लघुकथा-
सुरेखा
---------------------------------------
बेल वाजली ,सुरेखाने दरवाजा उघडला,
बाहेर मनोज , तिचा नवरा उभा होता,
गुरुवारी ऑफिस टूरसाठी गेलेला ,आज शनिवारी घरी आला होता, उद्या रविवार नसता तर हा आला असता का?
मनोजला उभा पाहून ती स्तब्ध ,
आज याला आत घ्यायचे की नाही ?
तिच्या चेहेर्यावर होणारे फेरफार पाहून
तिच्या मनात घालमेल सुरु आहे ,
हे त्याने ओळखले,
आणि अगदी गयावया करीत, तिला हात जोडीत म्हणाला,
सुरेखा,प्लीज, घरात घे मला, विस्वास् ठेव तू तुझ्या नवऱ्यावर,
पुन्हा असे नाही होणार,मी बाहेर कुठे न थांबता मुक्कामी घरी येत जाईन, पक्का प्रॉमिस,
मनोज हॉलमध्ये खुर्चीवर बसत म्हणाला-
सुरेखा"-
कुणी काही म्हटले तरी विस्वास् ठेवू नको, फक्त माझ्यावर विस्वास ठेव ,
बाहेरचे लोक जळतात ग माझ्यावर, माझा वर्क स्पीड सक्सेस देखवत नाही त्यांना,
काही- पण खोटं पसरवतात माझ्या नि माझ्या लेडी कलीग बद्दल,
तुला पुन्हा सांगतो,
आमच्यात मैत्रीचं आहे फक्त, बाकी काही नाही,
मनोजच्या चेहेऱ्यावर अजीजी होती, याचना होती,त्याही पेक्षा,
त्याच्या शब्दात जादू होती, एक वेळ आईस्क्रीम विरघळण्यास जास्त वेळ लागेल, पण सुरेखाचे मन ,
ती लगेच विरघळते,आपल्या बाबतीत कधीच कठोर होऊ शकत नाही,
तिचे खूप प्रेम आहे आपल्यावर,
ती रागावू शकत नाही, उलट तर बोलूच शकत नाही आपल्याला,
तिचा विस्वास आहे आपल्या नवऱ्यावर,
मऊ स्वभावाची सुरेखा सगळ्यांना तसं ही नेहमी सांभाळूनच घेते,
आपल्याला काळजी करण्याची गरजच नाहीये,
सुरेखाबद्दलचे मनोजचे अंदाज आणि हिशेब नेहमीच अचूक असायचे,.
आज ही त्याचा अंदाज चुकला नाहीच,
सुरेखाने बाजूला होत मनोजला आत येऊ दिलेच की, मग काय आत एकदा आल्यावर
काहीच झाले नाही, अशा बेफिकीरपणे
मनोज बेडरूम मध्ये गेला, आतूनच त्याने सांगितले,
सुरेखा- काय सांगतो ते ऐक नीट,
आज टूर मध्येच माझं सगळं झालय,
मी खुप थकलोय, मी पडणार आहे, डिस्टर्ब जरून उठवायचे नाही",
आले ना लक्षात ?
काही न बोलता सुरेखाने किचन मधली आवराआवर केली, बेडरूम मध्ये डोकावले,
मनोज गाढ झोपी गेला होता, त्याच्या चेहेऱ्यावर तृप्तता झळकत होती,
" नवऱ्याच्या चेहेऱ्यावर अशी तृप्ती कधी असते" ?
बायको असलेल्या सुरेखाला क्षणात काय ते सगळे कळून आले",
तशी संतापाची तिडीक तिच्या डोक्यातून गेली,
दुसऱ्या क्षणी ती त्यांच्या बेडरूम मधून बाहेर पडली, बाजूला असलेल्या मुलांच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपली,
मनोजच्या वागण्याने तिला धक्का बसला होताच, आता तिरस्काराने तिचे मस्तक पार भणानुन गेले होते,
असे ढिलेपणाने, खचून जाणे चालणार नव्हते.
काही तरी करणे भाग होते आता..
तिच्या डोक्यात चक्र सुरु झाले..
म्हणजे, ऑफिस मधून बाहेर पडल्यावर,
टूर करून आल्यावर आता मनोज घरी न येता परस्पर तिकडे जाऊन मौजमजा करूनच मग इकडे येतो,
किती धाडस आहे त्याचं, ढोंगी नवऱ्याच्या रागाने तिचे मन थरथरत होते.
त्याचा स्वतःच्या हुशारीवर असणारा फाजील विस्वास् की
आपला भिडस्त स्वभाव, ?
मऊ स्वभावाची बायको कधीच कडकपणे वागू शकणार नाही" हे गृहीत धरूनच मनोज असे करतोय,
मनोजने फायदाच घेतलाय आपल्या चांगल्या स्वभावाचा,
नाही, नाही, हे थांबवलेच पाहिजे,
मनोज म्हणजे, "डोळे मिटून दूध पिणारा संधिसाधू बनेल बोका आहे ",
आपल्या भावनांशी खेळणे त्याला काहीच वाटत नाही,
त्याच्या लेखी आपण महामूर्ख आहोत,बावळट आहोत, काही केलं तरी तिला काय कळणार ?,
त्याच्या दृष्टीनं
सुरेखाला गुंडाळून ठेवणं सगळ्यात सोप्प
होतं,
खरचं, किती गृहीत धरलय आपल्या नवऱ्यानं आपल्याला,
सुरेखाला स्वतःचा राग आला, का आणि कशासाठी अशा बदफैली नवऱ्याला सहन करायचं,
उपाशी मरायची वेळ नक्कीच येणार नाही, घरासाठी सोडून दिलेली नोकरी, पुन्हा घरासाठी करावीच लागेल,
मनोज बद्दल बाहेर जे बोललं जातंय, ते खोटं नसणार,तथ्य असल्याशिवाय असं कोण कशाला बोलेल विनाकारण ?
आज ऑफिसमध्ये चर्चा सुरु आहे, उद्या जगाला कळेल,
घरावर, संसारवर, आपल्या मुलांवर किती विपरीत परिणाम होईल या गोष्टीचा?
गेल्या वर्षभरा पासून ऑफिस कामाच्या नावाखाली,आणि टूरच्या नावाखाली
घरापासून दूर राहतोय, त्याला पूर्वी सारखी घरी येण्याची ओढ राहिलेली नाही हे तिला जाणवत होते,
तसे तर काही गोष्टी तिच्या कानावर उडत उडत आल्या होत्या,
मनोजचे त्याच्या एका कलीग बरोबर अफेअर सुरू आहे',
बाहेर सगळ्यांना कळतंय ,आणि मिसेस मनोजला कसं काय कळत नसेल यातलं काही ?
असा कुतुहुल वाटावा असा प्रश्न सर्वांना पडत होता.
आणि आता मनोज घरापासून दूर दूर गेलाय,
बायको, मुलं, सगळं काही तो विसरून गेलाय,
असं कसं वागू शकलाय तो,
त्याला आपली किमंत नसेल उरली ,मग आपण तरी त्याला का धरून राहायचं?
विस्वासघात करून वर काहीच घडलेलं नाही असे बेदरकारपणे, उजळ माथ्याने राजरोस फिरतोय,
मनोजला त्याच्या कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे, ती भोगतांना त्याला कळेल,
आपल्या वागण्याने सुरेखाच्या मनाला किती यातना झाल्या असतील,
मनोज आज जिच्या सोबत आहे, तिची सोबत आकर्षणातून, गरजेपोटीची आहे,उद्याचे काय सांगावे ?
सुरेखाने शेजारी झोपलेल्या आपल्या लाडक्या मुलांकडे पाहिले, त्यांना घरावर आलेल्या त्सुनामी संकटाची काय कल्पना ?
सुरेखाने स्वतःची बॅग भरली, मुलांची बॅग भरली, आणि सकाळ उजाडण्याची वाट पाहू लागली,
दिवस उजाडला, जग व्यवहार सुरु झाले,सुरेखाचे जग मात्र ढवळून निघाले होते,
मुलं उठली, तिने सांगितले, आपण आता आज्जी आजोबांकडे जाणार आहोत, त्यामुळे शाळा नाही सध्या नसेल,
मी तसा निरोप पाठवते शाळेत, तुम्ही तयार व्हा, आपल्याला निघायचे लगेच..
आई, आपण आधी जाणार मग
बाबा नंतर येणार आहेत का तिकडे
आपल्याला घ्यायला ?
ते नंतर ठरेल , आधी आपण जाऊ या,
आई सांगेल तसं मुलं तयारीला लागली,
सुरेखाच्या नि मुलांच्या बोलण्याचा आवाज ऐकून मनोज बाहेर आला,
हॉल मध्ये गावाला जाण्याच्या तयारीत
बसलेल्या सुरेखा आणि मुलांना पाहून
मनोजला काहीच कळेना ,
काय झालं सुरेखा, काही फोन बिन आला का अचानक काही ?
ठीक आहे ना सगळं ?
त्यावर सुरेखा म्हणाली-
काही झालं नाही, सगळं ठीक आहे सगळीकडे,
फक्त इथंच बिघडून गेलय सगळं,
आम्ही इथून चाललो आहोत, का चाललो ?
हे मुलांच्या समोर आत्ताच सांगण्याची माझी इच्छा नाहीये,
कळेल त्यांनाही एक दिवस,
तुम्ही तर खूप हुशार, न सांगता कळेल तुम्हाला,मी का असे म्हणते ते ",
या पुढे आणि यानंतर मला, आम्हाला बोलण्याचा, बोलावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका तुम्ही,
बाईमाणूस घरातून बाहेर पडतांना कधीही ," जाते म्हणत नाहीत , येते म्हणतात,
मनोज- नीट ऐका, मी आज जाते आहे इथून .
येते म्हणत नाही..,
आणि म्हणणार नाही पुन्हा .
बाय ....
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लघुकथा- सुरेखा
ले- अरुण वि.देशपांडे-पुणे.
मो- 9850177342
-------------------------------------------------- ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------