कर्तव्य
अरुण वि. देशपांडे
क्लबच्या बाहेर पडत असतांना मी फारच खुशीत होतो. बर्याच दिवसा नंतर आज रमी खेळत असतांना माझे कार्ड –लक.. बेस्ट लक “होते “, त्यामुळे नशीब खुलले असेच म्हणावे लागेल. रिकामा झालेला खिसा “,आज खूप दिवसानंतर भरभरून वाहतो आहे हे मला जाणवत होते.. खेळ संपवून आम्ही सारेजण क्लबच्या बाहेर पडलो. पार्किंगमध्ये माझी नवी कोरी बाईक मोठ्या दिमाखात चमकत होती. गाडी सुरु करून मी घराकडे निघालो. मध्यरात्रीच्या निवांत वेळी रस्ते सामसूम होते, रस्त्यावर गर्दी तर मुळीच नव्हती. माझी गाडी जरा जास्तच वेगानी पळवत होतो.. त्याक्षणी “जादूच्या उडत्या घोड्यावरून जाणऱ्या राजाची आठवण मला होत होती.
घर आले आणि गाडी थांबली, बाहेरच्या हॉल मधील लाईट चालू असल्याचे पाहून आमचा राजू इतक्या उशिरा पर्यंत अभ्यास करतो आहे “,या कल्पनेने मनाला समाधान वाटत होते. राजू यंदा बारावीला होता, पोराला खूप टेन्शन तर नाही आले ना ? असे मला वाटून गेले.
मी दारावरची बेल वाजवली – माझी अपेक्षा होती की – राजू दरवाजा उघडेल, पण तसे झाले नाही. वीणाने दरवाजा उघडला, त्यामुळे मी विचारले – वीणा, तू अजून जागीच आहेस ? राजू लवकर झोपला की काय ?
त्यावर वीणा म्हणाली- आपला राजू अजून घरी आलेला नाहीये.. ! आणि ज्या घरात बापानेच घरी येण्याच्या बाबतीत ताळतंत्र सोडलाय, मग, पोरगा भटकत राहिला तर त्याला काय आणि कसे बोलायचे मी ?.. . वीणाच्या स्वरातील कडवटपणा माझ्या कानात शिरला, पण, तिच्या अशा बोलण्याला प्रतिउत्तर देण्याची वेळ बरोबर नव्हती त्यामुळे मी गप्प बसून राहिलो. माझ्याकडे रागाचा कटाक्ष टाकून वीणा आतल्या रूम मध्ये निघून गेली होती.
क्लबमध्ये माझे पत्ते खेळण्यास जाणे, पार्टीच्या निमित्ताने उशिरा पर्यंत घराबाहेर रहाणे वीणाला अजिबात आवडत नव्हते. ज्या दिवशी क्लबमध्ये “ओली-पार्टी “करून मी येत असे त्यादिवशी तर माझ्यासाठी घरात संचारबंदी लागू केलेली असे.. . त्यामुळे घर ते ऑफिस आणि नंतर घरातच बसून राहणे असा आखलेल्या चौकटीत राहणे करायला लागायचे.. पण दोस्त फारच फोर्स करायचे.. मी नाही “ म्हणालो तर. टारगेट करून चिडवत असायचे.. ” डरपोक साला, आम्ही नाही बाबा तुझ्या सारखे जोरू का गुलाम. “,मनात आलं की आम्ही मस्त जमतो आणि एन्जॉय करतो. आणि तुझं बघाव तर – बायकोला विरोध करण्याची हिम्मतच नाहीये तुझ्यात. ” दोस्त असे बोलू लागले की मग काय, मी वीणाचा विरोध सहन करून, तिच्या रागाकडे दुर्लक्ष करून पार्टी एन्जोय करण्यासाठी जाऊ लागलो..
वीणाने नेहमी प्रमाणे माझ्यासाठीचे जेवण टेबलावर मांडून ठेवलेले होते. त्या जेवणाला जणू वीणाच्या मनाच्या नाराजीचा स्पर्श झालेला होता. त्यामुळे ते जेवण खात असतांना अगदी “बेचव लागत होते “.
माझे क्लब मध्ये जाणे –पार्ट्या करणे वीणाला पसंत नव्हते.. ती म्हणायची –अहो –या अशा सवयीने, वागण्याने कधी कुणाचं भलं झालाय का ? असे करू नका हो तुम्ही, पण, तसे होत नव्हते. मी मात्र –
कळत होते पण वळत नव्हते “असा वागत होतो. त्या क्लब –लाईफ ची भुरळ मला पडली होती. कधी वाटायचे.. ”मृगजळाच्या मागं धावण्याचा शाप, माणसाची पाठ केंव्हा सोडणार ?
जेवण करून,हात धुवून मी बेडरूममध्ये आलो, वीणाला झोप लागली होती. तिच्या अंगावर हात टाकून माझी मुलगी- गुड्डी झोपली होती. एरव्ही माझ्याकडून गोष्ट ऐकल्यावर झोपणारी गुड्डी माझ्या उशिरा येण्यामुळे मला दुरावली होती, आज गुड्डीला वीणाजवळ पाहून मला वाटले.. गुड्डीला तिची आई कोणती गोष्ट सांगून झोपवत असेल ?. कदाचित.. माझ्या सारख्या बिघडत चालेल्या बाबांची गोष्ट तर सांगत नसेल तिला ?”
मी चुपचाप हॉलमध्ये येऊन बसलो, बाहेरच्या पलंगावर राजूची पुस्तके आणि नोटबुक्स विखुरलेले दिसत होते. हे पाहून मी राजूचा विचार करू लागलो. इतक्या रात्री राजू कुठे गेला असेल ? घर आणि अभ्यास सोडून असे बाहेर फिरत राहणे बरे नाही. राजूला हे समजावून सांगितलेच पाहिजे.. या विचारातच मला झोप लागली असावी.
सकाळी मी जागा झालो.. याची अजिबात दखल ने घेता. वीणा “कामात खूप दंग आहे “असे दाखवते आहे असे तिच्याकडे पाहून मला जाणवत होते.. म्हणजे तिच्या मनातील राग जसाच्या तसा धुमसत आहे “याचे ते लक्षण होते. यामुळे मी अस्वस्थ झालो. “एखाद्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत त्याला मनातून वगळून टाकले आहे “,याची जाणीव करून देत रहाणे आणि तसे वागणे “, यासारखी दुष्ट आणि मानसिक शिक्षा “दुसरी नसावी.. कारण वीणाने नेमकी हीच शिक्षा मला केली होती.
हे जाणवून मी मनाशी म्हणलो.. छे.. ! छे.. ! हे असा काही खरा नाही रे बाबा. वीणाचा हा जीवघेणा राग परवडणारा नाही.. . रोजच्या प्रमाणे आमच्या दोघांच्या टूथ –ब्रशवर पेस्ट लावलेली असायची.. आज मात्र वीणाने माझ्या टूथ –ब्रश ला कोपर्यात तसेच ठेवून दिलेले दिसले.. हे असे पहिल्यांदा घडले होते.
दात घासीत असतांना मी विचार करू लागलो – मी माझ्या कर्तव्यात कुठे चुकत आहे का ?, वीणा म्हणते त्याप्रमाणे – मी घराकडे दुर्लक्ष करतोय का ? कारण, संध्याकाळी क्लबमध्ये जाणे, पत्ते खेळणे, अधून-मधून कधीतरी ओळी-पार्टी “करणे.. या गोष्टी तसा म्हटले तर आजकाल अगदी नॉर्मल आणि रुटीन झालेल्या आहेत. त्याचा इतका सिरीयस इश्यू.. ! करण्याचे कारणच नाही..
पण या वीणाला, प्रत्येक गोष्टीचा मोठ्ठा बाऊ करण्याची सवयच आहे “, सदा न कदा-किरकिर.. करीत रहाणार. जाऊ दे, तिला एवढ काय घाबरायचं ? माझं मन मला भक्कम आधार देत होते. शेवटी तिच्या रागाकडे दुर्लक्ष करण्याचे मी ठरवले आणि चहासाठी खुर्चीवर येऊन बसलो.
चहा घेत असतांना मी तिला विचारले – काय गं, काल रात्री राजू घरीच आला नाही, म्हणजे, तो तुला सांगूनच राहिला असेल न असा बाहेर ? तसे असेल तर काही हरकत नाहीये.. तुझे असेच लक्ष असुदे याच्यावर.
माझे ऐकून घेतल्यावर वीणा म्हणाली- हे पहा – मुलं मोठी झाली म्हणजे त्यांना आईच्या बोलण्याची आणि धाकाची काही किमत वाटत नसते, एक कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून दयायचे “ हे त्यांना छान कळत असते. ” अशा वळणावरच्या पोरांवरती बापाची बारीक नजर असायला हवी असते, पण, ही बाब तुमच्या मनात कधीच येत नाहीये “. वर तुम्हाला काही बोलायची सुद्धा सोय नाही. त्यात बघावे तर तुमची नजर असते “ हातातील पत्त्यांच्या डावावर, आणि मन घोटाळते ते क्लब भवती “, त्यामुळे “ वडील म्हणून राजूच्या बाबतीत फारच बे-फिकीर आहात “, हे पण मी सांगत राहू का
वेळीच तुमच्या मनावर आवर घाला.. आणि घरात काय होतंय ते पहा अगोदर.
वीणाची फायरिंग थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत. हे ओळखून मी म्हणालो – हे बघ– तू हे सारखं सारखं माझ्या बाहेर जाण्यावरून तू आरडा ओरड करीत जाऊ नकोस. मी तुमच्याकडे दुर्लक्ष करतो हे कशावरून ठरवतेस तू ?
उलट सगळा पगार मी तुझ्याजवळ देतोय, घरात आवश्यक असणार्या सगल्या वस्तू महिन्याला वेळेत आणून टाकतो. तुमच्या मनोरंजनसाठी म्हणून लेटेस्ट गोष्टी घरात हजर आहेत, तरी देखील तू माझ्यावर खुशाल बेजबाबदार असल्याचा आरोप करते आहेस.. मी तर म्हणेन. मी माझी कर्तव्य उत्तम प्रकारे बजावत असतो. ”
वा –वा –फारच छान.. ! झालं का तुमचे कर्तव्य –पुराण सांगून ? “ वीणाच्या बोलण्याचा टोन रागाचाच होता.. ”अहो, किती कोरडेपणाने सांगता आहात. या गोष्टी मिळणे म्हणजेच का आयुष्याचं सार्थक होत असतं का ? जरा नीट विचार करा,
तुमचं घराबाहेर राहणं, उशिरा घरी परत येणे, याचा काय परिणाम होत असेल ?.. विचार तरी करून पहा. तुम्ही आमच्या जितके जवळ होतात ना, त्याही पेक्षा जास्त दूर दूर गेलात तुम्ही आमच्या पासून. तुम्ही तुमच्या क्षणिक आनंदासाठी आमचे समाधान हिरावून घेतले आहे.
वीणा, बस झालं, पुरे कर तुझे भाषण, माझ्या मित्रांच्या आग्रहा खातीर मी क्लबमध्ये जातो, माझ्या पोझिशनला बाहेरच्या जगातील रिलेशन ठेवणे गरजेचे असते आणि मग त्यासाठी अशी कसरत करणे मला आवश्यक वाटत असते. ”
माझे हे समर्थन वीणाला पटले नाहीच. आमची उमलती सकाळ “हिरमसून कोमेजून गेली. समोरासमोर असून देखील वीणाआणि माझ्यातले अंतर न मिटण्याइतके झाले आहे असे वाटू लागले. आमचे शीत –युध्द “चालू असतांनाच काल पासून घरी न आलेला राजू घरात आलेला आम्हाला दिसला. आत मध्ये आल्यावर माझ्याकडे पाहून न –पाहिल्या सारखे करीत तो बेडरूम मध्ये जाऊन पडून राहिला. राजूने केलेले हे असे दुर्लक्ष जाणवून माझे माथेच भडकले.. “वीणा, राजूच्या टर्म –परीक्षेचे मार्क कळले असतील ना ? काय प्रगती आहे की नाही ?, त्यावर ती म्हणाली.. या प्रश्नाचे उत्तर राजूच देईल, त्याला विचारा ना, मी काय उत्तर देऊ ?
मी तडक बेडरूम मध्ये गेलो.. डोळे मिटून पडलेल्या राजूला उठवले आणि विचारले.. राजू, काल रात्रभर कुठे होतास तू ? आई किती काळजीत होती, कल्पना आहे तुला याची ?
बाबा – आईच काळजी करीत होती ना ? त्यात नवे काय, कारण.. तुम्हाला तर वेळच नसतो आईचे काय - ती नेहमीच सगळ्यांची काळजी करीत असते. ”
माझ्या नजरेला नजर देत शांतपणे बोलणारया राजूकडे मी थक्क होऊन पहातच राहिलो. आपला राजू एवढा मोठा कधी झाला ? त्याच्याशी जास्त न बोलता मी बाहेर आलो. त्याचा मार्क मेमो पाहून माझा राग अधिकच वाढला.. वीणाच्या समोर राजूला उभा करीत मी म्हणालो-
बघा –चिरंजीवांचा प्रताप –नुसत्या लाल –रेघा, आता वार्षिक परीक्षेत काय होणार आहे, हे आधीच कळते आहे, हे बघ वीणा- तू त्याच्या खाण्या-पिण्याच्या काळजी पेक्षा, त्याच्या अभ्यासाची काळजी घे “ कारण ते जास्त महत्वाचे आहे “.
आणि राजू- तुला लाज वाटत नाही का रे ? अभ्यास काय तुझ्या बापाने करायचा ? आम्ही कष्ट करायचे, आणि तू सगळं मिळून धड अभ्यास करू शकत नाहीस ? असला फालतूपणा मला चालणार नाहीये, पुन्हा असे झाले तर तुला असा बडवीन की चार दिवस तुझ्या अंगावरचे वळ जाणार नाहीत, हे लक्षात ठेव आणि नीट वाग, समजला ?
माझे हे असले बोलणे मध्येच तोडीत वीणा म्हणाली – हे काय चालवलाय तुम्ही,? बरोबरीच्या मुलाला असे बोलतात का कधी ? समजावून सांगणे तर दूरच राहिले, मारझोड करण्याची भाषा करता आहात.. असे कसे हो निर्दयी झालात आहात तुम्ही ?” त्याच क्षणी वीणा आणि राजू यांच्या समोरून मी निघून गेलो.
नंतर दिवसभर माझ्या डोक्यात राजुचेच विचार होते. वीणाची नाराजी मला अस्वस्थ करून टाकीत होती. मग,ऑफिसच्या कामात गढून गेल्यावर ते कमी कमी होत गेले. संध्याकाळी. दोस्त कंपनीचे फोनवर फोन आले.. सवयी प्रमाणे मी क्लब मध्ये जाऊन बसलो.
सकाळचा राग आता मावळून गेलेला होता. गपा आणि पत्त्यांचा डाव मस्त रंगत होता, माझे नशीब जोरात होते.. माझ्या मना प्रमाणे डाव पडत होता.. त्यामुळे राजूचे विचार, वीणाचा राग.. या गोष्टींचा विसर पडला होता.. ” मध्येच क्लबचा शिपाई माझ्या मागे उभा रहात म्हणाला.. साहेब, बाहेर तुमच्या मिसेस आलेल्या आहेत.. खूपच महत्वाचे काही सांगायचे आहे.. तरी तुम्ही बाहेर यावे असा निरोप आहे.. ..
वीणा आणि क्लब मध्ये ? मी चक्रावून गेलो, कदाचित माझा रंगलेला खेळ मोडण्यासाठी तर तिची ही चाल नसेल ना ? इथ पर्यंत मजल गाठली की काय ? मी माझा डाव सोडून देत बाहेर आलो.
मला बाहेर आलेला पाहून.. वीणा म्हणाली- तुमचा डाव मोडण्यात मला काडीचाही आनंद नाहीये हे लक्षात घ्या.
आता हे पत्र वाचा आणि मग ठरवा. माझे इथे येणे हे योग्य की अयोग्य ?
वीणाने माझ्या हातात दिलेले “ते पत्र – राजूचे होते..
“प्रिय बाबा –
आज सकाळी तुम्ही, मला जवळ घेऊन धीर देण्या ऐवजी धाक दाखवून दूर लोटून दिलेत. तुम्ही आमच्या अधिक जवळ यावेत म्हणून मी मुद्दाम नापास झालो होतो. पण, तुम्ही मला जवळ घेणे दूर.. रागारागाने पाठ फिरवून निघून गेलात. बाबा, आपल्या घरातील वातावरण बदलून गेले आहे, हे कळण्याइतका आता मी मोठा झालो आहे.
वडिलांचे कर्तव्य “काय असते हे सांगण्याइतका मी मोठा नाहीये. विद्यार्थी म्हणून माझे कर्तव्य काय आहे ते मला माहिती आहे आणि मी ते व्यवस्थित पार पाडेन. म्हणूनच सांगतो – आता परीक्षा पास झाल्यावरच मी तुमच्यासमोर येईन. तोपर्यंत नाही.. . !
“तुमचा राजू.
पत्र वाचून मी ते खिशात ठेवीत. वीणाकडे पाहिले, इतक्या वेळ दाबून ठेवलेला तिचा हुंदका आता बाहेर पडणार आहे “ हे ओळखून तिला जवळ घेत,पाठीवर आधाराचा हात ठेवीत म्हणालो.. वीणा,. चल, आपल्या राजूला घरी घेऊन येऊ “ माझ्या शब्दातील सच्चेपानाचा स्वर वीणाला खरा वाटला असावा.
क्लबच्या पायऱ्या मी उतरत होतो, आता परत कधी न चढण्या साठी “,आज माझ्या मनाला कर्तव्याची जाणीव झाली होती.. हीच जाणीव मला माझ्या माणसांच्या जवळ घेऊन जाणारी होती.
***