Nave Kshitij - 5 books and stories free download online pdf in Marathi

नवे क्षितिज - 5

नवे क्षितिज

part 5

रणजीतचे आई-वडील पुण्याला आल्यावर ते जास्तीत जास्त वेळ यशबरोबर घालवू लागले. ते यशचा अभ्यास पहात; तिथेच जेवून रात्री खूप उशीरा घरी येत पण नंदाने ते कुठे जेवतात, कुठे वेळ घालवतात, याची कधीही काळजी केली नाही. ती नवीन मिळालेल्या ऐश-आरामात मश्गुल होती. माणसांना कस्पटासमान मानत होती. तिला पतीच्या तब्येतीचीही तमा नव्हती. असाच काही काळ गेला, आणि सोनियाचा जन्म झाला. सोनियाला स्वतःचेच संस्कार देण्याचा प्रयत्न नंदाने केला पण रणजीत ब-याच वेळा सोनियाला तिच्या आजी- आजोबांकडे घेऊन जात असत. ते घर सोनियाला फार आवडत असे. ती गेली की आजी हमखास तिच्यासाठी गोडधोड करत असे. तिथेही आचारी होता, पण आजी घरातील प्रत्येकाच्या आवडी- निवडी जपत असे. यश तिला पुस्तकांमधली चित्रे दाखवी! सायन्स - गणितातल्या जादू दाखवी! आजोबा बागेत फिरायला नेत! त्यांच्याबरोबर रहायला तिला खूप आवडे. रणजीतकडे ती हट्ट करत असे, " बाबा, आपण यश आणि आजी-आजोबांबरोबर का नाही रहात ?" तिच्या या प्रश्नावर रणजीतकडे उत्तर नसे. हळू-हळू त्या घराचे कॊटुंबिक प्रेमाचे - मायेचे संस्कार सोनिया आत्मसात करू लागली. नंदा यशला मुलाचे प्रेम देत नव्हती पण सोनिया आणि यशमध्ये भावा-बहिणींचे रेशमी धागे निर्माण करण्यात मात्र रणजीतना यश मिळाले. नातवाला रमाबाईंनी लाडात वाढवले होते त्याची कधी हेळसांड झाली नव्हती आणि नंदाविषयी त्याच्या मनात किल्मिष निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली होती.त्यामुळे नंदा कशीही वागली तरी यशच्या मनात मात्र तिला आईचे स्थान होते. कधी कधी हट्ट करून तो तिला भेटायला जात असे. जरी नंदाचे वागणे बदलले नव्हते, ती त्याच्याजवळ जास्त थांबत नसे ; तरी तिथे त्याच्याबरोबर सोनिया असे. ती दादाला बागेत नवीन लावलेली झाडे दाखवी, आपली नवी पुस्तके दाखवी, होमवर्कमधे, हस्तकलेमधे त्याची मदत घेई! दादा खूप लाडका होता तिचा.

रणजितने नंदाचे यशबरोबरचे वागणे पाहून मनात काही निर्णय घेतले होते. त्यांनी आपले मृत्युपत्र बनविले. यशसाठी त्यांनी व्यवसायाचा आणि प्राॅपर्टीचा योग्य हिस्सा ठेवला शिवाय त्यांनी आई, यश आणि सोनियासाठी बँकेमध्ये वेगळी रक्कम ठेवली. नंदा यशचा हक्क त्याला देईल यावर आता त्यांचा विश्वास नव्हता. नंदाला मात्र या संबंधी काहीच कल्पना नव्हती. यश अभ्यासात हुशार होता . तो इंजिनियर झाला, आणि वडिलांकडे व्यवसायाचे धडे घेऊ लागला. यशला रणजीतने नवीन युनिट सुरू करून दिले. सोनिया तेव्हा काॅलेजमध्ये होती. एक दिवस अचानक् हार्ट अटॅक आला आणि रणजीतची प्राणज्योत मालवली. पतीच्या निधनाचे नंदाला दुःख झाले पण आपण आता रणजीतच्या संपत्तीची सर्वेसर्वा झालो अशी खात्रीही तिला झाली . पण रणजीतच्या मृत्युपत्राविषयी कळले तेव्हा तिचा थोडा हिरमोड झाला. रणजीतच्या संपत्तीचे आणि बिझनेसचे मृत्युपत्राप्रमाणे हिस्से झाले. यश वयाने लहान होता पण रणजीतनी त्याला व्यवसायाच्या खाचाखोचा शिकवल्या होत्या. जे युनिट त्याच्या वाट्याला आले ते त्याने चांगले वाढवले . चांगला जम बसविला. खरे म्हणजे त्याला सवता सुभा नको होता. आपण एकत्र काम करू असे त्याने नंदाला सुचवून पाहिले, पण तिला आपल्या कामात कोणाचा हस्तक्षेप नको होता; त्यामुळे त्याचा प्रस्ताव तिने फेटाळून लावला. तिने तिच्याकडे आलेला व्यवसाय उत्तम सांभाळला. पण तिचे सगळे लक्ष कामाकडे असल्यामुळे तिचे सोनियाकडे थोडे दुर्लक्ष झाले. अभ्यासात ती फार प्रगती करू शकली नाही. बिझनेसची माहिती करून घेण्याचीही तिने कधी तसदी घेतली नाही. नंदाने कधी जबाबदारीचे काम तिच्या अंगावर टाकले नाही. हे काही आईच्या मायेमुळे होत नव्हते. तिने तिच्या स्वभावानुसार पुढचे आडाखे बांधायला सुरुवात केली होती. सोनिया मानसिक रित्या पूर्णपणे आपल्या अधिपत्याखाली रहावी; ती कधीही सक्षम होऊ नये यासाठी तिचा प्रयत्न चालला होता. व्यवसाय तिने स्वतःच्या हातात ठेवला होता. सोनियाने प्रत्येक पाऊल आपल्याला विचारून टाकावे, या अट्टाहासापोटी आपल्याच मुलीचे आपण नुकसान करत आहोत हा विचार तिच्यातला अहंभाव तिला करू देत नव्हता. एखादा गरीब पण हुशार मुलगा पाहून घरजावई करून घ्यायचा हे तिने आधीच ठरवले होते. त्यामुळे तिचे सोनियावर कायम तिचे वर्चस्व रहाणार होते घरात सर्वांवर वरचष्माही रहाणार होता. आणि एकटीने रहाण्याची पाळी कधी तिच्यावर येणार नव्हती.

पण तिची ही योजना बारगळली. एक दिवस तिने सोनियाला एका मुलाबरोबर पाहिले. त्याविषयी तिने विचारताच सोनियाने स्पष्ट सांगून टाकले, " तो माझ्या मैत्रिणीचा चुलत भाऊ राजेश होता. तो दिल्लीला रहातो. नात्यातील एका लग्नासाठी मुंबईला आला आहे. मला तो आवडतो. आणि आम्ही लग्न करणार आहोत."

" पण त्याच्याशी लग्न झालं तर तुला दिल्लीला रहावं लागेल.कोण कोण असतं तिकडे? "

" त्याचे आई-वडीलही तिकडेच असतात. वडील चार्टर्ड अकॊंटंट आहेत . छान घर आहे तिकडे त्यांचं. राजेश डाॅक्टर आहे. खूप छान फॅमिली आहे. आजी, आजोबा , यश, सगळे ओळखतात त्यांना! गेल्या आठवड्यात तेही या लग्नासाठी इथे आले होते तेव्हा भेटले मी त्यांना! "

एवढा मोठा निर्णय सोनियाने न विचारता घेतला तेव्हा नंदाचा अहंकार दुखावला गेला होता पण तिने आपला राग सोनियाला कळू दिला नाही.पण ती कुठेही गेली तरी तिला आपल्या जवळ परत आणायचे हे तिने मनाशी नक्की ठरवले. शेवटी सोनिया म्हणजे तिच्या हातातला हुकुमी एक्का होता. वय झाले की तिची काळजी घेणारे कुणीतरी जवळ असणे आवश्यक होते. नंदाने सोनिया आणि राजेशचे लग्न धुमधडाक्यात करून दिले. पण तिने मनात ठरवलेली योजना कोणाच्याच लक्षात येणे शक्य नव्हते.

लग्नानंतर सोनिया दिल्लीला गेली. तिचा संसार आनंदात चालला होता. तिला एक गोंडस मुलगाही झाला.नंदा तिच्या बाळंतपणासाठी दिल्लीला जाऊन राहिली होती. इथेही जबाबदारीपासून दूर पळण्याच्या तिच्या स्वभावाने डोके वर काढले होते. " मी पुण्याला एकटीच रहाते आणि मला कामामुळे घरी थांबता येत नाही. तू बाळंतपणाला इथे येण्याऎवजी दिल्लीलाच रहा." असे तिने सोनियाला समजावले. पण सोनियाने हट्ट केला, " मला पहिल्या बाळंतपणात तू जवळ पाहिजेस." तेव्हा तिचा नाइलाज झाला. पण यावरही तिने उपाय शोधला. " मी शेवटचे काही दिवस दिवस दिल्लीला तुझ्या घरी रहायला येईन, घाबरू नको." ती सोनियाची खूप काळजी असल्याप्रमाणे म्हणाली. तिथे जाताना तिकडच्या बिझनेस. मीटिंग ठरवूनच ती तिकडे गेली. सोनियाकडे लक्ष देण्याऐवजी ती स्वतःच्या कामांमधे व्यग्र असे . कोणी आले की "सोनियाने तू माझ्याबरोबर असलेच पाहिजे असे डोळ्यात पाणी आणून सांगितले, त्यामुळे मला इथे यावेच लागले."असे अभिमनाने सांगत असे. नंतर मात्र मुलगी आणि नातू यापुढे आपल्याबरोबरच राहिले पाहीजेत या दृष्टीने तिने प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात केली. ती रोज सोनियाला फोन करी तिच्या घरात चाललेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती करून घेई आणि घरातल्या प्रत्येकाशी कसे वागायचे अगदी राजेशसुद्धा - याच्या सूचना देई. सोनियाने काय काम करायचे इतरांकडून काय करून घ्यायचे हे नंदा ठरवत असे. 'घराची स्वमिनी आता तू आहेस, इतरांना महत्व द्यायची गरज नाही ' असे विचार तिच्या मनात भरवून देई. अप्रत्यक्ष रित्या सोनिया आणि घरातील इतर माणसे यांच्यात तिने अदृष्य दरी निर्माण केली. तिचा फोन येऊन गेला की सोनिया अस्वस्थ असे. घरातल्या लोकांशी वागताना तिचा आवाज आपसूकच वर जाई. घरातले वातावरण हळू हळू बिघडू लागले.ती स्वतःचे श्रेष्ठत्व दाखवू लागल्यावर घरातील इतरांचा स्वाभिमान जागा होणे स्वाभाविक होते. भांडणे नकोत म्हणून सगळे तिच्याशी बोलणे टाळू लागले. या गोष्टीचा सोनियाला आणखीनच त्रास होऊ लागला. ती थोडी नाॅर्मल होऊ. लागली की तिच्या आईचा पुढचा फोन येई आणि सोनियाचा मूड परत बिघडून जाई. राजेश डाॅक्टर असल्यामुळे त्याला घरात असे वातावरण परवडणारे नव्हते. अस्वस्थ मनामुळे एखाद्या पेशंटच्या बाबतीत झालेली लहानशी चूकही त्याला खूप भारी पडू शकत होती. त्यामुळे त्यानेही आता घरातून लक्ष कमी करायला सुरूवात केली. सुरुवातीला घरातील सर्वजण तुझे दुष्मन आहेत असे सुचवणारी नंदा जेव्हा , "घटस्फोट घेताना भरपूर इस्टेटीची मागणी कर." असा सल्ला देऊ लागली, तेव्हा सोनिया सावध झाली. आपल्या अशा विचित्र पद्धतीने वागण्याचा शेवट हा असाच होणार हे तिच्या लक्षात आले. राजेशवर तिचे मनापासून प्रेम होते. त्याला सोडून रहाण्याची कल्पनाही तिला सहन झाली नाही. नंदा दिल्लीला आल्यापासूनच्या घटनांचा विचार केल्यावर तिच्या लक्षात आले की, कुटुंबातील दुहीला नंदाची शिकवणच कारणीभूत होती. तिचे हसते-खेळते कुटुंब आज तिच्या सतत बदलणा-या मूडमुळे अकारण तणावाखाली जगत होते. शेवटी तिने नंदाला थोडे फटकारले." आई तू प्रत्येक पावलावर मी इथे कसे वागावे याचे धडे तू तिथे राहून मला देत रहाशील तर मला एक दिवस वेड लागेल. कृपा करून माझे निर्णय मला घेऊ दे. माझं आयुष्य मला जगू दे! मला खरोखरच जेव्हा काही अडचण असेल तेव्हा मी स्वतः तुला सांगेन. तुझी मदत घेईन! "

" अग! तुला माहीत आहे? मी पहिल्यापासूनच खंबीरपणाने वागले म्हणून मी इथपर्यंत आलेय. तू अजून लहान आहेस. या जगात कसे हुशारीने वागायचे हे तुला अजून कळत नाही. म्हणून मी तुला नेहमी सावध करत असते." नंदा तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागली.

" मला तेच तर नको आहे नं आई! तूला आज एकाकी रहावं लागतंय! तसं जीवन मला नको आहे. तू कधी कोणाला स्वतःच्या जवळ येऊच दिलं नाहीस! कोणाशी संबंध ठेवले नाहीस. नाहीतर यश आजी-आजोबा, बाबा- किती छान कुटुंब होतं आपलं! त्यांच्यापासून वेगळं रहाण्याचा बाबांच्या मनाला किती त्रास होत होता, याचा विचार तू कधीच केला नाहीस. पण मी माझ्या बाबतीत तसं होऊ देणार नाही. मला राजेश हवाय. माझा संसार हवाय. तू फोनवर चार सुखदुःखाच्या गोष्टी कर.अनुजच्या बाललीला ऐक, मात्र आमच्या घरातल्या बाबींचा जास्त विचार करू नको" सोनियाने स्पष्ट शब्दात तिला सुनावले. तिला सगळ्याचा इतका त्रास होत होता की नंदाची चूक दाखवून दिल्याशिवाय तिला रहावलं नाही. नंदा तिच्यासमोर जे सोनिया- विरुद्ध घरातील इतर सर्व असे चित्र उभे करत होती; ते वस्तुस्थितीला धरून नव्हते हे तिथे गेल्यापासून तिला जे अनुभव आले होते त्यावरून चांगलेच माहीत होते. तिचे मन जपण्याचा प्रयत्न तिच्या सासरची माणसे करत होती तेवढा कधी तिच्या आईनेही केला नव्हता. सोनियाच्या बोलण्याने नंदा हादरून गेली. सोनियाला प्यादे बनवून स्वतःचा स्वार्थ साधण्याची तिचे इरादे ती वेळीच सावध झाल्यामुळे धुळीला मिळाले होते.

Cotd.....part 6

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED