नवे क्षितिज - 3 Amita a. Salvi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवे क्षितिज - 3

नवे क्षितिज

part 3

त्या दिवशी नंदा आॅफीसमध्ये गेली तेव्हा सगळ्या स्टाफची धावपळ चालली होती.

" आज कसली गडबड चालली आहे ? " नंदाने आश्चर्याने विचारले.

" आज आपल्या कंपनीचे मालक रणजीत व्हिजिटसाठी येतायत. तूझ्याकडचे पेपर्स पेंडिंग असतील तर पूर्ण करून ठेव." कंपनीची रिसेप्शनिस्ट -शीला - म्हणाली.

" ते इथे प्रथमच कसे येतायत?" नंदाने कुतुहलाने विचारले.

" पाच वर्षे झाली ; ते लंडनला असतात. तिथूनच इकडच्या उद्योगांवर लक्ष ठेवतात. क्वचितच भारतात येतात." शीलाने माहिती पुरवली.

"त्यांची सगळी फॅमिली तिकडेच रहाते कां?" नंदाने सहजच विचारले.

" तोच तर मोठा प्राॅब्लेम आहे. पाच वर्षांपूर्वी बाळंतपणात त्यांची पत्नी निवर्तली. त्यानंतर त्यांना इथे रहावेसे वाटत नाही. त्यावेळी त्यांचा मुलगा वाचला त्याला त्यांचे आई- वडील सांभाळतात. रणजीत सरांचे मधल्या काळात व्यवसायाकडेही लक्ष नव्हते. पण इथल्या विश्वासू अधिकाऱ्यांनी इथली व्यवस्था चोख सांभाळली. आता ते हळू हळू धक्क्यातून स्वतःला सावरायला लागलेयत. आणि कामात लक्ष घालायला लागलेयत. " बाॅसविषयी आपल्याला एवढी माहिती आहे याचा अभिमान शीलाच्या स्वरात डोकावत होता. " मी काय बोलत बसलेय. किती कामे करायची राहिलीयत." स्वतःच्या टेबलाकडे लगबगीने जाताजाता ती म्हणाली. तिच्या बोलण्यामुळे रणजित कसे असतील हे कुतुहल नंदाच्या मनात आणखीनच वाढले आणि ती रणजीत येण्याची वाट पाहू लागली. आज राकेशचेही तिच्याकडे लक्ष नव्हते. तो आपल्या फाइल्स. व्यवस्थित करण्यात दंग होता. रणजित दुपारी आले. पण आॅफिसच्या सर्व डिपार्टमेंन्ट्सचे काम बघता बघता रात्र झाली. नंदा स्टेनो असल्यामुळे तिला शेवटपर्यंत थांबणे भाग होते. खूप रात्र झाल्यामुळे राकेश तिला सोडायला घरापर्यंत गेला.

" कसे वाटले रणजीतसाहेब? " वाटेत त्याने सहज विचारले.

" किती स्मार्ट आहेत नं? " ती पट्कन बोलून गेली राकेशने चमकून तिच्याकडे पाहिले. " मी त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयीचा विचारलं " तो म्हणाला.

" कामाविषयी तर विचारायलाच नको. किती हुशार आहेत! किती पटापट आॅफिसचे काम त्यांनी नजरेखालून घातले! " तिच्या बोलण्यावरून रणजीतच्या व्यक्तिमत्वाने ती किती भारावून गेली आहे हे स्पष्ट होत होते.

राकेशला वाटले होते की उशीरापर्यंत थांबावे लागल्यामुळे ती चिडली असेल. नंदाची ही प्रतिक्रिया त्याला अनपेक्षित होती. नंदाचे श्रीमंत लोक आणि श्रीमंतीविषयीचे आकर्षण त्याला माहीत असते तर त्याला तिच्या वागण्याचे आश्चर्य वाटले नसते.

दुस-या दिवशीही रणजीत आॅफीसमध्ये आले. त्यांचे जाणे बहुधा लांबले असावे. एक नवीन मोठा प्राॅजेक्ट सुरू करण्याचा त्यांचा मानस होता. त्यासाठी सर्व गोष्टींची जुळवाजुळव चालली होती. सर्व गोष्टी जमून येईपर्यंत बरेच दिवस जाणार होते. चार - सहा महिने तरी त्यांना भारतात रहावे लागणार होते. या सहा महिन्यात नंदा आणि रणजीतमधला परिचय बराच वाढला. तिच्या सॊंदर्याने आणि शांत स्वभावाने ते प्रभावित झाले. जेव्हा त्यांनी तिला लग्नाविषयी विचारले, तेव्हा ती एवढी चकित झाली की काय बोलावं हेच तिला सुचेना. रणजीतच्या आणि तिच्या सांपत्तिक स्थिति आणि सामाजिक स्तरामध्ये जमीन अस्मानाचा फरक होता. असे असताना त्यांनी अशी इच्छा प्रकट करावी हे मोठे आश्चर्य होते. तिच्या मनातील प्रश्नाचं उत्तर तिला रणजीतच्या पुढील बोलण्यात मिळालं. " काही वर्षांपासून आमचं सर्व कुटंब विस्कळित झालंय. मी परदेशात - माझ्या आई - बाबांना या वयात माझ्या मुलाला- 'यश' ला सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी लागतेय. तुझ्यासारखी हुशार आणि समजूतदार स्त्री आमच्या घराची घडी नक्की नीट बसवू शकते." रणजित बोलत होते. " पण तू विचार करून निर्णय घे. तू जरी नाही म्हणालीस तरी तुला नोकरीमध्ये काही त्रास होणार नाही. तेव्हा अगदी मोकळ्या मनाने निर्णय घे."

" मी विचार करून सांगते." नंदा म्हणाली.

राकेश कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. तो जवळ असता, तर कदाचित् नंदाला विचार करण्याची गरज लागली नसती. तिने लगेच रणजीतना तिची असमर्थता सांगून टाकली असती . पण आज तिने विचार करून सांगते असे सांगितले तेव्हाच रणजीतचे पारडे प्रेमापेक्षा जड झाल्याचे स्पष्ट झाले होते. तिने लहानपणापासून. पहिलेली स्वप्ने साकार होण्याची वेळ आली असता ती संधी लाथाडण्याएवढी ती भावनेच्या आहारी जाणारी मुलगी नव्हती. पैशांच्या अभावी जगात कसे जगावे लागते हा अनुभव तिने लहानपणापासून घेतला होता. भावनेला महत्व देऊन एवढी मोठी संधी हातची जाऊ देण्याएवढी ती भोळी नव्हती. अचानक् आलेल्या संधीचा तिने फायदा घेतला. दुस-याच दिवशी त्यांना नंदाकडून लग्नासाठी होकार मिळाला. जेव्हा राकेश पुण्याला परतला तेव्हा ती सॊ . रणजित झाली होती. लग्न रजिस्टर्ड पद्धतीने झाले. पण रिसेप्शनला मात्र शहरातले सर्व मोठमोठे लोक आले होते. यशची परीक्षा चालू होणार असल्यामुळे रणजीतची आई - बाबा आणि यश लग्नानंतर लगेच विमानाने दिल्लीला गेले. रिसेप्शनसाठीही त्यांना थांबता आले नाही.

नंदाने प्रतारणा केली याचे दुःख राकेशला नक्कीच झाले पण त्याने मनाचा तोल ढासळू दिला नाही. नंदाकडे जाब विचारायलाही तो गेला नाही; कारण जे व्हायचे ते होऊन गेले होते. आता अकांडतांडव करून स्वतःचे हसे करून घेणे योग्य नव्हते. त्याने प्रयत्न करून बँगलोरच्या एका कंपनीत नोकरी मिळवली आणि एका चांगल्या मुलीशी लग्न करून सुखाचा संसार करू लागला.

***

यशची परीक्षा आटोपल्यावर लगेच तो आजी -आजोबांबरोबर पुण्याला आला. त्याला आणायला विमानतळावर नंदा आणि रणजीत दोघंही गेली होती. यशने नंदाला लग्नाच्या वेळी ओझरतेच पाहिले होते . त्यामुळे लगेच ओळखले नाही त्याने प्रश्नार्थक चेह-याने रणजीतकडे पाहिले. " अरे यश तू नेहमी आईविषयी विचारत असतोस नं ? ही तुझी आई आहे."

हे ऐकून छोटा यश नंदाला बिलगला. " आई! आता मला सोडून कुठे जाऊ नकोस हं! "

यशने त्याच्या आईला कधी पाहिले नव्हते. सावत्र आई वगैरे कळण्याचे त्याचे वय नव्हते. त्यामुळे आई म्हणून नंदाची ओळख करून दिल्यावर तो खुश होणे साहजिक होते. पण नंदाच्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते. ती विचार करत होती, ' हा जर जवळ राहिला तर मला स्वतःचे आयुष्यच उरणार नाही. त्याचे सर्व करताना एखादी आया आणि मी यांच्यात काहीच फरक रहाणार नाही. कसंही करून याला परत पाठविला पाहिजे. ' रणजीतला कसे समजावायचे हेही तिने ठरवून ठेवले.

ती यशपासून दूर राहू लागली. मनातून तिला गोबरे गाल आणि कुरळ्या केसांचा यश खूप आवडला होता. त्याला जवळ घ्यावे, त्याचे लाड करावे असे मनापासून वाटत होते. पण तिने मनाला आवर घातला. त्याला फार लळा लागता कामा नये या हेतूने ती त्याची सर्व कामे नोकरांना सांगे. यशला कुठे फिरायला न्यायला त्याचे मन रमवायला तिने कधी वेळ दिला नाही. हळू हळू तो कंटाळला. मला परत दिल्लीला जायचंय - मित्रांची आठवण येते म्हणू लागला. नंदाच्या परकेपणा दाखवण्याच्या वृत्तीमुळे रणजीतचे आई - बाबाही दुखावले गेले. त्यांना तिच्या दृष्टीने काहीही किंमत नव्हती आणि या घरात तिचाच अधिकार चालणार हे ती वेळोवेळी त्यांना दाखवून देत होती. त्या दोघांच्या मनात विचार येई, " ज्या क्षणी रणजीतची तू पत्नी झालीस तेव्हाच हे सर्व वैभव तुझे झाले. त्यात एवढा तोरा दाखवण्यासारखे काय आहे? आणि तोही त्याच्या आईवडिलांना? घरातले वडीलधारे म्हणून आई वडिलांनी मुलांकडून प्रेम आणि सन्मान यांचीही अपेक्षा ठेवायची नाही का? ईश्वराच्या कृपेने आमच्या मुलाचे आमच्यावर प्रेम आहे,आणि आमचे हातपाय अजून चालतायत.आम्ही हिच्यावर अवलंबून नाही पण जर तसे असते तर किती अपमानित आयुष्य काढावे लागले असते! " नंदाचे अजूनपर्यंतचे आयुष्य कसे गेले होते हे माहीत असते तर श्रीमंतीची एवढी नशा तिला का चढली आहे हा प्रश्न त्यांना पडला नसता. त्या दोघांनी रणजीतला तिच्या वागणुकीविषयी काहीही न सांगण्याचे ठरविले. आताच तो थोडा दुःखातून सावरतोय . त्याचा व्यवसाय सांभाळण्यासाठी त्याला किती कष्ट करावे लागतात! यावर घरच्या कटकटी सांगून त्याला आणखी तणावाखाली आणणे योग्य होणार नाही. आपला मुलगा किती हळवा आहे , हे त्यांना चांगलेच माहीत होते . उलट आता त्यांना त्याची काळजी वाटू लागली.' नंदा जर अशी बेजबाबदार आणि कठोर असेल तर रणजीतचे पुढे कसे होणार? ' ह्या चिंतेने त्यांच्या मनात घर केले . त्यांनी ठरविले , "आपले आता वय झाले आहे . निदान रणजीत सुखी राहू दे! आपण इथे जास्त काळ न थांबणेच योग्य होईल."

Cotd ---- part 4.