास अशी इच्छा आहे..आणि माझ्याशी लग्न करशील का ? विचार करून ठरव.हा आग्रह नाही, पण, प्रेम-पूर्वक विनंती आहे

अजितने खास तिच्या साठी आणलेला लाल-गुलाबांचा बुके तिच्या हातात देत म्हटले .मानसी -काळजी घेशील याची ,कोमेजू देऊ नकोस या लाल गुलाबाला ..!"

.

मानसी अजितचा एकेक शब्द मनापासून ऐकत होती ..या शब्दांना मनात साठवत होती ..हे तिला अनपेक्षित मुळीच नव्हते , आज ना उद्या हा क्षण आपल्या आयुष्यात येणार आहे ",याची तिला कल्पना होती तिच्या होकाराने .अजितचे भाव-विश्व बहरून जाणार होते ,अजित आणि मानसी यांचे कायमचे एकत्र येणे" दोघांच्या मित्र-मंडळीसाठी , परिवारासाठी आनंददायक अशी सुखद घटना होती ,ज्याची सार्वजन आतुरतेने वाट पहात होते

पण....

मानसी अजितला होकार ..देऊ शकत नव्हती ..का देऊ शकत नव्हती ?

कारण ..आता पर्यंत मानसीच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी चार-भिंतीच्या आताच राहिलेल्या होत्या .बाहेरच्या जगाला त्या सांगता येण्यासारख्या नव्हत्या .दर्शनी दिसणारे मानसीचे रूप एखाद्या मुखवट्या सारखे होऊन बसले होते , त्या खाली मानसीच्या वाट्याला आलेले फसवणुकीचे दुखः ,त्या यातना , त्या सोबत वाटणारी बदनामीची भीती ",या सगळ्या गोष्टी भावना शून्य जगाला दिसू नये याची काळजी घ्यवी लागली होती.

पण.. आता अजित पासून काही लपवणे योग्य होणार नाही ..आपल्या आयुष्यातली ही बाजू .त्याला सांगितली पाहिजे..,मग त्याचे आपल्या बद्दलचे मत काही ही होवो.

मनात धीर एकवटून मानसी सांगू लागली ....

अजित - तुमच्या भावनांचा मी आदर करते , मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे, त्या नंतर तुमचा निर्णय बदलेल याची मला खात्री आहे ..तरी पण एक मित्र म्हणून मी तुम्हाला खरे खरे सांगीन.

मानसीचा स्वर एकदम बदलून गेलेला पाहून.अजितच्या मनात अनामिक भीती दाटून आली

..काय ऐकावे लागणार आता आपल्याला , अरे देवा ...!तरी तू म्हणाला ,मानसी -मोकळेपणाने बोल,माझी ऐकण्याची तयारी आहे.काही ही घडलेले असू दे.एक मित्र म्हणून मी तुझ्या सोबत नक्कीच असेन.

अजित - दीड वर्षापूर्वी माझे लग्न झाले ..सुहास नावाच्या व्यक्तीशी .वडीलधार्या लोकांच्या रीतसर संमतीने , लौकिक अर्थाने सर्व काही छान आणि आनंदात पार पडले .पण, माझ्या सहजीवनाच्या पहिल्या रात्री –सिनेमा आणि सिरीयल मध्ये घडावे असे घडले. सुहासने सांगितले- आपण नावापुरते आणि देखाव्यापुरते नवरा-बायको आहोत , मी प्रेशर मध्ये येऊन हे लग्न केले आहे.माझे नात्यातीलच एका मुलीशी प्रेम-संबंध आहेत ,पण ,तिच्याशी माझे लग्न होऊ शकत नाही ,म्हणून मला आई-बाबांच्या दबावामुळे हे लग्न करावे लागले .

माझ्यामुळे तुझ्या वाटायला हे सगळे विपरीत आले आहे , मी तुला या बंधनातून मोकळे करीन नंतर तू स्वतंत्रपणे नवे आयुष्य जगावेस.तू एक चांगली मुलगी आहेस.. मी वाईट नाहीये , तुझ्याशी वाईट वागणार नाही .." .एक वर्ष नंतर तू घटस्फोटाचा अर्ज कर ..मी लगेच माझी संमती देतो." आजकाल घटस्फोट घेणे कॉमन झाले आहे . तुला समजून घेणारा समंजस तुला नक्की भेटेल .

अजित , नुकताच आमचा घटस्फोट मंजूर झाला आहे ,लग्नानंतर लगेचच मी माहेरी आले आणि गेले दीड वर्ष माझ्या आई-बाबांच्या कडे राहते आहे.मी म्हणजे एक "लग्न झालेली कुमारिका आहे" हे सांगून तरी खरे वाटायला हवे.विस्वास कोण ठेवणार माझ्यावर ? म्हणून मी तुमच्या विनंतीचा ......!

समोर बसलेल्या मानसीची कहाणी ऐकून अजितला धक्का बसला , न पाहिलेल्या "सुहास "या व्यक्तीचा तिरस्कार वाटला . मानसीच्या दुर्दैवास काय म्हणावे ? हकनाक किती मोठा भोग वाट्याला आला, तो निमुटपणे भोगावा लागला .आणि अशा केसेस मध्ये मुलींच्या वाट्याला येते ती फक्त बदनामी , तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी तय्यारच असतात . यांत्रिक आणि व्यवहारी दुनियेपासून हे दूर ठेवता आले हेच बरे म्हणयचे

.

तिचा हात हातात घेत तो म्हणाला – मानसी ,खरेच ,खूप मोठे दुखः भोगते आहेस तू ,आता या सर्व गोष्टींना विसरून जाणे.आणि एक नव्या आणि आनंददायी आयुष्य पर्वास आरंभ कर,मी साथ देईन तुला , माझ्या आधाराचा हा हात मी पुढे केलाय ,तुझा हात भीती न बाळगता हातात दे.

मानसी -तुझ्या -माझ्या शिवाय हे कुणास कधीच कळणार नाही. तुझ्या कालच्या आयुष्याबद्दल ज्यांना -ज्यांना माहिती आहे ,त्यांच्याशी मला काही देणे-घेणे नाही.. तुझा होकार असेल तर ..माझा नकार बिलकुल नाहीये.

अजितचा एकेक शब्द जणू मानसीच्या वेदनांवर प्रेमाची फुंकर घालणारा होता .त्याच्या रूपाने खरेच तिला समजून घेणारा एक समंजस साथीदार तिच्या जीवनात आला होता .काय बोलावे ,कसे बोलावे तिला समजेना ..भावना - आवेगाने तिचे मन गच्च भरून आलेले आहे हे तिला जाणवत होते .

त्याच्या हातात हात देत मानसी म्हणाली -

ओ अजित - काय म्हणताय तुम्ही हे ? आणि काय ऐकतेय मी ? विस्वास बसत नाहीये माझा . मला समजून घेणारा असा माणूस "माझ्या आयुष्यात आलाय ,हे खरेच वाटत नाहीये .

एक शब्द ही न बोलता ते,दोघे एकमेकाकडे पाहत होते ,आणि ते समोरचे गुलाबाचे फुल त्यांच्याकडे पाहून हसत होते .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथा - -गुलाबाचे फुल .

ले-अरुण वि.देशपांडे -पुणे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------