अडीच अक्षरांची गोष्ट - पुस्तक परीक्षण Suchita Ghorpade द्वारा पुस्तक पुनरावलोकने मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अडीच अक्षरांची गोष्ट - पुस्तक परीक्षण

अडीच अक्षरांची गोष्ट (पुस्तक परीक्षण)

पुस्तक परिचय- “अडीच अक्षरांची गोष्ट”
लेखक-         प्रदीप आवटे
प्रकाशक-       वॉटरमार्क पब्लिकेशन

                             
             चांगलं फटफटलं तरी नाम्याचा काय पत्ता नव्हता.काशा कवापासनं नाम्याला फोनच्या रिंग्या करून करून घाईला आला व्हता, पर हे बेनं कुठ अडकलं काय ठावं.तवर खायल्या अंगाच्या भुंड्या माळावरनं नाम्या येताना दिसला.काशा त्येला चार शिव्या हासडणारच पर नाम्या तर सूदीतच दिसत नव्हता, म्हंजी गालातल्या गालात हसत काय व्हता, लाजत काय व्हता.त्वांडबी कसं झेंडवागत फुललं व्हतं.त्यो जवळ आला तसा काशानं त्येला फटकारलं,
“कुठं उलतला व्हतास रं...?”
“काय सांगू काशा...”
“पुराण लावू नगोस,पटदिशी त्वांड उघड..”
“अरं काल कोल्हापूरास्न दिलप्या आलेलं, त्येनं eएक बुक मला वाचायसाठनं दिलं.म्हणला फकस्त पयलं पान उघड मग बग काय जादू हूतीया.अन् काय सांगू तुला, त्येचं पयलं पान उगडल्यावरच संगी डोळ्याम्होरं आली.हे असं बुक पयल्यांदाच पायलं, म्हंजी जे वाचताना डोळ्याला डोळाबी लागला नाय.एक एक पान नुस्त आत झिरपत चाललं व्हतं, एका सेकंदासाठीबी हातातनं खाली ठेवलं नाय, समदं बुक एका रातीच वाचूनश्यान काढलं.काशा गड्या तूबी पिरमात पडशील बग हे बुक वाचून.”
“हं...ही असली काय थेरं आमाला जमायची नाईत बाबा.आपण असल्या गोष्टीपासनं चार हात लांब हाय तेच बरं हाय.त्या संगीसाठ्नं जीव जाताना  तुला पायलं हाय.जीव तेवढा बाकी –हायला तुझा हे नशीब म्हणायचं.लेका मराया टेकलेलास तरीबी पिरमाची नशा काय उतरली नाय म्हणायची तुझी.”
“पिरमाची नशा कळाया पयला पिरमात पडाया लागतं गड्या.पर शपथ सांगतो तुला, जर या बुकातल्या कथा तू वाचल्यास तर पिरमात पडल्याशिवाय राणार नाईस.तुझा पिरमावर इश्वास बसणारच,लिहून देतो.”
“असं म्हणतोस तर... सांग मग असं काय हाय या बुकात.”
“eकाशा ठरवून बिरवून पिरेम कदीबी व्हत नसतं.ते असं आपल्या आयुशात आगंतुकच येतया बगं.  ‘अडीच अक्षरांची गोष्ट’ हे बुकबी अश्याच एका पिरमयेड्या माणसानं म्हंजी प्रदीप आवटे सरांनी लिवलं हाय.ह्यातला एक एक शबुद आत झिरपत जातोय.कदी न भेटलेली या पुस्तकामदली माणसं बी आपली वाटाया लागतात.अन् यात फकस्त त्या दोगांच पिरेमच नाय तर येगयेगळ्या नात्यामदी अलवार फुलणारं पिरेमबी दावलं हाय.जगातला हर एक माणूस पिरमाच्या या धाग्यात बांधलेला हाईच, तुला कुणीबी असा गावणार नाय ज्यानं कवाच पिरेम केलं नाय.तर यातली पयली गोष्ट हाय मोईद्दिन नी कांचनाची.
       ‘यवनाच्या उंबरठ्यावर पाऊल पडलं अन् मोईद्दिन नी कांचनाच्या बालपणापास्नच्या मैत्रीला पिरमाचा म्हवर फुटला.teeती बारकी पोरं व्हती तवर ह्येंच्या घरच्यासनी जात-पातीचं काय वावडं नव्हतं.पर यांच्या पिरमाची कुणकूण लागली अन् मोईद्दिन नी कांचनाची ताटातूट झाली.बरं एकयेळ ही ताटातूट महिना दोन महिन्याची असती तर कळलं असतं.तुझा ईस्वास बसणार नाय,एक दोन नाय चांगली पंचवीस वरीस कांचना नजरकैदत व्हती.पर एक दिस अघटीत घडलं पट्टीचा पव्हणारा मोईद्दिन पर पूरात अडकलेल्या लोकास्नी, पोरास्नी काढताना भव-यात अडकला अन् बिचा-यानं कांचनाला डोळ्याम्होरं आणत शेवटच्या श्वास घेतला.ह्या त्यांच्या ताटातूटीनं काळजाला चीर पडली.परं मोईद्दिन गेल्यावर कांचनानं बंधनं झुगारून एक पावूल उचललं, अन् आता आयुशभर लगीन न करता मोईद्दिनच्या आठवणीत सामाजिक कार्य करत जगत हाय कांचना.’
  
“नाम्या काय रं हे, इथं सेकंदा सेकंदाला माणसं बदलत्यात, तिथं अशी एकमेकावर जीवापाड पिरम करणारी,आठवणीवर आयुश काढणारी कांचना बगून डोळं भरलं रं.”

  
      “जरा कमी समदीच पिरम करताना पयला ती काळी का गोरी म्हंजी दिसाया कशी हाय ते बगत्यात.पर हिथं आलोक तर अॅसीडनं भाजलेल्या लक्ष्मीच्या पिरमात पडला.ज्या नराधमानं लक्ष्मीचं आयुश जाळून टाकलं व्हतं, त्या आयुशात आलोकनं पिरमाची फुलं फुलवली.आता ह्या येलीवर पिहू नावाची कळीबी उमललीया.”

“नाम्या जगात एवडी निष्ठूर माणसबी भरली हाईत हे बगून चीड येतीया रं.अरं त्येचं अॅसीड टाकताना हातबी थरथरलं नसतील का रं.आलोक लई देव गुणाचा,अशी माणसंबी हाईत आपल्या समाजात हे बगून बरं वाटलं बग.त्येनं तिचं आयुश पिरमानं भरून टाकलं.”

“काशा जगात जेवडी पिरमाला इरोध करणारी लोक हाईत तेवडीच पिरमाला साथ देणारी बी हाईत.आता ह्येचं बग की आपल्याला ठावं तर हाय का की, पिरमाला साथ देणारी एक संस्थाबी असल म्हणून.पर खरं हाय ‘लव्ह कमांडोज’ ही संस्था अश्या पिरेम करणा-या जोडप्यासनी समदी मदत करतीया.अन् तेबी  कायद्याला संग घेऊनच.”

“व्हयं का..? हे भारी काम हाय की नाम्या, आतापातूर आमास्नी असलं काम करणारी संस्थाबी असतीया हे ठावं नव्हतं.”

“काशा पिरमाला कोणत्याबी एका चौकटीत गच्च धरून बसवाया येत नाय म्हंजी पिरमाला जात-पात, गरीब-शीरमंत,देश-परदेश असल्या कुठल्याबी चौकटी नसत्यात.अशीच एक कथा समीना अन् प्रशांतचीबी हाय.ह्या दोगानी जाती-धरमाच्या समद्या चौकट्या फोडून काढल्या.अन् ज्या आई-वडीलांनी पिरमाला इरोध केलता त्येनीबी आता जात-धर्म इसरून आपल्या सूनंला, जावयाला जीव लावला हाय.”

“खरं हाय रं, पिरमानं माणूस बदलतोय हे आता तुझं ऐकूनश्यान पटालयं बग.”

“काशा पिरमात आंधळं हून काय बी करायचं बळ येतया हे तुला मला बगून आतापातूर ठावं झालं असलच पर माझ्यावानी अजून एक हाय बाबा, त्येचं नाव हाय श्रीकिशन काळे.या पोरानं अरं कालेजामदी असताना एका पोरीसाठ्नं अक्षी फिल्मी इस्टाईलनं गुंड, मारामारी, चक्कर असं समदं फुल्ल पीलानिंग केलं परं झालं उलटचं गड्या.अरं जिचं घर समजून ह्यो चक्कर येऊनश्यान पडला ती पोरगी अश्विनी नव्हतीच,जिच्यावर ह्यो लाईन मारायचा.एकदा आपटून गप्प बसणारा ह्यो नव्हताच.त्येनं पेपरमदी एकडाव तिचं नाव बगून तिला चिठ्ठी लिवली, पर हिथंबी परत दुसराच नंबर लागला.पर ह्यायेळी या चुकीच्या नंबरानच पिरमाची करेक्ट घंटी वाजीवली.पर काशा लेका ही दोग मला लई आवडली बग कारण ती येगळी हाईत रं.रंग, रूप असं समदं बगूनच समद्यांची गाडी पुढं सरकती.परं इथं श्रीकिशननं तिला तिच्या अपंगत्वाला बगितलं नाय तर तिच्या कोमल, निरागस मनाला वरलं.अन् ती पोरगी  म्हंजी अश्विनीबी जीव टाकती रं त्येच्यावर.आता त्येंच्या अंगणात  अनुश्रीच्या रूपानं पिरमाचा झराबी व्हाया लागलाय.”

“नाम्या अश्या लोकांनीच आपलं जग एवढं सुंदर दिसतया रं.”

“अजून एक चित्रपटाला शोभल अशी कथा हाय.चंदा अन् केशवची.चंदा केशवची आत्येभनच पर घराच्या जबाबदा-यानं पयला चंदाला नकार देतो, पर तीच चंदा जवा धोक्यानं लगीन झालेल्या माणसाच्या पयल्या बायकोकडनं जबरी डोक्याला मार खावून कोम्यात जातीया तवा केशवला या समद्याला आपूनच कारण हाय वाटू लागतं.मनातल्या पिरमानं उभारी दिल्यावर केशव तिची सेवा करून तिला बरी करतोच पर समद्यांच्या इरोधाला न जुमानता चंदाला आयुशभराची साथबी देतोय.आता ही दोग लई सुखातबी हाईत.लोक काय काशा असं बी बोलत्यात अन् तसबी बोलत्यातच पर आपुन काय करायचं ते आपणच ठरवाया पायजे.”

“नाम्या... आता पुढं नग सांगूस.तू फकस्त मला हे बुक दे.”

“काशा तुला द्याय साठनंच आणलं हाय रं मी.अजून बी ह्यात लई कथा हाईत रेचल, समुंदर,तिलाकम-काथिर, जितेंद्र-नताशा, पंकज-शहनाझ, फैजूल, नादिया, मोहमद्द अली बरीच माणसं भेटतील गड्या तुला.आपलं जग ह्या माणसांनीच शीरमंत हाय रं.बग मी म्हंटलं नाय.ज्याचा पिरमावर ईस्वास नाय तेचाबी ईस्वास बसल म्हणून.तू वाचबी हे बुक अन् कसं वाटलं ते प्रदीप सरास्नी कळीवबी.

       ह्या बुकावरलं पानाचं चितार संजय साठे या अवलिया माणसानं काढलं हाय.बुकाचं समदं सार त्यातच हाय.जगानं ,समाजानं ठरवून दिलं हाय त्या वाटनंच गेलं तर ठीक नाय तर उलट्या काळजाचं  जग आपणाला जाळून टाकतं,मग त्या धगीनं जीवनाचं हे पान गळून पडणार असतयाच पर पिरमाचा एक धागा अजूनबी शाबूत असतो.त्या धाग्याची यीन नवी पालवी फोडतीया अन् जीवन परत पिरमाच्या या अडीच अक्षरांनी फुलाया लागतया.असाच संदेश संजय भाऊ यातनं देत्यात.काशा या पिरमानं, अन् या पिरमातील माणसांनी मला लई शिरमंत केलया.”

             नाम्या बोलत रायला, पर काशा तर कवाच बुक घेऊनश्यान गेलाबी.आता तुमी कसली वाट बगाया लागलाइसा.तुमास्नीबी हे बुक वाचायची घाई झाली असलच नव्हं, मग माझ्यासंग बोलत बसून येळ घालवू नगासा.जावा अन् पयला प्रदीप आवटे सरांचं “अडीच अक्षरांची गोष्ट” आणा अन् वाचा.मग आमच्यावानी तुमीबी शिरमंत होशीला बगा.


-सुचिता प्रसाद घोरपडे
कोथरूड
पुणे-३८