Nave Kshitij - 6 books and stories free download online pdf in Marathi

नवे क्षितिज - 6

नवे क्षितिज

Part-6

सोनियाच्या घेतलेल्या पवित्र्याने नंदा हादरून गेली. सोनियाला प्यादे बनवून स्वतःचा स्वार्थ साधण्याची तिचे इरादे ती वेळीच सावध झाल्यामुळे धुळीला मिळाली होते.

"ही पोटची मुलगी असून माझ्याविषयी एवढी तेढ आहे हिच्या मनात? हिच्यापेक्षा लीना बरी! किती आदर करते ती माझा! आणि हुशारही आहे. माझी किती काळजी घेते! " ती मनातल्या मनात चरफडत म्हणाली.

यानंतर लीना नंदाच्या सगळयात जवळची व्यक्ती झाली. दिवसाचे चोवीस तास तिला लीनाचा आधार आवश्यक वाटू लागला. लीना सतत तिची स्तुती करत असे आणि अधिकाधिक तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे. आणि परिणामस्वरूप ती नंदाच्या घरचीच एक व्यक्ती झाली होती. नंदाचा पूर्ण विश्वास तिने संपादन केला होता. आपल्या आयुष्याचा चित्रपट पहाणारी लीना मनाशी म्हणाली ' बरे आहे माझे महत्व जाणणारी एक तरी व्यक्ती आहे.पण तरीही मी सोनियाला दूर करू शकत नाही. शेवटी माझी मुलगी आहे ती! उद्या दिल्लीला गेल्यावर काम झाले की तिला भेटायला गेलेच पाहिजे.' रात्री खूप उशीरा तिला झोप लागली.

***

नंदा सकाळी उठली तेव्हा ऊन पडले होते. तिला रात्रीचे स्वप्न आठवले, आणि ती थोडी अस्वस्थ झाली. चहा झाल्यावर तिने सुप्रियाला फोन केला. तिला दुपारी लंचला यायचे आमंत्रण तिने दिले. पण सुप्रिया म्हणाली, " सुधाकरनी नाटकाची तिकिटे गेल्या आठवड्यातच बुक केली आहेत. त्याचं आवडतं नाटक आहे. आता नाही म्हटलं तर ते नाराज होतील. मी संध्याकाळी येईन तुझ्याकडे! चालेल?" ब-याच वर्षानी भेटलेल्या मैत्रिणीचे मन मोडणे तिच्या जिवावर आले होते पण ती सुधाकरनासुद्धा नाराज करू शकत नव्हती.

"हरकत नाही! ये संध्याकाळी! सुधाकरनासुद्धा माझ्यातर्फे आमंत्रण दे. दोघंही संध्याकाळी जेवायलाच या." नंदाने ओपचारिक आमंत्रण दिले.

" त्यांना नाही जमणार, त्यांना रात्रीच्या विमानाने हैदराबादला जायचंय. बिझनेस मीटिंग आहे. पण मी नक्की येईन. " सुप्रियाने आश्वासन दिले.

त्या दिवशी नाश्त्यानंतर नंदा लीनाला घेऊन घराबाहेर पडली. दोघीनी मिळून खूप खरेदी केली. जेव्हा तिने महागड्या हि-याच्या बांगड्या घेतल्या तेव्हा त्यांची चमक पाहून लीनाचे डोळे विस्फारले. दुपारी घरी यायला त्यांना बराच उशीर झाला. जेवताना तिने संध्याकाळच्या जेवणाचा स्पेशल मेनू रमेशला सांगितला. जेवण लवकर तयार. करायला सांगितले. जेवणानंतर लीनाबरोबर कामाविषयी चर्चा केली. तिला काही कागदपत्रे तयार करायला सांगितले. दुसर-या दिवशी संबंधित सरकारी कचे-यांमधे जाऊन तेथील अधिका-यांना द्यायची होती. नंतर तिने थोडा वेळ विश्रांती घेतली आणि सुप्रियाला स्वतःची श्रीमंती दिसेल अशा रीतीने तयार होऊ लागली. आज नवीन घेतलेला बंगड्यांचा सेट , गळ्यात हि-याचा नेकलेस, उंची साडी - - " सुप्रिया माझ्याकडे पहात राहिली पाहिजे. लहानपणी तिच्याकडे पहाताना माझ्या मनात जी असूया जागृत होत असे ती तिच्या डोळ्यात मला दिसली पाहिजे. " ती आरशात स्वतःकडे पहाताना विचार करत होती.

संध्याकाळी नंदाने सुप्रियाला फोन करून विचारले " तुझ्यासाठी गाडी पाठवते. म्हणजे तुला यायचा त्रास होणार नाही." ती म्हणाली.

"नको नंदा! मी टॅक्सी करून येईन मी आता तयारच आहे. काळजी करू नको! मी लवकर येतेय." सुप्रिया म्हणाली.

***

" किती सुंदर आहे तुझा बंगला! " सुप्रिया आल्याबरोबर म्हणाली; पण तिच्या आवाजात कॊतुक होते.मत्सराचा लवलेशही नव्हता. नंदाने तिला बंगला दाखवला. जेवणाची व्यवस्था बंगल्याबाहेर बागेत केली होती. दोघी गप्पा मारू लागल्या. लहानपणाच्या आठवणींची उजळणी झाली. वडिलांचा विषय निघाला, तेव्हा सुप्रियाच्या डोळ्यात पाणी तरळले. " खरंच डोंगरासारखं व्यक्तिमत्व होतं त्यांचं! अख्ख्या गावाला त्यांचा आधार वाटायचा. आईचं आता खूप वय झालंय, पण बाबांचा वसा तिने अजून चालू ठेवलाय. गावातील प्रत्येकाची काळजी घेते ती! मी अधून मधून जाते तिला भेटायला! " ती भावनावश होऊन म्हणाली. त्यांच्या गप्पा चाललेल्या असतानाच वाॅचमन अनील आत आला. " मॅडम अनाथाश्रमाचे संचालक तुम्हाला भेटायला आले आहेत. त्यांना इथे घेऊन येऊ का?" त्याने विचारले. "आम्हाला डिस्टर्ब करायला कोणालाही आत पाठवू नका " अशी तंबी नंदाने त्याला आधीच दिली होती. त्यामुळे तो विचारायला थोडा घाबरत होता.

" मी इथे आल्याची बातमी यांना कशी कळते तेच कळत नाही." नंदा वैतागून म्हणाली.

" अग! येऊ दे त्यांना! महत्वाचे काम असेल." प्रिया म्हणाली. "

"कसलं काम? देणगी पाहिजे असेल! दुसरं काय?" नंदा म्हणाली.

" आपल्यासारख्या लोकानी मदत केली नाही तर सामाजिक संस्था चालू शकणार नाहीत." सुप्रियाने तिला समजावले.

अनीलने त्यांना आत पाठवले. ते आत आल्यावर प्रथम सुप्रियाकडे वळले. " ताई काल तुम्ही आश्रमाला देणगी देऊन गेलात. पण रिसीटबुक संपले होते. एक माणूस रिसीट देण्यासाठी तुमच्या घरी गेला आहे."

" एवढी घाई. काय होती ? किती वर्षांपासून तुम्ही आश्रमासाठी काम करत आहात.अनाथ मुलांसाठी आणि वृद्धांसाठी इतके कष्ट तुम्ही घेता. तुमच्यावर विश्वास आहे माझा! " सुप्रिया म्हणाली.

" तुमच्यासारख्यांच्या मदतीमुळेच आमचा अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम नीट चालले आहेत" ते म्हणाले.

"तुम्ही एकमेकांना चांगलेच ओळखता असं दिसतयं!" न रहावून सुप्रिया मधे बोलली. आपल्या घरी येऊन ते सुप्रियाला आपल्यापेक्षा अधिक महत्व देतायत हे तिला आवडलं नव्हतं.

" या नेहमीच आमच्या वृद्धाश्रमाला आणि अनाथाश्रमाला भेट देतात आणि मदतही करतात. डाॅक्टरसाहेब नेहमी येऊन मुलांच्या तब्येतीवर देखरेख ठेवतात. रात्री-बेरात्री कधीही बोलावलं तरी येतात. आम्हाला खूप आधार वाटतो यांचा."

शेवटी नंदाने नाइलाजास्तव मोठ्या रकमेचा चेक देऊन त्यांची बोळवण केली.

जेवणाचा बेत फक्कड झाला होता. काळोख पडायला सुरुवात झाली तशी सुप्रिया गप्पाना आवर घालत म्हणाली, "मला आता निघायला हवं. सुधाकरना बाहेरगावी जायचंय. ते निघण्यापूर्वी जायला हवं "

" मी निमेशला - माझ्या ड्रायव्हरला पाठवते तुला घरी सोडायला." तिने निमेशला बोलावून घेतले. निमेश आला, सुप्रियाला बघून तिच्या पायाला स्पर्श करुन त्याने नमस्कार केला. कसा आहेस निमेश? तुला पुण्याला नोकरी लागली आहे नं? तू इथे कसा? "

" यांच्याकडेच नोकरी करतो मी! त्यांच्या बरोबर मुंबईला आलोय."

"पण काल तू दिसला नाहीस. गाडी कोणी दुसराच चालवत होता." सुप्रियाने आश्चर्याने विचारले.

" काल रजा घेतली होती. आणि ओळखीचा ड्रायव्हर मॅडमना दिला होता."

"तुझा भाऊ कसा आहे आता?" सुप्रियाने विचारले.

"आता त्याची प्रकृती खूप सुधारलीय. योग्य वेळी जर उपचार झाले नसते तर काही खरं नव्हतं. तुम्ही आणि डाॅक्टरसाहेबांनी स्वतः लक्ष घालून त्याला हाॅस्पिटलमधे दाखल केला. ऒषधे मिळवून दिली! म्हणून तो लवकर बरा झाला. नाहीतर मी इतका खर्च कसा करणार होतो? "

त्यांचे बोलणे ऐकून नंदाची मान खाली गेली. निमेशला नोकरीची गरज आहे हे कळल्यावर तिने अगदी कमी पगार देऊन त्याला नोकरीवर ठेवून घेतले होते. तो आपले घर कसे चालवत असेल याचा थोडाही विचार तिने केला नव्हता. आपल्या हातातील बांगड्या आणि नेकलेसमधील. हि-यांपेक्षा सुप्रियाचा चेहरा जास्त तेजस्वी आहे असा भास तिला होऊ लागला.

***

सुप्रिया घरी गेली तरी नंदा कालपासून घडलेल्या गोष्टी विसरू शकत नव्हती. सुप्रियाचे घर पाहून तिला वाटलं होतं की सुप्रिया खूप दुःखी असेल. तणावाखाली असेल, विशेषतः नंदाचा बंगला, तिचं ऐश्वर्य पाहिल्यावर तर तिला नक्कीच हेवा वाटेल, पण खरी परिस्थिती वेगळीच होती. सुप्रिया तिचं आयुष्य भरभरून जगत होती.आजही तिला ओळखणारे लोक तिच्याकडे आदराने बघत होते. आज नंदाला कळत होते , माणसाला पैशामुळे अनेक सुखे प्राप्त होतात. माणसाचे सामाजिक स्थानही वाढते; पण खरे सुख मिळते जिवाला जीव देणा-या मायेच्या माणसांमुळे आणि आदर मिळतो आजूबाजूच्या माणसांच्या सुखदुःखात साथ दिल्यामुळे ! वेळ, पैसा, श्रम कोणासाठी खर्च करण्याची वेळ आली की नंदाने नेहमीच पाय मागे घेतला होता. आई म्हणून छोट्या यशला, सहचारिणी म्हणून रणजीतना वेळ देण्यापेक्षा स्वतःच्या आवडी निवडी जपणे तिने अधिक पसंत केले होते. तिच्या मावशीच्या कुटंबाने तिला इतके प्रेम दिले ; पण लग्न झाल्यावर तिने त्याचीही कधी विचारपूस केली नाही. मावशीचा मुलगा तिला जीव लावत असे, पण त्याला किंवा आपल्या गरीब भावाच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करावी असेही तिला कधी वाटले नाही. तिच्या स्वभावामुळे तिच्या पोटच्या मुलीचाही तिच्यावरचा विश्वास वाटेनासा उडाला. " माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. त्या आता सुधारायला हव्यात. असे एकलकोंडे आयुष्य. जगणे योग्य नाही.मी जर अशीच वागले तर. अधिकाधिक एकटी पडत जाईन." ती मनाशी म्हणाली. आज अंगावरील बहुमूल्य दागिने उतरून कपाटात ठेवताना नेहमीप्रमाणे तिला स्वत:चा अभिमान वाटत नव्हता, तर पुढील आयुष्याचा विचार करताना एकप्रकारची भिती वाटत होती.

तेवढ्यात रमेश दुधाचा ग्लास घेऊन आला. तिला अॅसिडिटीचा त्रास असल्यामुळे निघण्यापूर्वी त्याला न चुकता हे काम करावे लागे.

दुधाचा रिकामी ग्लास घेऊन तो किचनमधे गेला. घरी जायला निघाला. मॅडमच्या खोलीसमोरून जाताना तो थबकला. मोबाइलची रिंग वाजत होती. पण नंदा फोन उचलत नव्हती. " मॅडमना एवढ्या लवकर झोप कशी लागली? आणि जरी झोप लागली असली तरी फोनच्या आवाजाने जाग्या का होत नाहीत?" फोन बंद झाला आणि परत वाजू लागला तरी नंदा फोन उचलेना. रमेशने माळीदादांना बोलावून आणले, तेव्हाही मोबाइल वाजतच होता. शेवटी दोघानी दरवाजा ढकलून आत पाहिले, नंदा पलंगावर अस्ताव्यस्त पडली होती. तिला माळीदादांनी हाका मारल्या, नंतर हलवूनही पाहिले पण तिची काहीच हालचाल दिसत नव्हती. श्वासोच्छवास मात्र चालू होता. परत मोबाइल वाजू लागला. रमेशने उचलला. तो सुप्रियाचा फोन होता. रमेशने थरथरत तिला नंदाविषयी सांगितले. सुप्रियाने संतोषकडे फोन दिला. त्याने लक्षणे विचारून घेतली आणि म्हणाला, "मी अॅम्ब्यूलन्स पाठवण्याची व्यवस्था करतो. तुम्ही तिला ' लाइफ केअर ' हाॅस्पिटलमध्ये घेऊन या. मी तिथे येतोय. तुम्ही घाबरू नका. "

काही मिनिटांमध्ये रुग्णवाहिका आली. रमेशने लीनाला बरोबर घेतले. संतोष हाॅस्पिटलमधे आला होता. बरोबर सुप्रियाही होती. रमेशने यशलाही फोन केला होता. तोही लगेच आला होता." डाॅक्टर, कितीही खर्च झाला तरी चालेल. मुंबईच्या सगळ्यात मोठ्या स्पेशालिस्टना घेऊन या.पण. माझ्या आईला वाचवा." तो डाॅक्टरना विनंती करत होता. नंदावर लगेच उपचार करायला सुरुवात झाली. काही वेळाने संतोष आणि हाॅस्पिटलचे डाॅक्टर बाहेर आले. त्यांचा चेहरा गंभीर होता. " त्यांनी झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ही पोलीस केस आहे. मला पोलिसात कळवावं लागेल." ते म्हणाले.

" हे शक्य नाही. तिने आजच मला जेवायला बोलावले होते. रात्रीपर्यंत मी तिच्याबरोबर होते. अगदी आनंदात होती. उद्या रात्री कामानिमत्त दिल्लीला जाणार आहे म्हणत होती. तिची मुलगीसुद्धा दिल्लीला रहाते. मुलीला आणि नातवाला भेटायला मिळणार म्हणून खुश होती. ती आत्महत्येचा प्रयत्न का करेल? " सुप्रियाचा विश्वास तिच्या बोलण्यात जाणवत होता.

" असे जर असेल, तर त्यांना कोणीतरी मारण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या शुद्धीवर आल्या, की सत्य बाहेर येईलच." डाॅक्टर म्हणाले.

" पण आता नंदा कशी आहे?" सुप्रियाने संतोषला विचारले.

" उपचार चालू आहेत. धोका टळलाय . पण अजून शुद्धीवर आली नाही. रमेशच्या वेळेवर लक्षात आले ; म्हणून जीव वाचला. " संतोष म्हणाला. " आणि यश तू लगेच आलास म्हणून बरं झालं. अशावेळी कोणीतरी नातेवाईक बरोबर असणं चांगलं असतं."

" पण तू पुण्याला असतोस नं? इतक्या लवकर कसा आलास?" सुप्रियाने आश्चर्याने विचारले.

" माझी बायको शीतल डिलिव्हरीसाठी तिच्या माहेरी मुंबईला आली आहे. तिला भेटायला आलो होतो. आई मुंबईत आहे हे मला माहीतही नव्हते " यश म्हणाला.

" थँक गाॅड, मॅडमचा धोका टळला. मी आता घरी जाऊ का? सकाळी मी परत येते." लीना म्हणाली.

" तू घाई करू नकोस. आपण इथे थांबूया! सुप्रिया मॅडमना घरी जाऊ दे " रमेश म्हणाला. त्यांच्याबरोबर यशही हाॅस्पिटलमध्ये थंबला.

***

सकाळी इन्सपेक्टर बंगल्यावर आले. त्यांनी फोन करून सुप्रियालाही बोलावून घेतले होते.रमेश आणि लीना सकाळी घरी आले होते. नंदा शुद्धीवर आली होती पण मी झोपेच्या गोळ्या घेतल्या नाहीत असे स्टेटमेंट तिने दिले होते. इन्सपेक्टर बंगल्यातील प्रत्येक व्यक्तीची कसून चॊकशी करत होते. सगळ्यात शेवटी तिच्या खोलीत कोण गेले होते?" त्यांनी विचारले. यावर तिच्या खोलीत जाऊन दूध दिल्याचे रमेशने सांगितले. तो खूप घाबरला होता. या प्रकरणात आपण विनाकारण अडकलो आहोत याची त्याला खात्री पटली होती. घरी लवकर जाण्यावरून नंदा त्याला ओरडली होती हे बंगल्यातल्या प्रत्येकाला माहीत होते. इन्सपेक्टर काळे त्याला दुस-या खोलीत घेऊन गेले. " त्या दिवशी काय घडले मला सविस्तर सांग." ते म्हणाले. घाबरू नको. तू निर्दोष आहेस याची खात्री आहे मला ! पण माझ्या तपासाच्या कामात तूच मला मदत करू शकतोस."

रमेशने त्या दिवशी सकाळपासून काय घडले याविषयी त्यांना इत्यंभूत माहिती दिली. अगदी क्षुल्लक गोष्टीही इन्सपेक्टरनी त्याला विचारून घेतल्या.

"काय घडलंय हे माझ्या लक्षात आलंय. पण तू मला काय सांगितलंयस हे कोणाला सांगू नको. अपराधी सावध होता कामा नये." त्यांनी त्याला इशारा दिला.

Contd--part 7

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED