Kaidi books and stories free download online pdf in Marathi

कैदी

कैदी

कधी-कधी माणसाला आपल्या सामान्य जीवनाची ओळखसुद्धा असामान्य पद्धतीने होते. असं म्हणतात कि सुखाची कदर दुःख भोगल्याशिवाय कळत नाही. असाच एक प्रसंग जो एका माणसाच्या जीवनात, कैदी बनल्यानंतर त्याच्या मनःस्थितित कसा परिवर्तन घडवून आणतो, त्याची ही कथा..!

स्वातंत्र काय असते, त्याचे खरे स्वरूप काय, हे एखाद्या कैद्याला विचारावे. तेव्हां आपल्याला कळते कि आपण ज्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, किती नशीबवान आहोत..! आत आणि बाहेर, हवा, पाणी, पृथ्वी, आभाळ सगळे सारखेच असतात, तरीपण त्याला ग्रहण करणारा कैदी, खूप बेचैन असतो.., असं का बरं..?

किसना, हा असाच एक कैदी असतो, ज्याला विनाकारण तुरुंगात कैद केलेलं असतं. कारण फक्त एवडेच असते कि तो आपली निर्दोषता सिद्ध करण्यात अयश्स्वी ठरतो. सगळे आरोप आणि गवाह त्याला एक गुन्हेगार ठरवीत होते, त्याच्या विरोधात उभे होते. किसना, ज्याचे दोन वेळचे खायचे वांदे होते, स्वतःला निरपराध सिद्ध करण्यासाठी उच्चन्यायालयेत दादसुद्धा मागू शकला नाही..! गरीबाचा कोणीच वाली नसतो. त्याला सामाजीक न्यायव्यवस्थेत विश्वास करावाच लागतो आणि गरीब जर अशिक्षित असेल, तर मग विचारूच नका..! न्यायसुद्धा त्यालाच मिळतो, ज्याच्या खिश्यात दमडी असेल. अहो, पैश्याशिवाय हे काळे कोटवालेसुद्धा मदद करायला तैयार नसतात.

किसना, तुरुंगाच्या चार भिंतीच्या आत आपल्या नशीबावर रडत होता. त्याला सारखी आपल्या बायकोची आठवण येत होती. ती एकटी कशी जगेल..? या जगासोबत कशी एकटी लडा देऊ शकेल.., देव जाणे..! रात्र-रात्र भर त्याला झोप येत नव्हती. भिंतीला पाठ टेकवून तो आपल्या नशीबाला दोष देत बसायचा. रघूदादासोबत त्याचा राडा झाला नसता तर त्याला आज हा दिवस बघायला मिळाला नसता..! रघूदादानी त्याच्या शेतात आपली बैलजोडी मोकाट सोडली आणि त्यांनी किसनाच्या शेतातले संपूर्ण पीकाचे नुकसान केले होते. किसनानी रागाच्या भारात रघूदादाच्या घराला आग लावण्याची धमकी दिली होती..!

हो.., धमकीच तर दिली होती..! मग रघूदादाच्या घरी आग लागली कशी..? किसनाला काही कळेनासा झालं होतं. त्यांनी तर फक्त धमकीच दिली होती..! मग ती आग लावली कोणी..? किसना रात्रंदिवस याच प्रश्नाचा उत्तर शोधीत होता. रात्रभर तो याचाच विचार करायचा. पहाटे चार वाजता, जेव्हां कैद्धांना झोपेतून उठण्याचे बिगूल वाजायचा, तेव्हां तो आपल्या विचारातून बाहेर पडायचा. सकाळचे नित्यकर्म उरकून सगळे कैदी व्यायामासाठी, तुरुंगाच्या प्रांगणात एकत्र ह्वायचे. सायंकाळी खेळ वगैरे होत असायचे. किसना आपल्या साथीदारांसोबत व्हॉलीबॉल खेळायचा. बॉल जेव्हां नेटला लागून वर उसळायची, तेव्हां त्याचे मनसुद्धा बॉलसोबत उसळायचे..! किसनाला त्या बॉलच्या नशीबावर ईर्ष्या होत असायची. स्वतःतर आपल्या जागेहुन हालू शकत नाही आणि आमच्या हाताच्या ताकतीने या चार भिंतीच्या बाहेरचेसुद्धा किती सहजपणे बघू शकतेस..! किसनाचे मनसुद्धा त्या बॉलप्रमाणे वर उसळत होते. या तुरुंगाच्या उँच भिंतीच्या बाहेरचे जग किती सुँदर असेल नाही..! बाहेर रस्त्यावरून जाणारे लोकं, गरीब असो किव्हां श्रीमंत, किती नशीबवान असेल, नाही..! कोणी सायकलवर जात असेल तर कोणी स्कूटरवर. कोणी पायीच आपल्या घरी जात असेल. प्रत्येकाला आपल्या घरी जाण्याची किती घाई असेल, नाही..! म्हणुनच, संध्याकाळी लोकं आपल्या घराकडे कसे पळत सुटतात, जणू कोणी त्यांचा पाठलाग करीत आहे कि काय..! आठ-नऊ वाजता रस्त्यावर इतकी गर्दी होत असते कि तासंतास रांगेत उभे राहावे लागते. सगळ्यांना आपल्या घरी पोहचण्याची किती घाई असते..! कोणी घरी जातांना उद्यासाठी भाजी घेत असतो तर कोणी किराणा..!

किसनालासुद्धा आपल्या घरी जायची घाई झालेली होती. त्याची बायको एकटी असेल, तिच्यासोबत काही बरं-वाईट झाले तर..? आणि मग तीने जीव-बीव दिला तर..? अशे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात गिर्क्या घालीत होते..! त्याला चैन पडेना, असं वाटत होतं कि आता या डोक्याचे तुकडे-तुकडे होतील..! विचारात गुँग किसनाला झाडावर बसलेली एक चिमणी दिसते. ती झाडावरचे फळं खात असते. तीचे खाऊन झाले कि ती फूर्रकन बाहेर उडून जायची. किसनाला तिच्या पँखांचा तिरस्कार वाटू लागला..! ती कधी तुरुंगपरीसरच्या आत तर कधी बाहेर जायची.

“मी सुद्धा चिमणी झालो असतो तर.., फुर्रकन उडून घरी गेलो असतो, आपल्या बायकोला भेटून परत आत आलो नसतो का..?” किसना मनातल्यामनात पुटपुटत होता.

“ऐ किसना, कसला विचार करतोस रे गड्या..?” त्याच्या एका साथीदाराने त्याला विचारले.

किसनाचे मन खेळण्यात लागत नव्हते. तो बगीच्यात पाणी घालण्याचा प्रयत्न करीत होता पण त्याचे लक्ष्य कुठल्याच कामात लागत नव्हते. तो तीथे लागलेल्या फुलांकडे बघून स्वतःचे मन सावरण्याचे प्रयत्न करू लागला. संध्याकाळी जेवतांना, त्याच्या शेजारी बसलेले एक म्हातारे बाबांनी त्याला विचारले, “मी खूप दिवसांपासून बघतोय, तुझे मन येथे रमत नाहीये, काय कारण आहे, सांग मला. बोलण्याने मन हलके होत असते, बोल बेटा बोल..!”

किसनाच्या डोळ्यात पाणी आलं, तो म्हणाला, “बाबा, माझ्यासोबत खूप अन्याय झाले आहे. मला विनाकारण फसवल्या गेले आहे. माझे काहीच गुन्हा नसतांनासुद्धा मला येथे कोंबून ठेवले आहे.., मी काय करू बाबा..?” तो बोक्शाबोक्शी रडायला लागला. बाबा त्याच्या पाठीवरून हाथ फिरवीत होते आणि त्याला शांत व्हायला सांगत होते.

“कोणीही कधी कोणावरही असे खोटे आरोप लावत नसतो किसना...” बाबा म्हणाले, “देवाद्वारे रचलेल्या या जगात, एक पानसुद्धा जागचे हालत नाही, मग आपणतर त्याची सर्वात अनमोल रचना आहोत..! इतकी मोठी चूक तो करूच शकत नाही..! नक्कीच यात काही भेद असायला पाहिजे. अन्यथा तू कैदेत आलाच नसता..! कदाचीत बाहेर असता तर तू एखादा मोठा गुन्हा केला असता..! सबुरीनी घे बाळा.., सगळ नीट होईल..!”

दोन दिवसानंतर कैद्यांच्या सामुहिक विकासासाठी तुरुंगामधे एका नामवंत स्वामीजींचे प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जाते. अश्या प्रकारच्या कार्यक्रमाद्वारे कैद्यांच्या मनात एक सकारात्मक भाव उत्पन्न व्हावे, हाच एकमात्र प्रयोजन असते. त्यात योगा-प्राणायाम शिवाय कथेच्या माध्यमाने कैद्यांचे मन वळविले जाते. सगळी तैयारी झाली असते. तुरुंगाच्या मध्य प्रांगणात एक छानसं सुटसुटीत मंडप टाकला जातो. एकीकडे उँच सुशोभीवंत असा एक व्यासपीठ उभारला जातो. त्यावर एक शुभ्र चादर टाकली जाते आणि सुगंधीत पुष्पांनी त्याला सजविण्यात येते. सगळीकडे एका आनंदाचा, उत्साहाचा वातावरण असतो. प्रत्येक जण आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून मंडपात बसलेले असतात. किसनासुद्धा शेवटच्या रांगेत बसून असतो.

आपल्या वेळेवर स्वामीजी उपस्थित होतात. श्वेत वस्त्रात ते खूप प्रभावशाली वाटतात. डोक्याच्या मध्यभागी चंदनाचा मोठा टिळा लावलेला असतो. एकूण ते तेजस्वी तपस्वीसारखे दिसत होते. किसनाला तर जणू ते परमेश्वराचे अवतारच वाटत होते. त्याला वाटले, ते आपल्याला येथुन सोडवायलाच आले आहेत. अचानक किसना उठला आणि पुढच्या रांगेत येऊन बसला. तो संपुर्णपणे स्वामीजींचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक होता.

रितसर स्वागत वगैरे झाल्यावर स्वामीजी म्हणाले, “आपण सगळे देवांची संतान आहोत, कोणीही त्यांच्यासाठी लहान किंव्हा मोठा नाही, काळा किंव्हा गोरा नाही.., गरीब नाही कि श्रीमंत ही नाही..! आपण सगळे तर आपल्या प्रारब्ध कर्मांमुळे, वेगवेगळ्या योनीत जन्माला येत असतो. कोणी मोठ्या पाटलाच्या घरी तर कोणी एखाद्या गरीबाच्या घरी जन्माला येतो. जगाच्या प्रारंभकाळात आपण सगळे एकसारखेच होतो. मग कालांतराने मनुष्य आपल्या कर्माद्वारे वेगवेगळ्या योनीत जन्म घेऊ लागला आणि कर्माचे फळं भोगू लागला. जर का एकूण कर्म फेडल्या गेले नाही, तर परत या मोह-मायाच्या बंधनात त्याला अडकावे लागतं आणि हे वारंवार हे असेच घडत जाते. परत परत आपण या भूतळावर जन्माला येत असतो. कधी तरी एखादे या चक्राच्या बाहेर उडी मारण्यात यशस्वी होतात आणि महावीर किंव्हा बुद्धत्वाला प्राप्त होतात. क्वचितच कोणी या कालचक्राला तोडण्यात यशस्वी होतो आणि परमहँस, जीसस, पैगंबर किंव्हा ताओ बनतो...! अशे लोकं सहस्राब्दित एखाद्या वेळेला जन्माला येतात. असं का बरं होतो कि या कालचक्राच्या बाहेर पडणारे लोकं फार कमी असतात..? तुम्ही-आम्हीसुद्धा हे कार्य करू शकतात, परंतु असं घडत नाही, कारण आपल्याकडे वेळच नाहीये. आपल्याकडे रोजच्या कामानंतर बोलायलासुद्धा वेळ नसतो, मग देवासाठी वेळ कुठून काढणार.., सांगा बरं..?” इतके बोलून स्वामीजींनी सगळ्यांना एक नजर बघीतले आणि पुढे म्हणाले, “आपण कधी या महान लोकांकडून काही शिकलोच नाही..! किंबहुना प्रयत्नच केला नाही, कोणी योग्य मार्गदर्शण केले नसावे, पण याद राखा प्रयत्न केल्याशिवाय दोन वेळचे जेवणसुद्धा मिळत नाही.., हो कि नाही..? ज्या कामासाठी देवानी आपल्याला मानवजन्माला घातले, नेमके तेच सोडून आपण सगळे कार्य विधीवत करीत असतो, नाही का..? देवानी आपल्याला हा देह कमळासारखे फुलविण्यासाठी दिले आहे. महावीर आणि बुद्ध बनण्यासाठी दिले आहे. आपण हे विसरून भौतिक भोग विलासीतामधे गुँग होवून बसलो आहोत. म्हणुनच सांगतो मित्रांनो, ज्यांनीही तुम्हाला कष्ट दिले असेल, दुःख दिले असेल तर त्याला माफ करा, विसरा त्या गोष्टीला. फरगेट एण्ड फरगीव, हाच एकमेव सुत्र लक्षात असुद्या आणि जे झाले आपले कर्म समझून त्याला इथेच फेडुन टाका..! परत येऊ नका त्याच कामाला..! तुम्हाला येथे कुठल्यातरी गुन्ह्यासाठी ठेवले गेले आहे, तर फक्त एकच काम करा, तो म्हणजे- पश्चाताप..! एकदा का तुमच्या अश्रूनीं तुमचे गुन्हे धुतल्यागेले कि तुमच्या मनाला खूप बरं वाटेल आणि तुमचे इथेले वेळ बघा कसे पटकन निघून जाईल..!” स्वामीजी मौन झाले. प्रत्येकांचे डोळे भरून आले होते. सगळे हुंदके घेत आपले ओझे हलके करीत होते. किसनाला सुद्धा आता बरं वाटत होतं. त्याचे मन आता शांत झाले होते, आता तो आपली सगळी काळजी, देवावर सोडुन उरलेली शिक्षा लौकरात लौकर संपवून आपल्या घरी परत जाणार होता..!

समाप्त.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED