पाना-फुलांचा खेळ
चला चला मुलांनो कोणाकोणाला गोष्ट ऐकायची आहे.सगळ्यांनाच ऐकायची आहे ना,तर मुलांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे.एका तुमच्या सारख्याच गोड आणि खट्याळ मुलाची म्हणजेच शिवमची.तो तुमच्यासारखाच शाळेला जातो,अभ्यास करतो,भरपूर खेळतो आणि मजा देखील करतो.फक्त त्याला टीव्ही पहायला आणि मोबाईलवर गेम खेळायला मात्र फारच आवडतं.
तर एकदा काय झाले माहित आहे का?एक दिवस मोबाईलवर खूप वेळ गेम खेळल्याने शिवमची बोटे दुखू लागली.त्याला बोटांची हालचाल करताच येईना.त्याला भिती वाटू लागली.शिवम रडू लागला.शिवमची आई धावतच आली.तिने हळूहळू शिवमच्या बोटांना मालीश केल्याने त्याला थोडे बरे वाटले.मग आई त्याला म्हणाली.
“बघितलं ना शिवम बाळा,मोबाईलवर खेळल्याने काय होते.मी तुला किती समजावले होते पण तू माझे ऐकलेच नाहीस.”
“मग मी कशाने खेळू आई.”
“आपण पाना-फळांचा खेळ खेळू.ज्यामध्ये तुला भाज्या,फळे ओळखून दाखवावं लागेल.”
“पण मला नाही माहित आई,हे सगळं कुठे लागतं,कसं असतं.”
“शिवम तुझी आता परीक्षा संपली की मग आपण सहलीला जाणार आहोत.जिथे गम्माडी जम्मत असेल.तुला ती गंमत फार आवडेल.आणि तुला हा पाना-फळांचा खेळही खेळता येईल.”
शिवम खूष होतो.त्याची परीक्षा संपते.शिवम तर आपली बॅग घेऊन तयारच असतो.मग ते गाडीत बसून मानखेडला येतात.मानखेड खूप सुंदर गाव असते.हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये वसलेलं.गावाशेजारून एक छोटीशी नदी वाहत असते.छोटी-मोठी घरे,अंगण,गोठा आणि शेत-खळ्यांनी भरलेले असे गाव अगदी परीकथेतीलच वाटत असते.तिथे उंच उंच झाडे असतात.रंगीत रंगीत फळा-फुलांची झाडे शिवमला फारच आवडतात,चालत चालत झाडे पाहत असता शिवम अचानक थांबतो.शिवम पहिल्यांदाच भोपळा पाहत असतो,त्याला वाटत असते की इतके मोठे भोपळे तर उंच झाडावर लागत असतील ,पण भोपळा तर जमीनवर वेलीला लागतो.तो आईला विचारतो,
“ये आई भोपळा असा जमीनीवरच्या झाडाला का लागतो?सगळ्या फळांसारखा उंच झाडाला का नाही लागत?”
“शिवम काही फळे जास्त वजनाची असतात ती जमीनीवरच्या वेलीला येतात.जसे कलिंगड,भोपळा,टरबूज.आणि काही वजनाने हलकी फळे झाडाला लागतात.आता हेच बघ ना, हे बोराचे झाड आहे,ते तिकडे चिंचेचे,पेरूचे,आंब्याचे झाड आहे.याला अपवाद देखील काही आहेत. आता तिकडे बघ, तिकडे वजनदार नारळ मात्र उंच झाडाला लागले आहेत.कारण ते झाडही तसेच दणकट असते.”
“ओह.. असे असते काय.ये आई.. तिकडे बघ ते काका काय करत आहेत?”
“शिवम ते म्हशीची धार काढत आहेत.तुला ठाऊक आहे का, आपल्याला दूध कुठून मिळते.”
“अं.. डेयरीमध्ये पिशवीतून.”
“हो पण ते कुठून येते?शिवम आपल्याला दूध हे नेहमी असे म्हशीपासून, गायीपासून आणि बकरीकडूनही मिळते.आपल्या डेयरीमध्ये जे दूध येते ते असेच म्हशीपासून काढून आणले जाते.तुला प्यायचे आहे का.थांब मी देते.”
“उं...हे तर आपल्या डेयरीपेक्षाही छान आहे आई..”
मग ते शेतामध्ये जातात.तिकडे शेतामध्ये शिवम त्याच्या आवडीच्या सगळ्या भाज्या कोणकोणत्या रोपट्यांना येतात ते पाहतो.अगदी वांगी, टोमॅटो, भेंडी तोडून देखील पाहतो.त्याला खूप आश्र्चर्य वाटते, जेंव्हा त्याला कळते की कांदे,बटाटे हे तर जमीनाखाली येतात.
“ये आई.. बरे झाले तू मला ह्या सहलीला आणलेस.मला किती किती नवीन गोष्टी समजल्या.आता मी हे सगळं माझ्या मित्रांना सांगणार.मग त्यांनाही कळेल द्राक्षांच्या आणि केळीच्या बागा असतात.कांदे,बटाटे,गाजर,मुळा हे जमिनीवर नाही तर जमिनीखाली लागतात.आणि शेंगदाणे काही झाडाला नाही लागत, त्याच्या शेंगाही जमिनीखालीच येतात.”
“शिवम तुला बैलगाडीत बसायचं आहे का?”
“नको रे बाबा.. मी पडलो तर..”
“अरे काळजी नको करू तू नाही पडणार.”
“अजून जोरात..अजून जोरात. हे..हे.. आई मला बैलगाडी फार फार आवडली.किती मजा येते यामध्ये.अरे आई... तिकडे बघ मोर.पिसारा फुलवलेला मोर.”
“इथे मोर तर आहेतच पण अनेक खूप सारे पक्षीदेखील तुला पहायला मिळतील.चल तुला दाखवते.”
हे सगळे पाहत असताना शिवमला खूप आनंद झाला होता.त्याने आतापर्यंत हे सगळे कधी पाहिलेच नव्हते.शिवमच्या बाबांनी त्याला नदीवर पोहायला नेलं.आजवर शिवम कधी नदीच्या पाण्यात उतरलाच नव्हता.पण आज बाबांसोबत त्याने धमाल केली.पाण्यात खेळून दमल्यावर तो नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडून बसला, तेंव्हा त्याच्या पायाला मासे येऊन गुदगुल्या करू लागले.शिवमने आतापर्यंत मासे फक्त फिश टँक मध्येच पहिले होते.पण पायाला गुदगुल्या करणा-या माशांना तो पहिल्यांदाच पाहत होता.त्यामुळे शिवमला इतका खूष झाला होता की तो आनंदाने उड्याच मारत होता.मग त्याने मुलांना खेळताना पहिले.
“आई ती मुले काय खेळत आहेत? मलाही ती सायकलीची टायर काठीने फिरवायची आहे त्या मुलांसारखी.”
मग शिवमनेही त्या मुलांसोबत सायकलीची टायर काठीने दूरवर पळवत नेली.खूप सारे नवनवीन खेळ त्या मुलांनी शिवमला शिकवले.संध्याकाळ झाली होती.आणि दिवसभर फिरल्यामुळे, खेळल्यामुळे शिवम थकला होता पण तरीही शिवमला अजून खेळायचे होते.आज त्याला एकदाही मोबाईल किंवा टीव्हीची आठवण झाली नाही.
“शिवम बाळा..तू किती किती धमाल केलीस.आज किती काय काय शिकलास ना तू.मग तुला आवडली ना ही सहल.”
“हो आई.. मला खूप म्हणजे खूप आवडली ही सहल.ये आई, पण आपण आणि परत यायचं ना इकडे.मला अजून मजा करायची आहे,खेळायचं आहे.”
“हो नक्की येवू बाळा आणि पुढच्या वेळी तुझ्या मित्रांनाही सोबत आणू.”
“हे.. हे.. आई खरंच आपण शुभम,निनाद, ओमला पण घेऊन यायचं ना.”
“हो पण त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल.”
“हो आई मला माहित आहे,ती कोणती अट आहे.आता मलाच नाही मोबाईलसोबत खेळायचे.माझ्या डोळ्यातून पाणी येतं.आणि माझी बोटेही दुखतात.मला आता अभ्यास करायचा कंटाळा नाही येणार,आता मला फळा,फुलांची आणि कशाचीही नावे शोधावी नाही लागणार कारण तू इथे मला सगळं काही शिकवलं आहेस ना.”
पाहिलं मुलांनो शिवमला ही सहल किती किती आवडली.तर तुम्हाला देखील आवडेल ना अश्या सहलीला जायला.
सुचिता प्रसाद घोरपडे