नवे क्षितिज - 1 Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवे क्षितिज - 1

नवे क्षितिज

मे महिन्याचे दिवस - दुपारची वेळ- सूर्य जणू आग ओकत होता. प्रिया बस-स्टाॅपवर उतरली आणि झपाझप पावले उचलू लागली. 'बरं झालं घर जवळ आहे.' ती स्वत:शी म्हणाली आणि कडक उन्हापासून वाचण्यासाठी आणखी जलद चालण्याचा प्रयत्न करू लागली. पण गुडघे दुखत असल्यामुळे गती वाढवणं तिला शक्य होत नव्हतं. ' पन्नाशी उलटली. आता थोडेच पुर्वीसारखं धावता येणार आहे ?' ती स्वत:शी म्हणाली . एवढ्यात तिच्या बाजूला एक गाडी गचकन् उभी राहिली. ब्रेकच्या कर्कश आवाजाने सुप्रिया दचकली आणि गाडीकडे पाहू लागली. कारमधून एक स्त्री खाली उतरली, आणि तिने प्रियाला मिठी मारली."मला ओळखलं नाहीस तू प्रिया?" प्रिया भेटल्याचा आनंद तिच्या स्वरात ओसंडत होता. प्रियाने तिच्याकडे निरखून पाहिले आणि ओळख पटताच ती जवळ-जवळ ओरडली , " अग! नंदा तू ? किती बदललीस ? मी तर तुला ओळखलंच नाही. किती वर्षांनी भेटतोय आपण ! "

" ते शाळेतले दिवस विसरली नाहीस नं? नाही; मला विसरलीस म्हणून विचारलं " नंदाने हसून विचारलं.

" ते सोनेरी दिवस कसे विसरता येतील ? पण तुझ्यात एवढा बदल झालाय, की ओळखूच येत नाहियेस." नंदाच्या बाॅबकटकडे आणि मेक-अपकडे बघत प्रिया म्हणाली. तिला शाळेतली दोन वेण्या बांधणारी , गोड चेह-याची, चुणचुणीत नंदा आठवली.

" मला तर तुझी रोज आठवण येते. उगाच नाही तुला पाहिल्याबरोबर ओळखलं. " नंदा म्हणाली. इतक्या उन्हात कुठे गेली होतीस? कार घेऊन का नाही गेलीस? " सुप्रियाचं लग्न सधन कुटुंबात झालं होतं, हे माहीत असल्यामुळे नंदाने आश्चर्याने विचारलं.

" माझा मुलगा - ' संतोष ' गाडी दवाखान्यात घेऊन जातो. दवाखाना जवळ आहे ,पण त्याला व्हिजिटला जाण्यासाठी गाडी लागते." सुप्रिया म्हणाली.

बालपणीच्या जिवलग मैत्रिणींची अचानक भेट झाली होती. दोघींचाही आनंद गगनात मावत नव्हता. " माझं घर त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये आहे. चल, आपण चहा घेऊ आणि मस्त गप्पाही मारू." प्रिया उत्साहाने म्हणाली. नंदा एका महत्वाच्या मीटिंसाठी चालली होती, पण प्रियाबरोबर काही वेळ घालवण्याचा मोह तिला आवरता येईना

" मला एका महत्वाच्या मीटिंगसाठी जायचं आहे.अगदी थोडा वेळ थांबेन , चालेल? " तिने विचारले.

" काही हरकत नाही, चल! माझं घर तर बघून जा! " प्रिया म्हणाली.गाडीत बसलेल्या सेक्रेटरीला - 'लीनाला' थोडा वेळ गाडीत थांबायला सांगून ती सुप्रियाबरोबर निघाली.

कुठे तरी काहीतरी चुकतंय असं सुप्रियाला पाहिल्यापासूनच नंदाला सारखं वाटत होते. तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या सासरची श्रीमंती तिने पाहिली होती. नंतर तिला भेटायला म्हणून एकदा मुंबईला गेली होती; तेव्हा पाहिलेला वैभवशाली बंगला, तिथले लगबगीने कामे करणारे नोकर-चाकर, पोर्चमध्ये उभा असलेला गाड्यांचा ताफा तिला आठवला. पण ही सुप्रिया तर मध्यमवर्गीय गृहिणी वाटत होती .

सुप्रियाला पाहिल्याबरोबर तिच्या चार -पाच वर्षांच्या नातीने धावत येऊन तिला मिठी मारली आणि नंदाकडे संभ्रमाने पाहिले. " ही नंदा आजी आहे बरं का! तुझ्या आजीची फ्रेंड! हॅलो म्हण तिला!" प्रियाने तिला समजावले. मग मात्र आजीची फ्रेंड तिचीही फ्रेंड झाली. तिने तिच्या बाहुल्या नंदाला दाखवल्या! बोबड्या स्वरात गाणं म्हणून दाखवलं! चित्रांची पुस्तकं दाखवली! प्रियाने लहानसाच फ्लॅट पण छान सजवला होता. सुटसुटीत फर्निचर आणि प्रसन्न गृहरचना असलेला तो फ्लॅट गृहिणीच्या चोखंदळपणाची आणि उच्च अभिरुचीची जाणीव करून देत होता. तिच्या सुनेने चहा आणि स्नॅक्स समोर आणून ठेवले. चहा घेता घेता तिने काळजीच्या स्वरात सुप्रियाला विचारले, " प्रिया ! किती बदललीस तू? तब्येत बरी असते नं तुझी?"

"वयोमानानुसार तब्येतीचे चढ-उतार आलेच ! प्रकृतीच्या बारीक - सारीक कुरबुरी आहेत! पण तशी अगदी ठणठणीत आहे मी !" नंदा हसत म्हणाली.

"पण तुझा बंगला तर मलबार हिल वर होता. तू इथे कशी? " नंदाला विचारल्याशिवाय रहावेना.

"काही वर्षांपूर्वी सुधाकरना शेअर - मार्केटमध्ये फटका बसला फॅक्टरी, बंगला सर्व काही विकावे लागले. देणी दिल्यावरही तसे बरेच पैसे शिल्लक राहिले त्यातून हा फ्लॅट विकत घेतला. त्यानंतर आम्ही नवीन बिझिनेस सुरू केला. पण व्यवसायात जम बसायला थोडा वेळ लागणारच! आता आमचा बिझिनेस चांगला चालला आहे. परमेश्वराची कृपा म्हणायची ; की एवढे संकट येऊनही सुधाकर खचून गेले नाहीत . संतोषही खूप हुशार निघाला. या विभागातील यशस्वी डाॅक्टर आहे तो ! सूनही सूस्वभावी आहे . खूप शिकलेली आहे - प्रोफेसर आहे. पण आमच्यावर मुलीसारखी माया करते. आता मे महिना आहे म्हणून ती घरी आहे. एरव्ही छोट्या नेहाबरोबर मीच घरी असते. त्यामुळे माझी ओढ तिला जास्त आहे. मलाही तिच्याशिवाय करमत नाही." हे सर्व बोलताना तिच्या स्वरात पतीविषयी आणि मुलाविषयी आणि घराविषयी फक्त अभिमान होता. गतवैभवाविषयी बोलताना दु:खाची लहानशी किनारही तिच्या आवाजात जाणवत नव्हती. नंदाने घड्याळाकडे पाहिले .

" मला आता उशीर होतोय ! मी निघते आता!" नंदा अनिच्छेने म्हणाली. तिला मैत्रिणीशी अजून खूप बोलायचं होतं. पण मीटिंग चुकवून चालणार नव्हतं.

" परत कधी भेटशील? " सुप्रियाने विचारले.

"मी अजून दोन दिवस मुंबईत आहे.नंतर दिल्लीला एका महत्त्वाच्या कामासाठी जावे लागणार आहे. आता माझ्या घरी तूच ये मला भेटायला." नंदा आग्रहाने म्हणाली." उद्या दुपारी लंचला येशील? "

" उद्या दुपारी नाही जमणार. सुधाकरनी एका नाटकाची तिकिटे आणली आहेत. दुपारचे नाटक आहे तिकडे जायचे आहे. बेत रद्द झाला तर. त्यांचा हिरमोड होईल. नाटकांची फार आवड आहे त्यांना! मी उद्या संध्याकाळी नक्की येईन . येण्यापूर्वी मी फोन करेन तुला." सुप्रियाने तिचे आमंत्रण लगेच स्वीकारले. इमारतीमधून खाली उतरल्यावर नंदाने वर मान करून सुप्रियाच्या फ्लॅटकडे पाहिले. नातीला कडेवर घेऊन ती नंदाला 'बाय' करत होती. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होते.

***

नंदाची मीटिंग अत्यंत यशस्वी झाली. तिला मोठे काँन्ट्रॅक्टही मिळाले. घरी जाताना ती खूप आनंदात होती. तिची स्मार्ट सेक्रेटरी लीनाही तिच्या बरोबर होती. नंदाच्या गळ्यातला नेकलेस पाहून ती म्हणाली, " मॅडम! किती सुंदर नेकलेस आहे तुमचा! आणि तुमच्या गळ्यात अधिकच सुंदर दिसतोय." ती तिच्या मॅडमना खुश करण्यासाठी बोलत होती. पण तो नेकलेस नंदाच्या गळ्यात खुलून दिसत होता ही गोष्ट मात्र खरी होती. वयाचा प्रभाव नंदाच्या सॊंदर्यावर पडला नव्हता. "वीस लाखाचा आहे." नंदा अभिमानाने म्हणाली. "तुमची निवड नेहमीच एक्सक्लूझिव्ह असते, मॅडम !" लीनाने तिची स्तुति करायची संधी सोडली नाही.

घरी जाईपर्यंत रात्र झाली होती. बागेतील फुलांचा सुगंध तिच्या चित्तवृत्ती प्रसन्न करत होता. आकाशातील ता-यांच्या पार्श्वभूमीवर चमकणाऱ्या आपल्या देखण्या बंगल्याकडे पाहून नकळत सुप्रियाच्या छोट्याशा फ्लॅटशी ती तुलना करू लागली तिला आपला पुण्याचा याच्यापेक्षाही आलिशान बंगला आठवला, आणि तिला स्वतःचा अभिमान वाटला. आत आचारी रमेश तिचीच वाट पहात होता. त्याने " चहा आणू की सरबत?" असे अदबीने विचारले." मला आता काही नको. आणि रात्रीचे जेवणही नको. घरी गेलास तरी चालेल." नंदा म्हणाली. 'आमचं दोघींचंही जेवण झालंय ."

काही ना काही कारणासाठी सतत डाफरणाऱ्या मालकीणबाईना आज इतक्या चांगल्या मूडमध्ये पाहून रमेशला आश्चर्य वाटलं. काल " मुलाला बरे नाही , लवकर घरी जाऊ का?" असं विचारलं तेव्हा किती रागावल्या होत्या. नेहमी मी इथे नसते तेव्हा काय काम असतं? आणि मी आता इथे आहे तर तुला लवकर जायचय.तुम्हा लोकांना फुकट पगार हवा असतो " असे जिवाला लगणारे शब्द त्यंच्या तोंडून आले,तेव्हा नोकरी सोडून द्यावी असं वाटलं होतं; पण दोन्ही मुलांचे चेहरे नजरेसमोर आले; आणि मूग गिळून गप्प बसलो. "बरं झालं! आज तरी मुलाबरोबर रहाता येईल ." तो मनाशी म्हणाला आणि घाईघाईत घरी जायला निघाला. साफ-सफाई करणारी सुशीला संध्याकाळीच काम करून गेली होती. फक्त माळीदादा आणि लीना तिच्या सोबतीला होते. माळीदादा नोकरांच्या खोलीत झोपले होते. लीनाशी आजकाल नंदाची खूप जवळीक झाली होती. चोवीस तास नंदाला लीनाची कंपनी लागत होती. तिचा तिला खूप आधार वाटे. लीना जरी सेक्रेटरी असली तरी ती नंदाची जवळची मैत्रीण झाली होती. हळूहळू नंदा तिच्यावर पूर्ण अवलंबून राहू लागली होती. सुंदर आणि तरूण लीना कामामध्ये हुशार होती आणि नंदाचा शब्द झेलायला नेहमीच तयार असे. आजही ती नंदाच्या बंगल्यातच झोपणार होती.

*******

cotd ----prt 2