Virangana durgadevi vohra books and stories free download online pdf in Marathi

वीरांगना दुर्गादेवी वोहरा.

वीरांगना दुर्गादेवी वोहरा

अमिता ऐ. साल्वी.

१९३० सालच्या ऑक्टोबर महिन्यातील घटना! सार्जंट टेलर आणि त्याच्या पत्नीवर लॅमिंग्टन रोड पोलिस स्टेशनच्या समोर अचानक् एका मोटारीतून क्रांतिकारकांनी गोळीबार केला. त्या मोटारीमध्ये इतर हल्लेखोरांबरोबर पुरुषाच्या वेशात एक स्त्री बसलेली होती आणि तिनेही पिस्तुलातून गोळीबार केला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी दादर ते अंधेरी परिसरात पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या. पण शोध घेण्यात त्यांना यश आले नाही. ही जिवावर उदार झालेली स्त्री होती दुर्गादेवी वोहरा.

कोण होत्या या दुर्गादेवी? ब्रिटिश राजवटीविषयी एवढा राग का होता त्यांच्या मनात? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल.

दुर्गादेवींचा जन्म अलाहाबाद येथे १९०७ साली झाला. आई-वडिलांचे त्या एकुलते एक अपत्य होत्या. पण त्या लहान असतानाच त्यांची आई देवाघरी गेली. त्या शोकमग्न स्थितीत त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला. त्यानंतर दुर्गादेवींना आत्याने वाढविले. वयाच्या -११ व्या वर्षी त्यांचा विवाह भगवतीचरण वोहरा यांच्याशी झाला. त्यावेळी त्याचे शिक्षण फक्त ५ वी- पर्यंत झालेले होते. पण भगवतीचरण पुढारलेल्या विचारांचे होते. त्यामुळे त्यांच्याबरोबर आणि त्यांच्याच शाळेत दुर्गादेवींनी पुढचे शिक्षण घ्यायला सुरूवात केली लाहोर येथील नॅशनल काॅलेजमधे भगवतीचरण यांची मैत्री भगतसिंग आणि सुखदेव यांच्याशी झाली. लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या नॅशनल काॅलेजमधील विद्यार्थ्यांना भाई परमानंदांसारखा धडाडीचा प्राध्यापक मिळाल्यामुळे ते देशप्रेमाच्या विचारांनी भारावून गेलेले होते. या तीन मित्रांनी 'नॊजवान भारत सभा' ही क्रांतिकारी संघटना स्थापन केली.

गांधीजींच्या निःशस्त्र आंदोलनात जे देशभक्त सहभागी होत होते, त्यांना ब्रिटिश सरकारच्या आदेशावरून पोलीसांकडून जबरदस्त मारहाण केली जात आहे हे पाहून युवकांचा संताप दिवसेदिवस तीव्र होऊ लागला. इंग्रज अंमलदारांकडून राजबंद्यांवर तर अनन्वित अत्याचार होत होते. त्यांना त्यांच्या कृत्याचे प्रायश्चित्त देण्याच्या दृढ निर्धारातून क्रांति संघटना पुन्हा कार्यरत झाल्या. या क्रांतिकारकांमध्ये समन्वय साधता यावा म्हणून सचींद्रनाथ संन्याल यांनी 'हिदुस्तान रिपब्लिकन पार्टी ' ची स्थापना १९२४ मध्ये केली "ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र आणि सुसंघटित उठाव करून हिंदुस्तानात प्रजासत्ताकाची स्थापना करणे " हा मुख्य विचार घेऊन ही संघटना उदयाला आली होती. अनेक क्रांतिकारकानी स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. पण १९२८ च्या सुमारास हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टीचे कार्य मंदावले. कानपूर येथे भगतसिंगांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या बॆठकीत भगतसिंगांच्या आग्रहावरून 'सोशॅलिस्ट' या शब्दाचा अंतर्भाव करून या संघटनेचे पुनरुज्जीवन करण्यात आले. या संघटनेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व काशी येथे संस्कृतच्या अध्ययनासाठी गेलेले शिवराम हरी राजगुरू करत होते, तर पंजाबचे प्रतिनिधित्व भगतसिंग आणि सुखदेव करत होते.

भगवतीचरण श्रीमंत कुटूंबातील होते. त्यांच्या वडिलांना सरकारने 'रायसाहेब' हा किताब दिलेला होता. पण ध्येयवादी भगवतीचरण मात्र मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी शिर तळहातावर घेऊन लढा द्यायला सिद्ध झाले होते. आई ते लहान असतानाच जग सोडून गेली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी पूर्णपणे तन-मन-धनाने स्वतःला क्रांतिकार्यात झोकून दिले. दुर्गादेवींची ओळख भगवतीचरण यांच्यामुळे क्रांतिकारकांशी झाली. सगळे त्यांना आपलेपणाने दुर्गाभाभी म्हणू लागले.

सायमन कमीशनचे आगमन लाहोरमध्ये ३० आॅक्टोबर १९२८ ला झाले. भगतसिंगांनी 'ब्रॅडलाॅ हाॅल' मध्ये सभा घेऊन त्यांच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. 'सायमन कमीशन ' बारा वाजता लाहोरला पोहोचणार होते पण निदर्शक दहा वाजल्यापासूनच स्टेशनजवळ जमू लागले. या निदर्शकांना दूर ठेवण्यासाठी काटेरी तारेचे कुंपण घातले होते. शिवाय लाठीधारी पोलीस सज्ज होतेच.

' निदर्शन शांतपणे पार पडले पाहिजे ' असे आवाहन करण्यासाठी तेथे लाला लजपतराय आणि मदनमोहन मालवीय आलले होते. स्टेशनमध्ये गाडी येताच, " सायमन गो बॅक." या घोषणांनी आसमंत निनादू लागले. लोक घोषणा देण्याव्यतिरिक्त काहीही करत नव्हते. पण स्काॅट आणि साँडर्स या दोन पोलीस अधिका-यांनी लालाजींना लाठीने इतकी अमानुष मारहाण केली; की महिन्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला. याचा सूड म्हणून भगतसिंग सुखदेव आणि राजगुरूंनी स्काॅटला मारायचे असे ठरवले. पण ऎन वेळी स्काॅटच्या ऎवजी साँडर्स मारला गेला. मोटरसायकलवर त्याच्या मागे बसलेला छननसिंग त्यांचा पाठलाग करू लागला. आजादांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि छननसिंग तेथेच मरून पडला. यानंतर गुन्हेगारांना पकडण्यासाठी लाहोरमध्ये जागोजाग पहारे बसवण्यात आले. चॊकशी होऊ लागली. लाहोरमधून बाहेर पडले पाहिजे हे भगतसिंगाच्या लक्षात आले. या कठीण प्रसंगात दुर्गाभाभींनी त्यांची मदत केली.

त्यावेळी भगवतीचरण इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वार्षिक सभेसाठी कलकत्त्याला गेले होते. दुर्गादेवी लाहोरच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षिका होत्या. एके दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू त्यांच्या घरी आले. त्यांनी वेशांतर केले होते. साँडर्सच्या खुनाच्या संदर्भात पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते. भगवतीचरण कलकत्त्याला होते. सर्व निर्णय दुर्गादेवीना घ्यायचे होते. त्यांनी शाळेच्या कामातून काही दिवसांची सुट्टी घेतली. दुर्गादेवीनी या तिघा क्रांतिकारकांना फक्त घरी आसरा दिला नाही ; तर भगतसिंगांना सुखरूप कलकत्त्याला पोहोचवण्यासाठी त्यांच्या पत्नीचे सोंग घेतले. त्यांच्याबरोबर छोटा सचिंद्र असल्यामुळे एक कुटूंब प्रवासाला चालले आहे असेच वाटत होते. सुखदेव सामान उचलणारा हमाल बनले होते. जर सर्व पकडले गेले असते तर फार मोठी शिक्षा होण्याची शक्यता होती, पण यावेळी दुर्गादेवींनी स्वतःबरोबर सचींद्रलाही पणाला लावले होते. तो काळ असा होता की देशासाठी बलिदान देण्यासाठी देशभक्तांची चढाओढ लागली होती. दुर्गादेवींनी भगतसिंगांची पत्नी बनण्याचे नाटक करताना लोकापवादाचीही तमा बाळगली नव्हती. त्यांच्या या साहसामुळे भगतसिंग कलकत्याला सुखरूप पोहोचण्यात यशस्वी झाले.

कलकत्त्यामध्ये भगतसिंगांचा परिचय जतींद्रनाथ दास यांच्याशी झाला. ते बाॅम्ब तयार करण्यात प्रवीण आहेत हे कळले तेव्हा भगतसिंगांनी पार्टीच्या लोकांना बाॅम्ब तयार करण्याचे शिक्षण देण्याची विनंती केली.

काही दिवसांतच भगतसिंग कलकत्त्याहून आग्र्याला गेले. जतींद्रनाथ दास यांनाही आग्र्याला बोलावून घेण्यात आले. जतींद्रनाथ दासांनी त्यांना बाॅम्ब तयार करण्याचे शिक्षण तर दिलेच; पण प्रात्यक्षिकेही दाखविली. लवकरच अनेकजण या कलेत प्रवीण झाले. आग्रा, ग्वाल्हेर आणि लाहोरमध्ये बाॅम्ब तयार करण्याचे कारखाने सुरू करण्यात आले. जर ब्रिटिश सत्तेविरूध्द मोठा उठाव करायचा असेल तर बाॅम्बचा मोठा साठा हाताशी असणे आवश्यक होते. त्यानुसार हे पूर्वनियोजन भगतसिंगांनी केले होते.

हे सळसळत्या रक्ताचे तरूण सरकारला घाबरून फार काळ गप्प बसणारे नव्हते. चंद्रशेखर आझाद यांनी सरकारला हादरा देण्यासाठी केंद्रीय विधिमंडळात बाँब फेकण्याची कल्पना मांडली आणि सगळ्या मित्रांना ही योजना आवडली. आठ एप्रिलला भगतसिंग यांनी वरच्या प्रेक्षकांच्या गॅलरीतून संसदेच्या सभागृहात बाँब फेकला. बटुकेश्वर दत्त यांनी पत्रके खाली टाकली. पण ते दोघे पळून न जाता पोलीसांच्या स्वाधीन झाले. खटला चालू झाल्यावर न्यायालयासमोर क्रांतिकारी चळवळीची बाजू मांडण्याची संधी मिळेल असे भगतसिंगांना वाटत होते , म्हणून काम झाल्यावर अटक करून घ्यायची असे त्यांनी आधीच ठरवले होते.

ते दोघे पकडले गेल्यावर साँडर्सचा वध आणि विधानभवनातील बाँम्बस्फोट या दोन्हींचे धागेदोरे एकाच ठिकाणी गुंतलेले असावेत असा दाट संशय पोलीसांना येऊ लागला. त्या दिशेने तपास सुरू केल्यावर पकडलेल्या लोकांपैकी काहीजण माफीचे साक्षीदार झाले. त्यानंतर दोन्ही कटांचे धागेदोरे जुळवणे पोलिसांना कठीण नव्हते. मधल्या काळात आग्र्यातील काश्मिरी बिल्डिंगमधील बाँम्ब तयार करण्याच्या कारखान्यातून सुखदेव यांनाही अटक करण्यात आली. राजगुरू काशी सोडून पुण्याला रहायला आले. त्यांनाही तिथून अटक करण्यात आली.

८ जानेवारी १९३० या दिवशी विधानसभा बाँबस्फोट खटल्याच्या अपिलाची सुनावणी सुरू झाली १३ जानेवारीला भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांची जन्मठेप - काळ्यापाण्याची शिक्षा कायम केल्याचा निकाल वरच्या कोर्टाने दिला.

यानंतर गांधीजीनी 'यंग इंडिया'मधे ' कल्ट आॅफ द बाँब' हा लेख लिहून सशस्त्र क्रांतीचा धिक्कार केला. त्यांना उत्तर देण्यासाठी 'हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन'च्या वतीने 'बाँम्बचे तत्वज्ञान' या नावाचे परिपत्रक भगवतीचरण यांनी काढले. २६ जानेवारी १९३० या दिवशी हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. या पत्रकाची प्रत गांधींनाही पाठविण्यात आली. महात्मा गांधींचे निःशस्त्र आंदोलन, ब्रिटिश आधिका-यांचे हृदयपरिवर्तन करण्यात कसे अयशस्वी ठरले आहे; हे या पत्रकात उदाहरणे देऊन पटवून दिलेले होते ; तसेच सशस्त्र क्रांतीचा उठाव करणे का आवश्यक होते, हे सुद्धा स्पष्ट केलेले होते. यानंतर महात्मा गांधीनी 'यंग इंडिया'मध्ये आणखी एक लेख लिहिला आणि क्रांतिकारकांच्या बाबतीत आपल्याकडून थोडा अन्याय झाल्याचे मान्य केले.

कानपूर येथील बैठकीत असे ठरले की, भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांची सुटका लाहोरच्या तुरूंगात असतानाच करायची. त्यप्रमाणे भगवतीचरण वोहरा लाहोरला आले. तुरूंगापासून जवळ एक बंगला त्यांनी भाड्याने घेतला. दुर्गादेवींना आणि बहीण सुशीला यांनाही कलकत्त्याहून बोलावून घेतले. लाकडी फर्निचरचे व्यापारी, अशी स्वतःची ऒळख त्यांनी अजूबाजूला करून दिली.

भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना दर रविवारी सेंन्ट्रल जेलमधून 'बोर्स्टल जेल'पाशी आणत असत. तेव्हाच बाँब टाकायचा आणि अफरातफर माजवून त्यांना सोडवायचे नक्की झाले. या हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी भगवतीचरण यांनी घेतली होती. बाँब तेच टाकणार होते. पण प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी बाँबची चाचणी घेणे आवश्यक होते. रावीच्या तीरावरील घनदाट अरण्यात ही चाचणी घेण्याचे ठरले. पण दुर्दैवाने चाचणी घेताना बाँब फेकण्यापूर्वी त्यांच्या हातातच फुटला. भगवतीचरण रक्तबंबाळ झाले. ऐनवेळी वैद्यकीय मदत मिळू शकली नाही. त्यांच्या बरोबर असलेले सुखदेवराज आणि वैशंपायन त्यांना वाचवू शकले नाहीत. वैशंपायन यांनी बंगल्यावर जाऊन हे दुःखद वृत्त कळवले. आझादांनी हंबरडा फोडला, पण दुर्गाभाभी सुन्न होऊन गेल्या होत्या. चार वर्षांचा सचीन्द्रला काय झाले आहे हे कळत नव्हते; तो कावराबावरा झाला होता. कोणाला कळू नये म्हणून खड्डा खणून त्यात प्रेत ढकलून वर माती टाकण्यात आली होती. दुर्गाभाभींना तर त्यांच्या पतींचे अंत्यदर्शनही घेता आले नाही. सर्वजण दुःखावेगात असताना कोणीतरी विचारले,

" भगतसिंग आणि बटुकेश्वर यांना सोडवण्यासाठी ठरवलेल्या योजनेचे काय करायचे?"

"जे ठरले आहे तेच करायचे. त्यांना सोडवून आणायचे." आजाद म्हणाले.

" यावेळी बाँब मी फेकणार. पतीचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. तो माझा अधिकारच आहे. " दुर्गादेवींचे हे उद्गार ऎकून सर्वजण चमकून त्यांच्याकडे पाहू लागले. " या शोकमग्न स्त्रीला एवढे बळ कुठून आले ?" हा प्रश्न प्रत्येकाच्या नजरेत दिसत होता.

आजादांनी त्यांचे मन वळवले. " भूमिगत क्रांतिकारकांना आधार देण्याचे महत्वाचे काम तुम्हीच करू शकता. आणि यासाठी तुम्ही मोकळ्या असणे आवश्यक आहे." त्यांना समजावताना ते पुढे म्हणाले, "मागे भगतसिंगांना सुखरूप कलकत्त्याला सुरक्षित पोचवण्यासाठी तुम्ही त्यांच्या पत्नीचे सोंग घेतले होते. पुन्हा कोणावर असा प्रसंग ओढवला तर तुम्ही कर्तव्यापासून ढळणार. नाहीत याची मला खात्री आहे. तुम्ही आमचा आधार आहात. तुम्ही बाहेरच असायला हवं जेलमधे नाही."

यानंतर जवळ बसलेल्या सुशीला दीदी बाॅम्ब फेकण्यासाठी जाण्याचा आग्रह धरू लागल्या. पण त्यांनाही आजाद यांनी परावृत्त केले. सचींद्रच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ब्रिटिश सत्तेचा पाया उखडून काढण्यासाठी प्रत्येक क्रांतिकारी जिवावर उदार झाला होता; यात दुर्गादेवी आणि सुशीलादीदींसारख्या स्त्रियाही मागे नव्हत्या.

चंद्रशेखर आजाद, विश्वनाथ वैशंपायन, यशपाल, मदनगोपाळ, धन्वंतरी आणि टहलसिंग ठरल्याप्रमाणे मोहिमेवर गेले. पण ऐन वेळी भगतसिंग आणि बटुकेश्वर त्यांच्या गाडीत न बसता पोलिसांच्या गाडीत जाऊन बसले. कुठे आणि काय चुकले हेच आजादांना कळेना. त्यांना हात हलवत परत यावे लागले. बंगल्याच्या दुस-या बाजूला रहाणा-या श्रीपाल नावाच्या सरकारी अधिका-यांना या तरुणांच्या हालचालींचा संशय आला. हे लक्षात आल्यामुळे सगळ्याना घाईघाईत लाहोर सोडावे लागले. पण निघण्यापूर्वी दुर्गादेवींनी अंगावरचे सर्व दागिने आजादाना त्यांच्या पुढील कार्यासाठी मदत म्हणून दिले. आजादांनी ते दागिने घेतले, पण शक्यतोवर त्यांना हात लावायचा नाही असे मनोमन ठरवले.

सुशीलादीदी अजितराम थापर यांच्याकडे रहायला गेल्या. दुर्गाभाभी विश्वनाथ वैशंपायन यांची बहीण बनून अलाहाबादला गेल्या. प्रत्येकाने वेगळा रस्ता धरला. आजाद दिल्लीला गेले; आणि पुढे काय करायचे? पुढील योजनांसाठी पैसे कसे उभे करायचे; यासाठी योजना बनवू लागले. लक्ष्मीनारायण गडोदिया यांच्या दुकानातील गल्ला लुटून त्यामधून स्वतःसाठी काहीही न ठेवता; कानपूरला बाँब बनवण्याचा कारखाना सुरू करण्यासाठी वीरभद्रला सहा हजार , दिल्लीत पिक्रिक अॅसिड बनवण्यासाठी कैलासपतीला चार हजार, पंजाबमधे क्रांतिकारी कार्यक्रम चालू ठेवण्यासाठी काशीरामला दोन हजार, तर भगतसिंग आणि बटुकेश्वर यांना रशियात पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी रामकिशनला एक हजार रुपये दिले.

रामकिशन सीमाप्रांतातून अफगाणिस्तानला पोचला, पण तिथून रशियाकडे जाणारी नदी ओलांडताना बुडून मरण पावला. कानपूरला तयार झालेल्या बाँबच्या धमाक्यांनी मात्र दिल्ली ते लाहोरपर्यंतचा परिसर धडाडू लागला. एवढे करून आजाद स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी अजून पकडल्या न गेलेल्या, पृथ्वीसिंग या गदरच्या उठावातील प्रमुख कार्यकर्त्याशी संपर्क साधला. ते सध्या अलाहाबादलाच होते. भेटीत अजाद पृथ्वीसिंगाना म्हणाले , " मुंबईत क्रांतिकारकांचे एक केंद्र उभारण्याची भगतसिंगांची इच्छा आहे. ही जबाबदारी तुम्ही घ्याल का? " पृथ्वीसिंगांनी ही जबाबदारी स्वीकारली, आणि नानासाहेब या नावाने मुंबईला कांदिवली येथे रहायला आले.

सुखदेवराज आणि विश्वनाथ वैशंपायन हे सुद्धा त्यांना मदत करण्यासाठी मुंबईला आले. धन्वंतरी आणि दुर्गादेवीही लवकरच तिथे आल्या. मुंबईच्या मुक्कामात सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवण्याचे काम दुर्गादेवींकडे होते.

मध्यंतरी पकडल्या गेलेल्या इंद्रपालने भगवतीचरण यांच्या बाँब अपघातात झालेल्या निधनाची महिती आणि त्यांना कुठे पुरले या विषयीची माहिती पोलीसाना दिली. भगवतीचरण यांचा सांगाडा पाहून अब्दुल अजीज या पोलीस अधिका-याला खूप आनंद झाला; हे समजल्यावर अब्दुल अजीजला मारायचे, असे आजादांनी ठरविले. या निर्णयामागे आणखी एक कारण होते; भगतसिंगांना पकडण्यातही या अब्दुल अजीजचा मोठा हात होता. धन्वंतरी आणि विश्वेश्वर यांनी ही जबाबदारी घेतली. त्याच्या मागावर राहून अजीजची मोटर येताच त्यांनी गोळ्या झाडल्या; पण आयत्या वेळी अब्दुल अजीजचा नोकर काय होत आहे, हे पहाण्यासाठी गाडीतून उतरला. त्याच्या शरीरात गोळी शिरली आणि अब्दुल अजीज गाडीची गती वाढवून पळून गेला.

७ ऑक्टोबर १९३० ला साँडर्सच्या हत्येच्या 'लाहोर कट ' खटल्यामधे भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेमुळे संपूर्ण देशात सरकारविरोधात संताप धगधगू लागला.

" या क्रांतिकारकांना शिक्षा दिल्याबद्दल सूड घेतलाच पाहिजे. अन्यथा क्रांतिकारक घाबरून गेले आहेत असा प्रचार सुरू होईल. स्वातंत्र्य मिळेपर्यंत क्रांतिज्योत विझणार नाही ; हे आपण सरकारला दाखवून दिले पाहिजे. " दुर्गादेवी म्हणाल्या. त्यांच्या स्वरात दृढनिश्चय होता.

दुर्गादेवींचे बोलणे सुखदेवराज आणि पृथ्वीसिंग यांना पटले. त्या दोघांमध्ये पुढे काय पाऊल उचलायचे, याविषयी चर्चा झाली. मुंबईचे पोलीस कमिशनर हिली याचा खून करायचे नक्की झाले. यासाठी घेतलेल्या मोटारीतून पृथ्वीसिंग, सुखदेवराज आणि दुर्गादेवी मोहिमेवर निघाले. दुर्गादेवींनी पुरुषाचा वेश घेतला होता. पण कमिशनरच्या बंगल्यातला कडेकोट बंदोबस्त पाहिल्यावर हिलीपर्यंत पोचणे शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आले; आणि त्यांची मोटार सगळ्या पोलीस ठाण्यांवरून चक्कर मारू लागली. आज कुठल्या ना कुठल्या ब्रिटिश पोलीस अधिका-याला यमसदनी धाडायचेच; हा त्यांचा निर्धार होता. सरकारला सतत हादरे देऊन, ब्रिटिश साम्राज्यशाहीचा पाया डळमळीत करणे , हा मुख्य हेतू या सर्व कारवायांच्या मागे होता. आणि त्यासाठी सर्वांनी प्राण पणाला लावले होते.

समोरून मोटार येताना पाहिली, आणि बापटने मोटार थांबवली. समोरच्या मोटारीतून सार्जंट टेलर आणि त्याची बायको उतरली. क्षणार्धात सुखदेवराजनी झाडलेली गोळी टेलरच्या हाताला लागली , तर दुर्गादेवींच्या पिस्तुलातून सुटलेल्या दोन गोळ्या टेलरच्या बायकोच्या पायाला लागल्या . आत बसलेले किंग दांपत्य खाली उतरलेच नाही. बापटने टेलरच्या मोटरीच्या टायरवर गोळी झाडून निकामी केला; त्यामुळे आतून बाहेर आलेल्या पोलीस अधिका-यांना टॅक्सीतून पाठलाग करावा लागला. पृथ्वीसिंग दादरला उतरून बापटच्या मित्राकडे गेले ; तर बापटने सुखदेव आणि दुर्गाभाभींना खारला सोडले. यानंतर पोलीसांना गाडीच्या नंबरवरून तुकाराम शिंदे, या तिच्या मालकाचा शोध लागायला वेळ लागला नाही. शिंदेला पकडताच , त्याने पोलिसांना माहीत असलेले सर्व काही सांगून टाकले. पण क्रांतिकारकां- - पर्यंत पोलिस पोहोचण्यापूर्वीच सगळ्यांनी मुंबई सोडली. सुखदेवराज कानपूरला, पृथ्वीसिंग नवसारीला तर दुर्गादेवी झाशीला जाऊन पोचल्या.

काही दिवसांनी आजाद यांच्या आग्रहाखातर दुर्गादेवी दिल्लीला रहायला गेल्या. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांची फाशीची शिक्षा रद्द व्हावी असे सा-या देशाला वाटत होते. गांधीजी लाॅर्ड आयर्विन यांच्याशी चर्चा करण्यासाठी जेव्हा दिल्लीला आले होते. दुर्गादेवी आणि सुशीलादीदी त्यांना भेटण्यासाठी डाॅ. अन्सारी यांच्या बंगल्यावर गेल्या. भगतसिंगांची फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी गांधीजींनी लाॅर्ड आयर्विन यांना विनंती करावी हा या भेटीचा हेतू होता. पण गांधीजींनी त्यांची ही मागणी मान्य केली नाही, त्यामुळे दोघींना निराश होऊन परतावे लागले.

मुंबईतील हल्ल्यातील संशयित म्हणून दुर्गादेवींना अटक करण्यात आली, ३ वर्षे त्या तुरूंगात होत्या , पण पुरुषाच्या वेषातील स्त्री म्हणजे दुर्गादेवीच होत्या; हे सिद्ध होऊ शकले नाहीत आणि सरकारला त्यांना मुक्त करावे लागले. यानंतर १९३६ साली त्यांनी गजियाबाद येथे प्यारेलाल हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कामाला सुरूवात केली. १९३७ सालच्या दरम्यान क्रांतीची चळवळ थंडावली होती. या काळात स्वतंत्र्यासाठी काहीतरी प्रयत्न करता यावेत म्हणून त्यांनी काँग्रेसतर्फे स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली. दिल्ली काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. १९३८ साली निदर्शने आणि हरताळ यांच्यामध्ये भाग घेतल्याबद्दल त्यांना ८ दिवसांची शिक्षा झाली. १९४० साली दुर्गादेवींनी माँटेसरी स्कूलची स्थापना केली. शिक्षणाशिवाय गरिबांचा सामाजिक स्तर उंचावणार नाही या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात रस न घेता त्यांनी सर्व लक्ष काळात या स्कूलच्या विकासाकडे आणि गरीब मुलांच्या शिक्षणाकडे केंद्रित केले. १९९९ साली देहावसान होईपर्यंत हे कार्य दुर्गादेवींनी चालू ठेवले.

अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे अनुभव लिहून प्रसिद्ध केले . त्यामुळे चळवळीतील त्यांच्या योगदानाविषयी माहिती लोकापर्यंत पोहोचली. दुर्गादेवींनी स्वतःविषयी कधीच काही लिहिले नाही. नेहमी प्रसिद्धी पराङ्मुख राहिल्या. त्यामुळे क्रांतीच्या लढ्यातील त्यांचे कार्य दुर्लक्षित राहिले; पण त्यामुळे त्यांनी वेळोवेळी दाखवलेल्या शॊर्याचे आणि केलेल्या त्यागाचे मूल्य कमी होत नाही. त्यांचा उल्लेख केल्याशिवाय भारतीय क्रांतिसंग्रामाचा इतिहास अपूर्ण राहील. या वीरांगनेला शतशः प्रणाम.

***

संदर्भः सत्तावन ते सत्तेचाळीस ( वि. स. वाळींबे )

google search -1) Prakash Mishra.

15/10/2016

2) Hindustan Times:

Exrpts from book on

Indian Revolutionaries

18/4/2016

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED