गंधाळलेला पाऊस Suchita Ghorpade द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गंधाळलेला पाऊस

गंधाळलेला पाऊस

         सारा भवताल नितळ सोनेरी किरणांनी झळाळून निघाला होता.त्याने धुक्याची जणू काही झिलईच पांघरली होती.उबदार दवांचे सुंदर प्रतिबिंब मनाच्या आरश्यात झिरपत होते.आभाळ विविध रंगानी सजलेले होते.हा श्रावण सोहळा पाहून  मन भरून ओसंडून वाहत होते.सारा परीसर हिरवाईने नटलेला, जशी डोंगरमाथ्याने हिरवी शालच पांघरावी.रिमझिम सरी जश्या बरसू लागल्या तसे या थेंबांच्या सुमधूर संगीताने सारी सृष्टीही डोलू लागली.

                     मन आज जरा जास्तच  आनंदात डोलत  होते, कारण या निसर्गांच्या रंगाबरोबर ते अजून एका रंगात रंगले होते.'प्रेमाचा रंग' जो माझ्यावर चढला होता.आज माझ्यासोबत कुणीतरी होते.कुणीतरी आपले फक्त आपले.आणि ती व्यक्ती होती माझी पत्नी. लग्न झाल्यावर चार पाच  दिवसांनी आज पहिल्यांदाच आम्ही असे एकटे बाहेर पडलो.तेही तिच्या माहेरी जाण्यासाठी.लग्न मग सत्यनारायण पुजा.कुलदेवतेचे दर्शन, पाहूणे, मित्र परीवार या सर्वांमधून फक्त नजरभेटच होत होती.पण आज कुणी नव्हते.खुप काही बोलायचे होते तिच्याशी. खुप काही सांगायचे,ऎकायचे होते.एकमेकांना समजून उमजून घेण्यासाठी ही एक संधीच आम्हाला मिळाली होती.

     तिच्याशी बोलावे म्हणून ओठावर शब्द आलेच होते.तोच परत मेघ बरसू लागले.बहुधा त्यांनाही तिच्याशी बोलायची घाई झाली होती.तिने हळूच काच खाली केली आणि त्या सरींना आपल्या ओंजळीत भरून गोंजारले.अगदी नशीबवान वाटले ते थेंब ज्यांना तिच्या ओंजळीचा सहवास लाभला.तिचे माझ्याकडे लक्ष जाताच तिने त्या थेंबाना अलगद खाली सोडले.मी विचारले,

   "तुला आवडतो का पाऊस?"
यावर ती मला म्हणाली,  
 "हो खूपच आवडतो.अगदी लहानपणापासूनच.आम्ही पावसाच्या पाण्यात होडया बनवून सोडायचो....."
  
     तिचे हे वाक्य अजून पुर्णही झाले नव्हते.तो रस्त्याच्या कडेला काही मुले पाण्यात कागदी नावा बनवून सोडत होती.ते पाहून तिच्या चेह-यावर स्मितहास्य आले.मी म्हटंले,

  "उतरायचं का खाली."
   यावर तिने मानेनचं होकार दिला.मी गाडी साईडला पार्क  केली आणि आम्हीही त्या मुलांबरोबर कागदी नावा बनवून सोडल्या पाण्यात. काही मुले चिखलाचे धरण बांधत होती.खरे तर आम्हीही  लहान असताना असे चिखलाचे धरण बांधायचो.त्यातून पाणी सोडण्यासाठी पपईचे पोकळ देठ घालायचो.मग त्यातून पाणी सोडायला खुप मजा यायची.नकळत दोघेही काही क्षण बालपणीच्या रम्य आठवणींमध्ये रमून गेलो.
     परत आमचा प्रवास चालू झाला.पावसातील मनमोहक  धुंद प्रवास आणि सोबतीला हवाहवासा सहवास.तसे थोडे बोलणेही चालू होते आमचे.तिच्या आवडीनिवडी बद्दल.तिला कविता करायला आवडतात हे जेव्हा कळाले तेव्हा नवलं वाटले.वाटले आपल्याला तिला अजून  जाणून घ्यावे लागेल.नाजूक कळीला हाताळावे आणि त्याचे सौंदर्य डोळ्यात साठवावे अगदी तसे.
   बाहेर पाऊस थोडा कमी झाला होता. त्यामुळे जेवणासाठी एका ढाब्यावर आम्ही थांबलो.बोलता बोलता कळाले की तिला तंदूर रोटी कशी बनवितात ते अश्या ढाब्यावर आल्यावर पहायचे होते पण कधीही ते तिने नाही पाहिले.मी विचारले,
 
   "तुला पहायचं आहे का?"   तेव्हा ती नको नको म्हणत असता मीच तिला मॅनेंजरला विचारून त्यांच्या तंदूर खान्यात घेवून गेलो.अगदी काळजीने तिने सगळे न्याहाळले.अशी एक छोटीशीच इच्छा काय,मला तर तिच्या सगळ्या इच्छा पुर्ण करायच्या होत्या.
        
         गाडीत आल्यावर मी सीडी प्लेअर लावला.मस्त सुमधूर गीतांची सीडी होती.पण तिला ही गाणी आवडतात की नाही हे विचारलेच नाही म्हणून मी गाणी बंद केली.तोच ती म्हणाली
   "राहू दया ना ही गाणी.बाहेर कोसळणारा पाऊस आणि अश्या गाण्यांचा सुरेल संगम झालाच आहे तर.ही गाणी मलाही खुप आवडतात.मी घरी असले आणि बाहेर असा मस्त कोसळणारा पाऊस असला की मी तासनतास् खिडकीत बसून त्यांचा आस्वाद घेते.मग मन अगदी प्रसन्न होते."      तिला असे मोकळे होताना पाहून माझेही मन प्रसन्न झाले होते.हळूहळू ती उलघडत चालली होती,तिच्याही नकळत.आणि तिचे हे फुललेले रुप मला पहायचे होते.आतापर्यत निम्मा रस्ता पार झाला होता.पण हा प्रवास असाच चालू रहावा असे वाटत होते.आणि गाणे चालू झाले,
रिमझिम रिमझिम, रूमझुम रूमझुम
भीगी भीगी रूत में, तुम हम, हम तुम
चलते हैं, चलते हैं
    
        मी तिच्याकडे हळूच पाहिले.आणि नजरानजर होताच ती अशी काय गोड लाजली की, की मी गाडी चालवत हेही विसरलो.पाऊस आता वाढला होता.त्यामुळे कुठेतरी थोडावेळ थांबावे लागणार होते.जवळच चहाची टपरी पाहिली.मी गाडी थांबविली.मस्त चहाचा आणि गरमागरम भजीचा वास सुटला होता.अश्या पावसाच्या मस्त वातावरणात अशी चहा भजीची साथ मिळाली तर क्या बात..       ती थोडा संकोच करत होती पण मीच म्हंटले, अगं एकदा खावून तर बघ.खरचं त्या अमृततुल्य चहाची एक वेगळीच नशा होती.आम्ही चहावाल्या मामांशी बोलताना कळाले की वाटेत एक यात्रा भरली आहे.जी खास पावसाळ्यातच भरते.पावसात त्याचा आनंद लुटण्यासाठी खुपजण येतात.थोडा वेळ होणार होता.पण तिला विचारून जायचे ठरविले.        
   
    अगदी भर पावसात ती यात्रा भरली होती.खूप नाही पण तुरळक गर्दी तर नक्की होती.वेगवेगळे खेळही होते.खेळ खेळताना इतकी धमाल मस्ती केली आम्ही, की काही क्षण विसरूनच गेलो की हे बालपण नाही आहे.पण त्याचमुळे तिच्या चेह-यावरचे खटयाळ हास्य पहायला मिळाले.किती अल्लड आहे ही.तिचा हाच अल्लडपणा डोळ्यात  साठवून ठेवत होतो.आम्ही एका गोल उंच पाळण्यामध्ये बसलो.खरे तर तिला या पाळण्याची खूप भिती वाटत होती पण मीच म्हंटले की मी आहे सोबत तर कशाला काळजी करतेस.पण जस जसा पाळणा वर जावू लागला तसे तिने डोळे अगदी गच्च मिटून घेतले.आणि माझा हात घटट पकडला.अगदी पहिल्यांदा मी तिचा हात माझ्या हातात घेतला.तिने माझ्याकडे पाहिले.
 
"आता नाही वाटणार तुला भिती,मी आहे ना तुझ्याजवळ."     
लहान बाळ जसे आईच्या कुशीत आश्वस्त असते अगदी तसे ती फक्त माझ्या आधाराने आश्वस्त झाली.सगळे खेळ खेळून झाले मग आम्ही तिथून निघालो.आणि पावसाला परत सुरूवात झाली.

      हा पावसाचा खेळ आमच्या प्रवासा बरोबरच चालू झाला होता.कधी त्याचे थांबणे तर कधी बरसणे चालूच होते.पण त्याच्या या खेळात आम्हालाही खूप मजा येत होती.गाडीच्या चाकातील हवा कमी झालीय असे वाटले म्हणून पाहिले तर गाडीचे एक चाक पंक्चर झाले होते.नशीब गाडीत अजून एक स्टेपनी होती.आता मलाच हे सगळे करावे लागणार होते.कारण जवळपास गॅरेज मिळणेही तसे कठीणच होते.मग सगळा टूल बॉक्स बाहेर काढला.सगळे नटस् सैल केले आणि नेमका एक नट घरंगळत चिखलात गेला.मी काढणार तोच तिने तो नट काढून दिला.तिचे मेहंदीचे हात चिखलाने माखले होते.बहुधा या चिखलालाही तिच्या हातावर मेहंदी रेखाटायचा मोह आवरला नाही.चाक बसविले मग दोघांनीही हात धुतले आणि गाडी चालू केली.
   
   आता संध्याकाळ होत चालली होती.लवकर पोहचणेही गरजेचे होते.कारण दोघांच्याही घरातून खूप वेळा फोन येऊन गेले होते.आजचा पुर्ण दिवस आम्ही एकत्र होतो.खूप सुंदर क्षण आम्ही एकत्र घालविले.आणि आता तिला तिच्या माहेरी सोडून परत उद्या निघावे लागणार होते.पण ह्या काही क्षणाच्या सहवासानंतर मला आता एक क्षणही तिच्यापासून दूर रहायचे नव्हते.कदाचित तिलाही असेच वाटत असावे.      आभाळ अंधारून गेले होते.काही वेळातच मुसळधार पावसाला सुरुवात होणार होती,पक्षी आपापल्या घरटयाकडे परतू लागलेले.वाराही खुप जोरात सुटला होता.तिने काच लावून घेतली.आणि अचानक विज चमकली,तशी ती इतकी घाबरली की तिने पटकन माझा हात पकडला.

"अरे ही किती घाबरते वीजेला."
  
     मी तिला धीर दिला.पण विजेला खरंच खूप घाबरायची.तिला पाऊस खुप आवडायचा पण विजेची खूप भिती वाटायची.
    
      आता मुसळधार पावसाला सुरूवात झाली होती.खुप मोठा पाऊस पडत होता.समोरचे रस्तेही नीट दिसत नव्हते.माझे बोट गाडीचे चाक बदलत असताना थोडे चिमटले होते.त्यामुळे स्टीयरींग पकडताना बोट थोडे दुखत होते.
 
  "प्लीज तुम्ही गाडी हळू चालवा.तुमचे बोटही दुखत आहे.आपल्याला थोडा वेळ झाला तरी चालेल.पण ..." 
  तिच्या या पण.. मध्ये मला माझ्याबद्दलची काळजी, प्रेम दिसले.जे सकाळपासून मी तिच्या डोळ्यात पहायचा प्रयत्न करत होतो.सोसाटयाचा वारा सुटला.काही क्षण गेले असतील आणि परत एकदा विजेचा कडक़डात झाला.दुस-या क्षणी ती मला बिलगली.आता तर खूपच घाबरली ती.मी गाडी थांबविली आणि तिला जवळ घेतले.

"अगं वेडाबाई,किती घाबरतेस.आणि तेही मी तुझ्या जवळ असताना."  

   मी जवळ असताना हे वाक्य ऎकताच ती बाजूला झाली.लाजेने तिने तिचे मुखकमल ओंजळीमध्ये लपविले.ती माझ्या अगदी  जवळ.किती अदभूत दृश्य.ज्याची मी फक्त कल्पनाच केली होती.पाऊस आणि मेघ गर्जनाही आता थांबल्या होत्या.तिचे घरही जवळ आले होते. आणि अचानक तिचे डोळे भरून आले.मी विचारले,

" सॉरी पण माझे काही चुकले का?प्लीज सांग ना तुझे डोळे असे का भरले?."

"नाही... असे काही नाही,पण उद्या तुम्ही मला माहेरी सोडून जाणार म्हणून....."    

     तिने आता अधिक काही बोलायची गरज राहिली नव्हती.ती न बोलता बरेच काही बोलून गेली.तिचे प्रेम उमगले होते मला.तिच्या गालावर ओघळणारे मोती मी माझ्या ओंजळीत भरून घेतले.माझ्यासाठी ते अनमोल होते.
           
      बाहेर पाऊस पूर्णपणे थांबला होता.आभाळही आता निरभ्र झाले.माझ्या आयुष्यातील हा गंधाळलेला पहिला पाऊस.ज्याने जाता जाता मला माझ्या अतूट प्रेमाची अनमोल भेट मिळवून दिली.
            
    
सुचिता प्रसाद घोरपडे