सहेलीच्या कविता
(कविता –संग्रह )
अरुण वि.देशपांडे
कविता -१
सहेली
सहेली, तुझ्या वागण्याच्या सवयी फार गंमतीच्या
कधी नजरेसमोर असतेस तू
अन कधी
नजरेआड असतेस तू ..
माझ्या आवडत्या गोष्टींना
मनापासून जपतेस तू
अन बोलण्याची वेळ येते
तेंव्हा मात्र
सगळं मनाच्या शिंपल्यात ठेवतेस तू ..
सगळीकडे लक्ष देतेस
अन माझ्याकडे दुर्लक्ष करतेस तू
म्हणून किती रागवलो तुझ्यावर
नंतर उमजला मला
ते तुझं लक्षच होतं माझ्यावर ..
मन घेताय ओढ तुझ्याकडे
त्याला रोकणे जमत नाही
प्रेमात हे असचं होत असतं
हे तू का सांगत नाहीस
खरचं
सहेली, तुझ्या वागण्याच्या सवयी
फार गमतीच्या .
कविता-२
ठिपके अत्तराचे
सहेली,
कविता छानच !
दोनचं शब्द तुझे
ठिपके अत्तराचे
भरारी देणारे …….
कविता आवडली !,
दोनचं शब्द तुझे
साथ देणारे
सोबती माझे …
कविता -३
निरंतर ..
असतील तुझिया स्मरणात
गोष्टी अनेक अवांतर
नावं माझेच राहावे
मनात तुझिया निरंतर ...||१ ||
मिळावी प्रीती तुझी
शुभ संचित माझ्यासाठी
कोपरा एक हृदयीचा
असावा माझ्याच साठी....||२ ||
ऐकुनी मागणे माझे
सहेली उदार व्हावे
यावे मनात तुझिया
देऊनी तू टाकावे ...||३ ||
कविता -४
आणिक काय सांगू ...!
चंचल मन माझे
कुणात गुंतले नव्हते
पाहुनी तिला गुंतले
आणिक काय सांगू ...||
कशी भेट झाली
कुठे भेट झाली
योगायोग सुंदर तो
आणिक काय सांगू ...|
कोण असे माझी सहेली
नावं कसे सांगू
लटक्या रागे रुसेल ती
नाव कसे सांगू ...|
कविता ५
जादू
प्रेमाविण हे व्यर्थच जीवन
सांगत आले किती जन
कळुनी आला अर्थ यातला
गुंतले जेंव्हा तुझ्यात मन ...|
एक दिवाना मी तर होतो
प्रेम दिवाना मी झालो ग
गाईन आता गीत तुझेच हे
प्रेम तराणे छेडीन मी ग ..|
अबोल तुझ्या होकाराने
जादू कशी ही केली ग
डोळ्यांना मग भाषा आली
रेशीमधागी मने जुळली ग ...|
कविता -६
सखी
जीव जडेल कुणावर
कधी वाटले नव्हते
भेटेल सखी मनातली
कधी वाटले नव्हते ...|
डोळ्यात तुझ्या पाहिली
तरळती स्वप्ने साधी
जीवनाशा ती दिसली
खोल तुझ्या मनातली ...!
सांभाळ तूच आता
या खुळ्या मनाला
माझे न राहिले आता
सांभाळू तरी कशाला ...!
वाटले मनाला सहेली
इथेच थांबलो
आता कुठले ग जाणे
इथेच विसावलो ...!
कविता -७
सहेली
सहेली , काय झाले असते
तू भेटली नसतीस तर ?
या पेक्षा ,
तू भेटली तेंव्हा पासूनच
काय काय झालं हे महत्वाचे आहे
तू भेटल्यापासून तर
मी – पुन्हा
नव्याने जगण्याचे शिकलो आहे
विचारतेस कधी कधी तू
तुझ्या नावात एवढ काय आहे ?
सखे ,
हा श्वास घेतोय ना दरवेळी मी ,
त्यात तेच आहे ..
खरं म्हणजे, इथून पुढं
तू आहे म्हणून मी आहे
हे आणि एव्हढच खरं आहे ...!
कविता -८
लिफाफे ..
निमंत्रण लिफाफे
माझ्या नजरेचे
परत येतात
कमी तिकीट लावलेल्या
लिफाफ्या सारखे..
प्लीज –
एकदा उघडून तरी बघ
मग-
हवं तर- खुशाल परत कर ,
शेवटी मर्जी तुझी ..!
कविता- ९
आठवणी ..
आवडत्या माणसांच्या आठवणी
ठेवाव्यात मनाच्या पुस्तकात
खुणा असतात त्याच्याच
पानापानागणिक ....
केंव्हाही वाचावं मनातल्या मनात
आपलं आवडते माणूस
त्याच्या आठवणीसकट..
कविता-१०
तरंगचित्र ..
चेहेऱ्यावरून तुझ्या
कळत नाही फरसे
म्हणून –
पाहतो डोकावून
डोहात नजरेच्या
थेट मनाच्या तळापर्यंत
तिथं मात्र –
माझ्याच आठवणींचे तरंगचित्र
आकारून येतांना पाहिले
आणि परतलो माघारी
मोठ्या आनंदाने ...
कविता ११.
हमसफर ..
करितो सफर मी
हमसफर तू असे
सहवासात रम्य तुझ्या
ही आनंदयात्रा असे ...
नजर माझी न उरे वेगळी
नजरेत तुझ्या मिसळे
देखण्या डोळ्यातून तुझ्या
दिसे जग वेगळे ...!
गुणगुणावे तू सहेली
एक मधुर गाणे
देईन साथ तुला
गाण्या गीत दिवाणे ....!
कविता -१२.
चालतो राखुनी अंतर
मागे वळूनी पाहसी
नजर खुणावे तुझी
ठेवू नकोस अंतर .. ||.१ ||
चालता सवे तुझ्या
चालणे संपू नये
हसणे बोलणे तुझे
कधी संपू नये ...!.. ||२||
आवड माझी जाणुनी
सजलीस तू सहेली
पाहू दे मन भरुनी
पहाणे हे संपू नये ....! ||३||
कविता – १३
आठव तुझा सहेली ...
आठव होता तुझा सहेली
भरुनी येती डोळे
विरहाचे गीत गाते
अजुनी मन हे भोळे...!
एकटाच मी कातरवेळी
एकांत असे सोबती
मनात अशा व्याकुळवेळी
आठवणी तव येती ...!
मऊ शाल तव आठवणींची
अंगाभोवती घेतो लपेटूनी
उबदार त्या आठवणीनी
मन तुजकडे पळे...!
प्रीतीचा दर्द मधुरतम
तूच दिलास खरोखर
वेडे झाले मन तुजसाठी
इलाज करावा तूच बरोबर ...!
कविता -१४
सुंदर तू पाहुणी
आहेस माझ्या घरात
सुंदर तू पाहुणी
असता डोळ्यासमोर तू
यावी झोप कोठुनी ....!
जवळ असुनी तू
दूर दूर का भासे
कळेना मला अजुनी
हा दुरावा का असे ? ..!
सहवासात तुझ्या सहेली
बहरली चांदरात किती
चांदणे बघ प्रीतीचे
यावी झोप कोठुनी...
कविता -१५
१.
प्रिय असावे
तुझ्या सारखे
मनात कुणी
तरच ,
मन भटकत नाही
कुठे ही ....!
२.
भटकंती
मनाची संपली
केंव्हा ?
मुकामाचे गावं दिसले
तुझ्या मनात
तेंव्हा ...!
------
कविता -१६
उत्तर
प्रेम करता करता
जगता येणं
जगता जगता
प्रेम करता येणं
गणित कसंही सोडवा हो ,
उत्तर – एकच ..
जीवनाचं सार्थक होणं ...
साक्षात्कार
तुझं असणं
माझ्याभोवतीचं
आयुष्याला अर्थपूर्ण करणारं .
तुझं नसणं
माझ्या साठीचं
आयुष्य अपूर्ण ठेवणारं
हाच साक्षात्कार
तुझ्या प्रेमाचा .
कविता -१७
आला सुरेल वारा
आला सुरेल वारा
घेउनी शब्द तुझे
सांगे कानात माझ्या
येणार तू भेटण्या ...||१ ||
हुरहुरले होते मन
दाटली होती खिन्नता
झुळूक हवेची येता
आली मनी तजेलता ||२ ||
भेटीत आपल्या सहेली
कधी दुरावा नको
ओढ लागता भेटीची
वाट पहाणे नको ...||३||
कविता १८.
श्रावणसावळा .
असेल जर मनात तुझिया
कठीण नाही भेटणे
हेच नेमके अवघड वाटे
दाटे हुरहुर मनी माझिया
विरहाचे घन निळे मेघ हे
दाटुनी आले मनावरी
नयनांच्या काठा जमता
कोसळती बघ झरझरी
येणार नाही पुन्हा
पुन्हा असा पावसाळा
ये सहेली ,मुक्त मनाने
पाहण्या श्रावण सावळा ..
कविता -१९
बरसात
असशील तू
खिडकीत नेहमीच्या
आतुर नजर तुझी
असेल शोधीत
ओळखीच्या मेघांना ..
तुझ्याकडे येणारे हे मेघ
आलेत माझ्या घरावरून
आता रेंगाळतील ते
तुझ्या घरा समोर ..
माझं मन पाठवलाय
या जिवलगा सोबत
ते बरसतील
आता तुझ्यासाठी ..
होईल बघ बरसात
आता तुझ्या साठी
तुला सुखावणाऱ्या
जलधारांची
कविता -२०
नजरेच्या पायघड्या
नजरेच्या या पायघड्या
टाकिल्या तुज चालण्या
धावत यावे तो सखये
आज मजला भेटण्या ..
आतुरलेली ही लोचने
आज जाहली निरांजने
उजळूनी जाता वाट आता
यावे तू मज भेटण्या ...
बेभारोसी जीवनाचा
देऊ काय भरवसा
नको उशीर आता
गूज मनीचे सांगण्या ...
कविता -२१
गुलमोहराच्या देखण्या फांदीवर ...
असतेस उभी तू
स्वतहातच हरवलेली
नजर दूरवर गुंतलेली
अशावेळी येते एख
सुखद झुळूक वाऱ्याची
माझ्या आठवणीची ...
असतो मी समोर
गुलमोहराच्या देखण्या फांदीवर
भिरभिरत असतो भोवती तुझ्याच
लडिवाळ पाखरासारखा ....
तुझ्या काळ्याभोर रेशमी केसात
नेहमीच असतो एक गुलाब विसावलेला
सहेली, तो गुलाब मी
तुला सुखावणारा ....
कविता -२२
क्षण एक तो ..
डोळ्यात प्राण आणुनी
वात पहाणे नको
प्रतीक्षेचा क्षण एक
कितीदा मोजिला मी... ||१||
ओंजळीत टाकिल्यास माझ्या
कळ्या तू आठवणींच्या
फुले झाली त्यांची
एक हार ओवीला मी...||२||
शीतल चांदण्यात या
विरह साहिल मी
चेहरा उतरलेला चंद्र
माझ्यात पाहिला मी.....||३||
कविता-२३..
सहेली ..
१.
थोडसं जरी
समजून घेतलस मला
तर एक नवा अध्याय
होऊ शकतो सहवासाचा
आणि
लिहू लागेल मी नव्याने
काही नव्या कविता.....
२.कळ्या टाकिल्या मी
ओंजळीत तुझ्या
उमले पर्यंत लक्ष ठेव
या..
फुलांचीच वेणी
माळणार आहे मी
तुझ्या वेणीवर ....
कविता-२४
कविता सहेलीची ..
डोळ्यातून पाहिले सहेली
थेट हृदयात तुझ्या
मन माझे तेथे
प्रेमात रंगलेले तुझ्या....
नसेल कधी मनात
अभिलाषा तुझ्या विषयीची
असेल आशा मनात
मिळावी प्रीत हृदयीची
निर्मल निर्लेप प्रेमाची
गोडी असे आगळी
गोड कमाई आयुष्यातली
याहुनी नसे वेगली ...
आयुष्यात येतो असा
विरळ योग आगळा
चालता चालता रस्ता
साथी मिळतो वेगळा ...
कविता -२५
असता सोबत तू सहेली
मखमली गालिचा हिरवा
हिरवीच झाडे बाजूला
घनगर्द ही हिरवाई
रंगांची किती अपूर्वाई....||१||
वर आकाश निळे निळे
प्रतिबिंब जलाशयाचे निळेनिळे
नीलपरी तू निळाईतली
बाजूस गुलमोहर नवलाई ..||२||
रंगबिरंगी पाहुनी नजारा
मन झाले रंगबावरे
सोबती तू सहेली
मनी इंद्रधनू फुलवाई....||३||
कविता –२६
आकाशी ..
सहेली बघ आकाशी
मेघ जमले किती
कोसळतील धारा आता
ये भिजण्या संगती ...||१||
भिजलो तुझ्यासवे
अशाच पावसात एकदा
भिजलेली नखशिखांत
पाहू दे एकदा ....||२||
धावत्या पाण्यासंगे या
मन झाले कागद –होडी
येतय तुझ्याकडे ते
सोडीव मनातली कोडी ....||३||
कविता -२७
दुरावा
दुरावा तुझा सहेली
जशी ग्रीष्माची काहिली
सरेल आता तिही
पाउस चाहूल लागली .....||१||
घेउनी मनोगत तुझे
आले घन निळे प्रवासी
मेघ कुठे हे ग
हे तर माझे स्नेही .....||२||
मेघासम मन तुझे
होऊ दे मोकळे
बरसू दे भावना
जसा पाउस कोसळे.....||३||
कविता -२८
तू अबोली ..ती अबोली ..!
अशी उभी तू सहेली
शेजारी तुझ्या बघ
ही अबोली बहरलेली ...
ती अबोली .तू अबोली
दोघी आवडत्या माझ्या
अगदी मनापासून,पहिल्या पासून .. ||१||
फुलणारी ती अबोली
तुला भावणारी
खुलनारी तू अबोली
मला भावणारी अगदी मनापासून
पहिल्यापासून ...... ||२||
ती अबोली उमलते
तुझ्यासाठी
तू अबोली खुलते –फुलते
माझ्यासाठी
अगदी मनापासून ,
पहिल्यापासून ...||३||
कविता -२९
निशाणी हृदयी तुझ्या
अनुपम सुंदरी तू
मन त्याहुनी सुंदर तुझे
केले स्वाधीन मन माझे
निशाणी हृदयी तुझ्या ......||१||
आलीस तू जीवनी
मधुर प्रीती घेउनी
फुलावी प्रीती आपुली
निशाणी हृदयी तुझ्या ......|| २ ||
कठोर होणे मजवरी
शोभत नाही तुजला
तुझ्याविना सहेली
भावे न कुणी मजला ......||३||
ही भेट आपुली
संकेत नियतीचा असे
सांभाळ प्रीती आपुली
निशाणी हृदयी तुझ्या .....||४||
कविता -३०
हे तूच सांग ना .
साहू कसा दुरावा
हे तूच सांग ना
होणार भेट ती कधी ?
सहेली तूच सांग ना .....||१||
अबोल असत शब्द
भाव तुझे बोलके
अर्थ काय यातला ?
सहेली तूच सांग ना .....||२||
व्यापुनी टाकीलेस तू
तू अवघेच जग माझे
वजा कशा कशातून करू ?
सहेली ,तूच सांग ना ....|| ३ ||
-----------------