ग्रामीण शब्दावली Suchita Ghorpade द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ग्रामीण शब्दावली


ग्रामीण शब्दावली 

        कुसुमाग्रजांच्या या ओळीतून मराठी भाषेविषयीचा  स्वाभिमान जागा होतो. आपण जन्माला आल्यापासून आपली भाषा आपल्या कानावर पडत राहते, आणि आपसूकच त्या भाषेशी आपली नाळ जोडली जाते.. आईसारखाच एक जिव्हाळा आपल्या बोलीभाषेविषयीसुद्धा वाटतो.. मग जसजसा आपला विकास घडत जातो तसतशी अनेक भाषांशी आपली ओळख होत राहते.. मग ती व्यावहारिक भाषा असो वा  शैक्षणिक भाषा असो.. वेगवेगळ्या भाषा अवगत करताना कुठेतरी आपली भाषा हरवत चालली आहे याचे विस्मरणच होते.. पण तरीही आपली माती, आपली माणसे आणि आपली मातृभाषा, बोलीभाषा यांच्याशी अजूनही आपली नाळ जोडली गेली आहे.आणि ती अधिक घट्ट होण्यासाठी , भाषेचे संवर्धन होण्यासाठी हा  एक छोटाशा प्रयत्न... प्रमाण भाषेमधे असे प्रयोग झालेत ...वाचलेत म्हणून ग्रामीण भाषेचवरच्या प्रेमाने मलाही उद्युक्त केलं म्हणून हा प्रयोग.. मी सुद्धा शिकतच आहे.. 

ग्रामीण शब्दावली..१

१)झटाझोंब्या-- झटा-झगडणे, झोंबी-झुंज घेणे, झुंजणे  
  झट्याझोंब्या म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी काबाडकष्ट घेणे, अथक परिश्रम घेणे, झगडणे

*झटाझोंब्या खात तुला शिकवलं..

*झटाझोंब्या खात तुक्यानं कोर्टात भिजत पडलेली केस जिंकली..

*अशीच मोठी झाली व्हयं झटाझोंब्या खाल्ल्या तवा कुठं डोईवर छप्पर आलं अन् दोन घास पोटात पडलं..

२)वेळवखूत-  'वखूत'-वेळ , काळवेळ
 'वखूत' हा हिंदी वक्त या शब्दाचा अपभ्रंश असावा.


*दिस बुडला की..आता आलास काय वेळवखूत हाय का नाय तुला..

*वेळवखूत बघा अन् मगच जावा पुढं.

* एक मराठी शबूद नीट बोलता येत नाय.. मराठी भाषेवर काय वखूत आला हाय.. 


ग्रामीण शब्दावली..२

१)मत्तीर- मंतर, मत्तूर,  मंत्र
  
* म्हाद्याचं आजकाल ध्यानच नसतंय, कुणी त्येच्यावर मत्तीर फूकलं का काय??

   *नाना असा सहजासहजी ऐकणारा नाहीच, तंतर मंतरच असणार ह्याच्यामागं..

* कमळीनं मत्तीर फूकलं.. अन् घरादाराचं वाटोळं झालं.

२)म्हामूर-  मोप,मायंदळ,भरपूर

*तुक्याच्या शेतात पीक म्हामूर आलं हाय.

*जत्रंला म्हामूर गर्दी  व्हती.


ग्रामीण शब्दावली..३



१)इंगित- मनातला हेतू , गौडबंगाल, बिंग, गुपित, रहस्य

*राधीचं इंगित जाणायला जनम जायला पायजे.

*चोरीच्या  मागं कायतरी इंगित असायलाच पायजे.

*तुक्यानं सोंग का रचलं.. तेचं इंगित आता कळलं..



ग्रामीण शब्दावली..४

१) रांडमुंड- विधवा बाई
(रांड मुंड)रांड-विधवा, मुंड-केशवपन केलेली, बोडकी

रांडमास-(रांड मास)- पती निधनानंतर विधवा स्त्रीला थोडा एकटेपणा, मोकळेपणा मिळाल्यामुळे अंगावर चढणारे मांस किंवा आलेला लठ्ठपणा..
          पूर्वीच्या काळी विधवा स्त्रीयांना अत्यंत  हीन दर्जाची वागणूक दिली जायची, विधवा स्त्रीने पोटभर चांगले-चुंगले खाऊ नये किंवा तिने अर्धपोटी रहावे.हौसमौज करता कामा नये. साहजिकच अशाने विधवा स्त्री कृश, कमजोर दिसायची.. पण काही वेळा जर का ती स्त्री नियंता नाहीसा झाल्यामुळे थोडी धीट, चपळ झाली, किंवा तिने काहीतरी वावगे वागले  तर तिला मस्ती आली या अर्थाने तिचा उल्लेख रांडमास/रांडमस्ती असा केला जाई..

*रांडमुंड बाई म्हणून घरात ठेवली तर तिचं हे असं थॕर..

*रांडमुंड असली तर काय झालं, पोराला पोसायची धमक हाय तिच्यात..

*रांडमुंड बाईवानी पांढ-या कपाळानं फिरतीया..

*दाल्ला(नवरा) जाऊन सा महिनं झालं नाय तवर रंगीच्या अंगावर रांडमास दिसाया लागलं..

ग्रामीण शब्दावली..५

१)घबाड- अचानाक मोठा लाभ होणे, आयतं धन मिळणे, मोठा  फायदा होणे
घबाड योग- एक शुभ मुहूर्त 

*म्हातारीनं मरताना दडवून(लपवून) ठेवलं.पर धा वर्सानं का असना केरबाला घबाड गावलंच.

*वाड्यात हीर खणताना गण्याला घबाडच मिळालं.

*राधाक्काच्या सात पिढ्या बसून खातील, एवढं मोठं घबाड मिळाल्यावर.


ग्रामीण शब्दावली..६

१)झेंगाट- प्रकरण, लडतर, भानगड, नसती ब्याद, लफडं, लचांड

*च्यामायला हे काय अन् नस्तं झेंगाट मागं लागलं म्हणायचं.

*तवाच हे झेंगाट निस्तरलं असतं तर आता ही येळ आली नसती. 

*नाम्याचं त्या लतीशं झेंगाट चालू हाय का रं??

*घरात खाणारी तोंडं काय कमी व्हती तवा हे झेंगाट गळ्यात बांधून घेतलास.

-© सुचिता प्रसाद घोरपडे