Nave Kshitij - 7 books and stories free download online pdf in Marathi

नवे क्षितिज - भाग 7

नवे क्षितिज

Part - 7

रमेशची चॊकशी पूर्ण झाल्यावर इन्स्पेक्टर सुप्रियाशी बोलले. सुप्रियाने त्यादोघींची मॆत्री, दोन दिवसांपूर्वी दोघींची खूप वर्षांनी झालेली भेट, नंदाने दिलेले जेवणाचे आमंत्रण इत्यादी सर्व गोष्टी त्यांना सविस्तर सांगितल्या. " इतकी सुंदर संध्याकाळ तिच्याबरोबर अनेक दिवसांनी अनुभवायला मिळाली, म्हणून तिला थँक्स देण्यासाठी मी रात्री तिला फोन करत होते. ती फोन उचलत नव्हती म्हणून रमेशला संशय आला, आणि तिचा जीव वाचला." जर रमेशने फोनकडे लक्ष दिले नसते तर? - या कल्पनेनेच सुप्रियाचे अंग शहारले.

"कोणाशी त्यांचा काही वाद होता का? काही बोलल्या त्या? तुमचा संशय आहे कोणावर?" इन्सपेक्टरनी विचारले.

" आमच्या गप्पा भूतकाळावर जास्त रंगल्या होत्या. इतर विषयांवर आम्ही फार कमी बोललो." सुप्रियाला नंदाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी फार कमी माहिती होती.

"मला आता हाॅस्पिटलमधे जावे लागेल. तिचा मुलगा यश रात्रभर तिच्याबरोबर आहे. बहुतेक ती आता शुद्धीवरही आली असेल. मी जाऊन यशला विश्रांती घ्यायला घरी पाठवते. चालेल का?" तिने विचारले.

"तुमची मैत्रीण शुद्धीवर आली आहे. त्यांचा जबाब नोंदवूनच मी इथे आलो. तुम्ही गेलात तरी चालेल." इन्सपेक्टर काळे म्हणाले.

नंतर चॊकशीला सामोरे जावे लागले लीनाला." मी आज संध्याकाळपासून सरकारी कार्यालयात जमा करण्यासाठी कागदपत्रे बनवत होते.उद्या निघण्यापूर्वी हे महत्वाचे काम मॅडमना करायचे होते. "

"ठीक आहे! तुम्ही थोड्या वेळाने पोलीस स्टेशनला येऊन तुमचा जबाब नोंदवा. त्यांना सगळ्यात जवळच्या तुम्हीच आहात, त्यामुळे तुमचा जबाब महत्वाचा आहे. मला रमेशचा संशय येतोय. तुमचा संशय कोणावर असेल तर सांगा. आमच्या तपासात मदत होईल." इन्सपेक्टर काळे तिला विश्वासात घेत म्हणाले.

"हो! तिच्या खाण्यापिण्याचे सर्व तोच बघतो. त्यामुळे या घटनेमागे त्याचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय काही दिवसांपूर्वीच त्या दोघांमधे काही कारणांमुळे वादही झाला होता." लीनाने माहिती पुरवली.

यानंतर त्यांनी बंगल्याची साफसफाई करणाऱ्या सुशीलाला काही प्रश्न विचारले. विशेषतः येणारी जाणारी माणसं, नंदाच्या विश्वासातील लोक, तिची दिनचर्या याविषयी माहिती त्यांनी तिच्याकडून काढून घेतली.

दरवानाने खात्री दिली, की सुप्रिया गेल्यावर त्या रात्री बाहेरचे कोणी आले नव्हते. नंदाच्या खोलीतल्या कपाटात सोन्याचे दागिने सुरक्षित होते. मग तिला मारण्याचा प्रयत्न का झाला होता? लीनाला त्यांनी एका पोलीसाबरोबर व्हॅनमधून जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला पाठवून दिले. आणि बंगल्यात काही धागा मिळतोय का, याचा शोध घेऊ लागले.

***

नंदा हाॅस्पिटलमध्ये गेली ,आणि तिने यशला घरी जाऊन विश्रांती घ्यायला सांगितले." अग मावशी! विश्रांती घ्यायला मला वेळ नाही. नेहा, माझी पत्नी जवळच्या संजीवनी नर्सिंग होम मधे आहे. काल रात्रीच एका गोड बाहुलीला जन्म दिला तिने ! आईला फोन करून सांगण्यापूर्वीच तुमचा फोन आला. मी जवळच असल्यामुळे लगेच इथे पोहोचू शकलो. तिच्याबरोबर तिची आई होती त्यामुळे काळजीचे कारण नव्हते. आता तिला भेटून मग मी घरी जाणार." यश म्हणाला. रात्रभर जागरण करून तो थकला होता तरी मुलगी झाल्याचा आणि नंदा सुखरूप असण्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

" किती सुस्वभावी आहे तुझा यश! तुझ्यावर तर खूप जीव आहे त्याचा! काल तू बेशुद्ध. होतीस तेव्हा किती अस्वस्थ झाला होता! रात्रभर तुझ्याबरोबर होता! " सुप्रिया नंदाला सांगू लागली.

"काल नक्की काय झालं ते मला सांगशील कां? मी खूप गोंधळून गेलेय. मला कोणी वीष का देईल? आणि बंगल्यात तेव्हा नेहमीचीच विश्वासातील माणसं होती." नंदाने विचारलं

" इन्सपेक्टर काळे सगळ्या गोष्टींची छाननी करतायत. ते खरा प्रकार नक्की शोधून काढतील. तू जास्त विचार करू नको. शांत रहा, म्हणजे लवकर बरी होशील. " सुप्रियाने तिला समजावले." डाॅक्टर आलेयत." आत येता येता नर्स म्हणाली. मागोमाग डाॅक्टर आत आले. " काय म्हणतोय आमचा पेशन्टस्? " गप्पा चालल्यायत म्हणजे तब्येत सुधारली आहे." तिला तपासता तपासता डाॅक्टर हसून म्हणाले.

" हिला डिस्चार्ज कधी मिळेल?" सुप्रियाने विचारले.

" अशीच सुधारणा राहिली, तर उद्या यांना घरी न्यायला काहीच हरकत नाही." डाॅक्टर म्हणाले.

***

त्या रात्री नंदाच्या बंगल्यावर पोलिसांच्या हालचाली कोणाच्याही नकळत चालू होत्या. पोलीस अशी काही व्यूहरचना करत होते की जणू त्यांना वाटत होते की रात्री काहीतरी घडणार आहे. बारा - एक - दोन - सकाळचे पाच वाजले तरी काही घडत. नव्हते. ड्यूटीवरचे पोलीस कंटाळले होते.सकाळचे सहा वाजले आणि लीना गेटवर आली.

" सकाळीच कुठे निघालात मॅडम?" वाॅचमनने सहज विचारले.

" माॅर्निंग वाॅकला जातेय." लीनाने उत्तर दिले, आणि बंगल्याबाहेर निघाली. बाहेर काही अंतरावरील वळणावर एक गाडी उभी होती. ती गाडीजवळ गेली आणि हातातील बॅगेतून एक पार्सल काढून त्या गाडीच्या ड्रायव्हरकडे देण्यासाठी पुढे केले.

त्याचवेळी तिचा पाठलाग करणा-या साध्या वेशातील पोलिसांनी एकमेकांना खूण केली, आणि पुढे होऊन तिच्या हातातील पार्सल ताब्यात घेतले. पोलीस स्टेशनला फोन करून इन्सपेक्टर आणि महिला काॅन्स्टेबलला बोलावून घेतले. त्या बॅगेचा रीतसर पंचनामा केला गेला. इन्सपेक्टर काळेंच्या अंदाजाप्रमाणे त्या बॅगेत पैसे मिळाले नाहीत. पण पार्सलमध्ये हिरेजडीत मॊल्यवान दागिने मिळाले.

" लक्षावधी रुपयांचे दागिने आहेत हे! " इन्सपेक्टर म्हणाले. " हे दागिने पळवण्यासाठीच नंदा मॅडमना झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस देण्यात आला. यात त्यांचा जीवही जाऊ शकत होता; पण रमेशच्या वेळीच लक्षात आल्यामुळे अनर्थ टळला होता.

त्या दिवशी दुपारी इन्सपेक्टर काळेंनी सुप्रियाला आणि यशला पोलीस-स्टेशनमधे बोलावून घेतले. यशने त्यांना विचारले, "तुम्हाला लीनाचा संशय कसा आला?"

"रमेशला जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा त्याने सांगितले होते की, तो जेव्हा नंदा मॅडमसाठी दूध बनवत होता, तेव्हा काहीतरी कारण काढून लीना तेथे गेली होती, पण लीना म्हणाली की, ती दिवसभर कागदपत्रे तयार करण्याचे काम करत होती. ती रात्री किचनमध्ये गेली होती हे लपविण्याचा तिने प्रयत्न केला तेव्हाच मला तिचा संशय आला होता. मग मी तिला जबाब लिहून देण्याच्या निमित्ताने पोलीस स्टेशनला पाठवले, आणि तिच्या खोलीची झडती घेतली. तिच्या बॅगमधे मला दागिने मिळाले. पण तेव्हाच तिला पकडले असते तर " ते दागिने कोणी माझ्या खोलीत ठेवले हे मला माहीत नाही. मला यात गुंतवण्याचा प्रयत्न होतोय;" असा बचाव तिने केला असता. मला तिला पुराव्यासह पकडायचे होते. काल दिवसभर बंगल्यावर पोलीस होते, त्यामुळे दागिने बंगल्याबाहेर नेण्याची संधी तिला मिळाली नाही. एकदा मॅडम घरी आल्या असत्या,आणि दागिने चोरीला गेल्याचे सगळ्यांना कळले , की घरात शोधाशोध होऊन ती पकडली गेली असती. रात्रभर दरबान गेटवर असतो. सकाळी माॅर्निंग वाॅकच्या निमित्ताने बाहेर पडायचे तिने ठरविले, आणि साथीदारालाही बोलावून घेतले." इन्सपेक्टर काळे सांगत होते." त्या दागिन्यांची खरेदी, त्यांची किंमत फक्त लीनालाच माहीत होती. यशबरोबर विशेष संबंध नाहीत, मुलगी दूर रहाते तिलाही काही माहीत असण्याची शक्यता नाही शिवाय नातेवाइकांशीही विशेष संबंध नाहीत, त्यामुळे जर मॅडम वाचल्या नसत्या, तर बहुमूल्य दागिने लीनाने चोरले हे कोणाला कळलेही नसते. शिवाय तिने काही सोन्याचे दागिने जागेवर ठेवले होते. त्यामुळे चोरी झाली हेच कळले नसते.आणि आत्महत्येची केस म्हणून पोलीसांनी फाइल बंद केली असती. पण नंदा वाचली; हे कळल्यावर तिने चोरलेला ऐवज लवकर बाहेर काढण्याचा प्लॅन केला. तिला खात्री होती ; की तिच्यावर दागिन्यांच्या चोरीचा संशय कोणीही घेतला नसता.

***

दुसऱ्या दिवशी यश नंदाला घरी घेऊन आला. तिला लीनाविषयी कळल्यावर धक्काच बसला. " माणसं एवढी विश्वासघातकी कशी असू शकतात ? या जगात कोणी कोणावर विश्वास ठेवायचाच नाही का?" ती वैफल्यग्रस्त मनःस्थितीत स्वतःला विचारू लागली. तिचा उतरलेला चेहरा पाहून यशने तिला धीर दिला, "आई, माणसाचा खरा चेहरा ओळखणं फार कठीण असतं. या जगात स्वार्थ साधण्यासाठी गोड बोलणारी माणसे कमी नाहीत." तो विषय बदलण्यासाठी पुढे म्हणाला, " शीतल अजून घरी आली नाही. तिला आणखी ४ - ५ दिवस तरी हाॅस्पिटलमध्ये रहावे लागेल. नाहीतर तुला घरी घेऊन गेलो असतो. इथे जुने विश्वासू नोकर आहेत आणि तुझी काळजी घेण्यासाठी संतोष एका नर्सला पाठवणार आहे. तू काही दिवस मुंबईतच रहा. आणि लवकर बरी हो. पुण्याला आल्यावरही मन शांत होईपर्यंत काही दिवस आमच्याबरोबर रहायला ये. एकटी राहू नको! "

" तुझ्यासारखा काळजी घेणारा मुलगा असल्यावर ती का लवकर बरी होणार नाही? " आत येता येता सुप्रिया म्हणाली. " आता मी इथे संध्याकाळपर्यंत थांबणार आहे.तू गेलास तरी चालेल. तुझी छोटी परी तुझी वाट बघत असेल."

"आई, येतो मी! " यश लगबगीने निघाला. प्रथमच नंदाला वाटले की त्याने जाऊ नये. आता तिला त्याचा आधार वाटू लागला होता. घरच्या गडबडीत त्याने तिची एवढी काळजी घेतली ही गोष्टही त्याचे तिच्याविषयीचे प्रेम दर्शविणारी होती. मैत्रीण म्हणून सुप्रिया आणि आई म्हणून यशला आपल्या विषयी एवढी आत्मीयता आहे ह्या जाणिवेने तिच्या मनातली एकटेपणाची पोकळी भरून काढली होती.

"तू आज इथे रहाणार म्हणतेयस पण तुझी घरची कामे रहातील नं? सुधाकर तुझी वाट पहातील " ती सुप्रियाला म्हणाली.

"ते हैदराबादवरून अजून आले नाहीत. दोन दिवसांनी परत येणार आहेत. तोपर्यंत तुला भरपूर खाऊपिऊ घालून आणि गप्पा मारून लवकर बरी करणार आहे. तब्येत चांगली सुधारल्याशिवाय तू पुण्याला जायचं नाही. दिल्लीला कामानिमित्त. जाणार होतीस ते राहून गेले त्याचाही विचार करायचा नाही."

सुप्रियाने दिल्लीचा उल्लेख करताच नंदाच्या नजरेसमोर सोनियाचा चेहरा आला. " तिच्या मनातली माझ्याविषयीची अढी कमी झाली असेल का? एवढ्या मोठ्या संकटातून मी वाचले, पण तिने एवढ्या दिवसांमधे फोन करूनही चॊकशी केली नाही. असो. अशक्तपणा थोडा कमी झाला की मीच फोन करेन तिला." तिचे विचारचक्र चालू होते, तेवढ्यात दरवाजातून आवाज आला, " आई " तिने चमकून दरवाजाकडे पाहिले. तो भास नव्हता. सोनियाच आत येत होती.

"आता कशी आहेस आई? हे सगळं घडलं कसं? " तिने विचारले. झालेला सर्व प्रकार सुप्रियाने तिला सांगितला.

" मला नंदाने त्या दिवशी जेवायला बोलावले होते. संध्याकाळची पार्टी अतिशय छान झाली, गप्पा झाल्या, लहानपणीच्या आठवणीना उजाळा मिळाला, वेळ खूप छान गेला, त्याविषयी बोलायला हिला फोन केला, आणि हिने उचलला नाही म्हणून रमेशला संशय आला. त्याने शहानिशा केली नसती तर मात्र काही खरं नव्हतं " त्या दिवसाची आठवण झाली आणि सुप्रियाच्या अंगावर शहारे आले.

" परमेश्वराची कृपाच म्हणायची !" सोनिया नंदाच्या केसांवर हात फिरवत म्हणाली.

"काल रात्री यशचा फोन आला ; तेव्हापासून ही रडतेय. रात्री जेवणही गेले नाही तिला! कधी तुम्हाला भेटते असं झालं होतं. " अनुजला घेऊन मागून आत आलेला राजेश म्हणाला.

सोनियाला पाहून नंदाला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ' खरंच, संसार सोडून सोनियाने माझ्याकडे येण्यापेक्षा, हे सगळे सुखी आहेत हा विचार मला आज अधिक समाधान देतोय. मीच चुकत होते हे आज मला पटतंय.' ती स्वतःशीच कबूल करत होती. कदाचित् मृत्यूच्या दारातून परत आल्यामुळे तिला जीवनाचा खरा अर्थ समजू लागला होता. मरणासन्न अवस्थेत माणूस असताना राव आणि रंक असा भेद नसतो.तेव्हा जीव फक्त शिवाला आठवत असतो. आणि मनाच्या अशा हळव्या अवस्थेत सुप्रियाचा सहवास मिळाल्यामुळे तिचा कठोरपणा गळून पडला होता, मनातल्या कोमल भावना जागृत झाल्या होत्या. त्यामुळे आता समोरील व्यक्तीच्या संवेदना आणि प्रेम तिच्या हृदयापर्यंत पोहोचू लागल्या होत्या. एवढंच नाही, तर तिला आता समाजमनाची हाक ऐकू येऊ लागली होती. आपल्याला ईश्वरकृपेने मिळालेलं पुढचं आयुष्य आपल्या माणसांच्या सुखाबरोबरच समाजाच्या सेवेसाठी खर्च केलं पाहिजे असं तिचं मन तिला सांगत होतं. आत्मकेंद्रित आयुष्य जगणाऱ्या नंदाच्या नजरेसमोर मानवधर्माची वाट दिसू लागली होती जी सत्य, प्रेम आणि मानवसेवेच्या प्रकाशाने लखलखणाऱ्या नव्या क्षितिजाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा तिला देत होती.

***

यानंतर महिन्याने संध्याकाळी ती बंगल्याबाहेरील बागेत झोपाळ्यावर बसली होती. आता तिची प्रकृती खूपच सुधारली होती आणि तिने पुण्याला जायचे ठरविले होते. तिथे तिला यशचा मोठा आधार वाटत होता. सुप्रिया अधुनमधून जमेल तेव्हा भेटून जात होती. त्या दोघांनी तिला वाचविण्यासाठी आणि नंतर तिला आनंदी ठेवण्यासाठी केलेला आटापिटा ती विसरू शकत नव्हती. जर ती पुण्याला असताना असा प्रसंग आला असता तर काय झाले असते याची ती कल्पनाच करू शकत नव्हती. गेटजवळ गाडी थांबल्याचा आवाज आला आणि ती भानावर आली.गाडीमधून यश आणि त्याची पत्नी शीतल उतरले. यशच्या हातात त्यांची छोटी मुलगीही होती. यशने तिला नंदाच्या हातात दिले. "काल फोनवर हिला पहायचंय तुझ्या घरी येते म्हणत होतीस नं! म्हणून तुला भेटायला घेऊन आलो. बघ ! अगदी तुझ्यासारखी दिसते नं! तुझ्याकडे बघून हसायला लागली. आजीला बरोबर ओळखले तिने!"

"अरे यश! एवढ्या लहानग्या जिवाला कशाला एवढा त्रास दिलास? माझी प्रकृती चांगली आहे आता.मी आले असते तिला पहायला! " छोटीच्या मऊ जावळावर प्रेमाने हात फिरवत नंदा म्हणाली. त्या दोघांमधील संवाद ऐकून शीतलला आश्चर्य वाटत होतं. यशच्या मनात नंदाविषयी किती माया आहे हे तिला चांगलेच माहीत होते पण नंदाच्या वागण्यात नेहमीच अलिप्तपणा दिसे. आज मात्र तिच्या बोलण्यात माया दिसत होती. यशकडे पहाताना तिच्या नजरेत प्रेमाचा अथांग सागर दिसत होता. त्यांना अधिक मोकळेपणाने बोलता यावं म्हणून ती फुलझाडे पहाण्याच्या निमित्ताने बागेत फेरफटका मारू लागली.

"आई ! आता तुला माझ्याकडे यायला काहीच हरकत नाही. तू जर आमच्याबरोबर राहिलीस तर आपल्या छकुलीला तिच्या हक्काचा आजीचा सहवास मिळेल. मी स्वतः आजी-आजोबांबरोबर मोठा झालो.तशीच मायेची पाखर माझ्या मुलीलाही मिळावी असं मला वाटतं. " यश तिला समजावत होता. खरं सांगायचं म्हणजे तिने यापुढे एकटीने राहू नये हा मुख्य हेतू त्याच्या मनात होता.

"त्यापेक्षा तूच आपल्या बंगल्यावर घेऊन का रहात नाहीस? मलाही तिथे एकटेपणा खायला उठतो. एवढ्या मोठ्या वास्तूची देखरेख ठेवायला आता तरूण पिढीची गरज आहे." नंदाने सुचविले. " पण शीतल एकत्र रहायला तयार होईल नं? " नंदाला तरूण असतानाची स्वतःची मते आठवली. काही वर्षांपूर्वी रणजीतच्या आईवडिलांशी ती वागली तशीच शीतल वागली तर? त्यांच्या जागेवर आज ती उभी होती. यापुढील आयुष्यात यश सतत आपल्या नजरेसमोर रहावा असे तिला मनापासून वाटत होते ; पण शीतलने सहकार्य केले नाही तर ते शक्य नव्हते. आपण आपल्या कुटंबावर किती अन्याय केला आणि स्वतःचेही किती नुकसान करून घेतले हे तिला आज प्रकर्षाने जाणवत होते.

" मी शीतलला विचारलं आहे. तिला एकत्र रहायला आनंदच होईल. पण आजी आजोबा आले तर तुला चालेल? त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी मला सुखी करण्यासाठी खर्च केलंय. या वयात त्यांना मी एकटे सोडू शकत नाही. " यश म्हणाला त्यांच्याबरोबर रहायला नंदाला आवडत नाही हे एवढ्या वर्षांमधे त्याच्या लक्षात आले होते.

" अरे! आपला बंगला आवडीने त्यांनीच बांधलाय! आणि या वयातच खरी आधाराची गरज असते. त्यांच्याशी वागण्यात मी खूप चुकलेय! आता माझ्या चुकांचं मी परिमार्जन करणार आहे. त्यांना प्रेम आपुलकी देणार आहे. आपण सर्व एकत्र आलो, की तुझ्या बाबांच्या आत्म्यालाही शांती मिळेल " नंदा म्हणाली. काही दिवसांपूर्वीचे स्वप्न ती अजून विसरली नव्हती. "आणि आपल्या छोट्या परीचं बारसं आपण तिथेच तुझ्या आजी आजोबांच्या उपस्थितीत करू. खूप आनंद होईल त्या दोघानाही." ती पुढे म्हणाली.

खूप वेळ नंदा त्याच्याशी बोलत होती. " हे बघ! यापुढे दर महिन्याला तू मला अनाथाश्रमात घेऊन जायचं! तिथल्या मुलांसाठी , वृद्धांसाठी काहीतरी भरीव कार्य मला करायचं आहे. गावची शाळा मोडकळीला आली असेल. सुप्रियाचे बाबा होते तेव्हा लक्ष द्यायचे. आता त्यांच्या मागे तिथे कुणीच नाही. लायब्ररी , जिम , प्रयोगशाळा असलेली अद्यावत शाळा बांधूया. मला जरा बरं वाटलं, की आपण सगळे एकदा गावी जाऊन येऊ. म्हणजे तिथल्या लोकांसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत हे आपल्याला कळेल. तो परिसर अनेक प्रकारच्या फळांसाठी प्रसिद्ध आहे. आपण जर फळांवर आणि भाज्यांवर प्रक्रिया करण्यासाठी जर एखादा कारखाना तिथे सुरू केला तर शेतक-यांना आणि बागायतदाराना उत्पन्नाचे साधन मिळेल तरूणांना नोक-या मिळतील." नंदाने तिच्या स्वभावाप्रमाणे प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचार केला होता. ती पुढे बोलू लागली, " इथे आपण क्वचितच येतो हा बंगला बहूतेक वर्षभर रिकामी असतो. इथे आसपास रहाणाऱ्या गृहिणींसाठी काही मार्गदर्शक वर्ग सुरू करण्याचा माझा विचार आहे. त्यायोगे त्या स्वावलंबी बनतील आणि संसाराला हातभार लावू शकतील. सुप्रियाने या गोष्टीकडे स्वतः लक्ष घालायचं आश्वासन मला दिलंय. बंगल्यातील नोकरवर्गही यासाठी मदत करायला तयार आहे. पण तुझी काही हरकत नाही नं ?" नंदाच्या स्वरात कमालीचा उत्साह होता. काहीतरी नवे करून दाखवण्याची जिद्द होती. आतापर्यंत पैसे, दागिने , प्राॅपर्टी, मानमरातब या चॊकटीत अडकलेलं तिचं मन निःस्वार्थ सेवेच्या पवित्र विचारांच्या आकाशात भरारी घेत होतं. माणुसकीचं मोल तिने ओळखलं होतं. आयुष्यात खूप काही करायचं राहिलंय याची जाणीव तिला होत होती. एक नवं क्षितिज तिला खुणावत होतं. पण तिच्या पंखांमध्ये आता बळ राहिलं नव्हतं. एकलकोंडे आयुष्य जगण्यातले धोके तिला कळले होते. त्यामुळे यापुढची वाटचाल ती जवळच्या माणसांच्या सोबतीने आणि यशच्या मदतीने करणार होती. शीतल परत आली तरी ती बोलतच होती. तिला इतकं मनमोकळेपणाने बोलताना यशने कधीच पाहिलं नव्हतं. हा सर्व सुप्रियाच्या सहवासाचा परिणाम होता हे त्याला कसं कळणार? शीतलला पाहून ती उठून उभी राहिली, आणि हसत म्हणाली, " चला! आत चला! घर तुमचंच आहे! "

*****

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED