नवे क्षितिज - 2 Amita a. Salvi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवे क्षितिज - 2

नवे क्षितिज

part II

लीना जरी सेक्रेटरी असली तरी ती नंदाची जवळची मैत्रीण झाली होती. हळूहळू नंदा लीनावर पूर्ण अवलंबून राहू लागली होती. सुंदर आणि तरूण लीना कामामध्ये हुशार होती आणि नंदाचा शब्द झेलायला नेहमीच तयार असे. आजही लीना तिच्या बंगल्यातच झोपणार होती. ती गेस्ट-रूममध्ये झोपली. नंदाचा आलिशान बेडरूम गेस्टरूममध्ये पासून खूप लांब होता. मध्ये मोठा काॅरिडाॅर होता. बंगल्यात जीवघेणी शांतता होती. इतक्या शांत वातावरणामुळे नंद अस्वस्थ झाली. प्रथमच तिला खूप एकाकी वाटू लागले . पुण्याला तिचे कायम वास्तव्य असल्यामुळे नोकर-चाकर खूप होते. जेवण बनवणारे आणि बंगल्याची साफसफाई करणारे दांपत्य बंगल्यातच नोकरांच्या खोलीत रहात असे.त्यांची दोन मुलेही इकडे-तिकडे धावताना - खेळताना दिसत. आऊटहाऊसमध्ये माळीदादांचे कुटुंब रहात असे. इतर नोकरही होतेच. नंदा त्यांच्याशी जरी फटकून वागत असे, तरी सतत आजूबाजूला माणसांचा वावर असल्यामुळे तिला एकटेपणा कधी जाणवला नव्हता; शिवाय ती वास्तू सवयीची होती . पण इथे बंगल्याच्या भिंती जणू अंगावर येतायत असा भास तिला होऊ लागला. कदाचित् सुप्रियाचे हसते - खेळते घर पाहिल्यावर एकटेपणाची जाणीव तिला प्रकर्षाने होऊ लागली असावी. विचार करता करता तिचा डोळा लागला. झोपेत तिचे पती रणजीत समोर आरामखुर्चीवर बसून तिला आणि त्यांच्या मुलाला - यशला हाका मारतायत असा भास नंदाला झाला. त्यांच्या आवाजाने जणू संपूर्ण घर हादरू लागले. जेव्हा नंदा स्वप्नातून जागी झाली तेव्हा ती थरथरत होती. तिचे हृदय धडधडत होते.असे वाटत होते की रणजित काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. तिला काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करत होते. पतींच्या निधनानंतर शोक करत बसण्यापेक्षा त्याचे उद्योग - साम्राज्य सांभाळण्यात तिने स्वतःला गुंतवून घेतले होते. पण आजपर्यंत असा भास तिला कधीच झाला नव्हता. मग आजच का? हा कसला संकेत तर नव्हता? " बहूतेक सुप्रियाचे भरलेले घर बघून मला एकटेपणा जाणवतोय आणि असे विचित्र भास होतायत ' तिने स्वतःला समजावले. आणि परत झोपण्याचा प्रयत्न करू लागली.पण तिला आता झोप येणे शक्यच नव्हते. तिची झोप पूर्णपणे उडाली होती. 'आजचा दिवस काही वेगळाच गेला.' ती मनात म्हणाली. 'आज खूप वर्षानी सुप्रिया भेटली. किती बदललीय ती ! ' नंदाचे मन भूतकाळाकडे ओढ घेत होते. तिला बालपणीचे मंतरलेले दिवस आठवत होते . ते अल्लड बालपण ! ती खेड्यातली लहानशी शाळा - सुप्रियाबरोबरची मैत्री- दोघींचं शेतांमधून वारा प्याल्यासारखे धावणं ! पहिल्या पावसात भिजणं- -रात्री जागून केलेला अभ्यास- - नंदाच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य असूनही बालपण सुसह्य झाले होते सुप्रियामुळे !

***

सुप्रिया आणि नंदा एकाच वर्गात होत्या. घरापासून शाळा लांब होती. अर्धा तास चालावे लागे. नंदाला चालत जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. प्रिया मात्र गाडीतून शाळेत येत असे. तिला शाळेत सोडायला ड्रायव्हर येत असे. तिचे वडील नारायणराव गावचे जमीनदार ! घरी गडगंज श्रीमंती, मोठा वाडा--- आणि मनाने त्याहीपेक्षा मोठे! गावची शाळा बांधण्यात त्यांचाच पुढाकार होता. गावातील अनेक हुशार गरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली होती. गावात कोणालाही गरज लागली तर त्यांचा मदतीचा हात नेहमीच पुढे असे. त्या गावात प्रत्येकाला त्यांचा मोठा आधार वाटत असे. अशा नारायणरावांची मुलगी म्हणून शाळेत सुप्रियाला नेहमी सन्मानाची वागणूक मिळत असे. अभ्यासातही ती हुशार होती. पण श्रीमंतीचा दिमाख तिच्या वागण्या-बोलण्यात नव्हता . शाळेत सगळ्यांशी ती मिळून मिसळून वागे. एका वर्षी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी बसवायला घेतलेल्या नाटकाच्या निमित्ताने नंदाची आणि तिची ओळख झाली. हळूहळू त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली ; की शाळेत जाताना सुप्रियाची गाडी तिच्या घरासमोर थांबू लागली ; आणि तिला घेऊनच पुढे जाऊ लागली आणि घरी जातानाही तिला घरी सोडून जाऊ लागली. कधी कधी मधेच त्या दोघी गाडीतून उतरत असत आणि खांद्यावर हात ठेऊन गप्पा मारत चालणे पसंत करीत. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांवरील कै-या, पेरू , दगड मारून पाडत, कधी काटेरी जाळीतील करवंदे वेचत त्यांचा आस्वाद घेत-घेत रमत-गमत चालत असत. मोठ्या वर्गात गेल्यावर तिचा मुक्काम अभ्यासाच्या निमित्ताने दिवस-रात्र सुप्रियाच्या घरी असे. त्या वाड्यावर सगळ्या गोष्टींची समृद्धी होती. तिथून आपल्या घरी जाऊच नये असे नंदाला वाटे . तेव्हापासूनच ती स्वतःची आणि सुप्रियाची तुलना करू लागली होती. मनातल्या मनात ती तिचा मत्सर करू लागली होती, तिला स्वतःच्या घरची गरीबी टोचू लागली होती आणि पुढील आयुष्यात श्रीमंत होणे आणि सुखासीन आयुष्य जगणे हे एकच ध्येय तिने नजरेसमोर ठेवले होते.

***

गावात काॅलेज नव्हते. एस. एस. सी. झाल्यावर सुप्रियाला तिच्या वडिलांनी पुढील शिक्षणासाठी तिला पुण्याला पाठवायचे ठरवले. नंदाचाही शिक्षणाचा खर्च उचलून तिलाही सुप्रियाबरोबर पुण्याला पाठवायचे असे ठरले. नंदासारख्या हुशार मुलीचे शिक्षण थांबू नये या विचाराबरोबरच सुप्रियाला सोबत व्हावी; मोठ्या शहरात ती एकटी पडू नये , हा हेतूही होताच! नंदाचे आईवडीलही तिला पुण्याला पाठवायला तयार झाले. पुण्याला नारायणरावांनी मुलींसाठी एक घर भाड्याने घेतले होते. घरातील सगळे काम करायला एक बाई होती. नंदा खर्चासाठी पैसे मिळवण्यासाठी काही शिकवण्या घेत असे; पण सुट्टीच्या दिवशी दोघी खूप भटकत असत. कधी एखादे नाटक किंवा सिनेमा पहात. रात्री रेडिओ ऎकत ! शहरातले असे सुखासीन आयुष्य सोडून परत गावी जायचे नाही हे नंदाने मनातल्या मनात पक्के ठरविले होते. सुट्टीतही ती कधी गावी गेली नाही. नोकरी मिळवण्याच्या दृष्टीने काही शाॅर्ट कोर्सेस ती सुट्टीत पुण्यात राहून करत असे. पण सुप्रियाला मात्र कधी काॅलेज संपते आणि कधी आई - बाबांना भेटते असे होत असे. काॅलेजची शेवटची परीक्षा झाल्यावरही ती गावी गेली पण सुट्टी संपल्यावर परत पुण्याला येणार होती. तिला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचे होते. नंदाने मात्र परीक्षा झाल्याबरोबर नोकरी मिळविण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्या होत्या. तिने शाॅर्टहँड आणि टायपिंग शिकायला सुरुवात पूर्वीच केली होती तो कोर्स पूर्ण करण्यासाठी ती पुण्यातच राहिली. नोकरीसाठी तिने अर्ज करायलाही सुरुवात केली. कारण , यानंतर आपल्याला स्वतःच्या पायावर उभे रहावे लागणार हे तिच्या लक्षात आले होते. सुप्रियाच्या वडिलांनी अजूनपर्यंत जी मदत केली तीच खूप होती. त्यांच्यावर फार अवलंबून रहाणे योग्य नव्हते.

परीक्षा झाल्यावर सुप्रिया आईवडिलांना भेटायला गावी गेली, आणि ती तिथे असतानाच रिझल्ट. लागला. दोघीही पदवी परीक्षेत उत्तम मार्कांनी पास झाल्या.पण सुप्रिया पुण्याला परत जाण्यापूर्वीच नारायणरावांना हार्ट अटॅक आला. प्रकृती थोडी सुधारताच त्यांनी दर्शवलेली "माझ्या एकुलत्या एका मुलीचे लग्न माझ्या डोळ्यांसमोर व्हावे, " ही त्यांची इच्छा सुप्रिया टाळू शकली नाही. सुविख्यात कुटूंबातील सुंदर आणि सुशिक्षित सुप्रियाचे लग्न ठरायला वेळ लागला नाही . लवकरच तिचा विवाह मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योजक श्री. मनोहर पाटील यांच्या मुलाशी- सुधाकरशी झाला. लग्नाच्या खरेदीसाठी सुप्रिया पुण्याला आली तेव्हा लग्नासाठी नंदाला गावी घेऊन गेली. तिला भेटायला एकदा नंदा मुंबईला तिच्या सासरीही गेली होती. त्यावेळी तिच्या सासरचे वैभव पाहून तिचे डोळे विस्फारले होते. त्यानंतर मात्र दोघींच्या भेटी-गाठी बंद झाल्या. सुप्रिया तिच्या संसारात रमून गेली. नंदा गावी न जाता पुण्याला परतली. तिने दूरदृष्टी ठेऊन नोकरीसाठी जे प्रयत्न केले होते ते कामी आले आणि तिला एका लहानशा कंपनीत अल्प पगाराची का होईना, नोकरी मिळाली. आणि तिच्या स्वावलंबी आयुष्याची सुरुवात झाली.

तिची मावशी पुण्याला होती. अत्यंत गरिबीत रहात होती पण मायाळू होती . काही दिवस तिचा आधार घ्यावा लागला. तिच्या आईने अट घातली होती ; की, " जर मावशीकडे रहायला तयार असशील तरच पुण्याला रहा; नाहीतर गावी परत ये." त्यामुळे तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शिवाय तिला मिळणारा पगार घराचे भाडे भरण्यातच संपून गेला असता. मावशीकडे राहून ती थोडे पैसे बाजूला टाकू शकत होती. त्यामुळे आईचे म्हणणे ऐकणे तिच्या बजेटच्या दृष्टीनेही हितकारक होते . इथेही तिच्या गावच्या घरासारखीच परिस्थिती होती ; पण माणसे चांगली होती. मावशी, तिचा मुलगा श्रीधर तिच्याशी खूप प्रेमाने वागत. तरीही शक्य होईल तितक्या लवकर इथून बाहेर पडायचे असे ठरवले होते. नोकरी करता करता तिने शाॅर्टहँडचा कोर्स पूर्ण केला आणि तिला तिला एका मोठ्या कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये स्टेनोचा चांगल्या पगाराचा जाॅब मिळाला.या सर्व घडामोडींमधे दोन वर्षे निघून गेली.

तिची मावशीच्या मोडक्या संसारापासून दूर होण्याची इच्छा लवकरच पूर्ण होईल अशी चिन्हे दिसू लागली. तिच्या आॅफीसमध्ये राकेश नावाचा एक इंजिनियर ट्रान्सफर होऊन आला. राकेश अत्यंत हुशार आणि देखणा तरूण होता. सुस्वभावी होता . कंपनीमध्ये मोठ्या हुद्दयावर होता. त्याला पगारही भरपूर होता. नंदाकडे पाहून त्याचे कुतुहल जागे झाले. ती भविष्याचा विचार करून पैसे साठवीत असल्यामुळे ती अत्यंत साधेपणाने रहात असे. ती मीतभाषी होती. त्यामुळे आॅफिसमधील इतर फॅशनेबल मुलींमध्ये उठून दिसत असे. राकेशला ती साधी - सरळ मुलगी वाटली तर नवल नव्हते.त्यामुळे तो स्वाभाविकपणे तिच्याकडे आकर्षिला गेला. तिच्या सॊंदर्यावर आणि निष्पाप चेह-यावर भाळलेल्या राकेशला तिच्या स्वभावाचे खरे आकलन इतक्या कमी वेळात होणे शक्य नव्हते. त्यांची वाढती जवळीक पाहून ती दोघे लवकरच लग्न करतील असे त्यांच्या आॅफिसमध्ये प्रत्येकाला वाटत होते. पण मधल्या काळात अशा घटना घडल्या; की सर्व चित्र बदलून गेले.

*****

cotd.-- part. 3