काय हो हा चमत्कार...! (विनोदी कथा ) Arun V Deshpande द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

काय हो हा चमत्कार...! (विनोदी कथा )

विनोदी- कथा

------------------------------------------------

काय हो हा चमत्कार ....!

ले- अरुण वि.देशपांडे

----------------------------------------------------------------------

कॉलनीत गजाभाऊ आणि मी आमची घरे आजू-बाजूला , कॉलनीत शेजारी –शेजारी आहोत ,सहाजिकच आमचे गुळपीठ -नाते होते. शेजारी देशाशी मधुर-संबंध असवेत " ही राजनीती आम्हाला अवगत होती , आमच्या घराच्या भिंती पलीकडे -अलीकडे असे चोहीकडून सीमेवर असते तसे तणावपूर्ण वातावरण कधीच नसते. उलट आमची घरे म्हणजे-- आओ-जाव -घर तुम्हारा " असे मुक्त-दळणवळणक्षेत्र “ घोषित केलेला प्रदेश असल्यामुळे , ओळखीचा -आपला माणूस "

हाच आमच्या एरीयात व्हिसा आणि पासपोर्ट होता .कॉलनीतील सर्वांना या सवलतीचा फायदा घेता येत असे.

आयुष्याच्या "सेकंड-इनिंग " मधले आम्ही बहुसंख्य असल्यामुळे .सध्या कॉलनीतील वातावरण .आजोबा-आजीची बाग ", किंवा "नाना- नानी पार्क " असेच झालेले होते.नोकरीतून निवृत्त झालेल्या आम्हा चाकरमानी मंडळींना दिवस फारच मोठा असतो हो ..! कसा वेळ जाणार ?..प्रश्नच आहे बुवा मोठा. आराम तरी किती करायचा ..? असे प्रश्न पडत असायचे. बाहेरच्या ओट्यावर चाललेल्या आमच्या चर्चा -सत्रात मस्त गप्पा चालायच्या

.आमची ही इतकी चांगली अवस्था गृहखात्याच्या नजरेला खुपली मग काय या नंतर

लगेच घरा-घरातून विशेष - अध्यादेश उर्फ वटहुकुम जारी झाले..आणि आमच्या गप्पाना गुंडाळून ठेवीत ..वायफळ -गप्पा "पुरे झाल्या ,घरातली कामा कडे बघायला सुरुवात करा , खाल्लेले -जिरू द्या जरा..! असे सौम्य भाषेतले संदेश गृहखात्याच्या सेवका कडून प्राप्त झाले. याचा परिणाम ..कार्यक्षमतेनुसार घरा-घरातील साफ-सफाई होत असल्याचे जाणवत होते.

गजाभाऊ काय आणि मी काय..आम्ही दोघेही या शिस्तपालन "अध्यादेशाकडे दुर्लक्ष करून वागणे शक्य नव्हते .पडेल ते काम अगदी "पडेल चेहेर्याने करणारे आम्ही "पण आता मात्र असे बिझी झालेले पाहून .तमाम गृहिणी -मंडळ " अतिशय खुश झाले होते

,आणि यापुढे असेच वातावरण कसे कायम ठेवता येईल ? याचे विचार-मंथन - चिंतन - शिबीर " आयोजित करू या " या सूचनेवर एकमत झाले आहे ..एरवी आतून मतभेद असणाऱ्या ग्रुपमध्ये या विषयावर " भक्कम बहुमत झाले आहे ".अशा वार्ता आमच्या कानावर आदळत होत्या.

नोकरीत असतांना ऑफिसला जायची घाई, घरात आल्या बरोबर . --बापरे फार काम होतं आज , थकून गेलोय बाबा ..! चहा टाक बरं ..! अशा ऑर्डर सोडायची सवय अंगात पक्की मुरलेली होती , शनिवार -रविवार खाण्यात आणि लोळण्यात घालवणारे आम्ही , आणि या उलट घर-कामाची सवय असलेले आज्ञाधारक "आमच्यात नव्हते असे नव्हते .

.दोन्हीकडे सारख्याच सफाईने कामाचे ढीग उपसणारे कार्यकुशल मित्र आमच्या ग्रुपमध्ये होते , ते बिचारे त्यांच्यातच इतके बिझी असायचे की ..आमच्या सारख्या आळशी -नि- खादाड लोकांकडे पहाण्यास त्यांना सहसा वेळ मिळत नसे , चुकून एखदा दिवस मोकळा असेल त्यादिवशी ते मनातील खदखद व्यक्त करायचे ..तुम्हाला जमतं गजाभाऊ , काम न करता .खायला मिळते , आम्हाला तर असे स्वप्न सुद्धा पडत नाही कधी...

.गजाभाऊच्या सहवासात राहून राहून मला पण त्यांची सवय लागली असा टोमणा - मलाही ऐकवला जात असे.. अशा वेळी मी खुशाल -. निर्विकार आणि कोरा चेहेरा ठेवून रविवारच्या पेपर मध्ये तोंड खुपसून बसायचो , चहाचा घोट घेतांनाच काय तो माझा चेहेरा बायकोला क्षणभर दिसत असे. आमच्या अशा वागण्याला कंटाळून कधी-मधी गजाभाऊच्या घरात माझ्या नावाचा उद्धार "आणि आमच्या घरात गजभाऊच्या नावाने उद्धार .." असे होत असे...पण आम्ही अशा किरकोळ निषेध -घोषणांना महत्व देत नसुत.

पण आता अशी परिस्थिती नव्हती कारण आता आम्ही नोकरी-विरहीत होतो ..त्यामुळे आमची बाजू बरीचशी कमकुवत झालेली होती. या अगोदर आफिसच्या नावाखाली , कामाच्या नावाखाली ..घरा बाहेर राहून ,घरातली काहीच काम न करणे " आमचे असे वागणे फारसे मनावर घेतले नव्हते मुले लहान होती ,त्या काळात आमचे वागणे धकून गेले ..पण आता .वातावरण पहिल्या सारखे नाहीये,

जरा सुधरा आता तरी..अशी रोख ठोक समजावणी सुरु झाली होती. नोकरी संपल्या नंतर सुद्धा आम्ही होतो तसेच होतो ..आमच्या दिवसभर घरी असण्याने सुद्धा घरातील लोक जरा वैतागलेले आहेत असे जाणवले .

मी लगेच गजाभाऊला भेटलो .. नवीन परिस्थिती त्यांच्या कानावर घालणे गरजेचे होते ..नाही म्हटले तरी ..त्यांच्यामुळे माझा ,आणि माझ्यामुळे त्यांचा रोज रोज सत्कार होऊच लागला होता.मी डिटेल मध्ये त्यांना सांगितले आणि म्हणालो ..गजाभाऊ ..आपण नव्याने नव्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे बरं का .

माझे ऐकून घेतल्यावर गजाभाऊ डोळे मिटून घेत शांत बसले ..घाबरून मी विचारले ..काय हो ..काय झालं एकदम असे गप्प झालात ?

भाऊसाहेब - तुमची सूचना एकदम करेक्ट आहे. आपण काही तरी केले पाहिजे ..घरात टिकून राहून ,सगळ्या सोबत काही तरी श्रम केले पाहिजेल .. त्या शिवाय "नुसते चार घास गिळणारे " ही आपली इमेज बदलणार नाही.!"

गजाभाऊ इतक्या समजुतीच्या शब्दात बोलतील ..याची कल्पनाच नसल्यामुळे ..मला तर हे वाक्य गजाभाऊ बोलताहेत हे खरे वाटले नव्हते .माझे मन भरून आले हे पाहून गजाभाऊ म्हणाले ." .इसे - अपने मन की बात समझो ..! मेरे दोस्त.

मी आनंदाने मान डोलवित म्हणालो ..अपने येणारे दिवस "अच्छे दिन असावेत " हीच माफक इच्छा आहे हो .

भाऊसाहेब - आपण इतके दिवस ज्यांना हसत होतो , माघारी त्यांची टिंगल-टवाळी करीत होतो ..त्या आपल्या "घरेलू -पतिराजांना " अपान शरण जायचे ..आणि न लाजता ..त्याना म्हणयचे ..गुरुमहाराज ..आम्हास आपल्या प्रमाणे ..पत्नी-भक्तपारायण "कसे व्हायचे ? हे शिकवावे .वाटल्यास याचा .स्पीड-कोर्स -शिकवा ...तुम्हीच आता आमच्या जीवनाचे -शिल्पकार व्हावे..

गजाभाऊ -आपल्या या विनवणीचा काही परिणाम होईल असे वाटते का ? उलट .त्यांच्या मनात आपल्या विषयी नक्कीच कटुता असणार ..,किती हसायचो आपण यांना .

भाऊसाहेब - फिकीर करू नका . आपले दोस्त खूप मोठ्या मनाचे आहेत..सतत ऐकून घेण्याची त्यांना सवय असतांना ..आपल्या सारखा त्यांच्याकडे येतोय आणि म्हणतोय आम्हाला गाईड करा " ..खरेच वाटणार नाही त्यांना ,की आपल्या जवळ कुणाला सांगण्या सारखे आहे. उलट त्यांचे ऐकून आपण बदलण्याचे ठरवले आहे " हे ऐकून आपल्या बायका त्यांना दुवा देतांना म्हणतील .. तुमच्यामुळे तरी हे नाठाळ --वठणीवर आले .

लक्षात घ्या भाऊसाहेब - .हा कित्ती मोठा गौरव असणार आहे आपल्या मित्रांचा .गजाभाऊ असे बिनतोड काही तरी बोलतात आणि माझी बोलती बंद होते.

बरं यापुढचा एक्शन -प्लान कसा असणार आहे आपला ? मी माझ्या बाजूने "हम तय्यार है " सांगून टाकले .

ऐका भाऊसाहेब- आता उद्यापासून पुढचा एक महिना ..आपण आपल्या गुणी-मित्रांच्या घरी जाऊन..काही न दाखवता त्यांच्या कार्य-पद्धतीचा बारकाईने अभ्यास करायचा . फारच वाटले तर..वेळ-प्रसंग पाहून मित्राला त्याच्या कामात मदत करुया ..तेव्हढीच त्यांना मदत केल्याचे आपल्याला ट्रेनिंग -कम- समाधान मिळवता येईल .

कार्यानुभव " सर्वात महत्वाचा ..म्हणून प्रत्यक्ष्य "साईटवर- जाऊन आपण काम शिकलो तरच ..आपल्यात थोडाफार चेंज होण्याची अपेक्षा आपणच करू शकुत..अन्यथा ..काय रिझल्ट असेल ? तुम्हाला सांगायची गरज नाहीच म्हणा .

बापरे बाप - गजाभाऊ फारच विचार करून बोलत होते ..म्हणजे ..त्यांच्या मनाच्या ठायी विचार पक्का " झालेला होता ..थोडक्यात आमच्या वहिनींच्या पत्रिकेत "अच्छे दिन-" हा महा-भाग्य योग "असावा तो खरा होण्याची सूचना म्हणावी का ? वैसे तो हमारी दिल्ली अब भी दूर दूर थी..!

ठरल्या प्रमाणे आमचा निरीक्षण -कम - स्वानुभव -कम- कार्यानुभव " प्रोग्राम संपूर्ण झाला . आम्हा दोघांना हे शिकवतांना आमच्या मित्रांना मनापासून आनंद होत होता ." उंट पहाड कि नीचे आया "..असे त्यांना नक्कीच वाटत होते ..पण..बिचारे खरच मोठ्या मनाचे मित्र.. काही आढेवेढे न घेता त्यांनी आम्हाला ..घरकाम -कुशल कारागीर श्रेणीत उत्तीर्ण केले .यात आता शंकेला जागाच नव्हती. या पूर्ण उपक्रमात आम्हाला जी ज्ञान -प्राप्ती झाली ती ..इतर गरजू मित्रांना द्यावी .व सकल करावे ज्ञानीजन " हा उदात्त हेतू आहे.

एक छोटीशी यादी आहे...दस कलमी योजना म्हणा हवं तर-

१. निवृत्ती नंतर ..आपल्या हातातील घड्याळ वापरू नये .. भिंतीवारले घड्याळ आपल्या साठी नसते . कारण या पुढे निर्णय –अधिकारी " तुम्ही नाहीत .यापुढे निर्णय -..घरातील कर्ती-माणसे घेतील.त्या प्रमाणे आपण "वेळेवर तयार होणे "

हाच आपला कार्यक्रम असेल.

२. सकाळच्यावेळी आणि घाईच्या वेळी ..बाहेरच्या हॉल मध्ये सोफ्यावर बसून ..शांतपणे पेपर वाचावा .आंतरराष्ट्रीय-घडामोडीवर लक्ष ठेवावे . घरातील घडामोडीवर लक्ष ठेवू नये.काम नाही केले तरी चालेल पण घरतल्या माणसांची कामे वाढवून ठेवू नये.

३. नातवंडांना खेळवण्यात आनंद मिळत असतो हे अनुभवावे . चिडचिड करून ..आराम गेला आमचा “ .असे रडगाणे गात बसलात तर ..अधिक दुर्लक्षित राहाल.

४. तुमची बायको -आता बायको आणि सासूबाई या डबल रोल मध्ये असते ..सुनेची सासूबाई , आणि जावईबापुसाठी- सासूबाई , त्या साठी आपली भूमिका पूरक असू द्यावी ..नसता दोघांची फजिती .

५. औषधी -गोळ्या ..वेळेवर स्वताच्या हाताने घ्या ..त्याच बरोबर बायकोच्या औषधी -ची ,गोळ्यांची काळजी घेणे , तिला ते वेळेवर देणे हे महत्वाचे .हे करणे म्हणजे दोघांच्या नात्याची नव्याने बांधणी .

६. मुलगा -सुनबाई नोकरीवाले असतात .मार्केटची जबाबदारी आनंदाने पार पाडावी ..ज्या मुळे सगळ्या वस्तू घरात उपलब्ध होऊन .घर भरल्याचा आनंद सर्वांना घेता येईल.

७.मुलं एन्जोय करा म्हणतात त्यावेळी ..जुन्या पद्धती सांगून .हिरमोड न करता .आनंदाने सहभागी होऊन त्यांचा आनंद दुप्पट करा.

८. बायकोने आयुष्यभर खस्ता खाऊन घर सावरलेले असते . तिच्या या कामाचा आदर ठेवून नावे न ठेवता तिच्या कामात मदत केली तर.. जगण्यास नवी उभारी मिळते .

९. इगो " एक स्पीड ब्रेकर आहे ..तो टाळता येतो .त्यामुळे .प्रवास अधिक सुखकर होतो.

१०. आपण असल्याचा सर्वांना आनंद व्हावा " ही सुखद भावना आहे.खडीसाखरेचा खडा व्हावे" अलगद विरघळून जावे.

दोस्त हो-- गजाभाऊ आणि मी ..हे कठीण व्रत पूर्ण करण्याची धडपड करीत आहोत. तुम्हाला वाटले तर हे व्रत जरूर करा .

आनंदास निमंत्रण द्या .

हे परिवर्तन पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल - काय हो हा चमत्कार ..!

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------विनोदी कथा -

काय हो हा चमत्कार ...!

-अरुण वि.देशपांडे -पुणे.

मो- ९८५०१७७३४२