स्वयंसिद्धा अर्थात् वर्षाताई
वसईतील पापडी येथे रहाणारे श्री. केशव लवाटे यांचा फिरता सिनेमा होता. त्या वेळी त्या परिसरात सिनेमागृहे नव्हती. तंबूमध्ये सिनेमा दाखवला जात असे. आजूबाजूच्या परिसरात सिनेमाची ओळख केशवरावांमुळे झाली. तिकडे पहिला सिनेमा त्यांनी चालू केला ; त्यामुळे लोक त्यांना सिनेमावाले लवाटे म्हणून ओळखत असत. पण हा व्यवसाय काही वर्षानी नीट चालेनासा झाला. आणि ते वसई सोडून दादरला रहावयास आले. त्यावेळी केशवरावांची कन्या रत्नप्रभा म्हणजेच आपल्या वर्षाताई, पाच वर्षांच्या होत्या. त्यांच्या अस्थिर आयुष्याची सुरुवात इथूनच झाली. पण मुंबईतील वास्तव्य त्यांना ज्ञानार्जनासाठी पोषक ठरले.
दादरला श्री. लवाटे यांनी फर्निचर, पेंटिंग इ. लहानसहान उद्योग चालू केले; पण म्हणावा तसा जम बसत नव्हता. त्यांची आई- प्रमिला कारखान्यात नोकरी करून संसाराला हातभार लावत होती. रत्नप्रभा सहावीला असताना त्यांच्या आईने सातवीची व्हर्नाक्युलर फायनलची परीक्षा पास केली आणि सेवासदन येथे 'टीचर्स ट्रेनिंग काॅलेज 'ला दाखला घेऊन काही दिवसांतच पी. टी. सी. होऊन शिक्षिकेची नोकरी मिळवली. आईची ही जिद्द मुलीमधे उतरली होती याची खात्री वर्षाताईंची शिक्षणासाठी तळमळ पहाताना सतत जाणवते.
सातवी पास केल्यावर वर्षताईंना माटुंग्याला मावशीकडे, तर त्यांच्या भावाला वसईला मामाकडे पाठवण्यात आले.त्या शनिवार - रविवार घरी येत असत, तोच. काय तो आई-वडिलांचा सहवास त्यांना मिळत असे.
परिस्थितीची जाणीव असल्यामुळे खूप अभ्यास करून वर्षाताईंनी उत्तम प्रकारे एस.एस.सी. ची परीक्षा पास केली. पुढील शिक्षणासाठी रुपारेल कालेजला जाण्याची फार इच्छा होती पण आईने आणि मावशीनेही teachers ट्रेनिंग कोर्स करून प्रथम स्वतःच्या पायावर उभी रहा असा सल्ला दिला. सेवासदनमधून 87 टक्के मार्क मिळवून त्या PTC झाल्या आणि म्युनिसिपल शाळेत त्यांना लगेच नोकरी मिळाली; पण पुढे शिकण्याचा विचार मनातून गेला नव्हता. त्यामुळे घरी आईलाही न सांगता रुपारेल कालेजला त्यांनी आधी अॅडमिशन घेतली; आणि मग घरी सांगितले. त्यांना वाचनाची आवड तर होतीच पण विविध खेळांमधेही त्या तरबेज होत्या. त्या कॉलेजच्या उत्कृष्ट कबड्डी प्लेयर होत्या. शिवाय बॅडमिंटन त्यांचा आवडता खेळ होता. कबड्डी आणि बॅडमिंग्टन मुळे त्यांचे गुडघे नेहमीच फुटलेले असत. त्यांचा आवाज खूप गोड आहे. काही काळ त्यांनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले. पण आर्थिक अडचणींमुळे ही शिकवणी जास्त दिवस चालू ठेवता आली नाही.
कॉलेजचे शिक्षण मनासारखे चाललेले असतानाच त्यांना अनेक ठिकाणाहून लग्नासाठी विचारणा येऊ लागल्या आणि देखण्या रत्नप्रभाचे श्री. शशिकांत माचवे यांच्याशी लग्न ठरायला वेळ लागला नाही. त्यावेळी कॉलेजचे फक्त एक वर्ष पूर्ण झाले होते. लग्नानंतर वर्षाताई गिरगावात रहायला आल्या. श्री. शशिकांत माचवे भाभा अणुशक्तीकेंद्रामध्ये टेक्निकल एक्सपर्ट होते. सासरे डोळ्यांचे डाक्टर होते. त्यांचा कांदेवाडीत स्वतःचा दवाखाना होता. खूप छान सासर मिळालं म्हणून माहेरी सगळे खुश होते; पण वर्षाताईंसमोर एक वेगळीच समस्या उभी राहिली. सावत्र सासुबाई त्यांना आपलं म्हणायला तयार होईनात. माहेरच्या गरीबी वरून सतत टोमणे ऐकावे लागत. घरातील सून म्हणून कोणतेही अधिकार त्यांना मिळत नव्हते. संपूर्ण घर सासूबाईंच्या वर्चस्वखाली होते. वर्षाताई फक्त कामाच्या धनी होत्या.
वर्षभरातच त्या वीस वर्षांच्या असताना मोठ्या मुलीचा- स्वातीचा जन्म झाला. तिच्या मागून जन्मलेली दुसरी मुलगी मात्र फार दिवस जग पाहू शकली नाही. ताईंच्या मनावर मुलगी गमावल्याचा फार मोठा परिणाम झाला. त्या सुन्न होऊन गेल्या. ताईंना आणि श्री. शशिकांत यांना मुली झाल्या म्हणून कधीच खंत वाटली नाही पण सास-यांची नातू पाहण्याची इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही, ही टोचणी मन पोखरत होती. नोकरी, रोजची कामे सर्व काही यांत्रिकपणे चालले होते. पण मन मात्र कशातच रमत नव्हते.
अशा भरकटलेल्या मनस्थितीत असतानाच श्री माचवे यांचे एक मित्र- श्री. भागवत यांनी श्री. भाऊ (नीळकंठ) करंदीकर यांना पत्रिका दाखविण्याचा सल्ला दिला. शशिकांत यांची पत्रिका नव्हती. वर्षाताईंची पत्रिका भाऊंना दाखवली. दिवस होता 7 july 1961. भाऊंचा कल नेहमीच आधुनिक विचारांकडे होता. त्यांनी कधी कोणाला गंडे -दोरे दिले नाहीत. पुढच्या काळात ' ॐ सद्गुरू प्रतिष्ठान 'वरील त्यांच्या प्रवचनांमधेही ते अध्यात्म आणि व्यवहार यांची सांगड घालून सुखी आणि संपन्न जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन करत असत. या मुळेच भाविकांनी त्यांना 'आनंद -योगेश्वर' असे बिरुद दिले आहे. वर्षाताईंनाही भविष्य सांगण्याऎवजी त्यांनी समूपदेशन केले. ते म्हणाले, " तू मुलगा आणि मुलगी असा विचार करू नको. जे मिळाले ते देवाचा प्रसाद समजून स्वीकार कर. स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दे. तुला शिक्षणाची आवड आहे तर शिक्षण पुढे चालू ठेव. त्यातच तुझ्या मनाला विरंगुळा मिळेल. " भाऊंचा हा सल्ला वर्षाताईंच्या पुढील आयुष्याचा पाया ठरला; आणि मार्गदर्शक म्हणून भाऊंना त्यांनी मनापासून स्वीकारले.
त्यानंतर ताईंनी सर्व नकारात्मक विचार बाजूला ठेवून पुढचे शिक्षण External अभ्यास करून पूर्ण केले, आणि बी.ए. ची पदवी मिळवली. ट्रेनिंग कॉलेजला असताना त्यांना वक्तृत्वासाठी बक्षिसे मिळाली होती. त्यामुळे करिअर म्हणून वकीली करायची किंवा प्रोफेसर व्हायचे हे दोन पर्याय त्यांनी निवडले होते. कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेता, वकील होण्यापेक्षा प्रोफेसर होणे अधिक योग्य होईल असे त्यांनी ठरविले आणि त्यांनी B. Ed. ला ऍडमिशन घेतली. हा पूर्ण वेळ कोर्स असल्यामुळे आठ महिने बिनपगारी रजा घेणे गरजेचे होते. या काळात त्यांनी रात्रशाळेत नोकरी केली. त्या काळात एवढ्या रात्री एकट्या स्त्रिया बाहेर फिरत नसत. श्री. शशिकांत त्यांना घरी नेण्यासाठी शाळेत जात असत.
B.Ed. झाल्यावर 1970 साली त्यांनी इतिहास विषयात M.A केले. 1973 साली त्यांना एस.एन.डी.टी. कॉलेजला संलग्न असणाऱ्या पार्ल्याच्या महिला संघ कॉलेजमध्ये इतिहास विभागात प्राध्यापिकेची नोकरी मिळाली. मधल्या काळात करंदीकर कुटुंब आणि माचवे कुटुंब यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. भाऊंची आई आणि पत्नी ताईंना व त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक सणासमारंभाला अगत्याने घरी बोलवत असत.
गुरुवर्य भाऊ करंदीकर यांनी 1971 साली माघ महिन्यात वार्षिक गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. वर्षाताईना घरच्या जबाबदाऱ्यांमुळे सकाळी सहा वाजता तेथे जाणे शक्य होत नसे पण श्री. शशिकांत हे पारायण चुकवत नसत. पारायण सुरू करताना त्यांनी भाऊंना सर्व प्रकारचा सक्रिय सहभाग दिला. या वार्षिक गुरुचरित्र पारायणाची प्रथा आज भाऊंच्या नंतरही दौलत नगर येथील परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या पादुका- स्थानावर सुरू आहे.
1974 मध्ये गुरुवर्य भाऊ गिरगावामधून बोरिवली येथे राहायला आले. पण जेव्हा जेव्हा ते गिरगावात जात तेव्हा या कुटुंबाला भेट द्यायला विसरत नसत. याच काळात ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व श्री दादामहाराज निंबाळकर यांचाही परिचय झाला. वर्षाताई म्हणतात, " त्यावेळी अध्यात्म या शब्दाचा अर्थही मला माहीत नव्हता पण ईश्वरकृपेने त्या दिशेने वाटचाल चालू झाली होती."
घरात सर्व काही थोडे स्थिरस्थावर होत आहे असे वाटू लागले होते, पण त्याचवेळी ताईंचे सासरे आजारी पडले. आणि श्री शशिकांत यांचे पितृछत्र हरपले. सासुबाईनी जर घर विकले तर आयत्या वेळी चार मुलींना घेऊन कुठे जायचे हा विचार ताईंना अस्वस्थ करू लागला. या भीतीपोटी त्यांनी बोरिवलीला दोन खोल्यांचे लहानसे घर विकत घेतले आणि गिरगावातील मोठ्या घरातून या लहानशा जागेत रहायला आल्या. हे घर त्यांना खूप अपुरे पडत असे, पण नाइलाज होता. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यांच्या मैत्रिणीचा भाऊ - सुभाष काळे - त्यांना रस्त्यात अचानक भेटला. बोलताना कळले, की तो व्यवसायाने बिल्डर होता. नवीन बांधलेल्या इमारतीतील एक प्रशस्त फ्लॅट त्याने त्यांना दाखवला. त्यांचे जुने घर विकण्याची सोयही त्यानेच केली. शिवाय उरलेले पैसे हप्त्याने देण्याची मुभा त्याने वर्षाताईना दिली. अशा रितीने घराचा प्रश्न अगदी अकल्पितपणे सुटला. या घराच्या वास्तुशांतीला स्वतः दादामहाराज निंबाळकर आवर्जून उपस्थित राहिले होते.
१९७५ मध्ये वर्षाताईना एस.एनडी.टी. कॉलेज, चर्चगेट- येथे प्राध्यापिकेची नोकरी मिळाली. पुर्वी त्यांनी इतिहास विषय घेऊन M. A. केले होते. S. N. D. T. मध्ये काम चालू केल्यावर त्यांनी पॉलिटिक्स या विषयात M. A. केले. Exam Superintendent म्हणून जळगाव, औरंगाबाद, अमळनेर येथे काम करण्याची संधी ताईंना या काळात मिळाली. या विभागांमध्ये परीक्षांची सर्व व्यवस्था करण्यापासून ते फायनल रिपोर्टस पूर्ण करेपर्यंतची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असे. यासाठी साधारण एका महिन्याचा कालावधी लागत असे. तेथून मुंबईला आल्यावर इथल्या पेपर चेकिंगचे काम सुरू होत असे. या काळात पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये पेपर. सेटर म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले.
वर्षाताई जेव्हा S N D T मधून निवृत्त झाल्या तेव्हा 'गोखले एज्युकेशन सोसायटी'ने खारघर येथे नवीन शाळा सुरू करण्यासाठी इमारत बांधली होती. याबाबतीतील पूर्वनियोजन करण्याची जबाबदारी डा. गोसावी यांनी वर्षाताईंवर सोपवली होती. हे मोठे काम ताईंनी यशस्वी रित्या पार पाडले. पुढे शाळा सुरू करताना प्राचार्या म्हणून ताईंची नियुक्ती करण्याचे ठरले. पण ही आॅफर कॊटूंबिक कारणास्तव त्यांना स्वीकारता आली नाही.
या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना सामाजिक बांधिलकीही त्यांनी जपली. गोरेगाव - मुंबई. येथे नंदादीप हायस्कूलमध्ये साक्षरता वर्ग चालत असत ताई अनेक वर्षे तेथे विनामूल्य शिकवत असत. शिक्षणासाठी खाल्लेल्या खस्ता वर्षाताई कधीच विसरल्या नाहीत. त्यांच्या घरी काम करणाऱ्या बाईंची मुलगी S.S.C. ला असताना तिला स्वतःच्या घरी ठेवून घेऊन तिचा अभ्यास व्यवस्थित होईल या गोष्टीकडे त्यांनी जातीने लक्ष दिले. त्या मुलीला परीक्षत उत्तम यश मिळाले.
1984 साली बोरिवली येथे ' ॐ सदगुरू प्रतिष्ठान ' च्या वतीने परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींचे पादुका स्थान निर्माण झाले. पण त्याआधी दोन वर्षे जागा शोधण्याचे काम चालू होते. दौलतनगर येथे एक जुना बंगला ' ॐ सद्गुरु प्रतिष्ठान' तर्फे खरेदी केला गेला. त्यानंतर या बंगल्याचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले. यासाठी मोठा फंड गोळा करावा लागला. या सर्व प्रक्रियेत वर्षा- ताईंचा सक्रिय सहभाग होता.
अत्यंत सुंदर आणि प्रसन्न पादुका- स्थान सगळ्यांच्या अथक् मेहनतीने उभे राहिले पण जर हे टिकवायचे असेल तर दैनंदिन व्यवहार आणि आर्थिक व्यवहार यांच्यामध्ये शिस्त राहणे आवश्यक होते. या महत्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवण्याचे महत्वाचे काम वर्षाताईंकडे सोपविण्यात आले. अजूनही प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग असतो.
१९९२ साली गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर यांच्या एकसष्टीच्या निमित्ताने " महिमा गातो गुरु भाऊंचा " ही कॅसेट प्रसिद्ध गायक अजीत कडकडे यांच्या आवाजात प्रसिद्ध झाली. त्या कॅसेटमधील बहुतांश भक्तिरचना वर्षा ताईंच्या आहेत. श्री अजित कडकडे यांच्या मते या कॅसेटची सुरुवात जयघोषाने व्हायला हवी होती. वर्षाताईंनी कॉलेजमधून ट्रेनने घरी येताना सात ते आठ काव्यरचना तयार केल्या. त्यातील एक शब्द रचना " सुख - शांतीचे एकच नाव । नमो गुरवे निळकंठाय॥" ही जयघोष म्हणून म्हणण्यासाठी श्री. अजित कडकडे यांनी निवडली. त्यांनी लिहिलेली 'गुरुराया छत्र कृपेचे धरी ।।" ही आरती १९७३ सालापासून आजतागायत 'ॐ सद्गुरू प्रतिष्ठान'वर म्हटली जाते.
' ॐ सद्गुरु प्रतिष्ठान 'च्या वतीने अध्यात्मिक सहली भारतातील निरनिराळ्या पवित्र क्षेत्रांवर जात असत. या क्षेत्रांतील अनुभवांचे, नामस्मरण सोहळ्याचे आणि इतर कार्यक्रमांचे वर्णन सहलीवरून आल्यावर वर्षाताई लिहून काढत. असत, आणि ते वर्णन अनेक. मासिकांमध्ये प्रसिद्ध होत असे. गुरुवर्य भाऊ महाराज करंदीकर यांचे विचार, समाज प्रबोधन आणि विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी प्रसंगानुरूप वेळोवेळी लिखाण केले आहे.
वर्षाताईंनी अनेक भक्ती- गीते लिहिली आहेत पण मजेची गोष्ट म्हणजे, त्यांची एक लावणीही मधल्या काळात लोकप्रिय झाली होती. त्याचं असं झालं, रोशन सातारकर यांची " येऊ कशी तशी मी नांदायला" ही लावणी ऐकून ;जर हीच मुलगी सासरी जायला उत्सुक असती तर काय म्हणाली असती? असा विचार त्यांच्या मनात आला. आणि " मला बाई जायाचं नांदायला" ही लावणी वर्षाताईंनी लिहिली. त्यांची लावणीसुद्धा रोशन सातारकर यांच्याच आवाजात रेकॉर्ड झाली आहे.
मध्यंतरी टी. व्ही.वर लोकप्रिय ठरलेल्या कॉमेडी एक्सप्रेस या कार्यक्रमाचे निर्माते आणि ' ॐ सद्गुरु प्रतिष्ठान' चे एक विश्वस्त श्री. शशिकांत भालेकर यांच्या सहयोगाने प्रतिष्ठान विषयी आणि तेथील कार्याविषयी माहिती सांगणारी पुस्तिका वर्षाताईंनी 'स्वागत' या नावाने लिहून प्रसिद्ध केली. तसेच वर्षाताईंनी संकलित केलेली गुरुवर्य भाऊ करंदीकर यांची प्रवचने, " आत्मशोध " या पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध झाली. सद्गुरू भाऊमहाराजांनी १० मार्च २००४ मधे देह ठेवला. ते आज आपल्यात नाहीत पण त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवण्याचा मार्ग या "आत्मशोध" च्या रूपाने वर्षाताईंनी सगळ्यांना उपलब्ध करून दिला आहे. तसेच वर्षाताईंनी त्यांच्या ' गोष्ट माझी, न्याय भाऊंचा ' या पुस्तकात भक्तांच्या समस्यांवर भाऊंनी वेळोवेळी सुचवलेले तत्वाधारित पण व्यावहारिक उपाय संकलित करून, गुरुवर्य भाऊंचे विचार आणि आदर्शांचा परिचय भाविकांना करून दिला आहे.
गुरुवर्य भाऊ महाराज ( निळकंठ ) करंदीकर यांच्या जीवनपटाविषयी तसेच त्यांच्या अध्यात्मिक आणि सामाजिक कार्याविषयी विस्तृत माहिती वर्षाताईनी 'चिरायू ' या चरित्राच्या रूपाने आपल्या समोर आणले आहे. विशेष गोष्ट म्हणजे भाऊंच्या कुटूंबाशी अनेक वर्षांचा परिचय असूनही त्यांनी स्वतःचा उल्लेख या पुस्तकात कोठेही केलेला आढळत नाही. वर्षा ताईंच्या ओघवती लेखन शैलीमुळे, प्रांजळ कथनामुळे या पुस्तकाला भाविकांच्या मनात उच्च स्थान प्राप्त झाले आहे.
'चिरायू' चे प्रकाशन तेव्हाचे लोकसभा अध्यक्ष माननीय मनोहर जोशी यांच्या हस्ते शिवाजी मंदिर येथे झाले. या समारंभाला मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू स्नेहलता देशमुख, बँकिंग क्षेत्रातील नामवंत श्री. एकनाथ ठाकूर,'एस. एन. डी. टी.' च्या मराठी विभाग प्रमुख सई देशपांडे इत्यादी नामवंत मंडळी उपस्थित होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवर्य भाऊंना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः ब्रह्मचैतन्य गगनगिरी महाराज या संपूर्ण सोहळ्यांमध्ये उपस्थित होते. हा दिवस म्हणजे वर्षा ताईंच्या जीवनातला अविस्मरणीय दिवस आहे.
आज त्या ऐंशीच्या घरात आहेत पण काम करण्याची जिद्द अजूनही तीच आहे. दौलतनगर येथे स्थानावर आरती नंतर पुढील कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी त्या जेव्हा बोलू लागतात तेव्हा त्यांच्या आवाजात पूर्वीचाच गोडवा आणि खणखणीतपणा जाणवतो. लेखनही पूर्वीप्रमाणे चालू आहे.
स्वतःच्या करिअरसाठी एवढी धडपड करीत असतानाही मुलींकडे पतीकडे आणि घराकडे जराही दुर्लक्ष झालं नाही ही मोठी जमेची बाजू आहे असे त्या मानतात. पडत्या परिस्थितीतही नेहमी सत्कर्मांवर विश्वास ठेवल्यामुळे आणि जीवन सद्गुरुचरणी वाहिल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व इतके प्रसन्न आहे की त्यांच्याविषयी कोणाच्याही मनात आदर निर्माण होतो. आयुष्यात ज्या अडचणी आल्या त्यासाठी कोणाबद्दलही आकस त्यांच्या मनात नाही. त्यामुळेच सर्व नातेवाइकांमधे आणि ' ॐ सद्गुरु प्रतिष्ठान'च्या भक्त परिवारामधे त्या सगळ्यांनाच प्रिय आहेत.
आयुष्यातील अनेक वळणांवर अनेक अडचणींना तोंड देत त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सात वर्षांपूर्वी श्री. शशिकांत माचवे यांचे निधन झाले त्यानंतर घरात त्या एकट्याच राहतात पण अनेक कामांमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतल्यामुळे निराशेचा लहानसा सूरही त्यांच्या बोलण्यात येत नाही. आयुष्यात जे मिळवले त्यावर त्या पूर्ण समाधानी आहेत. अजूनही पूर्वीच्याच उत्साहाने त्या 'ॐ सद्गुरु प्रतिष्ठान'च्या सर्व कामांवर लक्ष ठेवतात, लेखन करतात आणि संन्यस्त वृत्तीने जीवन व्यतीत करतात. त्यांच्याकडून यापुढेही उत्तम कार्य होत राहो ही शुभेच्छा त्यांना देऊया.
***