Ti Chan Aatmbhan - 14 books and stories free download online pdf in Marathi

ती चं आत्मभान ... 14

१४. लिटमस..

Mrs. Dipti Methe

अनघाने एक दीर्घ श्वास घेतला. उरात सारा आसमंत भरून घेत नैनितालचा स्वर्ग सोडून मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात जाण्याचा आज तो दिवस होता. तिचा निर्णय ठाम होता. तिला जग पहायचं होतं, स्वतःला आजमवायचं होतं. आय सर्जन म्हणून केवळ नैनिताल सारख्या छोट्याशा शहरात डॉक्टर डॉक्टर खेळ खेळत बसायचा नव्हता. ती निष्णात आय सर्जन होती. आणि हे तिच्यासोबत काम करणाऱ्या साऱ्यांनाच ठाऊक होतं. नर्सेस पासून बाहेरून येणाऱ्या डॉक्टर्स पर्यंत. इतकंच नव्हे तर तिचं कौतुक अगदी फॉरेन कंट्रीज पर्यंत पोहोचलं होतं. बऱ्याच ऑफर्स येऊन गेल्या होत्या. पण तिने नेहमीच साऱ्यांना नकार दिला होता. कधी नैनिताल सारख्या रम्य जागेला सोडून जाण्याचं पटत नव्हतं तर कधी श्रीकांतला सोडून जाणं. काही न काही बहाणे देत ती आलेल्या संधी टाळायची. आणि तिला मागे खेचण्याचं काम श्रीकांतचं प्रेम करतच होतं त्यानेही कधी तिला प्रोत्साहन दिलं नाही. तिच्या करिअरच्या बाबतीत तो काही तितकासा सिरीयस नव्हता. लग्नाला आताशी वर्षंच होत होतं. पुढल्या वर्षी मूल झालं की अनघाचं काम करणं बंद होणार होतं. मग कशी पर्फेक्ट फॅमिली म्हणून चारचौघांत मिरवता येणार होत. असले ऑर्थडॉक्स विचार श्रीकांतचे असले तरी लग्नाआधी तो जर्मनीत शिकायला होता त्यानंतर पेडियाट्रीशियन म्हणून सिडनी, मिशिगन, सिंगापूर असे सगळीकडचे अनुभव गाठीशी बांधून तो भारतात परतला होता. अनघाच्या हुशारीने प्रभावित होऊन तर तो तिच्या प्रेमात पडला होता. दोघं डॉक्टर्स असल्याने घरच्यांनाही हे स्थळ पटलं आणि फारसा विचार न करता दोघं विवाह बंधनात गुंफली गेली. पण श्रीकांतशी लग्न केल्यापासून अनघाची जणू प्रगतीच खुंटली. प्रत्येक गोष्टीचा निर्णय त्याला विचारून घ्यावा लागत होता. प्रेमापोटी तिला देखील ते सारं मान्य होतं. पण खूप विचार केल्यानंतर नेमकं आताच असं काय घडलं की ही अपॉर्च्युनिटी तिला सोडावीशी वाटली नाही. ते काय कारण घडलं हे पहाण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. फार नाही एक चार दिवसांपूर्वी. किंवा आठवड्याभरापूर्वी असावं कदाचित.

दोनदा बेल वाजवून देखील अनघाने दार उघडलं नाही तेव्हा चरफडत श्रीकांतने चावी काढली आणि दरवाजा उघडून आत आला. "हे काय घरात एवढा अंधार..?" - तो स्वतःशीच पुटपुटला. अनघाला हाक मारत आत शिरला तर ती बेडवर बाहेरून आलेल्या कपड्यांत तशीच झोपली होती. तिला तसं पाहताच त्याला राग अनावर झाला. पटापट लाईट्स लावत तो जवळपास डाफरलाच, "अनु..! अनु...!" त्याच्या आवाजाने ती दचकून जागी झाली, "अरे..! तू आलास पण..? किती वाजलेत..?"- ती आळसावली होती तिच्या आवाजात थकवा होता. "ही काय झोपायची वेळ आहे..? तिन्हीसांज होऊन गेली तरी देवाला दिवा नाही. हॉस्पिटल मधून आलीस तरी त्याच कपड्यात अजून तू. कित्ती पेशंट्सना आपण पहातो.ते बॅक्टेरियाज्, ते सारं घाणेरडं वातावरण...आणि तू तशीच...शीट..!" - तो संतापून मोठमोठ्याने बडबडत होता. त्याने लगबगीने बेडवरची चादर खेचायला सुरुवात केली अनघा स्वतःला पुरती सावरू देखील शकत नव्हती पण त्याने तिला ढकलून देत बेडशीट काढून वॉशिंग मशीन मध्ये टाकली. आता आपल्या अंगावरचे कपडे देखील हा फाडून टाकतोय की काय या विचाराने ती दचकली, ह्या साऱ्या प्रकाराने गांगरून गेली. श्रीकांतचा हा चेहरा तिने यापूर्वी कधी पाहिला नव्हता. ती दिडमूढ अवस्थेत तशीच बसून राहिली. श्रीकांतने आंघोळ आटोपली, देवपूजा केली आणि तडक किचनमध्ये जात स्वतःसाठी कॉफी घेऊन तो रागाने हॉलमध्ये बसला. थोड्याचवेळात अनघा भानावर आली फ्रेश झाली. त्याच्याजवळ जात सॉरी देखील म्हणाली पण ,"आज डिनर तरी मिळणार आहे की उपवास घडणार....?" - तो रुक्षपणे बोलत होता.

"श्री...! अरे, सॉरी म्हटलं ना मी. आज तीन तीन ऑपरेशनस् होते शिवाय माझे चर्म्स पण आलेत. फार थकून गेले होते रे कधी डोळा लागला समजलंच नाही." - तिला जाणवलं आपण निदान दिवसभरात एकदा तरी त्याला कॉल करून सांगायला हवं होतं. त्याचं असं रुसणं अधून मधून चालायचं. पण आज तो जरा जास्तच चिडला होता. तिचा कोंडमारा होत होता या साऱ्याने. तिच्या बोलण्याचा त्याच्यावर काहीच परिणाम न झालेला पहाताच ती तिथून उठली आणि किचमध्ये गेली. कुकर चढवला. तासाभरात जेवण झालं. दोघं जेवले पण तिच्याशी एकही शब्द न बोलता श्री आत निघून गेला. सारी कामं आटोपून येई पर्यंत तो झोपला होता. अनघा मात्र रात्रभर विचार करत बसली की अशी काय मोठी चूक तिच्या हातून घडली की त्याचा एवढा राग श्रीला यावा. त्याचे नियम, त्याचं संस्कारांचं भाषण तिच्यासाठी काही नवं नव्हतं. फॉरेनमध्ये राहूनदेखील तो टिपिकल पुरोगामी नवरा होता. झोप येत नसल्याने अनघाने लॅपटॉप उघडला. आणि धडाधड दिवसभर साचलेले मेल्स येऊ लागले. आज मोबाईल कडे देखील पहायला फुरसत मिळाली नव्हती. तिने एकेक मेल्स पहात डिलीट करायला सुरुवात केली. आणि त्यात ही मुंबईतली अपॉर्च्युनिटी अनघाचे लक्ष वेधून गेली. रात्रभर ती विचार करत राहिली. देवाला प्रश्न करत राहिली. देवाशी ती लहानपणापासून बोलायची. आणि तिला पूर्ण खात्री होती की तो तिचे सारे प्रॉब्लेम्स सोडवणार. साऱ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच मिळणार. तीने एकवार संपूर्ण घरावर नजर फिरवली.

"प्रेम म्हणजे हेच असतं का? कुणावर सत्ता गाजवणं..! कित्ती आवडीने आपण हे घर सजवलं होतं. एकेक वस्तू घेतल्या होत्या. पण आज त्या इतक्या परक्या का वाटतात? हे घर मला माझं का वाटत नाहीय..? परमेश्वरा खरंच मी चुकतेय का? मला उत्तर दे...तू नेहमीच मला सुचवत आलायस आजही मार्ग दाखव या नात्याचं ओझं वाहण्यास मी योग्य नसेन तर मुक्त कर मला यातून. माझ्यासाठी काय योग्य आहे ते तूच ठरवं. श्रीला जशी हवी आहे तशी बायको मात्र मी नाही. त्याच्या सुखासाठी जो निर्णय मी घ्यावा असे तुला वाटत असेल तो निर्णय घेण्याची मला ताकद दे..." - मनापासून देवाचे स्मरण करीत अनघा त्या रात्री झोपली खरी पण सकाळी उठताच देवाने आपला कौल दिला होता. अनघा आता द्विधामनःस्थितीत नव्हती. ती ठाम होती आपल्या निर्णयावर. मुंबईतील ती संधी तिने स्वीकारायची ठरवली होती.

आणि आज नैनिताल सोडण्याचा तो दिवस होता. अनघा आयुष्याला एक चान्स दयायला निघाली होती. नवी सुरुवात. पण श्रीकांतला काही हे पटत नव्हतं. "अनु..! तू या डिसीजन वर पस्तावशील. मुंबई तुझ्या सारख्या छोट्या शहरातल्या मामुली डॉक्टर साठी नाहीय."- श्री तिचं करता येईल तेवढं खच्चीकरण करत होता.

"मी मामुली आहे हे ठरवणारा तू कोण, श्री..? लेट मी प्रुव्ह मायसेल्फ."

"करत बस स्वतःला प्रुव्ह. पण परतीचे सारे मार्ग बंद होतील हे लक्षात ठेव."

"डोन्ट वरी, श्री...! तुझ्याकडून दुसरं काय एक्सपेक्ट करणार? मला कल्पना आहे त्याची. गुड बाय.."

ती निघून गेली तरी श्रीकांतने वळून सुद्धा तिच्याकडे पाहिलं नाही. तिच्या लग्नानंतर तिचे वडील वारले असल्याने आई एकटीच राहायची पण तरी तिला नैनिताल सोडून जायचं नव्हतं. मात्र तरीही ती अनघाच्या निर्णयात तिच्या सोबत होती.

मुंबईची मोकळी हवा, तो समुद्र, ते स्वातंत्र्य अनघाला इतकं भावलं की, दिवस रात्र काम आणि नव्या फ्रेंड झोन मध्ये लवकरच ती ऍडजस्ट झाली. तिची खास मैत्री जुळली ती रामेश्वरीशी. तिची रूम पार्टनर. तिच्यासोबत अनघाला जुहूला 'हरे रामा हरे कृष्णा' मंदिरात जायला खूप आवडायचं. तिकडे गेल्यावर रिटायर्ड मिलीटरी ऑफिसर मेजर इंद्रजित सेन भेटायचे. त्यांच्या सोबत आयुष्यावर बोलणं त्यांच्याकडून ज्ञान घेणं तिला स्वस्थ बसू देत नसायचं. ती हळूहळू मुंबईकर होऊ लागली. दरम्यान श्रीकांत कडून अपेक्षित डिव्होर्स पेपर्स आले. आणि अगदी सहजपणे ते दोघं आपापल्या मार्गाने जात वेगळे झाले.

त्यादिवशी 'हरे रामा हरे कृष्णा' मंदिरात तिची ओळख अनुरागशी झाली. वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अनुराग देसाई. यंग,टॉल, हँडसम थोडा सावळा असला तरी त्याचे डोळे विलक्षण आकर्षक होते. रेखीव चेहरा, पिळदार बांधा. पहाताक्षणी अनघा त्याच्याकडे आकृष्ट झाली.

"आवडला...? होतं असं..! लाईफ आहे. आणि त्यात आपलं मन फुलपाखरासारखं, एका ठिकाणी स्वस्थ बसेल तर ते मन कसलं.." - मेजर सेन हसत होते. ते तिच्यामागे कधी आले तिला कळलंच नाही तिचं सारं लक्ष अनुरागवर केंद्रित झालं होतं. अनघा लाजिरवाणी झाली.काय बोलावं तिला कळेना.

"हंम्म...! पुन्हा प्रेमात पडावंस वाटतंय..?"- मेजर मिश्किलपणे बोलले.

"मेजर...! तसं काही नाही. पण...आय रिअली डोन्ट नो..व्हॉट टु से..."

"फार काळ नाही टिकणार. या नात्याला देखील बाय करशील."- ते शांतपणे बोलले आणि तिच्या प्रत्त्युराची वाट न पहाता निघूनही गेले. अनघा कोड्यात पडली की हे असं का म्हणाले..? थोडा रागही आला तिला त्यावेळी.

फ्रेंड्सग्रुप अन अनुरागसोबत वाईल्ड लाईफ फोटोग्राफी साठी अनघाला भारतभर फिरण्याची संधी मिळाली.आपली संस्कृती, बदलत जाणाऱ्या रूढी, परंपरा अगदी जवळून अनुभवायला मिळाल्या. अनुरागशी तिचं मैत्रीचं नात फ्रेंड्समुळेच जुळलं. मुंबईत येऊन दीड दोन वर्षं होत आली. अजून अनघा रामेश्वरी सोबत रूम शेअर करत रेंट देखील शेअर करत होती पण अनुरागशी तिचं ट्युनिंग इतकं खास जमलं की लवकरच ती त्याच्यासोबत रहायला त्याच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. लिव्ह इन रिलेशनशिप. नवरा बायको सारखं एकत्र रहाणं सध्या फॅशन होत चालली होती. नवं वारं वाहू लागलं देहात, मनात अगदी खोल हृदयात. दोघांची जोडी जिथे जाईल तिथे हिट होत होती. लोकांच्या नजरा एकदा तरी वळतील असे कपल. दोघांच्या या प्रेम संबंधाला नऊ महिने होत आले. अनघाने त्याचा फ्लॅट हळूहळू आपल्या परीने सजवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला देखील तिचं प्रत्येक गोष्टीत दखल घेणं आवडायचं पण नंतर अचानक अनुरागला तिचं बॉसिंग, तिची बंधन नकोशी वाटायला लागली.

"अनुराग, डिअर कुठंयस तू..? हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. कुल दिसशील तू या जॅकेट मध्ये."- ती त्याला हाक मारत बोलतच घरात शिरली. तो बाल्कनीत ड्रिंक्स घेत लॅपटॉपवर काम करत होता. अनघाने येताच पाठीमागून त्याला हग केलं आणि ते जॅकेट त्याच्या समोर धरलं. पण शरीरात वीज चमकावी तसा तो दूर झाला.

"गॉड डॅम ईट...! अनु, प्लिज गिव्ह मी सम स्पेस यार. एम फेड अप ऑफ ऑल धीस नॉन सेन्स..."- त्याने ग्लासात अजून थोडी व्होडका घेतली.

"व्हॉट हॅपन ? तू अचानक असं..!!!"

"अचानक नाही. तुझ्याशी खरंतर मी हे आधीच बोलायला हवं होतं. माझंच चुकलं. अनु...! तुझ्या कामात मी कधी तरी लुडबुड केलीय का आजपर्यंत? तू कधी यावस? कुठे जावंस? मी कधीतरी यावर बोललोय का?"

"नो...बट...!"

"नाही ना मग तू का मला बदलवण्याच्या मागे लागली आहेस, का? माझ्या आवडी निवडी, मी काय घालायचं, काय नाही..इव्हन तू घराचं इंटिरिअर सुद्धा बदलून टाकलंस. मला माझ्याच घरात परकेपण आलंय. यु नो..!! मला प्लिज थोडं एकटं सोड, मी तुझ्या पाय पडतो प्लिज...." - तो हात जोडून बोलत होता आणि अनघा रडावं की नाही या संभ्रमात स्तब्ध उभी होती.

अनघा रामेश्वरीकडे पुन्हा शिफ्ट झाली. अनुरागने तिला कॉन्टॅक्ट करण्याचा, पॅच अप करण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. त्याला भेटणं तर दूर पण अनघाने त्याचा एकही कॉल त्यानंतर रिसिव्ह केला नाही. कारण तिला यावेळेस देखील देवाकडून अपेक्षित उत्तर मिळालं होतं. मेजर सेन यांचे शब्द तिला आज आठवले. ते तेंव्हा तसं का म्हणाले असावेत? मनात विचार येताच तिचे पाय मंदिराच्या दिशेने वळले.

"खरं ऐकायचंय तुला..?" - त्यांच्या प्रश्नावर तिने मान डोलावली.

"प्रॉब्लेम्सना घाबरतेस तू. ते फेस करण्यापेक्षा तिथून पळून जाणं तुला इझी वाटत आणि सॉरी टु से...! पण तुझा देव तुला ही भ्याड उत्तर देत नाही. तू तुझ्या मनाचं ऐकतेस आणि जबाबदारी पासून पळ काढतेस."

"असं तुम्ही कसं म्हणू शकता मेजर? लग्न केलं तेव्हा देखील मी प्रयत्न केला होता. तडजोड फक्त मीच का करावी..?"

"निरपेक्ष प्रेम दगडालाही देवत्व देत त्यालाही पाझर फोडू शकत तर आपण केवळ माणसं आहोत सतत चूकत माकत जगणारी."

"तुम्हाला काही कल्पना नाही श्री माझ्याशी कसा वागला होता..?"

"तो कसाही वागू देत. तू कशी वागलीस हे इम्पॉरटंट आहे. तुझं प्रेम होतं ना त्याच्यावर मग त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केलास? स्वतःला एकतरी संधी दिलीस. नाही ना..? पळून आलीस. आणि इथे अनुराग भेटला. मी ओळखतो त्याला. गुड बॉय..! पण प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहे डिअर..! प्रेम हे बेलगाम, बेछूट असावं ते बंधन वाटता कामा नये. मग ते गळफास बनत. शाळेत असताना कसे रुल्स तोडावेसे वाटतात अगदी तसेच. कसलीही अपेक्षा न करता प्रेम केलंस तर रिटर्न तुला अमाप प्रेम मिळेल. पण त्याआधी लाईफ पासून पळणं थांबव. नातं घट्ट करायला शिक. तरच ते टिकेल. शत्रूशी झुंज देताना मी मरण जवळून पाहिलं आहे म्हणूनच आज जीवनाचं, आपल्या माणसाचं मोल मला कळतंय." -

गेले चार महिने ती यावर विचार करत होती ती अंतःर्मुख झाली. "अनुरागशी आपण तसेच वागत होतो जसा श्री तिच्याशी.अशी चूक कशी घडली आपल्या हातून..? अनुरागच चुकलं नाही. आपलंच चुकतंय. कुणाच्याच प्रेमाला मी पात्र नाही. कदाचित प्रेम माझ्या नशिबातच नसावं." पण अनुरागकडे परतण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. आता मुंबईत तिचं मन लागेनासं झालं. हॉस्पिटलकडून चार निष्णात डॉक्टर्सना दुबईला पाठवण्यात येणार होतं. अनघाने कसंबसं त्या लिस्टमध्ये स्वतःला फिट केलं. यावेळी देवाकडून कौल न मागता तिचा आयुष्याचा प्रवास दुबईला निघाला एका नव्या अनुभवासाठी.

दुबईतले नियम समजणं तसं फार कठीण जात होतं तिला पण पर्याय नव्हता. परतीचे मार्ग बंद करून आपण अनोळखी प्रवासाला निघालो आहोत याची तिला पूर्णपणे जाण होती. दुबईतच अनघाने स्वतःला बिझी ठेवण्यासाठी एक एन.जी.ओ. जॉईन केली. गरिबांना, गरजूंना मोफत डॉक्टरी सेवा देणारी ती संस्था विश्व पातळीवर कार्यरत होती. तिथेच काम करताना त्या संध्याकाळी तिला बातमी समजली की, कंबोडियातील नक्सली अटॅकर्सनी अचानक केलेल्या हल्ल्यात बरेच नागरिक घायाळ झाले आहेत. तिथले जन जीवन त्यांनी इतके विस्कळीत केले आहे की लोक जीवाच्या भीतीने सरकारी रुग्णालयात शरणागत झाले आहेत. पण मुबलक औषध पुरवठा आणि डॉक्टर्स नसल्याने कैकजणांना आपला जीव गमवावा लागत आहे. एन.जी.ओ. कडून तिथे जाऊन त्यांना मदत करू इच्छिणाऱ्या डॉक्टर्सना स्वच्छेने जाण्यास सुचविताच अनघाने क्षणाचाही विलंब न करता आपली स्वीकृती दर्शविली. तसं पण जगण्यातला तिचा इंटरेस्ट आता पूर्णपणे गेला होता. निदान समाजासाठी आपण काही देऊ शकलो तर ह्या जगण्याला काहीतरी अर्थ येईल. कुणासाठी तरी आपण उपयोगी पडू. हा विचार तिच्या मनात चमकला.

जगभरातून डॉक्टर्सची टीम कंबोडियात आली होती. तिथल्या मिलिटरी फोर्सच्या पहाऱ्यात हॉस्पिटलला जणू छावणीचे रूप आले होते. वेदनांचा कोलाहल माजला होता. तिथे पोहोचताच सारे क्षणभरही विश्रांती न घेता कामाला लागले. अनघाने स्वतःला झोकून दिलं होतं. त्याही धावपळीत कुणाची तरी नजर सतत तिचा पाठलाग करत होती. न्यूरॉलॉजिस्ट डॉ.विशाल. अनघाला हे कळत नव्हतं असं नाही पण आता तिला कोणत्याही रिलेशनशिप मध्ये गुंतायचं नव्हतं. ती फ्रेंडली सगळ्यांशी बोलायची अगदी विशालशी सुद्धा पण ती फिलिंग आता काहिकेल्या येत नव्हती. त्यापेक्षा तिथल्या लहान मुलांमध्ये ती रमून गेली. आठवडा कसा गेला ते कळलंच नाही.

आणि एका दिवशी नक्सली अटकर्सनी हॉस्पिटलवर हल्ला केला तेही फॉरेनर डॉक्टर्सना ओलीस ठेऊन त्यांच्या सरकारकडून खंडणी वसुलण्यासाठी. मिलिटरी फोर्स अलर्ट होतीच. दोन्हीकडून तुफान फायरिंग होत होते. जीवन मरणातली ही लढाई सारेच आपापल्या परिने लढत होते. अनघा लहान मुलांना चपळाईने सेफ ठिकाणी नेत होती आणि विशाल त्यांना मदत करत एकार्थी अनघाला वाचवत होता. अखेर साऱ्यांना वाचवताना एका बेसावध क्षणी अनघा एका नक्सल्याच्या हाती लागली. तिला गनपॉईंट वर पाहून विशालला रहावलं नाही.

"टेक मी...लिव्ह हर..!"- विशाल हात वर करत सामोरा गेला. त्याला पाहून अनघा थक्क झाली.

"विशाल...काय करतोयस तू हे...? जा इथुन. मी तुझंच काय पण कोणाचंही प्रेम नाही डिझर्व्ह करत."

"हे तू नाही ठरवायचं.." - विशाल ठाम होता.

अखेर नक्सली तिला खेचत नेताना अडखळतो आणि ही संधी साधत जिवाची फिकीर न करता विशाल त्याच्यावर हल्ला करतो. एव्हाना दोघांमध्ये झडप सुरू झाली होती. पण त्याच्यासमोर विशालची ताकद कमी पडत होती. एक डॉक्टरला जीव वाचवणं माहीत असतं जीव घेणं त्याला कसं ठाऊक असणार ? विशालवर चाकूने बरेच वार होत होते तरीही तो झुंज देत होता. सुदैवाने अनघाच्या हाती त्या नक्सली ची गन लागते आणि विलंब न करता ती त्याच्या दिशेने फायर करते. तो नक्सली जमिनीवर कोसळतो. विशालच्या जवळ जाताना अनघाचे पाय थोडे अडखळतात पण ती पुढे होत त्याला सावरते. बरेच ब्लिडिंग झाल्याने विशाल घायाळ होत बेशुध्द होतो. अनघाचा हात मात्र त्याने घट्ट पकडून ठेवल्याने यावेळी मात्र ती तो हात सोडवून पळून न जाता आयुष्य फेस करण्याचं ठरवते. मेजर सेन यांचे बोलणे तिला आठवते,- " प्रेम ही नियमात करण्याची, तोलून मापून करण्याची गोष्ट नाही. तो एक अनुभव आहे. एक सुखद संवेदना. आयुष्यात जीव लावणारे बरेच भेटतील पण तुझ्यासाठी कोणी जीव देणारा भेटला तर त्याचा हात सोडू नकोस...!"

यावेळी देखील देवाकडे कोणताही कौल न मागता अनघा देवाने लिहिलेल्या स्क्रिप्ट नुसार जगायचं ठरवते. केवळ आठवड्याभराच्या ओळखीत आपल्यासाठी मरायला तयार असणाऱ्या विशालचे प्रेम स्वीकारण्याचा ती निर्णय घेते. यावेळेस अनघाच्या मनातला लिटमस रंग बदलत नाही. तिला न्यूट्रल वे सापडतो. विशाल आणि अनघाला घेऊन हेलिकॉप्टर हवेत भराऱ्या घेत दिसेनासे होते.

Mrs. Dipti Methe

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED