Parsu ek anaam Krantikari books and stories free download online pdf in Marathi

परसू एक अनाम क्रांतिकारक

परसू : एक अनाम क्रांतिकारक

आपल्या मातृभूमीसाठी लढलेल्या अनेक शूर वीरांची गोडवी गाताना अंगावर एक रोमांच उभा राहतो.आपले कर्तव्य बजावताना वेळप्रसंगी प्राणाची आहुती देण्या-या वीर जवानांच्या,देशभक्तांच्या समोर नेहमीच आदराने मान झुकते.इतिहासातील अनेक सुवर्ण पटले या अश्याच पराक्रमी, थोर, वीरांच्या पराक्रमांनी भरलेली आहेत.पण काही नावे तर अशीही आहेत, जी या सगळ्यांच्या पाठीमागे कुठेतरी नकळत लपूनच राहिली.ना कधी त्यांची आठवण काढण्यात आली ना त्यांचे नाव कोणत्या पानावर विराजमान झाले.ते अनामच जगत राहिले अगदी शेवटच्या श्वासापर्यंत.
या अनाम क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याची अक्षरशः होळी केली होती.त्यांनी आख्खे आयुष्य पणाला लावले.हे असे अनाम क्रांतिकारक पाठीशी होते म्हणून तर लढायला पुढे असणा-या त्यांच्या नेत्यांच्या हातात दहा हत्तीचे बळ यायचे, लढण्यासाठी सज्ज होताना आपल्या पाठीमागे सावलीसारखे असंख्य खंबीर हात आहेत याची त्यांना खात्री होती म्हणून तर ते धैर्याने सगळ्या संकटांना सामोरे गेले.पण हे असे अनेक अनाम लढवय्ये नेहमीच पडद्याच्या मागे राहिले.ते कधीच समोर आले नाहीत म्हणून तर जगाला त्यांची नावे कळालीच नाहीत.त्यांचा कधी गौरव करताच आला नाही ज्या गौरवाचे ते खरे हक्कदार होते.

तर आज अशाच एका अनाम क्रांतिकारकाची ओळख मला जगाला करून द्यायची आहे.आणि त्या क्रांतिकारकाचे नाव आहे परसू सुतार.. एक अनाम कांतिकारक. हीच फक्त एक ओळख नाही तर त्यांच्या विषयी जाणून घेताना अनेक पटले उघडत जाऊन आपोआपच त्यांची एक आगळी वेगळी ओळख आपल्याला पटू लागेल.

परसू सुतार यांचे पूर्ण नाव परसू नारायण सुतार.कोल्हापूरच्या पावन भूमीत परसू यांचा जन्म २१ जून १८८० रोजी नारायण सुतार यांच्या घरी झाला.नारायण सुतार हे शाहू महाराजांच्या खास दरबारातले, म्हणजे शाहूंच्या आवडीचा विषय असणा-या कुस्तीमधील ते एक वस्ताद होते.महाराजांच्या खास मर्जीतले.अगदी त्यांच्या वाड्यात देखील त्यांचा सहज वावर असायचा.ना-या वस्ताद हे नाव तसे सगळ्यांच्याच परिचयाचे कारण कुस्ती मधील अफाट ज्ञान नारायण सुतार यांना होते.कोल्हापुरातील भवानी मंडपानजीक असणा-या मोतीबाग मैदानात ते कुस्ती शिकवायचे.अगदी गोळीबंद पैलवान, मल्ल तयार करायचे.एक वेगळा रूबाब होता नारायण वस्ताद यांचा.आणि त्यांच्या याच गुणांमुळे त्यांनी शाहू महाराजांची मर्जी संपादन केली होती.

ते जसे कुस्तीत पारंगत होते ,तसेच ते सुतार कामात देखील तरबेज होते.तालमीत जाऊन आल्यानंतर किंवा तालमीच्या अगोदर ते सुतारकाम करायचे.पिढीजात वारसाने मिळालेला सुतारकीचा गुण त्यांच्या अंगी अगदी ठासून भरला होता,म्हणून तर पैलवानकी शिकवत सुतारकाम करून संसाराचा वेल नीट फुलत चालला होता.परसू यांच्या पाठीवर त्यांना चंदा आणि सरू या आणखीन दोन बहिणी होत्या.त्यांच्या बहीणींना कधी शाळेत जाणे जमले नाही पण परसू यांनी शाळेची पायरी चढली.परसू शिक्षणाचा एक एक टप्पा पार करत राहिले तशी इकडे नारायण उस्ताद यांची छाती गर्वाने फुलू लागली.उभ्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबातील कुणी एकानेही शाळेची पायरी कधी चढली नव्हती.

परसू यांना तालमीत जायला जसे आवडायचे तसे त्यांना वाचन करायलाही फार आवडायचे.आणि आपल्या अवती भवतीचे जग जाणून घेण्याच्या ध्यासामुळे वाचन प्रक्रिया प्रचंड वाढत राहिली.संस्काराची मुळे रुजविणारे हेच तर पर्व होते.आणि या योग्य त्या वयात योग्य ती पुस्तके हाती आल्यामुळे त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली.वाचन प्रक्रियेतील पहिले पुस्तक ज्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला ते म्हणजे १८४४ साली कोल्हापुरातील गडका-यांच्या बंडावर लिहिलेले पुस्तक.ते पुस्तक वाचत असता गडक-यांच्या बंडाची पराक्रमाची गाथा वाचून एक खुमखुमी त्यांच्यामध्ये निर्माण झाली.इंग्रजांचा प्रचंड राग उरात धुमसत असता या पुस्तकाच्या वाचनाने परसू भारावून गेले.

जसे जसे त्यांचे वय वाढत होते, तशी वाचनाची आवड देखील वाढीस लागली.आणि त्याचमुळे जिथे संधी मिळेल तिथे त्यांचे वाचन चालू झाले.कधी वर्तमानपत्र तर कधी साप्ताहिके, मासिके ते चाळू लागले.याचा एक फायदा झाला आणि तो म्हणजे त्यांच्या जाणीवा समृद्ध होऊ लागल्या.सामाजिक, राजकीय परिस्थितीचे भान त्यांना यायला लागले.शाळांमध्ये हळूहळू चालू झालेल्या जोर-जोडी,मल्लखांब, कसरत या सगळ्यांमुळे अंगात एक जरब निर्माण होत होती.शारीरिक क्षमता जशी वाढीस लागली होती तशी बौद्धिक क्षमताही वाढली होती.इंग्रजांचा अमानुष अत्याचाराला लढा देण्याचे स्वप्न उरी जन्म घेऊ लागले होते.अन्याय सहन करायचा नाही हा निर्धार पक्का होत चालला होता.वाचन करताना ते समरसून जात, अनेक वेळा रंकाळा तलावाचा शांत, निर्मळ परिसर त्यांना या वाचनासाठी भुरळ घालायचा.तासनतास तिथेच त्यांचे वाचन चालू असायचे.

कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात अनेक हालचाली, उलथापालथ चालली होती.कोल्हापूर हळूहळू इंग्रजांच्या ताब्यात जायला लागले होते.या सगळ्या घडामोडीनंतर शाहू महाराजांच्या रूपाने कोल्हापूरला एक नवा प्रतिनिधी मिळाला.हे जरी इंग्रजांच्या संमतीने झाले असले तरी ब्रिटीशांच्या मनात एक वेगळाच मनसुबा होता.पण जनसामान्यात ग्रीन साहेबांमुळे झालेल्या चौथ्या शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे दुःख होतेच.पण ते उघड उघड आपला राग व्यक्त करू शकत नव्हते.परसूच्या मनातही ही खदखद होतीच.

याच काळात परसू यांना एक समविचारी मित्र भेटला, ज्याचे नाव दामोदर जोशी.बेळगावातील दामू एक कर्तबगार, धाडसी,करारी लढवय्या होता.क्रांतीच्या आगीने पेटलेला दामू मुळातच अत्यंत हुशार होताच.त्याच्या सोबत बराच काळ परसूचा व्यतीत व्हायला लागला होता.त्यांच्यात अनेक चर्चा विनिमय व्हायचे.दामूच्या भाषणांनी परसूला भारावून जायला व्हायचे.याच काळात टिळकांच्या ‘केसरी’ने एक वेगळेच गारूड या सगळ्यां मुलांवर केले होते.टिळकांना आपल्या आदर्श स्थानी ठेऊन अनेक समविचारी, देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी बाळगणारे तरुण एकत्र येऊ लागले.
इंग्रजांच्या अमानुष अत्याचारांनी देश पोळून निघत होता, आणि यामुळेच व्यथित झालेल्या दामूंच्या मनात आपणही बंदूक, पिस्तूलीचा वापर करावा आणि गो-यांना संपवून टाकावे मग भलेही तेंव्हा प्राण गेले तरी चालतील, असा विचार वारंवार येऊ लागला.घरात एक क्षणही थांबावे असे त्यांना वाटायचे नाही.स्कॉलरशिपचा अभ्यास करून ती मिळवण्याचा ध्यास होता.आपल्यासारखेच ते आपल्या साथीदारांना सुद्धा प्रेरित करू लागले.त्यावेळी देशात वेगवेगळ्या रितीने लढा पुकारला जात होता.तीन प्रवाह निर्माण झाले होते.पहिला प्रवाह म्हणजे ज्यांचा इंग्रजांच्या न्यायप्रियतेवर विश्वास होता आणि ते समाज सुधारकांच्या भूमिकेतून न्याय मिळवू पाहत होते.
दुसरा प्रवाह म्हणजे सभा-संमेलन भरवून,वृत्तपत्रे आणि लोकशिक्षण या माध्यमातून लोकांना जागृत करणे.कारण न्यायप्रिय इंग्रजांना प्लेग-दुष्काळ या सारख्या घटना हाताळता न आल्यामुळे सामान्य जनतेचा जीव जात होता,मग कोणत्या न्यायप्रियतेवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न पडला होता.टिळकांनी यासाठीच जहाल मार्ग पत्करला होता.
आणि यातील तिस-या प्रवाहातील लोकांनी सशत्र क्रांतीवर विश्वास ठेऊन आपला लढा चालू ठेवला.कारण बाकी मार्गांनी यश मिळवण्यासाठी खूप कालावधी निघून जाणार होता,आणि त्यामध्ये गोर-गरीब जनताच भरडली जाणार होती.त्यामुळे गुप्त संघटना स्थापन करणे,कट करणे असे प्रयत्न होऊ लागले.मग त्यासाठी शस्त्रास्त्र ,दारूगोळा यांची जमवा-जमव होऊ लागली.पूर्वजांकडून मिळालेली कोल्हापूरची क्रांतीची परंपरा अजूनही पेटती राहिली होती.छत्रपती बाबासाहेबांचे धाकटे बंधू चिमासाहेब,साता-याचे रंगोजी बापू गुप्ते यांनी उठाव केले.१८४४ साली गडक-यांचे बंड झाले.सतत होणा-या बंड आणि उठावामुळे इंग्रज हैराण झाले होते.

वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांतीचा झेंडा फडकवला,कोल्हापुरातील शिवाजी क्लबचे अनेक तरुण या सगळ्यांनी भारावून गेले.शिवाजी क्लबमधील सदस्यांची संख्या वाढू लागली.पण नेमके त्याचवेळी भारतात मोठा दुष्काळ पडला.लोकांचे हाल होऊ लागले.शाहू महाराजांनी कोल्हापुरात धान्याचे वाटप चालू केले,रंगून मधून पहिल्यांदा लाल तांदूळ आणला गेला.भरीस भर म्हणून की काय प्लेगच्या साथीने डोके वर काढले.अगदी कोल्हापूर पर्यंत ही साथ पसरली.या सगळ्यांमुळे परसू सारखे क्लबचे बाकी तरुण देखील अस्वस्थ होऊ लागले.पुण्यात तर यापेक्षा भीषण परिस्थिती होती.लोकांना अमानुष वागणूक दिली जात होती आणि याचाच भडका उडाला.चाफेकर बंधूनी या जुलमाचा बदला घ्यायचे ठरविले आणि प्लेग कमिशनर रँड आणि आयर्स्ट यांची हत्या करण्यात आली.

इकडे शिवाजी क्लबच्या तरुणांमध्ये क्रांतीची मशाल पेटलेली होतीच.पिस्तूल ने-आण करणे, शस्त्रास्त्र पुरविणे यासाठी परसू, दामू हे सगळी मंडळी कोणतीही जोखीम उचलण्यास तयार होते.पोलीसांची नजर चुकवून पुस्तक कोरून पिस्तुले,काडतुसे,रिव्हॉल्वर आणणे शक्य होत होते.दामूला ब-याच वेळा शस्त्रास्त्र बाळगल्या प्रकरणी धरपकड होऊ लागली होती.क्लबचे प्रमुख उद्दिष्ट आता ब्रिटीशांची सत्ता उधळून लावणे आणि शिवछत्रपतींचे वारस असणा-या शाहूंचे राज्य निर्माण करणे हे होते.या शिवाजी क्लबला छत्रपती शाहू महाराजांचा फार मोठा पाठिंबा होता.या सर्व गोष्टींना लोकमान्य टिळक आणि शाहूंचे छुपे आतून सहकार्य मिळत असल्याने क्रांतीच्या वेडाने भारावलेल्या या तरुणांना स्फुरण चढलेले.

सरावासाठी घोडे,बंदुका, हत्यारे मिळत होतीच पण सशस्त्र क्रांतीसाठी, स्वातंत्र्याच्या उठावासाठी पैशाची गरज होती.त्यासाठी काय करायचे या विचारातून दरोडे घालण्यास सुरुवात झाली.आणि तसेही शिवाजी महाराजांना इंग्रज लुटारू,दरोडेखोर असेच म्हणून हिणवले होते.भारतात स्वराज्य आणायचेच या ध्येयाने या परसू सारख्या तरुणांना पछाडले होते.मग श्रीमंतांच्या घरावर दरोडे पडू लागले.याच काळात दरोड्यातून मिळालेल्या पैश्यांमधून काडतुसे,रिव्हॉल्वर वगैरे आणण्याची जबाबदरी परसू ,दामू आणि प्रसादे यांच्यावर आली.अशी जीवावर बेतणारी कामे करताना परसू यांना स्वतःचाच अभिमान वाटायचा.

पण आता परसू यांच्या घरापर्यंत ते दरोडेखोर असल्याचे माहिती जाऊन पोहचली होती.लोक त्यांच्याकडे ,घरच्यांकडे तुच्छतेने पाहू लागले.पण परसू यांना काहीही फरक पडत नव्हता कारण ते आता ‘क्रांतीच्या वेडानं भारलेलं झाड’ झाले होते.आता कोल्हापुरातील कटाची माहिती,वेगवेगळ्या घडामोडींची बातमी लोकमान्यांपर्यंत पोहचविण्याची महत्त्वाची कामे परसू यांच्याकडे होती.शिवाय बेलूर मठात असणा-या हणमंतराव कुलकर्णी-मुर्कीबावीकर यांना बातम्या पुरविण्याचे कामही परसू यांच्याकडेच होते.इकडे दरोडेखोराची बायको असे सारखे हिणवले गेल्याने, लोकनिंदेला घाबरून त्यांच्या पत्नीने म्हणजे मंदा यांनी काडीमोड घेतली.पण परसू यांना आता सांसारिक मोह राहिलाच नव्हता.

लोकमान्यांच्या प्रयत्नाने ब्रिटीश सरकार उलथावून लावण्यासाठी नेपाळला बंदुकीचा कारखाना काढण्यासाठी लो. टिळक आणि त्यांचे सोबती गेले होते.या सगळ्या बातम्या शिवाजी क्लबला कळत राहायच्या.आता क्लबमधील सा-यांचे लक्ष अतिशय महत्त्वपूर्ण अश्या या गोष्टीकडे लागले होते.क्रांतिकारकांनी अशी भव्य-दिव्य कामगिरी करत बंदुकीचा कारखाना काढणे ही फार मोठी गोष्ट होती, त्यामुळे साहजिकच परसू अतिशय प्रभावित झाले होते.कारखान्याच्या या कामासाठी शाहूसारखे ब-याच जणांनी आतून पैशाची फार मोठी रक्कम देऊ केली होती.कारखान्याचे काम पूर्णत्वास येण्या अगोदर जर्मनीहून मशीनरी यायला पाच वर्षाचा कालावधी लागेल असे कळले आणि एवढा वेळ थांबणे शक्य नसल्याने क्रांतीचा हा मोठा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.

याच काळात कोल्हापूरमध्ये ‘वेदोक्त अधिकार’ या मुद्दयांवर ब्राम्हण-मराठे संघर्ष पेटून उठला.वणवा पेटू लागला.खरे तर असे आपापसात लढण्यापेक्षा एकजुटीने स्वातंत्र्यासाठी लढणे गरजेचे होते म्हणूनच परसू नाराज झाले होते.पण यामुळे परममित्र असणा-या परसू सुतार आणि दामू जोशी यांना कोणताच फरक पडला नाही.शिवाजी क्लब बंद होता पण राजकीय सामाजिक चर्चा चालू होत्याच.टिळकांचा ‘केसरी’, शिवराम परांजप्यांचा ‘काळ’, दामल्यांचे ‘स्वराज्य’, मोडकांचे ‘राष्ट्रमत’. फडक्यांचा ‘हिंदू पंच’, अरविंदबाबूंचे ‘वंदेमातरम्’ या वर्तमानपत्रांतून देशप्रेम जागविणारे,प्रेरणा-स्फूर्ती देणारे लिखाण येऊ लागले.तरुणांच्या मनात या मधील लेख पाहून संताप पेट घेऊ लागला.व्याख्याने,संमेलने भरू लागली आणि त्या सभांना तरुणांचा वाढता सहभाग पाहून सरकारचे धाबे दणाणले.यावर बंदी आणली जाऊ लागली.तरीही सावरकरांचे पोवाडे तरुणांची मने भारून टाकू लागले.

काही कारणांमुळे शाहू महाराज आणि लो.टिळकांच्यामध्ये कटुता निर्माण झाली.ज्याचा परिणाम म्हणून की काय पण शाहू यांच्याबद्दल टिळक भक्त असणा-या शिवाजी क्लबची आस्था उरली नाही.त्यामुळे टिळक दाखवतील तोच मार्ग सही या दिशेने शिवाजी क्लबची वाटचाल चालू राहिली.

गुप्त संघटना आता आक्रमक झाल्या होत्या.रशियन क्रांतिकारकांकडून बॉम्बचा फॉर्म्युला मिळविला गेला.आणि याचा वापर करून खुदिराम बोस-चक्रवर्ती यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला, पण त्यांना फाशीची शिक्षा झाली.तरीही शिवाजी क्लबमध्ये बॉम्बबद्दल उत्सुकता निर्माण झाली होतीच.त्यांना कोल्हापूरमधील छळवादी वरिष्ठ अधिका-यांना आणि कर्नल फेरिस यांना ठार करायचे होते आणि त्यासाठी त्यांना बॉम्बची आवश्यकता होती.त्यासाठी स्वतः दामू आणि परसू पुण्याला जाऊन आले.आणि कोल्हापूरला बॉम्ब पाठवून देण्याची विनंती केली.तो बॉम्ब महाराजांच्या कन्येच्या विवाह प्रसंगी टाकण्याचा आणि एकत्रित सर्व अधिका-यांना ठार करण्याचा मनसुबा बॉम्ब वेळेवर न पोहचल्याने अयशस्वी झाला.पण झाले ते एक त-हेने ठीकच होते कारण त्यांना निरपराध लोकांचा जीव घ्यायचा नव्हताच.या बॉम्बची चाचणी घेण्यासाठी दामू आणि परसू यांनी एक बॉम्ब खाणीजवळ उडवून देखील पाहिला पण खाणीत नेहमीच सुरुंग उडत असल्याने कोणाला संशय आला नाही.

कर्नल फेरिस निवृत्त होऊन परत निघाले होते, तेंव्हा दामू आणि परसू यांनी पिस्तुलीने फेरिस यांना ठार करण्याचा प्रयत्न केला खरा पण ऐनवेळी पिस्तुल उडालेच नाही आणि हा प्रयत्न देखील अयशस्वी झाला.मग जर पुण्यामधील क्रांतिकारकांना बॉम्ब तयार करण्याचे कसब मिळवता येते तर आपण स्वतःही बॉम्ब तयार करायचा या गोष्टीने शेणोलीकर,अंबप,पाध्ये,गोखले आणि स्वतः परसू धडपडू लागले.बॉम्ब तयार करण्यासाठी अॅसिड मिळवण्यासाठी कधी शाळेत, केमिस्ट तर लॅबोरेटरीमध्ये धाडी टाकल्या जाऊ लागल्या.मग शेणोलीकर,परसू आणि बाकी साथीदार बॉम्ब तयार करण्याच्या कृतीच्या हस्तलिखिताच्या नकला काढून दामूकरवी त्या सगळीकडे लावल्या गेल्या.सगळीकडे एकच खळबळ उडाली.त्यात शाळेच्या चालकांनी अॅसिड चोरीची वर्दी दिली.पोलीस तपास चालू झाला.अटक सत्र तर चालूच होते.यामुळे काही काळ गुप्त संघटनांचे कार्य थंडावले.

सगळीकडे असंतोषाचे वारे वाहू लागले होते.घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यात शिवाजी क्लबमधील काही सदस्यांना अटक झाली.काहीजणांना सक्तमजुरीची शिक्षा झाली,काही फरार झाले तर परसू आणि प्रसादे निर्दोष सुटले.पण त्यानंतर शिवाजी क्लब सरकारकडून बंद पाडण्यात आला.पण तरीही शिवाजी क्लबच्या कारवाया चालूच राहिल्या.मग परत धर-पकड चालू झाली.दामूला अटक करण्यात आली.परसू आणि पाडळकर व बाकींना अटक झाली.कबुलीजबाब देण्यासाठी अमानुष छळ केला जाऊ लागला.शेतजमीनी जप्त करण्याच्या, ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.कितीतरी दिवस उपाशी ठेवण्यात आले.मारझोड चालू केली.घरच्यांना मारण्याच्या धमकीने पाडळकराने कबुलीजबाब दिला.पण परसू सगळे सहन करत राहिले.याचा परिणाम म्हणून की काय पण पायात काठ्या मारल्या, हाडे खिळखिळी होईपर्यंत वेताच्या छडीने परसू यांना फोडून काढले.परसू यांना उलटे टांगून मारून झालेल्या जखमांवर मिठाचे पाणी शिंपडले जाऊ लागले.दामूला समोर उभे करून त्यांची डोक्याची केसं उपटण्यात आली.आणि शेवटी बळजबरीनेच कबुलीजबाब लिहून घेतला.दामू जोशीने तुरुंगातून पत्रे पाठवून सुटकेसाठी प्रयत्न चालू केले.

पण तरीही दुसरा अभियोग चालला आणि परसू यांच्यासोबत दामू आणि बाकी सहाजणांवर खटला चालवला गेला.यामध्ये प्रत्येकाला काही वर्षाच्या शिक्षा झाल्या.पण या सात-आठ वर्षाच्या कालावधीमध्ये शिवाजी क्लबच्या करवाया थंड पडल्या.

पुढे या शिवाजी क्लबच्या कार्यकर्त्यांचे काय झाले, ते कुठे गेले, ते कसे जगले.काहीच कळाले नाही.या काळात अनेक हालअपेष्टा सहन करत ते कसे जगले असतील की स्वातंत्र्याच्या अग्नीकुंडात ते होरपळले असतील याची भणक देखील कुणाला लागली नाही.तरीही ब्रिटीशांना सळो की पळो करणा-या या क्रांतिकारकांची नावे कुठेही आली नाहीत.ते आणि त्यांचे अजरामर कार्य कुठेतरी विरूनच गेले.


खटले, तुरुंगवास चालूच राहिला.याच कालावधीत परसू कोल्हापूरातील बाबूराव पेंटर यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी काम करू लागले.त्यांचा कोगनोळी येथील पाटलांच्या मंजू यांच्याशी विवाह झाला.लग्नानंतर त्यांचे राधा असे नाव ठेवण्यात आले.राधाबाई या दूरदृष्टीच्या आणि चतुर होत्या.त्यामुळेच बाबूराव पेंटर यांच्या घराशेजारीच आपले दाग-दागिने विकून त्यांनी घर घेतले.देशासाठी संसार मांडलेल्या परसू यांची राधाबाईंना एवढी मदत नव्हती पण राधा यांनी एकखांबी संसार करत आपल्या सहा मुलांना वाढविले.पहिली मुलगी तारा ही साथीत वारली.इंदू,विमल,देवी,नलू या मुली आणि बबन,सुभाष हे दोन मुलगे त्यांना झाले.याच राधा बाईंच्याकडे मंगेशकर, माडगूळकर ,ललिता पवार,मा.विनायक अशी नामवंत मंडळी भाड्यानं राहिली.अटकसत्र अजूनही चालूच होते, एकदा दोनदा परसू यांच्या घराची झडती देखील घेण्यात आली.त्यांना अटक झाली.

इकडे माधवराव बागल,दिनकरराव देसाई,रत्नाप्पा कुंभार,देशिंगकर,बापू पाटील अश्या नेत्यांमुळे महाराष्ट्राच्या चळवळीला चालना मिळाली.अजूनही परसू यांचे यातनापर्व संपले नव्हते.छत्रपती राजारामांच्या एका कार्यक्रमात छोट्या गोड विमलने पी.सावळाराम यांची एक कविता म्हणून दाखविली.तेंव्हा महाराजांनी भारावून जाऊन “तुला काय हवं बाळ?” असे विचारताच छोट्या विमलने म्हंटले “माझे बापू तुरुंगात आहेत,त्यांना सोडा.”
महाराज हसले आणि तिची पाठ थोपटली.तिचे बापू सुटले,घरी आले.

स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या आयुष्याची होळी केली.आपले सर्वस्व अर्पण केले.आणि परसू यांच्यासारख्या अनेक अनाम क्रांतिकारकांच्या रक्ताच्या थेंबा-थेंबानी या आपल्या भूमीला पावन केले.देशासाठी झटलेल्या,देशप्रेमाने वेडावलेल्या असामान्य व्यक्तीमत्व, मनोधैर्य, कुशल कारागिर असे अनेक कसब असणा-या परसू यांची ओळख त्यांच्या नातीने म्हणजे ज्ञानदा नाईक यांनी पटवून दिली.

ज्ञानदा नाईक म्हणजे परसू सुतार यांची मुलगी विमल आणि जगाला आपल्या अजरामर साहित्यांनी भारावून टाकणा-या व्यंकटेश माडगूळकर यांची कन्या.चारचौघांपेक्षा वेगळे आणि विलक्षण आयुष्य जगलेल्या आपल्या आजोबांची जगाला ओळख व्हावी यासाठी धडपडणा-या ज्ञानदा नाईक यांनी त्यांच्या आजोबांच्या आयुष्यातील अनेक पटले उघडली.परसू सुतार...बलदंड शरीराचा, साहसी वृतीचा,हरहुन्नरी आणि तुरुंगातल्या शारीरिक छळाला पुरून उरलेला, कमालीचा सहनशील, देशासाठी आयुष्य पणाला लावलेला परसू सुतार सशस्त्र लढ्याबरोबर अहिंसात्मक सत्याग्रहाचीही वाट चालला.त्याने दिव्य स्वातंत्र्यरवीची पहाट पाहिली; बदलते राजकीय रंग पाहिले.या काळाने मात्र त्याचं तारुण्य हिरावून घेतलं.गृहसौख्य लुटून नेलं.आत्मसन्मान काढून घेतला.
शरीरानं खंगलेल्या,मनानं जखमी झालेल्या, उपेक्षेनं विद्ध झालेल्या परसू सुतार यांचे निधन १९६५ साली झाले.त्यानंतर म्हणजे जवळपास पन्नास वर्षानी अनेक धागे-दोरे,दुवे गोळा करत आपल्या लेखणी मधून अनाम क्रांतिकारक परसू सुतार यांचे चरित्र साकारले.आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपले आयुष्य अग्नीकुंडात झोकून देणा-या अनेक अनाम क्रांतिकारकांच्या पदरी आलेली वंचनाच समोर आणली.

सुचिता प्रसाद घोरपडे
कोथरूड
पुणे-३८

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED