नवे क्षितिज - part 4 Amita a. Salvi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवे क्षितिज - part 4

नवे क्षितिज

part 4

मनोहरराव आणि रमाबाईंनी जास्त दिवस पुण्याला न रहाता दिल्लीला परत आपल्या घरी जाण्याचे ठरविले. त्याबरोबरच यशलाही नंदाच्या स्वाधीन न करता आपल्या बरोबर न्यायचा निर्णय त्यांनी घेतला. रणजीतने त्यांना थांबविण्याचा खूप प्रयत्न. केला. शेवटी नंदाने त्यालाच समजावलं, " ते इथे राहिले असते तर मलाही नक्कीच आवडले असते पण उतारवयात नवीन जागी रहायला त्यांना आवडत नसेल! त्यांचं आयुष्य दिल्लीत गेलंय ! तिथे त्यांचे वर्षानुवर्षांचे संबंध आहेत; तसेच आपल्या यशचेही लहानपणापासूनचे मित्र तिथे आहेत. त्यालाही तिकडे रहावेसे वाटणे अगदी नैसर्गिक आहे. " ती त्यांना खूप समजावून घेत असल्याप्रमाणे म्हणाली नंदाची आई-वडिलांबरोबर आणि यशबरोबर वागण्याची पद्धत रणजीतच्या लक्षात आली होती. आपण कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी लग्न केले पण नंदा अशीच वागणार असेल तर आपला हेतू कधीच साध्य होणार नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. पण आता विचार करण्याची वेळ निघून गेली होती. नंदाला तिच्या स्वभावासहित स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही ही खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. नंदाला ओळखण्यात त्यांनी चूक केली होती. अशी चूक, की जी दुरुस्त करता येणे शक्य नव्हते. नशिबाला दोष देण्याव्यतिरिक्त त्यांच्या हातात काही उरले नव्हते.

सासू-सासरे आणि यश दिल्लीला निघून गेल्यावर तर नंदाच्या वागण्याला जराही धरबंध राहिला नाही. तिच्या रोजच्या वेळापत्रकात ती रणजीतलाही खिजगणतीत धरत नव्हती. क्लब, शाॅपिंग , आणि मैत्रिणींबरोबर पार्ट्या यात तिचा दिवस जात होता. पतीची काळजी घेणे , घराकडे लक्ष देणे आपले कर्तव्य आहे हे तिच्या गावीही नव्हते. पत्नी म्हणून स्वतःचे हक्क कसे मिळवायचे हे तिला चांगलेच माहीत होते पण हक्कांबरोबर कर्तव्येही येतात हे ती सोईस्करपणे विसरत होती. ती आता रणजीतचे भारतातील काम संपण्याची वाट पहात होती. लंडनला गेली, की तिला अधिक स्वातंत्र्य मिळणार होते. इथे त्याचे आई- वडील, नातेवाईक कधीही येऊन तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करू शकत होते. लंडनला गेल्यावर मात्र ती शक्यता कमी होती. त्यामुळे रणजीतचा प्राॅजेक्ट कधी पूर्ण होतोय, असे नंदाला झाले होते. शेवटी बरेच दिवस वाट पाहून तिने रणजीतना विचारले, " आपण लंडनला कधी जायचं? तुमचा प्राॅजेक्ट पूर्ण होत आला असेल आता! मी तर अगदी वाट बघतेय, खरंच ! कधी मला लंडन पहायला मिळतंय, असं मला झालंय ! तिकडे खूप काही पहायचं आहे मला! "

तिच्या या बोलण्यावर रणजित विचारमग्न झाले. नंदा नेहमी कमी बोलत असे त्यामुळे तिच्या मनात काय चाललंय हे ती कधी कोणाला समजू देत नसे. आज तिला बोलतं करायची वेळ आली आहे हे ओळखून ते म्हणाले, मी यापुढे भारतातच रहायचे असं ठरवले आहे . इथे राहूनच व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागेल. मधल्या काळात माझं दुर्लक्ष झाल्यामुळे बरंच नुकसान झालं आहे. हं ! पण तुला युरोप पहायचा असेल, तर आपण काही दिवसांची युरोप टूर करू. इथल्या कामांमुळे आपण लग्नानंतर कुठे बाहेर जाऊ शकलो नाही. पण आता कामं संपत आली आहेत. "

त्यांना भारतात कायम रहाण्याचे कारण वाढलेला व्यवसाय , हे सांगावे लागले, कारण यश आणि आईवडीलांची काळजी हे खरे कारण नंदाला सांगून उपयोग नाही ; हे त्यांना माहीत होते.

त्यांच्या या निर्णयाने नंदाच्या उत्साहावर पाणी पडलं, पण ती काही बोलली नाही. लग्न होऊन फार काळ गेला नव्हता. तिच्या मनावरील रणजीतच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अजून कमी झाले नव्हता.

रणजीत पुढे बोलू लागले, " मी असा विचार करतोय की आपण दिल्लीला सर्वजण एकत्र राहू. मला माझ्या व्यवसायावर लक्ष ठेवणे सोपं जाईल, आणि तुलाही आई-बाबांची आणि यशची सोबत मिळेल."

आता आपण गप्प राहिलो तर यश आणि सासू - सास-यांबरोबर रहावे लागेल, या गोष्टीची जाणीव नंदाला झाली, आणि ती म्हणाली, " तुमचा व्यवसाय पुण्यात आणि मुंबईत आहे. दिल्लीला रहाण्यापेक्षा इथेच रहाणे तुम्हाला सोईस्कर आहे."

" ठीक आहे. मग मी त्या तिघानाही कायमचे पुण्याला बोलावून घेतो." खरा उद्देश रणजीतच्या तोंडून शेवटी बाहेर पडलाच, " त्याशिवाय हिचे खरे विचार कळणार नाहीत, एकदा काय तो सोक्ष-मोक्ष होऊन जाऊ दे" ते मनाशी म्हणाले.

"त्यांना इथे बोलवायची काय आवश्यकता आहे? तसे पण यशला इथे रहायला आवडत नाही. तिथे तो चांगल्या शाळेत जातोय, त्याचे लहानपणापासूनचे मित्र तिथे आहेत." त्यांना न दुखवता आपले ईप्सित साध्य करण्यासाठी व्यूहरचना करायला नंदाने सुरुवात केली.

पण आज रणजीतनी तिच्या मनात नक्की काय आहे याचा शोध घेण्याचा निश्चय केला होता.ते पुढे म्हणाले, " इथेही खूप चांगल्या शाळा आहेत. पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात हे विसरलीस का? शिवाय आई - बाबांचंही वय झालंय. त्यांनाही आपल्या आधाराची गरज आहे असे तुला नाही वाटत? शिवाय तूही दिवसभर एकटी असतेस तुलाही वडीलधा-यांची सोबत मिळेल, मार्गदर्शन मिळेल ."

" मला कोणाच्या सोबतीची आवश्यकता नाही. आणि कोणाचे सल्ले त्याहून नकोत. एकत्र राहिल्यावर सासू- सुनांची तू तू - मी मी होणारच. त्यापेक्षा त्या लांब. आहेत तेच बरे आहे." वादविवादाच्या भरात नंदाचा गोड स्वभावाचा मुखवटा गळून पडला होता.

"पण ती माझी आई आहे. आपलं घर हे तिचंही घर आहे. ती स्वतःचं घर सुखी रहावं यासाठीच प्रयत्न करणार नं? तिच्या आयुष्याच्या अनुभवांचा उपयोग आपल्याला व्हावा म्हणून तिने कधी सूचना केल्या तर त्यात वावगे काय आहे? तुला एखादी गोष्ट पटली नाही तर तुला तुझे विचार सांगण्यापासून कोणी रोखणार नाही. तुझ्या मतांनाही तेवढेच महत्व आहे. जगात कोणीही सर्वज्ञ नसतो त्यामुळे घरात महत्वाच्या गोष्टींवर चर्चा आवश्यक असते. एकत्र रहायचे तर एकमेकांमधे संवाद हवा. एका घरात राहून कोणी कोणाशी बोलायचं नाही, कोणी कोणाला काही सांगायचं नाही, असं परकेपणाचे वातावरण कसं चालेल? " रणजीतना तिला आणखी बोलते करायचे होते.

" पण मला कोणाचं ऐकायची सवय नाही. आणि कोणासाठी माझा वेळ घालवायचीही इच्छा नाही. त्याना तुम्ही इथे बोलावून घेतले तरी त्यांची कामे मी करेन अशी समजूत तुम्ही करून घेऊ नका. आणि यशला सांभाळायलाही मला जमेल असे मला वाटत नाही. आजी-आजोबांनी लाडावून ठेवलेला मुलगा आहे तो! नंतर मला दोष देऊ नका." नंदाचं रूप लग्नानंतर काही दिवसांतच इतकं बदलेल असं कधी रणजीतना वाटलं नव्हतं, आणि तिच्या बोलण्यात एवढा ताठरपणा होता की तिला समजावून काही उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आले.

यावर काही गोष्टी तिला माहीत असणे आवश्यक आहेत ; हे लक्षात घेऊन रणजीत म्हणाले," त्याना इथे राहू नका असे म्हणणारा मी कोण? हा बंगला बाबांनी वडिलोपार्जित वाड्याच्या जागी स्वतः बांधला आहे.मी फक्त अर्किटेक्ट म्हणून बंगल्याचं डिझाइन तयार केलं होतं . त्यांना अनेक वर्षे नोकरीसाठी दिल्लीला रहावं लागलं, पण रिटायर झाल्यावर पुण्यात येऊन रहाण्याची त्यांची इच्छा आहे. ते गेल्या वर्षी रिटायर झाले, आणि यशच्या शाळेचं हे वर्ष पूर्ण झालं, की ते कायम पुण्याला रहायला येणार आहेत."

रणजीतचे हे बोलणे ऎकून नंदा निर्वाणीच्या स्वरात म्हणाली," त्यांच्या घरात ते येऊन रहाणार असतील तर मी काय बोलणार? पण माझ्या बाहेर येण्या- जाण्यावर, वागण्यावर त्यांनी लक्ष ठेवलेलं मला चालणार नाही. माझ्याकडून त्यांनी सून म्हणून काही अपेक्षा ठेवू नयेत हेच बरं होईल."

यावर रणजीत काही बोलले नाहीत. पण जर यश आणि आई-बाबा इथे येऊन राहिले तर घरातले वातावरण कसे असेल आणि त्या दोघांना आणि यशला त्याचा किती त्रास होईल, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे एकत्र रहाण्याचा बेत त्यांनी बदलला; आणि स्वतःसाठी आणि नंदासाठी पुण्यात मोठा फ्लॅट घेतला. आई- बाबांना पुण्याला बोलावून घेतलं . यशला चांगल्या शाळेत प्रवेश घेतला. पण बाबा म्हणाले, एवढ्या मोठ्या बंगल्याकडे लक्ष द्यायला आम्हाला जमणार नाही, तुम्ही दोघे इथे रहा, आम्ही यशला घेऊन फ्लॅटमधे रहातो."

*****

Cotd---- part 5