Lek laadki ya gharchi books and stories free download online pdf in Marathi

लेक लाडकी या घरची - Letter to Valentine

लेक लाडकी या घरची..!

मनीष गोडे

एका रोमन संतानी तिसर्या शतकात 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमासाठी साजरा करण्याचे ठरविले होते. काहींच्या मते हा दिवस दोन शहीद ख्रिस्ती सैनिकांच्या, ज्यांचे आडनाव ‘वैलेंटाईन’ असे होते, त्यांच्या स्मृती प्रित्यार्थ पाळले जात असावे, असे सुद्धा आहे. पण या सणांची मुख्य बाब, एकामेकांना प्रेमपत्र लिहुन पाठवायचे, असे आहे आणि ही परंपरा अजुनही कायम आहे. पत्राद्वारे प्रेम व्यक्त करणे ही सुद्धा एक कलाचं आहे, नाही का..? पत्रामधुन प्रेमरूपी शब्द कसे कोरायचे हे त्या लेखकाचे वैशिष्ठये म्हणावे लागेल, असो..!

आता पन्नासी गाठल्यावर बायकोव्यतिरिक्त कुणाला पत्र लिहायचे, ही एक अडचन भासत आहे..! एका युवा मुलीच्या बापाला ते शक्य होत नाही आहे, संस्कारात बसत नाही आता ते. आज ही मी ‘पैडमैन’ बनू शकलो नाही, कारण आपल्या मराठी संस्कृतीत ह्या गोष्टी न बोलताच मुलींना कळून जातात. एका डोळ्याच्या इशार्यांवर चालणार्या आपल्या या संस्कृतीमधे एका मराठी माणसाला पैडमैन बनून मुलीसोबत सेल्फी काढायची गजचं भासत नही आहे, कारण आजच्या मुलींचे खरे आईबाप टेलीव्हिजन ऐड्स ह्या आहेत..! बाकीचे काम आई करून देते. जवळ जवळ सगळे मुलभूत शिक्षण हे तिला आपल्या आईकडुनच प्राप्त होतात. असो..!

आता संत वैलेंटाईनच्या कृपेने मुलीलाच आपली लाडकी समझुन हा पत्र लिहण्याचे प्रयत्न करतो आहे, बघा आवडलं तर..! माझ्या मुलीला आवडलं म्हणजे झालं, शेवटी हा पत्र तिलाच लिहितोय ना मी..! मार्क झुकरबर्ग किव्हां बच्चन साहेबासारखं मला पत्र लिहिता येणार नाही कारण मी त्यांच्या सारखा मोठा माणुस नाही आहे..! तरी पण, ‘मातृभारतीला’ वंदन करून दोन शब्द लिहतो (एरवी एका-मागे-एक इ-मेल येत आहेत कि तुम्ही लिहाच एक वैलेंटाईन पत्र.., असो)

माझ्या लाडक्या मुलीला एक पत्र..!13 वर्षापुर्वी तू आली आणि माझे तुझ्या आईवरचे प्रेमाव्यतिरिक्तही एक नवीन प्रेमाचे बी अंकुरीत झाले. हा एक नवीन प्रकारचा प्रेम होता माझ्यासाठी. बाप आणी लेकीमधला प्रेम..! तब्बल दहा महीन्याची बिनपगारी रजा घेतली होती मी..! नंतर नोकरीच नवीन शोधावी लागली, ही गोष्ट वेग़ळी..! तरी पण आपलं कसं होईल, मी एकटा ह्या दोघींना कसा सांभाळणार, नवीन फ्लैटचे हप्ते कसे भरणार, घर कसं चालवणार..! काहीही अवघड वाटले नाही, कारण तू माझ्यासोबत होती..! तुझा हसरा चेहरा बघितला की मला माझे सारे कष्ट आपोआप नाहीसे होवून जायचे. कधीही कुठलीही अडचन भासली कि मी तुझ्या जवळ येऊन बसायचो आणि तू आपले इवलेसे हाथपाय हालवित, कदाचित म्हणत असणार, “पप्पा काळजी करू नका, सगळं बरं होईन..!” मी स्मितहास्य देत तुझ्या डोकयावरून हाथ फिरवायचो, आणि खरचं संध्याकाळ पर्यंत ते काम होवून जायचे किंवा कोणी तरी कामाचे पैसे देवून जायचा..! कसे हासत खेळत ते ही दिवस निघुन गेले, काही कळलेच नाही.

आठ-नऊ महीन्यानी एका नवीन कंपनीत अर्ज केला आणि दोन महिन्यातच कॉल लेटर घरी आला. मी इंटरव्यूला गेलो, सिलेक्ट झालो आणि लगेच दुसर्या दिवसापासून ज्वाइनही झालो..! कदाचित आता पैस्यांची गरज़ वाढणार होती कि काय, माझ्या लाडकीला आमच्यापेक्षाही जास्त आमची काळजी होती.

संध्याकाळी तुझ्या आईचे दोन-चार पोळ्याटाके पर्यंत तुला झोका देता देता मी केलेली एक नवीनच अंगाई गीतेची रचना ऐकल्याशिवाय तुला झोप येत नव्हती. तुझी आई म्हणायची, “अहो, तुमचं गीत ऐकल्याशिवाय ही झोपत नाही..!” तर आईशिवाय बापसुद्धा अंगाई गीत किती चांगल्या पद्धतीने घडु व म्हणु शकतो, याचा मान तूच मला दिला.

बघता बघता तू आता 13 वर्षाची झाली, आता तुझे पदार्पण बालपणातुन युवावस्थेत होत आहे. अचानक तू ‘टीन-एज’ झाली याची मला थोडी काळजी वाटायला लागली. कसे सांभाळणार तू स्वतःला काही कळत नव्हतं. पण ज्या सामर्थ्याने तू स्वतःला सावरले त्याबद्दल मला तुझा नेहमीच अभिमान वाटणार आहे.

तू खूप मोठी हो, ज्या कार्यासाठी देवाने तुला या जगात पाठविले आहे, त्या सर्व कार्याबद्दल तुला उदंड आयुष्य लाभो हीच देवाचरणी प्रार्थना आहे. आता येत्या चार पाच वर्षात तुला तुझे करीअर निवडाचे आहे. दहावी बारावीचे परिक्षेची तैयारी करायची आहे, त्याचा हाच मुलभूत पाया आहे. आताच जर का अभ्यासाचा पाया भक्कम केला तर तो पुढे कॉलेज आणि त्यानंतर कॉम्पिटिटीव परिक्षेकरिता खूप कामात येणार आहे. म्हणुनच शाळेचा अभ्यास हा खूप महत्वाचा असतो, ते तू नक्किच चांगल्या पद्धतिने करीत आहे, हे मला माहित आहे.

आजची युवती खूप उँच भरारी घेत आहे यात काहिच शंका नाही. जल, थल असो किंव्हा नभ, या तिन्ही ठिकाणी युवतींनी आपले सामर्थ्य गाजविले आहे. कल्पना चावला, सुनिता पंड्या विलियम्स, पी.व्ही. सिंधू, मॅरी कॉम असो कि समुद्रभरारी घेणारी – तारिणीची महिला नेव्ही टिम असो, महिला क्रिकेट टिम असो किंव्हा अणु-वैज्ञानिक असो कि बिझनेस वुमन ऑफ द इयर.., सगळीकडे युवतींची आपल्या सहपाठी युवकांक्या बरोबरीचे काम करीत आहे आणि त्या कुठेही कमी पडत नाही आहे, हे लक्षणीय बाब आहे.खरंतर आभार मानावे लागेल त्या ‘सावित्रीचे’ जिच्या अथक प्रयत्नाने आज आपण स्त्रीला आपल्या पायावर उभी राहतांना बघत आहोत आणि याचा अभिमान घेत आहोत.

शिक्षण घेतल्यावर तुला या जगाचा ज्ञान होईल. आपलं बरंवाईट कळायला लागेल. स्वतःच्या पायावर उभी राहल्यावर आपल्याला स्वाभिमाने जगता येतो, आपण कोणाच्या बंधनात नाही आहोत याची जाणीव होते; आणि हीच जाणीव आपल्याला जीवनात संघर्ष करायला बळ देते. सुखासोबतच दुःखातसुद्धा कसे खंबीरपणे उभे राहायचे, या साठी बळ व मार्गही सुचतो.

शिक्षणाला आपली शिदोरी म्हटल्या जाते. जगाच्या कुठल्याही पाठीवर जाशिल तिथे तुझे हेच शिक्षण शिदोरी बनुन तुझे पोट भरायला मदद करणार. एक शिक्षित स्त्री आपल्या संपुर्ण परिवाराला शिक्षित करते, हे उगीच म्हटल्या गेलं नाही आहे. याच्यामागे सुद्धा खूप सखोल अभ्यास आहे. आपल्या परिवारावर आलेल्या संकटाशी सुद्धा आपले हेच शिक्षण कामात येत असतं.

जुन्या काळात बाप म्हणेल तिथेच मुलीचे लग्न होत असत. मग तो नवरा मुलगा कसाही असु दे, आपली मुलगी मुक्या जनावरासारखी त्याच्या सोबत लग्न करून सासरी चालली जायची. बरेचदा बालविवाह सुद्धा होत असत, पण आता जग बदललेला आहे. आता मुलींची पसंतीसुद्धा विचारली जाते आणि ती काळाची गरजही आहे. तू सुद्धा तुझ्या पसंती द्याला स्वतंत्र राहणार आहेस. जगाची परवाह न करता आपली पसंतीवर ठामपणे कायम राहशील, हीच माझी अपेक्षा आहे. कुठलं करिअर निवडायचं, कोणते कपडे घालायचे, कुठला रंग निवडायचा, कशी नोकरी पत्करायची, कोणाबरोबर लग़्न करायचे, कधी करायचे, कश्या पद्धतीने आणि कुठे करायचे.., हे सगळं ठरवायला तू नेहमीच मोकळी आणि स्वतंत्र राहणार आहेस, हे मी या पत्राच्या माध्यमाने तुला सांगु इच्छितो.

शेवटी, एकच अपेक्षा आहे, माझ्या आईची जागा तू घेतली आणि मला काहीही कमी पडु देले नाही, अशीच माया आयुष्यभर आम्हा माय-बापावर असू दे. अर्थातच सगळ्या मुली आपल्या बापाच्या लाडक्या असतात, मुलापेक्षाही जास्त जीव लावतात आणि शेवटपर्यंत काळजी ही घेतात, जरी त्या परदेशात राहत असेल, तरी त्या वेळातुन वेळ काडुन वर्षातुन एकदा तरी आपल्या म्हातार्या आईबापाला भेटायला येतात.बस, हिच आमची अखेरची सदिच्छा आहे. एकुलती एक असल्यामुळे आमचं सगळं तुझंच आहे. तुझ्या आईच्या कृपेनी लावलेलं हे घराचं रोपटं, हळु हळु तुझ्यासोबतच मोठं होत चाललं आहे. आमच्यानंतर त्याचे सांभाळ करशील, कारण स्वतःचे घर असेल तर आपल्याला खूप मोठा आर्थिक आधार असतो. वेळप्रसंगी हा घर तुमची आर्थिक टंचाई दूर करेल. इतके लिहून मी इथेच थांबणार आहे. देव तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पुर्ण करो, हीच सदिच्छा..!

अनेकानेक आशिर्वाद...तुझे पिता -मनीष गोडे, नागपूर.ता. 23/02/2018.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED