बाप्पांची जंगल सफर Suchita Ghorpade द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बाप्पांची जंगल सफर

बाप्पांची जंगल सफर

              “ये आई... मी ना आता बाहेरच जाणार नाही..” इटूकले मिटूकले उंदराचे पिल्लू आपल्या आईला म्हणाले.

“अरे बापरे... पण तू का नाही जाणार बाहेर..?” आईने पिल्लाला विचारले.

“कारण मला कुणीच पसंद करत नाही.सगळे तर त्या चीनमीन चिऊला , विंकी खारुटली आणि मोहन मोरालाच पसंद करतात.मला तर कुणी विचारत देखील नाही.मी बाहेर गेलो तर कुणी मला पाहात नाही.बोलत नाही.मला आता इथे मुळीच राहायचे नाही..”

“अरे पण तू निघून गेलास तर मग मला तुझी आठवण येईल.आणि मग रात्र झाल्यावर तू कुठे झोपणार..? आणि काय खाणार..?”

“ह्याचा तर मी विचारच केला नव्हता..मग आता मी काय करू..?”

            छोटेशे उंदराचे पिल्लू खूपच उदास झाले होते की त्याला कुणी पसंदच नाही करत म्हणून.मग त्याच्या आईने त्याला खूप समजावले.. तेंव्हा कुठे तो शांत झाला.आणि नदीकाठाला खेळायला गेला.

  “आजपासून मी एकटाच खेळणार..  इथे नदीकाठाला किती सुंदर सुंदर झाडे आहेत.रंगीत रंगीत फुले-फळे आहेत.मी यांच्या सोबतच खेळणार.” 

  ते पिल्लू नदीकाठाला पाना-फुलांसोबत खेळू लागले.आणि मग अचानक काय झाले... जोरजोरात वारा वाहू लागला... नदीचे पाणी हलू लागले.. आणि त्या पाण्यातून एक मोठाले कमळ हळूहळू वर येऊ लागले.आणि त्या कमळामध्ये कोण बसले होते ठाऊक आहे का..? आपले गणपती बाप्पा... गणपती बाप्पा कमळाच्या फुलामध्ये बसून त्या पिल्लाकडे पाहून हसत होते.त्यांना पाहून पिल्लू घाबरले... ते मागे मागे सरकू लागले.. मग बाप्पा म्हणाले;

“अरे मला घाबरू नकोस.. मी तुला काही नाही करणार.. ये इकडे ये..” 


“ना.. ना... नाही.. मी नाही येणार.. तू कोण आहेस ते पहिला सांग.” पिल्लू जरा घाबरलेच होते बाप्पांना पाहून पण तरीही धाडस करून त्याने विचारले.मग हसतच गणपती बाप्पांनी उत्तर दिले..

“मी होय.. मी आहे गणेश... मला सगळे गणपती बाप्पा म्हणून बोलावतात.पण तू मला घाबरत का आहेस.मी म्हणालो ना.. मी तुला काही नाही करणार..”

   आता जरा पिल्लू धीट झाले आणि म्हणाले.

“तू या पाण्यात राहतोस का..?”

“नाही नाही... मी या पाण्यात नाही राहात मी कैलासवर राहतो.”

“हे कैलास कुठे आहे..?”
 
     यावर गणपती बाप्पा हसतच म्हणाले;
“ते बघ तिकडे.. तिकडे जे हिमालय पर्वत दिसत आहे ना.. मी तिथेच राहतो..”

“अच्छा... पण तू असा कसा वेगळा आहेस...?” बाप्पाचे ते रूप पाहून त्या पिल्लाला प्रश्न पडला.

“अरे मी असाच आहे..”

“मग तरीही तुला सगळे पसंद करतात का..?”

“हो तर.. मी सगळ्यांना आवडतो.. म्हणून ते मी येण्याची वाट पाहतात.. माझ्या आवडीचे पदार्थ बनवून ते माझे स्वागत करतात...”

“अरे वा... तुझी तर मजा आहे बुवा.. पण मला कुणी पसंदच करत नाही..!”  ते छोटेसे पिल्लू परत उदास होत म्हणाले.यावर बाप्पा म्हणाले;

“तुला सांगू का.. कोणी आपल्याला आपण कसे दिसतो.. यावरून पसंद नाही करत .ते आपल्याला आपण त्यांच्याशी किंवा इतरांशी कसे वागतो.. हे पाहून पसंद करतात.”

“म्हणजे बाप्पा मला नाही कळले..?”

“म्हणजे आपण कधी कोणाशी विनाकारण भांडण नाही काढायचे, सगळ्यांशी छान गोड बोलायचं.सगळ्यांना संकटकाळी मदत करायची.. मग आपोआपच सगळे आपल्याला पसंद करतात.”

“असे असतं का..? हम्म... बाप्पा मागे एकदा मी नदीच्या पाण्यात मस्त डुंबून मजा करून घरी येत होतो.. मला फारच गडबड होती..कारण मला भूकही खूप लागली होती आणि माझ्या आईने माझ्यासाठी खास पदार्थ बनविला होता.मी असाच हलत डुलत चाललो होतो तर मला अचानक टिंगळी मुंगीचा आवाज आला.. ती मदतीसाठी कोणाला तरी बोलावत होती..कारण ती पाय घसरून चिखलाच्या खड्ड्यात पडली होती.. पण मला तर जाम भूक लागली होती. आणि मी जर तिला चिखलात उतरून मदत केली असती तर माझे कपडे खराब झाले असते.. म्हणून मग मी तिथून निघून गेलो.म्हणजे मी तिला मदत नाही केली..”

“असे कधीही नाही करायचे.. जर त्या ठिकाणी तू चिखलात पडला असतास तर..? 

“बाप्पा खरंच माझे चुकले.. मी परत आता जर कोणी संकटात असेल तर त्यांना नक्की मदत करणार.”

“बघ.. करशील ना..”

“हो हो नक्कीच.”

“बरं चल आपण तुझ्या जंगलात फेरफटका मारू.. तू मला तुझे जंगल दाखव..”

“अरे वा... चल चल... मी तुला घेऊन जातो..”

   मग बाप्पा आणि ते उंदराचे पिटूकले जंगलाची मस्त मजेदार सफर करण्यासाठी बाहेर पडतात.ते जात असताना मध्येच गोपू अस्वल रडत बसलेले असते.मग ते पिल्लू त्या गोपी अस्वलाजवळ जाऊन विचारते;

“गोपी दादा... गोपी दादा काय झाले तुला रडायला...?”

“काय सांगू बाळा माझ्या पायात काटा घुसला आहे.. पण मला तो काढताच येत नाही आहे.. आं... माझा पाय खूप दुखत आहे.”

“थांब थांब तू हलू नकोस.. मी हळूच तुझ्या पायातील काटा काढून टाकतो.” 

   असे म्हणून ते पिल्लू गोपीच्या पायाला न दुखवता त्याच्या पायातील काटा काढून टाकते.आता गोपीला खूप बरे वाटते.

“धन्यवाद बाळा.. तू मला मदत केलीस.थांब मी तुला काहीतरी देतो. हे घे मध.. ताजा ताजा मध.”

“उं... मला गोड गोड मध खूपच आवडतो.”

     पिल्लू खूप खूष होते.. ते आजूबाजूला पाहते तर तिथे बाप्पा नसतो.. तो बाप्पांना शोधू लागतो..

“बाप्पा बाप्पा तू कुठे आहेस..?”

“अरे इकडे बघ.. मी या झाडाच्या पाठीमागे आहे.. तू खूप चांगले काम केलेस.मी तुझे काम पाहात होतो.”

“बाप्पा आता चल माझ्या घरी जाऊ.. आणि आपण खूप खेळू..”

     मग बाप्पा त्याच्या सोबत जाऊ लागतात.. त्याच्या घरी जात असता वाटेत त्यांना सुशी सश्याचा आवाज येतो.. आणि सोबत त्याच्या पिल्लांचा देखील.. ते उंदराचे पिल्लू आवाजाच्या दिशेने थोडे जवळ जाऊन पाहते.. तर सुशी ससा आणि त्याची पिल्लं एका जाळ्यात अडकून पडलेले असतात.ती पिल्लं खूप घाबरलेली असतात.कारण ते जाळे एका शिका-याने लावलेले असते.मग ते उंदराचे पिल्लू त्यांच्या जवळ जाऊन विचारते;

“अरे तुम्ही सगळे इथे कसे अडकला...?”

“आम्ही गाजर घेऊन आमच्या घरी जात होतो, पण वाटेतच शिका-याने जाळे लावले होते..आणि त्यावर गवत ठेवल्यामुळे जाळे आम्हाला काही दिसले नाही.आणि आम्ही त्यात अडकलो.. आता थोड्या वेळात शिकारी येईल आणि आम्हाला पकडून नेईल.हे जाळे खूप मोठे आहे..आम्हाला ते तोडता येत नाही आहे..”

“जरा वेळ थांबा.मी तुमची मदत करतो.मी जाळे तोडण्यासाठी काहीतरी घेऊन येतो.”

     ते पिल्लू जाळे तोडण्यासाठी इकडे तिकडे काहीतरी शोधू लागते.मग त्याच्या लक्षात येते की आपण बाप्पाला बोलावू.म्हणजे मग जाळे तोडता येईल.पण बाप्पा परत झाडामागे लपलेले असतात.

“बाप्पा बाप्पा लवकर ये.. आपण हे जाळे तोडून टाकू आणि सुशी सश्याची मदत करू.”

“नाही मी नाही येऊ शकत कारण मी फक्त तुलाच दिसतो.. पण तुला एक कल्पना सांगतो जाळे तोडण्याची.”

“कोणती कल्पना बाप्पा..?”

“तू ते जाळे तुझ्या तीष्ण दातांनी तोडून टाक.. बघू तुझ्या दातात किती ताकद आहे..”

“बाप्पा पण ते जाळे फार मोठे आहे.”

“तू प्रयत्न तर कर पहिला.. कदाचित जाळे तुटेल ही..”

     मग लगेचच ते पिल्लू धावत धावत सुशी सशापाशी पोहचते आणि जाळे तोडू लागते.खूप प्रयत्नानंतर थोडेसेच जाळे तुटते आणि एक छिद्र पडते.पण त्यातून फक्त सुशी सशाच्या पिल्लांनाच बाहेर येता येते कारण ते छिद्र फार छोटे असते.. मग सुशी सशाला वाचविण्यासाठी आपली सर्व ताकद लावून ते उंदराचे पिल्लू जाळे तोडू लागते.मग काही वेळाने जाळे तुटते आणि सुशी ससादेखील जाळ्यातून बाहेर पडतो आणि त्या उंदराच्या पिल्लाचे आभार मानतो.

“धन्यावद मित्रा.. आज तू नसतास तर शिका-याने आम्हाला बंदी बनवून नेले असते.ही घे तुला आमच्याकडून भेट.आम्ही आणलेली गाजरे..”

      उंदराचे पिल्लू गाजरे पाहून फार खूष होते, कारण त्याला गाजर खूप आवडत असतात.. सुशी ससा आणि त्याची पिल्लं निघून गेल्यावर बाप्पा आणि ते पिल्लू बोलत बोलत त्या पिल्लाच्या घरी जातात.आता ते पिल्लू खूप खूष असते कारण बाप्पा त्याच्या बरोबर रोज खेळत असतात.पण बाप्पा फक्त त्यालाच दिसत असतात.आता ते पिल्लू सगळ्यांशी आपणहून बोलत असते.त्यांना मदत करत असते.. त्यामुळे जंगलातील सगळे प्राणी, पक्षी त्याचे मित्र झालेले असतात.अगदी चीनमीन चिऊ, विंकी खारूटली आणि मोहन मोरदेखील.म्हणून ते पिल्लू आता आनंदी झालेले असते.आणि अचानक एक दिवस बाप्पा त्याला म्हणतात;

“आता माझी निघण्याची वेळ आली.. तू मला निरोप द्यायला येशील ना..?”

“तू.. तू कुठे चाललास मला सोडून..? मी नाही सोडणार तुला..”

“असे नाही म्हणायचे.. मी येणार आहे परत.. आणि आता तर तुला किती सारे नवीन मित्र मिळाले आहेत.मी नक्की तुला भेटायला येणार.आता तू तुझ्या नवीन मित्रांसोबत खेळ.”

   ते पिल्लू खूप उदास होते.पण त्याला बाप्पांना हसत हसत निरोप द्यायचा असतो.ते दोघे मिळून ososjosjtosjttosjtttosjtttnosjtttnnosjtttnosjtttosjtनदीकाठाला येतात.मग बाप्पा त्याला म्हणतात..

“मला तुझी ही जंगलाची सफर खूप खूप आवडली.मी परत इकडे नक्की येणार.मग आपण खूप मजा करू.. खूप खेळू.”

     ते पिल्लू बाप्पांना हात हलवून निरोप देत असते.बाप्पाही मग आता पुढच्या वर्षी मी लवकर येतो तुला भेटायला असे म्हणून कमळात बसून निघून जातात.. 

-सुचिता प्रसाद घोरपडे
कोथरूड
पुणे-३८